घरफिचर्सअनलॉक वनच्या निमित्ताने...

अनलॉक वनच्या निमित्ताने…

Subscribe

लॉकडाऊननंतर हळूहळू अनलॉक वनची सुरुवात आठ तारखेपासून झाली. ठाणे, मुंबई भागातील नागरिक रस्त्यावर उतरले होते. लॉकडाऊन करणे ही आपली हतबलता होती, तर अनलॉक करणे ही जीवनाची गरज आहे. जगणं काही काळाकरता थांबतं, पण जीवन नाही. याच जीवनाचा हात धरून आपल्याला आता पुढे जावे लागणार आहे. अनलॉक वन ही त्याचीच सुरुवात आहे.

लॉकडाऊननंतर हळूहळू अनलॉक वनची सुरुवात आठ तारखेपासून झाली. ठाणे, मुंबई भागातील नागरिक रस्त्यावर उतरले होते. बाजारपेठा खुल्या झाल्या होत्या. बर्‍याच ठिकाणी दुकाने उघडली होती. अत्यावश्यक सेवा वगळता असलेली दुकानेही उघडली होती. ज्यात चहाची दुकाने, कपडे, भांडी, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू आदी दुकानेही उघडण्यात आली होती. सकाळच्या वेळेत ठाणे, कल्याण, वसई, विरारहूनही एसटी बसेस सोडण्यात आल्या होत्या. यावेळी एसटी स्टँडवरील गर्दी होतीच. याशिवाय ठाणे, मुंबईतील महामार्गांवरही वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. खासगी वाहनेही नागरिकांनी घराबाहेर काढली होती. दुचाकी आणि चारचाकीची वर्दळही दिसत होती. याशिवाय पादचारीही रस्त्यावर उतरले होते.अनलॉक वनचे हे दृष्य होते. ठाण्यातील तालुके आणि ग्रामीण भाग तसेच नगरपालिका क्षेत्रातही मोठ्या प्रमाणात बेस्ट बसेस दाखल झाल्या होत्या. एसटी महामंडळाच्या बसेसही रस्त्यावर उतरल्या होत्या. ठाणे ग्रामीण भागातून सरकारी कर्मचारी मंत्रालयाकडे आणि आपापल्या कार्यालयांकडे निघाले होते.

अनलॉकची सुरुवातच गर्दीने झाल्याने पुढील परिस्थितीचा अंदाज आताच घेणे गरजेचे आहे. एकीकडे पोलीस आणि आपत्कालीन यंत्रणेतील तसेच वैद्यकीय सेवेतील कर्मचार्‍यांना करोनाच्या संसर्गाची शक्यता वाढत असताना अनलॉक वनची सुरुवात करण्यात आली आहे. करोना आता जगण्याचा भाग होण्याची ही सुरुवात आहे. हे होणार होतेच. जागतिक आरोग्य संघटनेने देशातील लॉकडाऊन हटवल्यास करोनाचा विस्फोट होण्याची भीती व्यक्त केली आहे. त्यातच महाराष्ट्र आणि मुंबईतील परिस्थितीबाबत काळजी घेण्याची गरज आहे.

- Advertisement -

आरोग्य संघटनेचा इशारा आणि देशातील परिस्थितीबाबत भारताने घेतलेली भूमिका परस्परांना छेद देणारी आहे. मात्र, अनलॉक केल्याशिवाय दुसरा पर्याय भारतासमोर आणि महाराष्ट्रासमोर सध्या तरी नाही. यातील मध्यम मार्ग म्हणून अनलॉक वनचा विचार व्हायला हवा. ब्लॅक आणि व्हाईट यातील ग्रे शेडमध्येही जगता येऊ शकते. हे येत्या काळात देशाला आणि पर्यायाने महाराष्ट्राला सिद्ध करावे लागेल. सरकारी यंत्रणाही त्याच दिशेने पावले टाकत आहेत. करोनासोबत जगणे ही येत्या काळातही हतबलता आहे. या हतबलतेवर मात करून करोनाला नियंत्रणात ठेवून जगावे लागणार आहे. देशातील लॉकडाऊनच्या काळात बंद पडलेले उद्योग, छोटे मोठे व्यवसाय पुन्हा उभे राहण्यासाठी मोठा कालावधी जावा लागणार आहे. लॉकडाऊनचा कालावधी हा करोनाविरोधातील पुढील लढाईकरता करण्यात आलेल्या तयारीचा होता. मात्र, करोनाविरोधातील खरे युद्ध पहिल्या अनलॉकनंतर सुरू झालेले आहे. एका विशिष्ट कालावधीनंतर लॉकडाऊन वाढवणे देशाला परवडणारे नाही. मुंबई देशाची आर्थिक राजधानी असल्यामुळे जास्त काळाकरता मुंबई बंद ठेवणे शक्य नाही. रेल्वे, बससेवा, खासगी वाहतूक, उद्योग व्यवसायांचे झालेले नुकसान येत्या काळात भरून काढावे लागणार आहे. या एकूण नुकसानाची आकडेवारी अभ्यासण्यात येणारे महिने जाणार आहेतच. मुंबई आणि महाराष्ट्र हळूहळू पूर्वपदावर येताना ढिसाळ कारभार आणि नागरिकांचा बेजबाबदारपणा परवडणारा नाही. करोनाविरोधातील लढ्यात आजपर्यंत आपण बचावात्मक पवित्रा घेतला होता. करोनाच्या हल्ल्यापासून वाचताना आपण सुरक्षा यंत्रणा, वैद्यकीय संस्थांची ढाल पुढे करत होतो. मात्र, यापुढे हे हल्ले इथल्या नागरिकांना स्वतःवर झेलावे लागणार आहेतच शिवाय प्रतीहल्लाही करावा लागणार आहे.

सॅनिटायझर, मास्क, हात धुण्याची सवय आपल्या जगण्याचा भाग झालेल्या असतानाच जास्तीत जास्त सुरक्षा साधनांचा योग्य आणि पुरेपूर वापर करून आपण करोनाला नामोहरम करू शकतो हा आशावाद कायम आहे. जागतिक आरोग्य संघटनेने भारतात करोनाचा स्फोट होण्याची भीती जरी दाखवली असली तरी आपल्या घरातील परिस्थिती आपल्यालाच ठाऊक असते, अशी भारताची स्थिती झाली आहे. कामे आणि उद्योग व्यवसाय याहीपुढे बंद राहिल्यास माणसं करोनाने नाही तर भुकेने मरतील, अशी भीतीही व्यक्त होत आहे. परिस्थितीने प्रमाणाबाहेर हतबल केल्यावर माणूस त्याविरोधात बंड करतो. तो रस्त्यावर उतरतो कारण गमावण्यासारखे त्याच्याकडे काहीच नसते. जे उरलेले आहे, ते सुरक्षित ठेवण्यासाठी त्याला आहे त्या साधनांसोबत परिस्थितीविरोधात झगडावेच लागते. करोनामुळे कामे बंद झाल्यावर उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झालेला आहे. भुकेने मरण्यापेक्षा लढून धारातीर्थी पडण्याचा निर्धार सर्वसामान्य आणि हातावर पोट असलेल्या कामगारांकडून व्यक्त केला जात आहे. उद्योग बंद होणे धोक्याचे आहे. हे संकट करोनाच्या संकटापेक्षा मोठे आहे. करोनावर येत्या काळात प्रभावी उपचार, लस निर्माण होईलही. तोपर्यंत आर्थिक संकटाने आणि दारिद्य्र भुकेने होणारे मृत्यूही आपल्याला रोखावे लागणार आहेत. सरकारी यंत्रणा आपल्या स्तरावर प्रयत्न करतीलच. परंतु, त्यांना साथ देण्याची जबाबदारी इथल्या नागरिकांची आहे.

- Advertisement -

मुंबईची लोकसंख्या एक कोटीहून जास्त असतानाच अनलॉकनंतर निर्माण होणारा धोकाही तेवढाच मोठा आहे. मागील अडीच महिन्यांच्या बंदमध्ये करोनाचे प्रमाण त्याचा संसर्ग त्यावरील उपाययोजनेचा पुरता अंदाज घेता आलेला आहे. यापुढील स्थिती न टाळता येणारी जोखीम आणि जबाबदारीची असणार आहे. पोलीस, आरोग्य यंत्रणा आणि सरकारवर जबाबदारी ढकलून चालणार नाही. मानवी स्वातंत्र्याचा संकोच करणारा कायदा लोकशाहीत सदा सर्वकाळ चालवता येत नसतो. मात्र, लोकशाहीत लोकांवर टाकलेला विश्वास त्यांनी आपल्या नागरीकत्वाच्या जबाबदारीतून सार्थ करायचा असतो. सद्यस्थितीत या जबाबदारीचे भान आवश्यक आहे.

पावसाळ्यात शेतकर्‍यांना शेतीची कामे करावी लागणार आहेतच. उद्योग व्यवसाय सुरू करावे लागणार आहेतच. वाहतूक व्यवस्थाही सुरू करावी लागेलच. त्यामुळे अर्थचक्र हळूहळू वेग घेईल. लॉकडाऊनचा शेतकरी, कामगार, इतर यंत्रणांवर झालेल्या परिणामातून सरकारी यंत्रणांना पुढील परिस्थितीचा अंदाज घेता येईल. करोनाविरोधातील ही महत्त्वाच्या टप्प्यातील लढाई आता बचावातून आक्रमणाच्या दिशेने सुरू झाली आहे. ही लढाई जिंकण्यासाठी संयम शिस्त ही मोठी हत्यारे आपल्या भात्यात आहेतच. ही लढाई यापुढे नागरिकांनाच लढावी लागणार आहे. यापुढे इथल्या प्रत्येक स्थितीची जबाबदारी आपलीच असणार आहे. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर देशातील प्रत्येक सामाजिक आणि राजकीय स्थितीची जबाबदारी इथल्या लोकशाही आणि नागरिकांची होती. प्रत्येक गोष्टीत इंग्रजांना दोष देण्याचा मार्ग मिळालेल्या स्वातंत्र्यामुळे बंद झाला होता. उदाहरणातील काहीशा फरकाने अशीच स्थिती करोनाने केलेली आहे. लॉकडाऊन हे पारतंत्र्य असेल तर अनलॉक वन हे टप्प्याटप्प्याने मिळणारे स्वातंत्र्यच आहे. हे स्वातंत्र्य उपभोगताना त्यातील जबाबदारीचे भानही आवश्यक आहे. या नव्या स्वातंत्र्यात नागरिकांच्या हक्क अधिकारांचा कमालीचा संकोच होणार आहे. परंतु, हा संकोच जगण्याच्या आणि जीवनाच्या अधिकाराच्या रक्षणासाठी केला जाणार आहे.

देशातील अर्थव्यवस्था शेतकरी आणि कामगार दोन खांबांवर आधारलेली आहे. हे दोन खांब करोनाच्या विषाणूकडून पोखरले जाऊ नयेत, यासाठी नागरिकांनाच कंबर कसावी लागणार आहे. लॉकडाऊन करणे ही आपली हतबलता होती, तर अनलॉक करणे ही जीवनाची गरज आहे. जगणं काही काळाकरता थांबतं, पण जीवन नाही. याच जीवनाचा हात धरून आपल्याला आता पुढे जावे लागणार आहे. अनलॉक वन ही त्याचीच सुरुवात आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -