घरफिचर्सआम्ही आलोय आपल्या ठाण्यात

आम्ही आलोय आपल्या ठाण्यात

Subscribe

जागतिकीकरणाच्या रेट्यात अवघे जगच एक मोठं गाव बनू पाहत असताना शहरीकरणाच्या या वेगात आपलं परंपरागत गावपण जपण्याचा प्रयत्न करणारं आपलं ठाणं…आगळंवेगळं निसर्गसंपन्न वैविध्यपूर्ण असा आपला ठाणे जिल्हा…ठाणे नाही, ठाणंच ते… गावठाणांचं ठाणं, हे ठाणं आहे जुन्या ब्रिटिशकालीन वाड्यावस्त्यांचं, तलावांचं, जैवविविधता जपणार्‍या कांदळवनाचं…. हे ठाणं आहे त्या कांदळवनांच्या खाडीकुशीत वसलेल्या हिरवळीचं, या हिरवळीला न चुकता भेट देणार्‍या परदेशी फ्लेमिंगो पाहुण्यांचं…. हे ठाणं आहे निसर्ग वनसंपदेचं, वाहणार्‍या नद्यांचं, गडकिल्ले, डोगरांचं आणि महत्त्वाचं म्हणजे इथल्या ठाणेकरांचं…अशा अनेकविध ओळखी असलेल्या या शहराची किती वैशिष्ठ्ये सांगावीत. संस्कृती, कला, साहित्य, संगीत, धार्मिक परंपरा, सणवार, खवय्येगिरी अशा अनेकविध वैशिष्ट्यपूर्ण ओळखी या ठाण्यानं अंगाखांद्यावर दिमाखात मिरवल्या आहेत. ठाण्याच्या शिरपेचात असे अनेक मानाचे तुरे इतिहासानेच रोवलेले आहेत. देशातच नाही तर आशिया खंडातील मुंबईच्या बोरीबंदरातून निघालेली पहिली आगगाडी याच ठाण्यात येऊन विसावली. श्रीस्थानक म्हणून ठाण्याची ओळख अगदी पूर्वापार आहे. एकेकाळी या ठाणे स्टेशनबाहेर टांग्यांची टपटप ऐकू यायची…आता स्टेशनजवळ सॅटीससारखा प्रकल्प उभारण्यात आला आहे. ट्रान्सहार्बरनंतर आता ठाण्याला मेट्रोचे वेध लागले आहेत. स्मार्ट सिटी होणारं ठाणं वेगानं बदलतंय…बदल ही काळाची गरज असते, मात्र निसर्गाच्या नियमांमध्ये बदल होत नाहीत, निसर्गाचं संतुलन कायम ठेवून बदलणार्‍या ठाण्याचं स्वागतच करायला हवं.राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, साहित्यिक अशा सर्वच आघाड्यांवर बदलणार्‍या ठाण्यानं आपला अमीट ठसा राज्यात उमटवला आहे. गावपाड्यांचं ठाणे नगर झालं, पुढे महानगर झालं, अशा बहुरंगी, बहुढंगी आपल्या ठाण्यात मागील ३१ वर्षांपासून निर्भीड, निष्पक्ष पत्रकारितेचा वारसा जपणारं ‘आपलं महानगर’ दाखल होतंय. मुंबई, नाशिक आवृत्ती दणक्यात गाजवल्यानंतर ठाण्यात ‘आपल्या बातम्या, आतल्या बातम्या’ सांगण्यासाठी ‘आपलं महानगर’ आलेलं आहे. मागील ३१ वर्षांपासून आपलं महानगरने मराठी वाचकांशी बांधिलकी जपलेली आहेच. ‘‘आपल्या बातम्या, आतल्या बातम्या’ हे महानगरचं ब्रीद आहे. आपली बातमी म्हणजेच आपले प्रश्न, आपल्या समस्या, आपल्या अडचणी, आपल्यावर होणारा अन्याय, आपल्यासाठी राबवली जाणारी आपली लोकशाही आणि आपली सत्ता, आपला समाज, आपली संस्कृती असं सर्वच जे आपलं, आपल्या सर्वांचं आहे ते-ते आपल्या वाचकांपर्यंत पोहचवण्याचं नाव म्हणजे आपलं महानगर…. माणसांचं हे आपलेपण मुंबईत आपलं महानगरने मागील ३१ वर्षांपासून जपलं आहे. वाचकांच्या विश्वासार्हतेवर ट्यॅब्लाईड पासून ब्रॉडशिट अंकापर्यंतचा तीन दशकांचा हा प्रवास मोठा आहेच. मुंबईतील माणसांचे असे अनेक प्रश्न ‘आपलं महानगर’ने केवळ हातीच घेतले नाहीत तर तडीस नेले. मग तो वशिलेबाज अधिकार्‍यांना क्रिम पोस्ट देण्याचा विषय असो वा दांडीबहाद्दर मंत्र्यांचा पोलखोल असो, असे प्रश्न महानगरने न डगमगता पुढे आणले. नाणारचा केमिकल प्रकल्प असो की राज्याला डोईजड ठरू पाहणारा बुलेट ट्रेनचा विषय केवळ आणि केवळ सामान्य माणसाला डोळ्यापुढे धरत महानगरने आपल्या पत्रकारितेला वाट करून दिली. आपल्या सामाजिक भवतालचा आपल्यावर सातत्याने परिणाम होत असतो. आपलं महानगरची दर रविवारी प्रसिद्ध होणारी सारांश पुरवणी ही या भवतालचंच प्रतिबिंब…साहित्य, समाज, मनोरंजन, राजकारण, नाट्य सिनेसृष्टी, अर्थकारण, घडमोडी, अशा सर्वोतोपरी घटनांचा सार म्हणजेच आपलं महानगरची सारांश पुरवणी…नुकताच आपलं महानगरने नाशिक आवृत्तीचा पहिला वर्धापनदिन दणक्यात साजरा केला. नाशिकमधील नागरी समस्या, शेतकर्‍यांचे प्रश्न, संस्कृती, येथील राजकीय प्रश्नांवर अभ्यासपूर्ण वस्तुस्थिती आणि केवळ सत्यान्वेषी पत्रकारिता केली. त्यामुळे नाशिकमध्ये ‘आपलं महानगर’ने अल्पावधीत मोठा नावलौकीक आणि वाचकांचा भरघोस विश्वास मिळवला आहे. वेगाने बदलणार्‍या माहिती आणि तंत्रज्ञानाच्या या नव्या युगातही आपलं महानगरने प्रिंट मीडियासोबतच डिजिटल माध्यमातूनही आपल्या निर्भीड, निष्पक्ष पत्रकारितेला नवी दिशा दिली. हातागणिक मोबाईल असलेल्या नव्या पिढीला आपलं महानगरची ओळख पुन्हा नव्याने ‘माय महानगर’ मधून तोपर्यंत झाली होतीच. ‘इंटरनेटकर’ वाचकांनाही आपलं महानगरने आपलंसं केलं. वैविध्यपूर्ण माहिती आणि सत्याचा शोध घेणार्‍या निर्भीड आणि निष्पक्ष बातम्या हे आपलं महानगरचं वैशिष्ट्य इथंही कायम होतंच. त्याला जोड मिळाली अत्याधुनिक तंत्राची, व्हिडिओ, दृकश्राव्य बातम्या, थेट स्पॉटवरून घटनेचा माहितीवजा वृत्तांत देणार्‍या पत्रकारितेच्याही पुढे जाऊन घटनेमागील कारणांचा शोध घेणारी, त्याची मीमांसा आणि त्याचे आपल्यावर होणारे परिणाम स्पष्ट करून सांगणारी आपलं महानगरची पत्रकारिता ही कायम चर्चेत राहिली आहे. घडामोडी, घटनेचे विविधांगी कंगोरे, त्याचे भविष्यातील परिणाम, सकारात्मक किंवा नकारात्मक घटनेला कारण असलेल्या यंत्रणेचा पर्दाफाश करणारी पत्रकारिता ‘आपलं महानगर’ ने कायम जपली. मुळातच आपलं महानगरची ही पत्रकारिता मानवी संवेदना आणि भावनेशी जोडलेली असल्याने ‘आपली’शी आहे. मानवी भावना संवेदना केवळ नकारात्मकच नसतात, आनंद, समाधान, कौतुक, जल्लोष, कार्यतत्परता, कर्तव्यभावना असे अनेक सकारात्मक कंगोरेही जगण्यासाठी आवश्यक असतात. त्यामुळे केवळ नकारघंटा वाजवणारी पत्रकारिता आपलं महानगरची नाही. जे जे कौतुकास्पद आहे ते महानगरने आपलंसं केलं. समाजात आणि राजकीय क्षेत्रातही केली गेलेली चांगली कामं, सकारात्मक ऊर्जा देणार्‍या घडामोडींनाही आपलं महानगरमध्ये ‘मानाचं पान’ आहे. अशा आपलं महानगरचं निष्पक्ष निर्भीड पत्रकारितेचं हे नवं अवकाश ठाण्यातही या निमित्ताने खुलं झालं आहे. हाती लेखणी असो किंवा माईक वा कॅमेरा…माध्यमं बदलली तरी वस्तुनिष्ठ बातमीतलं सत्य बदलत नसतं, ‘आपल्या बातम्या, आतल्या बातम्या’ आपल्यापर्यंत पोहचवण्यासाठी आता आपल्या ठाण्यातही आपलं महानगरची ही देदीप्यमान ३१ वर्षांच्या पत्रकारितेची परंपरा सुरू झाली आहे…गरज आहे ती आपल्या विश्वासाची, मुंबई, नाशिकप्रमाणेच ठाण्यातही हा विश्वास ‘आपलं महानगर’ सार्थ ठरवेल, हा आमचा शब्द आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -