घरफिचर्समाझी माय, मुंबई माय आम्हाला माफ कर!

माझी माय, मुंबई माय आम्हाला माफ कर!

Subscribe

खूप भयंकर परिस्थिती आहे. धड गाव नाही, धड मुंबई नाही. करोनासारख्या महामारीमुळे उद्या किती जणांच्या नोकर्‍या राहतील, याची काही खात्री नाही. २००५ साली मुंबई पाण्या-खाली गेली होती तेव्हा आपल्याला सगळ्यांना तिने इशारा दिला होता. आता करोनाने नवा धडा शिकवायला घेतला आहे. आज मरत नाही म्हणून आपण जगतो आहोत, कशाचा काही भरवसा नाही. माझी माय, माझी मुंबई अत्याचार सहन करून आता लुळी पांगळी झाली आहे. वाढणार्‍या झोपड्या, नष्ट होत चाललेली तिवरांची झाडे, बुजत निघालेल्या खाड्या, एखाद्या बॉम्बच्या टोकावर असल्यासारखे प्रदूषण, प्रचंड गर्दी, घुसमटणारा श्वास... मुंबईने आता किती अत्याचार सहन करायचा... तिची सहनशक्ती संपली आहे. माझी माय, मुंबई माय आम्हाला मला माफ कर!

ज्या मुंबईने तुम्हा आम्हाला जगवले, आता जगवतेय आणि पुढेही जगवत राहील, ती माझी माय, मुंबई माय आता कोणाला नकोशी झालीय… ज्याला त्याला येथून पळून जायचे आहे. जीव वाचवण्यासाठी. मुंबईला वार्‍यावर सोडून! करोनाने हे दिवस मुंबईला दाखवले ते बरे केले. स्वार्थी माणसांचे चेहरे उघडे पडले. ही पळून जाणारी माणसे एका बाजूला, तर दुसरीकडे गावाला येऊ नका, अशीही सांगणारी माणसे दुसर्‍या बाजूला. आता त्यांना मुंबईकर नको आहेत. मरणाचे भय इतके भयानक आहे की रक्ताची माणसे एकमेकांपासून दूर गेलीत… करोनाने मेलेल्या बापाच्या प्रेताला हात लावायला करोनाबाधित मुलगा तयार नाही. दादरची घटना ताजी आहे. घरात बापा मुलाची कडाक्याची भांडणं झाली की माझ्या प्रेतालासुद्धा हात लावू नको, म्युन्सिपालटी मला घेऊन जाईल आणि जाळेल, असे बर्‍याचवेळा ऐकले आहे. ते आता प्रत्यक्षात बघायला मिळत आहे. कोकणातील माणसे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून कळवत आहेत की मुंबईकरांना गावाला पाठवू नका… तिकडे ते मेले तरी चालतील, पण इकडे नको. आम्हाला जगायचे आहे. मुंबईकडून देवळे बांधायला पैसे हवे आहेत, आजारी माणूस पडला की त्याला बरा करायला घेऊन जायला मुंबई हवी आहे, नोकरीसाठी मुंबई हवी आहे, गावच्या मुलाबाळांना आसरा द्यायला मुंबई हवी आहे, मुंबईचे पैसे हवे आहेत, पण आता मुंबईवाले नको आहेत. तुम्ही मरा, आम्ही जगतो हा प्रकार म्हणजे प्रख्यात नाटककार विजय तेंडुलकर यांच्या ‘गिधाडे’ या नाटकातील हिंस्त्र माणसाचे हे खरे चेहरे आहेत… लोभ, माया, मत्सराने माणसांची गिधाडे होऊन मुलगा बापाच्या जीवावर, मुलगी आईच्या मरणावर, भाऊ बहिणीला संपवायला निघाल्याचे भयानक वास्तव त्या नाटकात होते. आज करोनाने ते जग दाखवले.

कोकणापेक्षा उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेशची माणसे बरी म्हणायची. आमच्या माणसांना घरी पाठवा, पुढचे पुढे बघू… जगलो तर त्यांच्याबरोबर, मेलो तर त्यांच्या साथीने. त्यांची सरकारेसुद्धा त्यांच्या बरोबर आहेत. त्यांना घेऊन जायला तयार झाली. १४ दिवस विलगीकरण करून त्यांना घरी पाठवले जाईल तेव्हा त्यांना घरी घ्यायला त्यांची माणसे आतुर झालीत आणि इकडे मुंबई, पुणे, ठाणे येथे पोट भरायला गेलेले चाकरमानी आले तर त्यांना १४ दिवस नाही तर २८ दिवस घराच्या बाहेर ठेवणार…मोगलाई लागून गेली आहे. सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकारी मंजुलक्ष्मी यांचा हा निर्णय म्हणजे बेबंदशाही झाली. पुर्‍या भारतात असा कोणी निर्णय घेतल्याचे ऐकिवात नाही. उद्धव ठाकरे सरकार चिडीचूप. पालकमंत्री उदय सामंत, अनिल परब, आदिती तटकरे गप्प. आज २२ हजार चाकरमानी गावाला अडकून पडले आहेत आणि लाखो मुंबई, पुणे, ठाणे आणि नाशिकमध्ये गावाला जायची वाट बघत आहेत. होळीनिमित्त गावाला गेलेल्या २२,००० कोकणवासियांना आज मुंबईत मुलांकडे जाता येत नाही आणि मुलांना आपल्या वयस्कर आई-बाबांना बघायला गावाकडे जाता येत नाही. मोठे त्रांगडे होऊन बसले आहे. पण, सरकार काहीच हालचाल करत नाही. सरकारने एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की करोना किती वेळ चालणार आहे हे कोणालाच माहीत नाही, म्हणूनच त्यामधून मार्ग काढायला हवा. उत्तर प्रदेश आणि राज्यांनी काढला असेल तर आपण काढायला नको का? मुंबईत कोकणातून जगायला आलेली माणसे ही काही फार मोठ्या हुद्यांवर नाही. बहुतांशी मुलेमुली ही खाजगी नोकर्‍यांमध्ये असून विरार, दिवा, नालासोपारा, बदलापूरला राहतात. दररोज ट्रेनमध्ये लोंबकळून जगत आहेत. चाळीत, झोपडपट्टीत राहत आहेत. गावाला मात्र चाकरमानी म्हणून त्यांना मिरवायचे आहे. आधीही मिरवत होते, आताही मिरवत आहेत. कोकणात आता माणसे नाहीत. गावे ओसाड झाली, घरांच्या उद्ध्वस्त धर्मशाळा झाल्या.

- Advertisement -

घरची एक दोन म्हातारी माणसे राहिली. शेती उजाड झाली. पण, हे सारे बघण्यासाठी कोकण रेल्वेतून दर आठवड्याला आम्हाला गावाला जायचे आहे. जागा मिळाली नाही तर स्वछतागृहाच्या बाजूला बसून जायचे आहे. गर्दीच्या वेळी तर आत बाथरूममध्ये सामान ठेवून आणि तिकडेच बसून त्यांना गावाला जायचे आहे. आता चाकरमानी नाही तर आमची माणसे कोकणी भैय्ये झालेत आणि खूप काही गावाला पैसे घेऊन आणि मोठे काही उभारायचे म्हणून कोणी जात नाही. पण, आम्हाला गावाला जायचे आहे. आपण ज्यांना भैय्ये म्हणून हिणवतो ते उत्तर प्रदेश आणि बिहारची माणसे बरी म्हणायची आता वेळ आली आहे. एक बरे ते कोणाची कमी पैशात चाकरी करत नाहीत. बारावी आणि पदवीधर असला तरी त्याला व्यवसाय करावासा वाटतो. आमची कोकणातील मुले दहावी, बारावी असली तरी त्यांना नोकरी हवी आहे, ऑफिसातली, कंपनीतली. त्याला मिळणार किती तर दहा बारा हजार. पण, भैय्या दिवसाला तेवढे कमावणार. मी ज्या इमारतीत राहतो त्याच्या खाली रस्त्यावर २००० साली एक भैय्या केळी घेऊन बसायचा.

