घरफिचर्सजपान.. तोडलंस भावा!

जपान.. तोडलंस भावा!

Subscribe

फुटबॉलवर्ल्ड कप सामन्यातून बेल्जियमविरूद्ध झालेल्या सामन्यात पराजयाने जपानला या खेळातून बाहेर पडावं लागलं. परंतु अपयशानंतरही सामाजिक जबाबदारीचे जे भान त्यांनी दाखवले त्यातून हरूनही एक नवइतिहास कसा रचता येतो, याचा आदर्श जपानने जगापुढे ठेवला आणि अवघे क्रीडाजगत अचंबित झाले

रेणुका खोत

फुटबॉल वर्ल्डकप सामन्यातून बेल्जियमविरूद्ध झालेल्या सामन्यात पराजयाने जपानला या खेळातून बाहेर पडावं लागलं. परंतु अपयशानंतरही सामाजिक जबाबदारीचे जे भान त्यांनी दाखवले त्यातून हरूनही एक नवइतिहास कसा रचता येतो, याचा आदर्श जपानने जगापुढे ठेवला आणि अवघे क्रीडाजगत अचंबित झाले.अगदी आपल्या भाषेत बोलायचं झालं तर ‘तोडलंस भावा…’

- Advertisement -

फुटबॉल व क्रिकेट या दोन खेळांसाठी रसिक किती वेडे असतात आणि त्या वेडापोटी ते काय कृत्य करतात याच्या चर्चा जगभरात तिखटमीठ, कांदालसूण लावून चघळल्या जातात. जय वा पराजय अलाहिदा..! गोंधळ हुल्लडबाजी हल्लागुल्ल्याचे आयटम केल्याशिवाय सेलिब्रेशन केलं किंवा शांतपणे शोक व्यक्त केला तर क्रीडाप्रेमींचा इज्जतपापड करपतोच जणू. सच्चा क्रीडाप्रेमी हा जरा लाऊडच असावा असं म्हणे! तसे नसल्यास त्याचे खेळप्रेम, भक्तीगंजलेले आहे का, अशा शंकाही येऊ लागतात. नैराश्यप्रदर्शन वा यशजल्लोष साजरा करण्यासाठी ढणाढणा आवाज, बोंबाबोंबयुक्त गाजावाजा करण्यावर आपल्याकडे पैल्यापास्ना भर बाब्बा. अशात जपानच्या फुटबॉल संघाकडून व त्यांच्या चाहत्यांकडून मात्र एक वेगळीच कृती घडली जी आदर्श व अनुकरणीय आहे.

वर्ल्डकपसारख्या सामन्यातील पराजयक्षण खेळाडू व चाहत्यांसाठी दु:खदायक असतात. अशा दारूण पराभवानंतरही जपान संघाचे आज जगभरात कौतुक होत असून त्यांच्या खिलाडू वृत्तीची सर्वत्र तोंडभरून स्तुती होतेय. विषय तसा भारतीयांसाठी नवा आहे. कदाचित अपरिचितच म्हणता येईल. स्वच्छता. नया है यह!

- Advertisement -

पराभवानंतर खेळाडूंनीच काय तर स्टेडियममध्ये जमलेल्या प्रेक्षकांनी आपले नैराश्य बाजूला ठेवले. खेळाडूंनी त्यांच्या चाहत्यांना वाकून अभिवादन केलेच आणि त्यानंतर सारे लागले झटझट कामाला. पराभवाने खचून न जाता त्याच स्थितीत पुढील मार्ग शोधणे हे एका योद्धयाचे, उत्तम खेळाडूचे, एका सर्वगुणसंपन्न व्यक्तिमत्वाचे प्रतीक आहे. हा सामन्यांचा यजमान देश रशियासाठी जपानच्या खेळाडूंनी कृतज्ञता व्यक्त करणारा, आभार मानणारा संदेश लिहून ठेवला. त्यानंतर खेळाडूंनी त्यांची लॉकर रूम अशापद्धतीने आवरली की त्यांचे तिथे काही सामान होते हेही ओळखू न यावे. ‘स्पॉटलेस रूम’ ज्याला म्हणतात तशी ती जागा दिसत होती. तर दुसरीकडे पराभव झाला म्हणून खेळ संपण्याच्याआधीच मैदान सोडून पळून जाणे, जाळपोळ करणे, स्टेडियमची नासधूस करणे, झेंडे जाळणे, मारामार्‍या करणे असा कोणताही प्रकार जपान संघाच्या चाहत्यांनी केला नाही.

चाहत्यांनी स्टेडियममध्ये थांबून एक अनोखा प्रकार केला. अनोखाच म्हणायला हवा. कारण आपल्याला याअशा गोष्टींचे ना महत्त्व कळते ना कळूनही ते आपण आचरणात आणतो. या क्रीडारसिकांनी प्रेक्षक बसतात ती सारी जागा..अख्खे स्टेडियम पिंजून काढत तिथे पडलेला सर्व कचरा उचलला.सारे स्टेडियम स्वच्छ केले आणि खेळादरम्यान प्रेक्षकांकडून खुर्च्यांखाली व चालण्याफिरण्याच्या जागेत पडलेला कचरा पिशव्यांमध्ये भरला.

माणसाचे व्यक्तिमत्व संस्कार, संस्कृतीदर्शन याअशा घटनांमधून दिसत असते. मोठ्यात मोठं संकट, पराभव वा कोणत्याही भीषण परिस्थितीत कच न खाता आपण कसं धीरानं उभं रहायला हवं, याचा आदर्श या घटनेतून जपानने सर्वांसमक्ष ठेवला. अणुबॉम्ब हल्ला असो, त्सुनामीने माजवलेला हाहा:कार असो जपान ढासळले; पण डगमगले नाही.

आपल्याकडे मात्र खेळाडू हरायला लागले की त्यांना शिवीगाळ करणे, त्यांना नाहीनाही ते बोलणे, त्यांच्या घरांवर दगडफेक करणे, स्टेडियममध्ये घाण करणे, त्याची उलथापालथ, नासधूस, जाळपोळ करणे हे नित्याचे झालेले आहे. मनातली भडास अशी बाहेर काढायची आणि त्याला भावूक होणे म्हणायचे याची आपल्याला सवय लागलेली आहे. ही आपल्या भारत देशाची संस्कृती आहे का, असा प्रश्न पडतो. आपल्यात खिलाडूवृती आहे का? खेळाचे मैदानच का?या बीभत्स वृत्तीचे दर्शन तर जागोजागी होते. अगदी साध्या लग्न समारंभात आलेली पाहुणे मंडळी मंडपात आसपास वाट्टेल तशी घाण करतात.आपले पर्यटक तर महानच. डोंगरदर्‍या, हिरवळ, फुलांची मैदानं, समुद्र, नद्या जिथे जातील तिथे आपल्या बापाची जागीर असल्यासारखा हगरडगुत्ता सुरू. जिथे तिथे घाण, कचरा फेकणं आणि बर्बाद करणं याने आपण आबाद होत असतो? याची काही लाजकाज.. छे..

महाराष्ट्रातल्या तर कित्येक लहानमोठ्या टेकड्या, मुंबईच्या आसपासचे अनेक हिरवेगार पट्टे हे कचर्‍याचे डम्पिंगग्राऊंड झालेले आहेत. आपल्याकडे जमिनी कशा घशात घालायच्या याकडे लक्ष असते. पण पर्यावरणाला आपणही काही देणे लागतो, आपले दुसर्‍या नागरिकांप्रतीही काही सामाजिक जबाबदारी आहे याबाबत अनास्थाच जागोजागी दिसते.

दारातले बघितले आता घराच्याआत वळूया. घरातल्या बाईने म्हणजे बायको, आई, मुलगी किंवा कामवाली बाई यांनी कचरा उचलला नाही तर चहाचा रिकामा कपही जिथल्या तिथे तसाच बरबट्ट ठेऊन देण्याची आपली गोड संस्कृती आहे हो. जपानमध्ये स्वच्छता आणि नीटनेटकेपणा याचे फार महत्त्व आहे. लहानपणापासूनच स्वच्छता, स्वावलंबन, स्वयंपूर्णतेवर भर दिला जातो. त्यामुळे हेच गुण अंगवळणी पडल्याने असे साफसफाईचे कोणतेही काम करण्यात त्यांना कमीपणा वाटत नाही. आश्चर्य म्हणजे ही कामे करण्याची लाज तिथल्या पुरुषांनाही वाटत नाही. ऐकावे ते नवलच. आपल्याकडे मात्र अनेक घराघरांत पुरूष बाळंतिणीसारखे खाऊनपिऊन आडवे पडलेले असतात. जेवणाचे ताट पुढे ढकलायचे आणि निघून जायचे. बायकोने आईने केलेला स्वयंपाक आवडला नाही की ताट फेकून द्यायचे.

पुरूषच काय कैक स्त्रियाही गचाळ आणि गलिच्छ अरारा रा.. थोबाडावर मेकअप आणि सार्वजनिक ठिकाणी या महिला मैला पसरवण्यात एक नंबर. लघवीला गेल्यावर टॉयलेट पॉटवरचे झाकण जरा पाण्याचा स्प्रे मारून स्वच्छ करायला यांचे हात झिजतात. आपल्या पिवळट्ट सूसूच्या ठिबकसिंचनाचे थेंब धुऊन टाकत संडासच्या भांड्याचे झाकण साधे वर करून ठेवण्याची अक्कल गहाण टाकलेल्या स्त्रिया मुंबईतल्या पॉश मॉलमध्ये दिसतील. जागोजागी कचरापेट्या असल्या तरीही आपल्याला रस्त्यावर, रस्त्याच्या बाजूला कचरा टाकण्यात सारेपटाईत. त्यात काय एवढं… बसं इतक्याशाकचर्‍याने काय होणार.. ही वृत्ती.

अगदी नात्यांमध्येही हाच कचरा आपण भारतीय करतो. नाती सडवणं, कुजवणं, चिघळवणं यात जास्त रस. नाती तुटल्यानंतरही जी काही भावनिक मोडतोड होते त्यात खचलेल्या माणसांची जरा विचारपूस करण्याचेही धारिष्ठ्यही किती जणांमध्ये असते? आपला अहंकार हा भौतिक आणि भावनिक अशा सर्वच प्रकारचा दिसणारा व न दिसणारा कचरा साफ करण्याच्या आड येतो. स्वच्छता करणं ही कुण्या एकट्याची जबाबदारी नाही. ती प्रत्येकाची आहे. अगदी थोडंफार काम करू शकणार्‍या लहान मुलाचीसुद्धा. पण लक्षात कोण घेतं?

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -