घरमनोरंजनवास्तवाची जाणीव करून देणारा - लेथ जोशी!

वास्तवाची जाणीव करून देणारा – लेथ जोशी!

Subscribe

३५ वर्ष ज्या मशिनवर काम केलं ते मशिन नोकरी गेल्यानंतर विकत घेऊन आपण एखादा व्यवसाय सुरू करावा, अशी इच्छा जोशींची असते. त्यासाठी ते खूप प्रयत्न करातात. ऑटोमेशनच्या काळात लेथ मशिन कालबाह्य आहे हे समजण्याची मानसिकता लेथ जोशींची नाही. लेथ जोशी ते मशिन विकत घेणार का? त्यांच्या आयुष्यात काय घडतं? हे कळण्यासाठी तुम्हाला लेथ जोशी बघावाच लागेल.

काळ खूप पुढे गेला आहे. विज्ञानाशी, नवीन तंत्रज्ञानाशी जुळवून घेत येणं आता गरजेचं आहे. नाहीतर तुम्ही या स्पर्धेच्या बाहेर फेकले जाल. त्यामुळे तुम्हाला काळाबरोबर बदलणं आता अनिवार्य आहे. ‘लेथ जोशी’ या चित्रपटातून हाच विषय हाताळण्यात आला आहे. अनेक ठिकाणी बदलत्या तंत्रज्ञानामुळे कंपनीतून कामगारांना कमी केलं किंवा काढून टाकलं अशा घटना आपल्या कानावर येत असतात. याच आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टी लेखक-दिग्दर्शक मंगेश जोशी यांनी ‘लेथ जोशी’ उत्तमरीत्या प्रेक्षकांसमोर मांडल्या आहेत. जोशी (चित्तरंजन गिरी) यांची कंपनी बंद पडते हे चित्रपटाच्या सुरूवातीलाच कळतं. गेली ३५ वर्ष आपल्या लेथ मशीनवर काम करणाऱ्या जोशींना मशिनबद्दल वाटणारी आपुलकी वेळोवेळी चित्रपटातून जाणवते. आपल्या लेथ मशीनवर जिवापाड प्रेम करणाऱ्या जोशींची ही कथा.

जोशींबरोबरच त्यांच्या जुन्या घरात त्यांचा मुलगा दिनू (ओम भुतकर), आई(सेवा चौहान) आणि पत्नी (अश्विनी गिरी) राहात असतात. त्यांची पत्नी जेवणाच्या ऑर्डर्स घेत असते. तर मुलगा दिनू हा लॅपटॉप, कॉम्प्युटर हार्डवेअर दुरुस्तीचं काम करत असतो. काळाप्रमाणे घरातील प्रत्येक गोष्ट बदलत असते. जोशी यांची पत्नी ग्राहकांच्या जेवणासाठी अगदी चायनीजची ऑर्डर देखील स्विकारते. घरातील पुरणाचं यंत्र जाऊन त्याजागी फूडप्रोसेसर येतो, आईचा नवीन हेअर कट अशा छोट्या छोट्या गोष्टी कालानुरूप होणारा बदल प्रेक्षकांपर्यंत पोहोचवतो. घरातील प्रत्येकजण काळाशी जुळवून घेत असतो. आपल्या कामात प्रगती करत असतो. मात्र जोशी हा बदल स्वीकारायला तयार नसतात.

- Advertisement -

नोकरी गेल्यानंतरही जोशी यांचा जीव त्या मशिनमध्ये अडकलेला असतो. आजूबाजूला होणारे बदल त्यांना दिसत असतात पण ती बदलण्याची तयारी त्यांची तयारी नसते. दुसरीकडे पडेल ते काम करण्याची तयारी ही ते दाखवत नाहीत. ३५ वर्ष ज्या मशिनवर काम केलं ते मशिन नोकरी गेल्यानंतर विकत घेऊन आपण एखादा व्यवसाय सुरू करावा, अशी इच्छा जोशींची असते. त्यासाठी ते खूप प्रयत्न करातात. ऑटोमेशनच्या काळात लेथ मशिन कालबाह्य आहे हे समजण्याची मानसिकता लेथ जोशींची नाही. लेथ जोशी ते मशिन विकत घेणार का? त्यांच्या आयुष्यात काय घडतं? हे कळण्यासाठी तुम्हाला लेथ जोशी बघावाच लागेल.

चित्रपटाला वेग नसला तरी चित्रपटातील अश्विनी गिरी, चित्तरंजन गिरी, ओम भुतकर यांच्या  उत्कृष्ट अभिनयामुळे तुम्हाला कंटाळा येत नाही. नोकरी गेल्यानंतर  जोशी यांची मानसिक स्थिती चित्तरंजन गिरी यांच्या देहबोलीतूनच प्रेक्षकांपर्यंत पोहोचते. वरवर जरी हे पात्र मठ्ठ दिसत असलं, तरी आत चाललेली घालमेल कळते. त्याचबरोबर चित्रपटातील आंधळ्या आजीचं पात्रही कथेला वेगळी ताकद देऊन जातं. काळानुसार बदल स्वीकारण्याची तयारी तिच्या वागण्यातूनही दिसते. तिचा काळा चष्मा वर्तमानकाळातही भविष्य बघतो. त्याचबरोबर ओम भुतकर, अश्विनी गिरी यांची पात्र लक्षात राहतात.

- Advertisement -

चित्रपट भावण्यामागे सगळ्यात मोठा वाटा आहे तो लेखक-दिग्दर्शक मंगेश जोशी यांचा! चित्रपटातील अनेक प्रसंग आपल्याला दिग्दर्शक उलगडून सांगत नाही. ते आपोआप आपल्याला उमगत जातात. आपल्या आसपास घडणारी कथा दिग्दर्शकाने उत्तमरीत्या पडद्यावर उतरवली आहे. चित्रपटात फार संवाद पात्रांच्या तोंडी नाहीत. पण पात्रांच्या दमदार अभिनयामुळे आणि देहबोलीमुळे त्या प्रसंगातून काय सांगायचे आहे ते कळते. त्याचबरोबर उत्तम जमून आलेलं पार्श्वसंगीत ही खरी या चित्रपटाची जमेची बाजू आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
काळ खूप पुढे गेला आहे. विज्ञानाशी, नवीन तंत्रज्ञानाशी जुळवून घेत येणं आता गरजेचं आहे. नाहीतर तुम्ही या स्पर्धेच्या बाहेर फेकले जाल. त्यामुळे तुम्हाला काळाबरोबर बदलणं आता अनिवार्य आहे. ‘लेथ जोशी’ या चित्रपटातून हाच विषय हाताळण्यात आला आहे. अनेक ठिकाणी बदलत्या तंत्रज्ञानामुळे कंपनीतून कामगारांना कमी केलं किंवा...वास्तवाची जाणीव करून देणारा - लेथ जोशी!