आज २० वर्षांनी त्याने रस्त्यावर विविध फळांच्या दुकानाचा मोठा संसार थाटला आहे. किती तरी वेळा त्याचे दुकान महापालिका घेऊन जाते; पण त्याला पर्वा नाही. दिवसाचा त्याचा दहा पंधरा हजार रुपयांचा धंदा आहे… आता बोला. महापालिका आणि पोलिसांना हप्ते देऊन तो नेटाने दुकान चालवतो. त्याला विचारले तर सांगतो, ‘का करी साब, बंंबई हमार पेट है, कितना दुकान लेके जाव, हम जायेंगे नही’.

- Advertisement -

तो गावाला वर्षातून एकदाच जातो. त्याने आपल्या दोन भावांना आणले आहे. चाळीत दोन घरे आहेत, स्कुटर, रिक्षा आहे, गावाला मोठे घर बांधले आहे. शेती वाडी विकत घेतली. गंमत म्हणजे त्याने आपल्या भावाच्या लग्नाला तिकीट काढून आजूबाजूच्या लोकांना घेऊन गेला होता. ही माहितीही त्याने मला दिली. बरोबर या भैय्याच्या बाजूला मराठी मुलगा भाजीचा व्यवसाय करत होता; पण रस्त्यावरचे आपले दुकान भाड्याने देऊन हा नोकरी करतो. भाजी विकून तो भैय्या त्या मुलापेक्षा दुप्पट कमावतो… जय मुंबई, जय महाराष्ट्र. आम्ही फक्त खांद्यावर झेंडे घेणार!

श्रमिक, कष्टकरी, कामगार यांनी मुंबई घडवली, उभारली. ती मुंबई १९८२ च्या गिरणी कामगारांच्या संपानंतर कधी आपली मराठी माणसांची राहिली नाही. आता त्या गिरण्यांच्या जागेवर उभ्या राहिलेल्या मॉलमध्ये आपली मराठी मुले काम करत आहेत. नाटककार जयंत पवार यांच्या ‘फिनिक्सच्या राखेतून उठला मोर’प्रमाणे आडवी मुंबई उभी झाली, मराठी माणूस देशोधडीला लागला. धंदेवाले ताकदीच्या जोरावर याच मोठ्या टॉवरमध्ये राहायला आले. आम्ही त्यांची काल भांडी घासत होतो, आजही घासत आहोत. फक्त निवडणुका आल्या का छाती पुढे करून आणि बेंबीच्या देठापासून ओरडत भगवे, हिरवे, पिवळे झेंडे घ्यायचे आहेत. आपल्या मुलांना छोटे मोठे व्यवसाय करायचे नाहीत आणि स्पर्धा परीक्षांना बसायचे नाही. हाताच्या बोटावर मोजता येणारी मराठी मुले आज सरकारी आणि बँका, खाजगी नोकर्‍यांमध्ये मोठ्या हुद्यावर आहेत. बाकी सगळा गाळ आहे. खूप भयंकर परिस्थिती आहे. धड गाव नाही, धड मुंबई नाही. करोनासारख्या महामारीमुळे उद्या किती जणांच्या नोकर्‍या राहतील, याची काही खात्री नाही.

२००५ साली मुंबई पाण्याखाली गेली होती तेव्हा आपल्या सगळ्यांना तिने इशारा दिला होता. आता करोनाने नवा धडा शिकवायला घेतला आहे. आज मरत नाही म्हणून आपण जगतो आहोत, कशाचा काही भरवसा नाही. माझी माय, माझी मुंबई अत्याचार सहन करून आता लुळी पांगळी झाली आहे. वाढणार्‍या झोपड्या, नष्ट होत चाललेली तिवरांची झाडे, बुजत निघालेल्या खाड्या, एखाद्या बॉम्बच्या टोकावर असल्यासारखे प्रदूषण, प्रचंड गर्दी, घुसमटणारा श्वास… मुंबईने आता किती अत्याचार सहन करायचा… तिची सहनशक्ती संपली आहे. माझी माय, मुंबई माय आम्हाला माफ कर!

Sanjay Parab
Sanjay Parabhttps://www.mymahanagar.com/author/psanjay/
गेली ३२ वर्षे पत्रकारितेचा अनुभव. राजकीय, पर्यावरण, क्रीडा आणि सामाजिक विषयांवर विपुल लेखन. प्रिंट आणि डिजिटल मीडियामध्ये कार्यरत.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -