घरमनोरंजनधडक जात वास्तवाला बगल

धडक जात वास्तवाला बगल

Subscribe

‘सैराट’मधले आर्ची, परशा पळून गेल्यावर परश्याच्या बापाला जातीबहिष्कृत करण्यासाठी बोलावलेली जात-पंचायत महाराष्ट्राच्या जातवास्तवाचे प्रतिनिधीत्व करते. ‘धडक’मध्ये हा विषय टाळला जातो.

सामाजिक आशयाच्या वास्तववादी कथानकाला व्यावसायिक कोनातून पडद्यावर साकारल्याचं ‘सैराट’ यश महाराष्ट्रानं पाहिलं, अनुभवलं. ‘सैराट’चंच कथानक असल्यानं ‘धडक’ पाहताना नागराजच्या कथेवर विसंबून राहण्याचा धोका ‘धडक’चा दिग्दर्शक शशांक खैताननं पत्करलेला नाही. त्यामुळे पटकथेवर जोर देणं आवश्यक होतं. देशातल्या हिंदी प्रेक्षकांना समोर ठेवून नेमकं तेच ‘धडक’मध्ये बर्‍यापैकी साध्य केलं आहे. पण त्यामुळे अनेक प्रसंगात गोंधळ उडतो.

मधुकरची गरिबी परशाच्या तुलनेत खूपच श्रीमंत वाटते. शिवाय पार्थवी आणि मधुकर पळून गेल्यानंतरचा त्यांचा जगण्याचा संघर्षही बेगडी वाटतो. ‘सैराट’मधले आर्ची, परशा पळून गेल्यावर परश्याच्या बापाला जातीबहिष्कृत करण्यासाठी बोलावलेली जात-पंचायत महाराष्ट्राच्या जातवास्तवाचे प्रतिनिधीत्व करते. ‘धडक’मध्ये हा विषय टाळला जातो. त्यामुळे त्याचा ‘सैराट’च्या तुलनेत सामाजिक परिणामही पडद्यावर येत नाही. सामाजिक जातवास्तवाचा सिनेमा की व्यावसायिक प्रेमकथा या द्वंद्वात अडकलेला ‘धडक’चा दिग्दर्शक प्रेमकथेला महत्त्व देतो. ‘सैराट’ आणि ‘धडक’ची तुलना होऊ शकत नाही.मात्र हेही खरं, की धडक पहायला थिएटरमध्ये जाणार्‍यांच्या डोक्यातून ‘सैराट’ बाजूला करणं कठिण असतं. त्यामुळे मराठी प्रेक्षकांचा कथेबाबत हिरमोड होऊ शकतो. सैराटचा अनुभव न घेतलेल्या हिंदीतल्या प्रेक्षकांना हा धोका नाही. ‘धडक’चा निर्माता करण जोहर असल्यानं त्याच्या मिळमिळीत श्रीमंती कथानकांच्या एनआरआय नायक-नायिकापटांत धडक बसणारा नाही. त्यामुळे तद्दन सामाजिक आणि व्यावसायिक पटातील मधोमध असलेल्या प्रेक्षकांना समोर ठेवून धडक बनवल्याचं पडद्यावर कॅमेर्‍याच्या पहिल्या फ्रेमपासून जाणवतं.

- Advertisement -

‘धडक’चं कथानक राजस्थानमधल्या गाववजा शहरात घडतं. त्यामुळे सैराटचे सामाजिक संदर्भ इथंही तसेच येतात. पण ते ‘सैराट’इतके आक्रमक किंवा थेट नसतात. केवळ जातवास्तवाची पार्श्वभूमी बदलल्याने चित्रीकरणाची स्थळे बदलतात, इथं ‘सैराट’ची पुरेपूर नक्कल धडकने केली आहे.

‘सैराट’मध्ये राजकारणाचा विषय हा जातवास्तवापेक्षा दुय्यम असतो.तर ‘धडक’मध्ये राजकीय महत्त्वाकांक्षा जातीय अहंकारापेक्षा मोठी होते. इथं आर्चीची पार्थवी होते आणि परशाचा मधुकर.तर इतर व्यक्तीरेखाही सांस्कृतिक पार्श्वभूमीनुसार बदलतात. ऑनर किलिंगच्या कित्येक घटना घडणार्‍या राजस्थानची पार्श्वभूमी कथानकासाठी असतानाही ‘धडक’चं जातवास्तव ‘सैराट’इतकं अंगावर येत नाही.

- Advertisement -

‘सैराट’मध्ये नागराजच्या डोक्यात आर्ची आणि परशा ही कॅरेक्टर्स फिट होती. त्यानंतर या कॅरेक्टर्सच्या जवळ जाणारे अ‍ॅक्टर त्याने रिंकू राजगुरु, आकाश ठोसर यांना महाराष्ट्रातल्या करमाळ्याजवळच्या सामान्य माणसांच्या वस्तीतून निवडले. शशांकला तशी सोय नव्हती.

‘सैराट’ आणि ‘फँड्री’त मातीचा गंध उतरवण्यात नागराज यशस्वी झाला.याचे कारण त्याचे पाय इथल्या मातीचेच होते. अजय-अतुल यांच्या संगीताची जादूही जोडीला होतीच. करण जोहर किंवा शशांककडून तशी अपेक्षा करता येत नाही. त्यामुळे मध्यंतरापूर्वीचा ‘धडक’ त्यानंतर काहीसा सैल होतो. व्यावसायिक चित्रपटाची गणितं वेगळी असतात. त्यामुळे प्रेक्षकांना जे आवडतं ते द्यायचा प्रयत्न ‘धडक’मध्येही होतो. पण दिग्दर्शकाकडून हा प्रयत्न टाळताना पटकथेची दमछाक होते.

‘सैराट’ पाहताना एक भितीची लकेर शेवटपर्यंत प्रेक्षकांची सोबत करते. ही भीती ‘धडक’मध्येही कायम आहे. श्रीदेवीचा हळवा आवाज आणि सशक्त अभिनय आत्मसात करण्याचा जान्हवीचा प्रयत्न कौतुकास्पद आहे. ‘धडक’ बनवताना दिग्दर्शकाची ती मर्यादाही चित्रीकरणातून समोर येते. लंगडा आणि सल्या या व्यक्तीरेखांना ‘सैराट’मध्ये स्वतंत्र ओळख होती. तशी ‘धडक’मध्ये नाही. ग्रामीण जीवनातलं अहंकारी जातवास्तव असलेल्या प्रिन्सच्या सूरज पवारची दहशत नागराजने विद्रोही कविता आणि तुकारामाच्या अभंगाच्या संदर्भातून साकारली होती. तो परिणाम ‘धडक’मध्ये नाही. इथं प्रिन्स अक्षरश: वाया घालवला आहे. एक स्वतंत्र कलाकृती म्हणून धडक सिनेमा ‘सैराट’ डोक्यातून बाजूला काढून पहायला हवा.पण ते मराठी प्रेक्षकांना शक्य नाही.

(लेखक ‘आपलं महानगर’चे प्रतिनिधी आहेत)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -