घरमुंबईव्यावसायिक महिलेवर लैंगिक अत्याचार करणार्‍या आरोपीस अटक

व्यावसायिक महिलेवर लैंगिक अत्याचार करणार्‍या आरोपीस अटक

Subscribe

स्वतःला व्यापारी तसेच आयपीएस अधिकारी असल्याचे सांगत होता, मुंबईसह गुजरातमध्ये अनेक फसवणुकीचे गुन्हे असल्याचे उघड

कापड व्यावसायिक असलेल्या एका 45 वर्षांच्या महिलेवर लैंगिक अत्याचार करून पळून गेलेल्या एका आरोपीला गुरुवारी रात्री उशिरा वडोदरा येथून गुन्हे शाखेच्या अधिकार्‍यांनी अटक केली. भुपेंद्र जयंतकुमार व्यास असे या 55 वर्षीय आरोपीचे नाव असून, अटकेनंतर त्याला पुढील चौकशीसाठी मालवणी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आल्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक चिमाजी आढाव यांनी सांगितले. भुपेंद्र हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून, त्याच्याविरुद्ध मुंबईसह गुजरात राज्यात अनेक फसवणुकीचे गुन्हे आहेत. तो स्वत:ला व्यापारी, आयपीएस अधिकारी, पंतप्रधान कार्यालयातील एक बडा अधिकारी असल्याचे सांगून अनेकांना गंडा घालत होता.

पीडित 45 वर्षांची महिला ही कापड व्यावसायिक असून, तिचे मुंबईसह दिल्लीत कार्यालय आहे. तिचे पती एअरफोर्समध्ये कामाला होते. पतीच्या निधनानंतर ती तिच्या मुलांसोबत राहते. काही महिन्यांपूर्वीच तिची भुपेंद्र याच्याशी ओळख झाली होती. यावेळी त्याने आपण स्वत: व्यावसायिक असल्याचे सांगून तिला तिच्या व्यवसायात मदत करण्याचे आमिष दाखवले. त्यानंतर तिच्याशी जवळीक निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता. काही दिवसांनी या ओळखीचे रूपांतर मैत्रीत झाले होते. अलीकडेच तो तिला मालवणीतील मढ येथील एका हॉटेलमध्ये घेऊन गेला होता. तिथेच त्याने शीतपेयातून गुंगीचे औषध देऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केला होता.

- Advertisement -

लग्नाचा प्रस्ताव
हा प्रकार तिच्या लक्षात येताच त्याने तिच्याकडे लग्नाचा प्रस्ताव ठेवला. तिच्या मुलांचा सांभाळ करण्याचेही त्याने तिला आश्वासन दिले होते. त्याच्या प्रस्तावानंतर तिनेही त्याला होकार दिला होता. मात्र, जानेवारी महिन्यापासून त्याने अचानक तिच्याशी संबंध तोडून टाकले होते. तो मुंबईबाहेर पळून गेल्याचे लक्षात येताच या महिलेने मालवणी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तिथे उपस्थित पोलिसांना घडलेला प्रकार सांगितला. या महिलेच्या तक्रारीवरून भुपेंद्रविरुद्ध पोलिसांनी बलात्कारासह अन्य भादंवि कलमांतर्गत गुन्हा नोंदविला होता.

वडोदरात केली अटक
पळून गेलेल्या भुपेंद्रचा मालवणीसह स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी शोध घेत होते. ही शोधमोहीम सुरू असतानाच तो वडोदरा शहरात असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती. या माहितीनंतर चिमाजी आढाव यांच्या पथकाने वडोदरा येथे लपून बसलेल्या भुपेंद्र व्यास याला गुरुवारी रात्री अटक केली. अटकेनंतर त्याला पुढील चौकशीसाठी मालवणी पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले.

- Advertisement -

सराईत गुन्हेगार
भुपेंद्र हा सराईत गुन्हेगार आहे. भाजप अध्यक्ष अमित शाह यांच्याशी आपले चांगले संबंध आहेत, पंतप्रधान कार्यालयात आपण वरिष्ठ अधिकारी आहोत. तसेच, आपण व्यापारी, व्यावसायिक तसेच आयपपीएस अधिकारी असल्याची बतावणी करून त्याने आतापर्यंत अनेकांची फसवणूक केल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे. त्याच्याविरुद्ध मुंबईसह गुजरातच्या काही पोलीस ठाण्यात फसवणुकीच्या गुन्ह्यांची नोंद असून, याच गुन्ह्यांत त्याच्या सहकार्‍यांना यापूर्वी पोलिसांनी अटक केली होती. मात्र, तो प्रत्येक वेळेस पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळून जात होता. अखेर गुरुवारी त्याला गुन्हे शाखेच्या अधिकार्‍यांनी अटक केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -