घरफिचर्सवंचितांनी कोणाकडे पाहावं?

वंचितांनी कोणाकडे पाहावं?

Subscribe

राज्यात वंचितांना आता कोणी वाली राहिलेला नाही, हेच खरंय. त्यांच्या नावावर सर्वांनी पोळ्या भाजल्या आणि तोच वर्ग आज दिनवाणा बनला आहे. ज्यांनी त्यांचा वापर केला ते सगळेच भरपेट जगतात आणि वंचित मात्र आशेच्या किरणांची अपेक्षा ठेवून जगत आहेत. सत्ता कोणाचीही असो, वंचितांचा हा घटक आपल्या मागण्या पूर्ण व्हाव्यात म्हणून शक्यतो आंदोलनं छेडत सत्तेला जागं करण्याचं काम करत असे. त्याचा फायदा सगळ्या वर्गांना व्हायचा. आज सरकारला जागं करण्याची परिस्थिती राहिलेली नाही. कारण सत्तेलाच आपलंसं करण्याचा विडा वंचितांच्या नेत्यांनी उचलला आहे. सत्तेला जागृत करण्याच्या निमित्ताने ज्यांचा आसरा घेतला तेच नेते अप्पलपोटी निघाले आणि स्वत:चा तेवढा फायदा त्यांनी करून घेतला. ज्यांनी अपेक्षा ठेवल्या ते मागेच राहिले. आजही त्यात जराही फरक पडला नाही. तिथे रामदास आठवले असोत वा प्रकाश आंबेडकर. इथे रामदास आठवले यांनी स्वत:चं तेवढं पाहिलं आणि रिपब्लिकन चळवळीचे पुरते बारा वाजवले.

आठवलेंनी रिपब्लिकन पक्षाला भाजपच्या दावणीला बांधलं. आठवलेंचा हा इतिहास आजचा नाही. काँग्रेसच्या सरकारमध्ये ते थेट मंत्री म्हणून रुजू झाले होते. तेव्हाही त्यांनी कधी काँग्रेसच्या तर कधी राष्ट्रवादीच्या दावणीला पक्षाला जुंपलं होतं. तेव्हाही आपल्या पक्षाच्या पाच आमदारांनाही ते निवडून आणू शकले नाहीत. आजही हा पक्ष एकट्या आठवलेंपुढे जाऊ शकलेला नाही. आता तर तो इतका भाजपवासी झालाय की निवडणुका लढवण्यासाठी कमळ हे निवडणूक चिन्ह घेण्याचा आवाज तो पक्ष देऊ लागला आहे. रिपब्लिकन पक्षाचं किती अवमुल्यन झालं हे या सगळ्या परिस्थितीवरून लक्षात येतं.

- Advertisement -

आठवलेंच्या या कार्यपध्दतीला कंटाळलेला कार्यकर्ता हळूहळू त्यांची साथ सोडू लागला. आठवलेंच्या या अशा वागण्यामुळे सामान्य नगरसेवक निवडून आणण्याचीही ताकद पक्षाची राहिलेली नाही, हे दिसू लागताच. अनेकांनी त्यांचा माग सोडत प्रकाश आंबेडकरांची वाट धरली. अनेक कार्यकर्ते आंबेडकरांच्या भारिप-बहुजन महासंघाच्या झेंड्याखाली एक झाले. आठवलेंना सोडून कार्यकर्ते आपल्याकडे येतात हे पाहून प्रकाश आंबेडकरांनी याचा फायदा घेत नव्याने राजकारण खेळण्याची खेळी खेळली. सुरुवातीला त्यांनी तिसर्‍या आघाडीचं निमित्त करत काँग्रेसेतर समविचारी पक्षांना आणि त्यांच्या नेत्यांना एका व्यासपीठावर आणण्याचा प्रयत्न केला. शेकाप, जनता दल, कम्युनिस्ट यांची मोट बांधत आंबेडकरांनी नवा पर्याय देण्याचं निमित्त पुढे केलं. पण तो प्रामाणिक नव्हता. हा पर्याय देतानाही आंबेडकर यांनी तिसर्‍या सहकार्‍यांचीही फसगत केली. आपल्याला हव्या तेवढा हिस्सा घेतला आणि इतरांनाही दिला. तो देताना काँग्रेस आघाडीपुढे अडचण कशी येईल, अशी पध्दतशीर खेळी खेळली. यातून तिसर्‍या

आघाडीच्या सहकार्‍यांना आंबेडकरांच्या अंतर्मनात काय आहे, कळायला वेळ लागला नाही. आंबेडकर आज संघाला कायद्याच्या चाकोरीत आणण्याचा विषय काढत असले तरी त्यांचे आजवरचे राजकीय निर्णय हे संघ पोषक असेच होते, हे तिसर्‍या आघाडीला तेव्हा कळले नाहीत असं नाही. पण चाचपडून पाहण्याशिवाय त्यांच्याकडे पर्याय नव्हता. त्यांनी वेळ घेतला आणि आंबेडकर हे काय रसायन आहे, हे त्यांना पुरतं कळून चुकलं. तिसर्या आघाडीतले सहकारी पुरोगामी राजकारणाचा पहिला विरोधक म्हणून भाजपकडे पाहत असले तरी आंबेडकरांचं तसं नाही. त्यांचा विरोध भाजपऐवजी काँग्रेसला होता. हाच काँग्रेस विरोध भाजपच्या पथ्यावर पडला आहे. या काँग्रेस विरोधाचा फायदा भाजपला होणार हे स्वाभाविक होतं. त्याचे गंभीर परिणाम कार्यकर्त्यांना दिसत होते. माजी न्यायमूर्ती बी.जी.कोळसेपाटील, लक्ष्मण माने यांच्यासारख्या असंख्य नेत्यांनी आंबेडकरांना परिस्थितीचं भान आणून देण्याचा प्रयत्न केला. पण आंबेडकर स्वच्छ नव्हते. त्यांना योग्य आणि अयोग्य कळत नव्हतं असं नाही. पण स्वार्थ माणसाला संकटाकडेच नेतो, हे त्यांनी जाणलं नाही.

- Advertisement -

नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीने आंबेडकरांचा अंतस्त हेतू उघड झाला आणि वंचितांवर कपाळावर हात मारण्याची पाळी आली. ही वंचितांची उघड फसवणूक होती. त्यांनी भरभरून मतं दिली ती प्रकाश आंबेडकर यांच्याकडे पाहून नव्हे तर भाजपपुढे ते योग्य पर्याय उभा करतील या अपेक्षेने. पर्याय उभा राहिला नाहीच. उलट राज्यात काँग्रेसच्या रुपाने तो निर्माण होण्याऐवजी त्याचा फायदा भाजपला झाला. भाजपला फायदा झाल्याचा जराही मनस्ताप आंबेडकरांना नाही, याचंही वंचितांना वाईट वाटलं. आजवर त्यांनी या संबंधी एकदाही स्पष्टीकरण दिलं नाही. आमची ताकद काँग्रेसला कळली, असं सांगत आंबेडकरांनी आपल्या ताकदीचा बाऊ केला. ते काँग्रेसला ब्लॅकमेल करू लागले. सत्ता ही मस्तीचं एक साधन असतं तसंच ब्लॅकमेलिंग करणं हे ही त्याच तर्‍हेचं साधन होय. जे आंबेडकर उघडपणे करत आहेत.

आंबेडकर यांना आलेल्या निर्णयाचा पश्चाताप झाला असता तर त्यांनी स्वत:मध्ये सुधारणा करण्याचा प्रयत्न केला असता. त्यांनी तो केला नाहीच. उलट भाजपला फायदा होईल, अशी नवी खेळी त्यांनी खेळायला सुरुवात केली आहे. आगामी विधानसभा निवडणूक तयारीच्या दृष्टीने समविचारींना एका व्यासपीठावर येण्याचं आवाहनं सगळेच करू लागले आहेत. ज्या काँग्रेसच्या नऊ जागा प्रकाश आंबेडकरांच्या हटवादामुळे हातच्या गेल्या. इतकं होऊनही त्या काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनीही प्रकाश आंबेडकर यांच्याशी आगामी विधानसभा निवडणुकांबाबत चर्चा तयारी दर्शवली. ज्या शरद पवारांच्या विरोधात आंबेडकर कायम आग ओकतात त्या पवारांच्या राष्ट्रवादीनेही चर्चेची तयारी दर्शवली. या तयारीला रुकार देऊन आंबेडकरांनी आपला भाजप विरोध स्पष्ट करायला हवा होता. पण तो करण्याआधीच 288 पैकी काँग्रेस पक्षाला 40 जागा देण्याची आपल्या पक्षाची तयारी असल्याचं सांगत आंबेडकरांनी उफराटेपणाचा कळस केला. हेतू स्पष्ट असता तर आंबेडकरांनी स्वत:च पुढाकार घेऊन भाजपच्या विरोधात सार्‍या विरोधकांना एक करण्याची तयारी केली असती. आंबेडकरांना हे काहीच करायचं नसल्यामुळेच आघाडी होण्याआधीच स्वत:च जागा वाटपाचा खेळ आंबेकडकरांनी सुरू केला. हा खेळ वंचितांच्या फायद्याचा नाहीच. उलट राज्याचं सर्वाधिक नुकसानच यातून होईल आणि त्यात वंचितच भरडून निघतील, हे उघड वास्तव आहे. हे वंचितांना आता कळायला लागलं आहे.

आपली ताकद किती आणि तिचा बाऊ किती करायचा याला काही मर्यादा असतात. ती मर्यादा आंबेडकर यांनी केव्हाच ओलांडली आहे. लोकसभा निवडणुकीत तिचा पहिला प्रयोग पाहायला मिळाला आणि राज्यात भाजपला आयता फायदा झाला. आता राज्यात युतीची सत्ता आणण्याचा विडा आंबेडकरांनी वंचितांच्या नावाने उचललेला दिसतो आहे. खरं तर काँग्रेसला 40 जागांचं वाटप करण्याचा अधिकार आंबेडकरांना कोणी दिला, असा सवाल आता सगळेच विरोधक विचारू लागले आहेत. लोकसभा निवडणुकीत काँग्रेस आघाडीने आपल्यातल्या जागा इतरांना देऊन मतविभागणी टाळण्याचा प्रयत्न केला होता. आता तसा प्रयत्न सुरू होण्याआधीच आंबेडकर 40 जागांचं वाटप कुठल्या अधिकारात करतात, हे ही कळायला मार्ग नाही.

ज्या वंचितांच्या नावाने हा खेळ आंबेडकर करत आहेत, त्या वंचितांची अवस्था राज्यात काय आहे, हे एकदा आंबेडकर यांनी उघड्या डोळ्यांनी पाहावं. देशात मॉबचिलिंगचे होणारे प्रकार हे कोण्या सवर्णाबाबत होत नाहीत. याचे शिकार हे आजवर वंचित असलेले दलित, पददलितच झाले. मुस्लिमांबाबत तर खूपच गंभीर वातावरण देशात निर्माण होऊ पाहत आहे. गेल्या पाच वर्षांत गोरक्षेच्या नावाने आणि आता जय श्रीराम म्हणण्याच्या निमित्ताने अनेक ठिकाणी मुस्लीम बांधवांना गंभीर परिस्थितीला तोंड द्यावं लागत आहे. ज्या वंचितांच्या नावाने आंबेडकर स्वत:ची चूल पेटवतात. त्या वंचितांची ही दु:ख आंबेडकर यांना कळत नसतील, असं कसं म्हणता येईल? आगामी निवडणूक जिंकण्यासाठी अधिक परिश्रम घेण्याची आवश्यकता नाही, असं भाजप नेते आता छातीठोकपणे का सांगत आहेत? फडणवीस आणि चंद्रकांत पाटलांना तर 288 पैकी 250 जागा जिंकण्याची स्वप्न पडू लागली आहेत. ही स्वप्नं उगाच का पडतात. ती आंबेडकरांच्या खांद्यावर टाकलेल्या जबाबदारीतून पडत असावीत, हे उघड सत्य आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -