घरमनोरंजन'पियानो फॉर सेल’ अ‍ॅण्टीक पीस

‘पियानो फॉर सेल’ अ‍ॅण्टीक पीस

Subscribe

मराठी रंगभूमीपासून दुरावलेले अनेक कलाकार पुन्हा रंगमंचासाठी तयार झालेले आहेत. सतीश राजवाडे, मकरंद देशपांडे यांच्याबरोबर वर्षा उसगांवकर, किशोरी शहाणे-वीज नाटक करण्यासाठीत तयार झालेल्या आहेत. वर्षा आणि किशोरी यांच्याबाबतीत सांगायचे झाले तर त्यांचा सुरवातीचा प्रवास हा नाटकातून झाला. पुढे त्यांनी चित्रपटात काम करायला सुरू केले. कितीतरी चित्रपटांत नायिका म्हणून आपला प्रभाव दाखवला. इतकेच काय तर हिंदीतही त्यांनी आपली मोहोर उमटवलेली आहे. कामाच्या व्यापामुळे नाटक करणे त्यांना काही जमले नाही.

आशिष कुलकर्णी या लेखकाने हा योग ‘पियानो फॉर सेल’ या नाटकाच्या निमित्ताने घडवून आणलेला आहे. मूळ लेखक मेहेर पेस्तोनजी हे आहेत. या नाटकाचे इंग्रजी प्रयोग झालेले आहेत. जी नाटके गुजराती, हिंदी, इंग्रजी रंगमंचावर गाजली त्याचे बर्‍याचवेळा मराठी रंगभूमीवर स्वागत झालेले आहे. तोच काहीसा प्रयत्न ‘पियानो फॉर सेल’ या नाटकाच्याबाबतीत झालेला आहे. डिजिटल डिटॉक्स् आणि व्ही. आर. प्रॉडक्शन यांनी या नाटकाची निर्मिती केली असून त्याचे भाषांतरीत लेखन, वर्षा-किशोरी यांचा अभिनय, सुरेल संगीत या सार्‍या गोष्टी लक्षात घेता ‘पियानो फॉर सेल’ हा अ‍ॅण्टीक पीस म्हणावा लागेल.

- Advertisement -

अनिता-शीला या दोघी अमित नावाच्या एका नवर्‍याच्या दोन बायका. अमित तसा श्रीमंत पण दोन्ही स्त्रियांकडे बघण्याचा त्याचा उद्देश हा वेगवेगळा. अनिता ही त्याच्यासाठी सौंदर्यवती होती तर शीलाकडे तो व्यवहारी व्यक्तीमत्त्व म्हणून पहात होता. त्यातूनही या अमितने संसार थाटला तो अनिताबरोबर. त्याचे दु:ख शीलाला अधिक झालेले आहे. अमित प्रत्यक्ष नाटकात दिसत नाही. त्यामुळे अनिता आणि शीला यांना नजरेसमोर ठेवून लेखकाने हे द्विपात्री नाटक लिहिलेले आहे. शीलाने घर विकायला काढलेले आहे. जुना, संग्रही ठेवावा असा पियानो तिच्यासाठी अडगळ ठरत आहे. तो विकला जावा यासाठी तिने जाहिरात दिलेली आहे. हा पियानो जी स्त्री विकत घेण्याची तयारी दाखवते ती म्हणजे अनिता असते जी शीलाची सवत आहे. शीला मागेल ती रक्कम अनिता द्यायला तयार होते, त्यामुळे त्यांचे एकत्र भेटणे होते. यात आठवणी जागवल्या जातात, एकमेकींमधील राग, द्वेष व्यक्त केला जातो. अमित माझा कसा हे दोघीही ठामपणे सांगण्याचा प्रयत्न करतात. एक दु:खाने व्याकूळ होते, तर दुसरी मुक्तपणे जगण्याची तयारी दाखवते. या सार्‍या गोष्टी लेखकाने संवादात गुंफलेल्या आहेत. त्यांचे व्यक्त होणे म्हणजेच ‘पियानो फॉर सेल’ हे नाटक सांगता येईल. याची निर्मिती चैतन्य गिरीष आकोलकर याने केलेली आहे.

मराठी नाटकाचा प्रेक्षक हा थोडा चोखंदळ आहे. लेखक, दिग्दर्शक, संस्था यांचे नाटकातील योगदान लक्षात घेऊन ते नाटक पाहणे पसंत करतात. पण ‘पियानो फॉर सेल’ या नाटकात वर्षा उसगांवकर आणि किशोरी शहाणे-वीज या अभिनेत्री काम करत असल्यामुळे चौकस राहणे तूर्तास थांबते. त्याचे कारण म्हणजे यापूर्वी या दोघींनी नाटकात केलेले काम आणि चित्रपटातील त्यांचे योगदान हे सांगता येईल. वर्षाने यात अनिताची व्यक्तीरेखा साकार केलेली आहे, तर किशोरी ही शीलाच्या व्यक्तीरेखेत पहायला मिळते. तिरस्कार, घालमेल, स्वाभिमान या सार्‍या गोष्टी अभिनयात डोकावतील असे या दोघींनी आपल्या भूमिकेत पाहिलेले आहे. नेपथ्य, संगीत, प्रकाश योजना ही या नाटकाची गरज असली तरी यातला संवाद हा या नाटकाचा महत्त्वाचा गाभा आहे जो शब्दातून व्यक्त करताना अभिनयही तेवढ्याच प्रभावीपणे होणे गरजेचे आहे. ही किमया या दोन्ही अभिनेत्रींनी उत्तमपणे सांभाळलेली आहे. देव घोष, एकनाथ राणे(नेपथ्य), योगेश खडीकर, मुकेश परमार(पार्श्वसंगीत), आशिष कुलकर्णी(प्रकाश योजना) यांनी तांत्रिकदृष्ट्या नाटक उत्तम होईल हे पाहिलेले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -