घरफिचर्सअण्णा हजारेंचा चारित्र्य प्रमाणपत्रे वाटण्याचा भंपकपणा!

अण्णा हजारेंचा चारित्र्य प्रमाणपत्रे वाटण्याचा भंपकपणा!

Subscribe

आधी मोदी, फडणवीस चांगले; आता म्हणतात ढवळ्या शेजारी पवळ्या बांधला!

केजरीवाल यांची पाठ थोपटून झाली आणि नंतर आले मोदी… अहाहा, आता फक्त रामराज्य यायचे बाकी आहे, असे अण्णांना झाले आणि मोदी सरकारच्या चौथ्या वर्षात ते अण्णांना अहंकारी वाटतात. ते आपल्याला विचारत नाहीत, पत्रांची दखल घेत नाही आणि आंदोलनाला घाबरत नाहीत म्हणून ते आता अण्णांच्या परीक्षेत नापास झाले आहेत. तीच गोष्ट फडणवीस यांची. किती भला माणूस वाटत होता. जणू देवच स्वर्गातून पृथ्वीवर राज्य करण्यासाठी आला आहे. आनंदी आनंद गडे, जिकडे तिकडे चोहीकडे… आणि आता चार वर्षांनंतर अण्णांना फडणवीस बोलका पोपट वाटतात. माफ करा अण्णा. हा तुमचा चारित्र्य प्रमाणपत्रे देण्याचा भंपकपणा झाला. राजकारणी हे राजकारणी असतात, येथून तेथून सारखे असतात.

प्रसंग 1 : मे 2014 भाजपा सरकार सत्तेत आल्यावर जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी नरेंद्र मोदी चांगलं काम करतील, अशी जाहीर अपेक्षा व्यक्त केली होती. पण, चार वर्षांनंतर आता मोदी आपल्या शेतकर्‍यांचे प्रश्न आणि आणि भ्रष्टाचाराविषयी लिहिलेल्या 30 पत्रांना एकदाही उत्तर दिले नाही, अशी जाहीर तक्रार करत त्यांनी गेल्या वर्षी आंदोलनाचा इशारा दिला होता आणि नोटाबंदीसह भ्रष्टाचार रोखण्यात मोदी सरकार कसे अपयशी ठरले अशा मुलाखतीही दिल्या.

- Advertisement -

प्रसंग 2 : एकीकडे मोदींवर टीका करणार्‍या अण्णांनी मुलाखतीत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं मात्र कौतुक केलं होतं. मला नरेंद्र मोदींपेक्षा फडणवीसांचं काम एक पाऊल पुढे वाटतं. त्याचं कारण ते नॉन-करप्ट आहेत. दुसरं, मोदी नुसतं सत्ता, पार्टी यांच्यात अडकले आहेत. फडणवीसांमध्ये पण ते आहे. तरी ते योग्य तेच करतात. मी काही त्यांच्याकडे काही जात नाही. पण जे चांगलं आहे त्याला चांगलं म्हटलं पाहिजे.

प्रसंग 3 : मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर विश्वास ठेवला होता. मात्र ते विश्वासाला पात्र ठरले नाहीत. ते काही करतील ही अपेक्षा फोल ठरली. केवळ बोलण्यातच ते हुशार आहेत. गेल्या चार वर्षांत लोकपाल कायदा झाला नाही. ढवळ्या शेजारी पवळ्या बांधला वाण नाही, पण गुण लागला.

- Advertisement -

हे तीन प्रसंग काय सांगतात अण्णांना आधी समाजसेवक असो की राजकारणी खूप महान असल्यासारखे वाटत असतात आणि तो नेता किंवा सामाजिक कार्यकर्ता अण्णांना विचारत नाही म्हटले की ते संतापतात, त्यांना रागाराग येतो. ते बोलनासे होतात. स्वतःला कोंडून घेतात, आंदोलनाचा इशारा देतात आणि अखेर उपोषणला बसतात. दिल्लीत काँग्रेस काळातील भ्रष्टाचाराच्या विरोधात रान पेटवून मोदी आणि केजरीवाल यांना सत्तेचा मार्ग उघडून दिल्यानंतर मोदी आणि केजरीवाल हे दोघेही आता अण्णांना मस्तवाल वाटू लागले आहेत. सत्तेचा माज त्यांना चढला आहे, असा संताप ते व्यक्त करतात. दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांनी तर त्यांची साफ निराशा केली म्हणे. ‘मी अरविंद यांना सांगत होतो. आपल्याला सत्ता नको आहे. समाजसेवा हाच आपला मार्ग आहे. पण ते ऐकले नाही. त्यांना सत्ता हवी होती. आता मी त्याचे फोनही घेत नाही’. अण्णांची आम आदमीची टोपी घालून आपल्या गुरुलाच टोपी घालणार्‍या केजरीवाल यांनी मोठा दगा दिल्याने अण्णा खूपच निराश झाले आहेत आणि आता आपण त्यांचे फोनही घेत नाहीत, असे रुदनही ते करतात…आधी केजरीवाल चांगले. प्रशासनाची नोकरी सोडून माणूस समाजसेवा करायला आला आहे. भला माणूस आहे.

केजरीवाल यांची पाठ थोपटून झाली आणि नंतर आले मोदी… अहाहा, आता फक्त रामराज्य यायचे बाकी आहे, असे अण्णांना झाले आणि मोदी सरकारच्या चौथ्या वर्षात ते अण्णांना अहंकारी वाटतात. ते आपल्याला विचारत नाहीत, पत्रांची दखल घेत नाही आणि आंदोलनाला घाबरत नाहीत म्हणून ते आता अण्णांच्या परीक्षेत नापास झाले आहेत. तीच गोष्ट फडणवीस यांची. किती भला माणूस वाटत होता. जणू देवच स्वर्गातून पृथ्वीवर राज्य करण्यासाठी आला आहे. आनंदी आनंद गडे, जिकडे तिकडे चोहीकडे… आणि आता चार वर्षांनंतर अण्णांना फडणवीस बोलका पोपट वाटतात. माफ करा अण्णा. हा तुमचा चारित्र्य प्रमाणपत्रे देण्याचा भंपकपणा झाला. राजकारणी हे राजकारणी असतात, येथून तेथून सारखे असतात. लोकपाल, लोकायुक्त कायदा, शेतकर्‍यांचे प्रश्न हे तुम्हाला वाटतात म्हणून ते सोडवणार नाहीत. त्यांना त्यामधून काय फायदा होणार आहे, याचा ते आधी विचार करतील. अण्णा तुमचा नाही!

आता तुम्ही 30 जानेवारीपासून राळेगण सिद्धी येथे आमरण उपोषणाला बसणार आहात. पण, आधी काँग्रेसच्या काळात विलासराव देशमुख येत होते, तसेच आता तुम्हाला उपोषण सोडायला लावण्यासाठी फडणवीस यांनी त्यांचे विश्वासू शिलेदार गिरीश महाजन यांना दिमतीला ठेवले आहे. सध्या गिरीशभाऊ इतके फॉर्ममध्ये आहेत की ते काही करू शकतात. ते ग्रामपंचायत ते महापालिका निवडणुका हातोहात जिंकतात. फोडाफोडी करू शकतात. एकनाथ खडसे यांना मुख्यमंत्र्यांच्या वाटेतील काटा म्हणून बाजूला सारू शकतात. आता त्याच महाजन यांच्या हातून आधीसारखा ग्लासातून रस घेऊन उपोषण संपवणार आहात का? याकडे आता महाराष्ट्रातील तमाम जनता मोठ्या उत्सुकतेने पाहत आहे. राजकारण्यांना प्रमाणपत्रे वाटण्याचा भपंकपणा दिसतो. तो कृपया किमान उपोषणातून दिसू नये. कारण ज्या महात्मा गांधींवर विश्वास ठेवून तुम्ही लोकशाहीतील प्रमुख अस्त्र असलेल्या उपोषणाला बसता त्यावर जनतेचा अजूनही विश्वास आहे. जनेतेचे प्रश्न सोडवण्यासाठी आत्मशुद्धीतून जाण्याचा तोच एकमेव मार्ग आहे. आता 30 जानेवारीपासून उपोषणाचे हत्यार काय असते, हे फडणवीस सरकारला दाखवून द्याच अण्णा तुम्ही!

डोंगर पोखरला आणि उंदीर निघाला. काळा पैसा बाहेर येण्यासाठी नोटाबंदीचा कार्यक्रम केला. सारा देश रांगेत उभा राहिला. सगळ्यांनी एवढा त्रास सहन केला. काहींचा त्यात जीवही गेला. मलाही वाटलं होतं की आता काळा पैसा बाहेर येईल. शेवटी रिझर्व्ह बँकेनं जेव्हा आकडेवारी जाहीर केली, तेव्हा समजलं की, 99 टक्के पैसा बँकांमध्ये जमाही झाला. मग तो काळा पैसा गेला कुठं? हा सगळा राजकीय स्टंट होता. दिल्लीतील एका मुलाखतीत अण्णांचे हे भाष्य आहे. आपला मुद्दा विस्तारित करताना त्यांनी गोमांस बंदी आणि त्यानंतर घडलेल्या हिंसक घटनांवर बोलताना त्यांनी केंद्र सरकारच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केला. जर पंतप्रधानांना हे चूक वाटतं तर कारवाई का नाही करत? पंतप्रधान आहात ना ते देशाचे? मग अ‍ॅक्शन का घेत नाहीत? ती अ‍ॅक्शन घेत नाहीत याचा अर्थ हा आहे का ही आपली माणसं आहेत…. म्हणून जाऊ द्या?

अण्णांचे आंदोलन म्हटले की, 2014 च्या निवडणुकीपूर्वी रामलीला मैदानात झालेल्या जनलोकपाल विधेयकासाठीच्या आंदोलनाची आठवण होते. या आंदोलनाला संपूर्ण देशात प्रसिद्धी मिळाली होती. अण्णा हजारे यांचे राळेगणसिद्धी हे गावही या आंदोलनामुळे देशभरात प्रसिद्ध झाले होते. मात्र, त्याच आंदोलनात अरविंद केजरीवाल निर्माण झाले आणि त्यांनी राजकारणात प्रवेश केला आणि राजकीय फायद्यासाठी खोटेनाटे आरोप केले, त्यावर जाहीर माफीही मागितली. अण्णांच्या यापुढील आंदोलनातून अशा सत्तापिपासू आणि जनतेच्या भावनांशी खेळणार्‍या व्यक्ती उदयाला न येवोत! या आंदोलनाला देशभरातील सर्वसामान्य समाजाने प्रत्यक्ष सहभागाद्वारे आणि अप्रत्यक्षरीत्या शुभेच्छांद्वारे पाठिंबा दर्शवला होता. देशातील काँग्रेसची सत्ता संपुष्टात येण्यात या आंदोलनाचा मोठा वाटा होता. यापुढे दिल्लीत किंवा राळेगणमध्ये मोदी तसेच फडणवीस यांच्या कारभाराविरोधात अण्णांच्या आंदोलनाला कितपत प्रतिसाद मिळतो? हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. प्रसिद्धीमाध्यमे हे आंदोलन यशस्वी करण्यात कितपत हातभार लावणार? सरकार त्याची कितपत नोंद घेणार? या प्रश्नांचे उत्तर मिळेल.

यापुढे अण्णा हजारे यांनी केलेल्या आरोपांचा राजकीय लाभ उठवण्यासाठी काँग्रेससह इतर राजकीय पक्षांचे नेते टपलेले असणारच. त्यामुळे मोदी सरकारच्या अडचणी आणखी वाढणार यात शंका नाही. 2014 हा देशभर बदलाचा मंतरकाळ होता. लोकांना देशाच्या नेतृत्वात बदल हवा होता. नरेंद्र मोदी यांची लाट या बदलाचा भाग होता, ती स्वयंभू लाट नव्हती. अण्णा हजारे यांचे आंदोलन आणि त्याला सर्वसामान्यांचा मिळालेला पाठिंबा हा काँग्रेसची सत्ता उलथून लावणारा ठरला. मी अण्णा नावाची टोपी प्रत्येकाने घातली. झोपडीत राहणार्‍या श्रमिकापासून बंगल्यात राहणार्‍या श्रीमंतापर्यंत. पण पाच वर्षांत पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले. आता कुठले मोठे आंदोलन नाही, उपोषण नाही आणि लाटही नाही… मात्र लोकांच्या मनात सत्ताधार्‍यांविरोधात नाराजी आहे. आपली फसवणूक झाल्याची भावना आहे.

अण्णा यांना जसे आपला विश्वासघात झाल्याचे वाटते तसेच ते सर्वसामन्यांच्या मनात घर करून आहे. अशा निर्णायक क्षणी अण्णा हजारे हे आंदोलनाची दिशा कशी ठरवतात हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. आंदोलनात आपल्या बाजूला बसणार्‍यांकडून आपण कुठल्याही परिस्थितीत राजकारणात जाणार नाही किंवा नेता होणार नाही, असे आपण लिहून घेणार आहोत, असे अण्णा म्हणाले आहेत. अनुभवातून आलेल्या या शहाणपणातून आंदोलन स्वच्छ, निर्मळ होईल, अशी आशा वाटते… पण, अण्णा कृपया स्वच्छ चारित्र्याची प्रमाणपत्रे वाटण्याचा भंपकपणा करू नका…!

Sanjay Parab
Sanjay Parabhttps://www.mymahanagar.com/author/psanjay/
गेली ३२ वर्षे पत्रकारितेचा अनुभव. राजकीय, पर्यावरण, क्रीडा आणि सामाजिक विषयांवर विपुल लेखन. प्रिंट आणि डिजिटल मीडियामध्ये कार्यरत.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -