घरफिचर्सकॅन्सरवरील उपचारात आयुर्वेदाची जोड लाभदायी

कॅन्सरवरील उपचारात आयुर्वेदाची जोड लाभदायी

Subscribe

कॅन्सरचे निदान झाल्यास आधुनिक वैद्यकशास्त्रानुसार शस्त्रकर्म, रेडिओथेरॅपी व केमोथेरॅपी या चिकित्सापद्धतींचा अवलंब केला जातो. त्यावेळी कॅन्सरच्या पेशींबरोबर चांगल्या पेशींनाही इजा पोहोचते. अशावेळी आधुनिक चिकित्सेच्या जोडीला चूर्ण, गुटी-वटी, आसवारिष्ट अशी आयुर्वेदीय शमन चिकित्सा, रसायन चिकित्सा, पंचकर्म चिकित्साही उपयुक्त ठरते.

आजच्या आरोग्यम् धनसंपदा या सदरातील लेखात आपण कॅन्सरव्याधी बाबतचा आयुर्वेदीय दृष्टीकोन जाणून घेणार आहोत. कॅन्सरचा आयुर्वेदीय संहितांत कॅन्सर या नावाने उल्लेख नसला तरी आयुर्वेदीय संहितांमध्ये उल्लेख केलेल्या दुष्ट, व्रण, दुष्ट ग्रंथी, दुष्ट अर्बुद, दुष्ट नाडीव्रण, दुष्ट विद्रधी, धातुगत धातुपाक अवस्था यांचे कॅन्सरशी साधर्म्य आढळते.

- Advertisement -

आयुर्वेदाच्या सिद्धांतानुसार कोणत्याही व्याधीचा विचार ३ टप्प्यांत केला जातो
१) हेतू – व्याधीची कारणे.
२) लक्षणे – व्याधीची विशिष्ट स्थानी व सर्व शरीरावर व्यक्त होणारी लक्षणे
३) औषधे -यात शोधन चिकित्सा (पंचकर्म); चूर्ण, गुटी-वटी, आसवारिष्ट अशी शमन औषधे चिकित्सा, रसायन चिकित्सा यांचा समावेश होतो.

१) हेतू – इंटिग्रेटेड कॅन्सर ट्रीटमेंट अ‍ॅन्ड रिसर्च सेंटरमधील आतापर्यंतच्या निरीक्षणांनुसार अयोग्य आहार, अयोग्य विहार, व्यवसायजन्य कारणे, व्यसनांचे अतिरिक्त सेवन, पूर्वीचे आजार, अनुवंशिकता, मानसिक हेतू ही कॅन्सरची प्रमुख कारणे आढळली आहेत. आपणआरोग्यम् धनसंपदा या सदराच्या पहिल्या लेखात या कारणांबाबत सविस्तर माहिती जाणून घेतली.

- Advertisement -

२) लक्षणे – कॅन्सरच्या लक्षणांचा विचार २ प्रकारे करावा लागतो.
सर्व शरीरावर व्यक्त होणारी सामान्य लक्षणे, विशिष्ट अवयवांच्या कॅन्सरमध्ये व्यक्त होणारी लक्षणे
सामान्यत: भूक मंदावणे, वजन कमी होणे, अशक्तपणा ही लक्षणे सर्व प्रकारच्या कॅन्सरमध्ये आढळतात. याशिवाय त्या त्या कॅन्सर प्रकारांनुसार विशिष्ट लक्षणे दिसून येतात.स्तनप्रदेशी गाठ जाणवणे, तेथील त्वचा लाल रंगाची होणे, काही वेळा गाठ फुटून त्यातून पूयस्त्राव किंवा रक्तस्त्राव होणे, काखेत गाठ जाणवणे ही स्तनाच्या कॅन्सरची लक्षणे आहेत. ताप, नाकातून रक्तस्त्राव, पाण्डुता ही लक्षणे दीर्घकाळ रहाणे ही ल्युकेमियाची लक्षणे आहेत. अशाप्रकारे विशिष्ट प्रकारच्या कॅन्सरची विशिष्ट लक्षणे आढळतात.

अशी लक्षणे दिसल्यास तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्याने कॅन्सरच्या निदानासाठी आवश्यक त्या रक्त तपासण्या, एक्सरे, सोनोग्राफी, स्कॅन इ. करून घेणे उचित ठरते.

३) औषधे-कॅन्सरचे निदान झाल्यास आधुनिक वैद्यकशास्त्रानुसार शस्त्रकर्म, रेडिओथेरॅपी व केमोथेरॅपी या चिकित्सापद्धतींचा अवलंब केला जातो. या चिकित्सा पद्धतींमुळे विशेषत: रेडिओथेरॅपी व केमोथेरॅपीमुळे कॅन्सरच्या पेशींबरोबर चांगल्या पेशींनाही इजा पोहोचते. तसेच शरीराची प्रतिकारशक्तीही कमी होते. अशावेळी आधुनिक चिकित्सेच्या जोडीला चूर्ण, गुटी-वटी, आसवारिष्ट अशी आयुर्वेदीय शमन चिकित्सा, रसायन चिकित्सा, पंचकर्म चिकित्साही उपयुक्त ठरते.

कॅन्सर चिकित्सेत पथ्यकर आहार-विहाराची भूमिकाही महत्त्वाची आहे. पचण्यास हलका परंतु पोषक, संतुलित आहार शरीराची प्रतिकारशक्ती वाढवितो.

‘कॅन्सर’ हे नाव ऐकताच रूग्ण व त्यांचे नातेवाईक कोलमडून जातात. आता मृत्यूशिवाय सुटका नाही व वेदनेशिवाय मुक्ती नाही, अशी त्यांची धारणा होते. अशावेळी गरज असते ती त्यांचे मनोबल उंचावण्याची. समुपदेशनाने तसेच गुणवत्तापूर्ण आयुष्य जगणा-या अन्य कॅन्सरग्रस्त रूग्णांच्या बरोबर संवादाने त्यांच्या मनातील कॅन्सरची भीती कमी करून त्यांचा सकारात्मक दृष्टीकोन वाढविता येतो.

-वैद्य स. प्र. सरदेशमुख
-ए. व्ही. पी., पीएच्. डी. (आयुर्वेद)
-संचालक, इंटिग्रेटेड कॅन्सर ट्रीटमेंट अ‍ॅण्ड रिसर्च सेंटर, वाघोली, पुणे

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -