घरफिचर्सआद्य मराठी गद्यमुद्रक विल्यम कॅरी

आद्य मराठी गद्यमुद्रक विल्यम कॅरी

Subscribe

विल्यम कॅरी हे अर्वाचीन बंगाली व मराठी गद्यलेखनाचा पाया घालणारे पहिले इंग्रज पंडित, ख्रिस्ती धर्मप्रचारक, कोशकार, व्याकरणकार व भाषांतरकार होते. त्यांचा जन्म १७ ऑगस्ट १७६१ रोजी इंग्लंडमधील पोलेर्सपरी येथे झाला. प्रतिकूल परिस्थितीमुळे फारसे शिक्षण घेता आले नसले, तरी धार्मिक साहित्याचे त्यांनी विपुल वाचन केले. वयाच्या सोळाव्या वर्षी त्यांनी चर्मकाराचा व्यवसाय सुरू केला. नंतर मोल्टन येथील एका चर्चमध्ये त्यांनी धर्मोपदेशकाची नोकरी धरली व परदेशात मिशनरी व्हावयाचे ठरविले. पूर्वतयारी म्हणून त्यांनी हिब्रू, ग्रीक व लॅटिन भाषा-साहित्य अभ्यासले.

11 नोव्हेंबर 1793 रोजी ते कोलकाता येथे आले. मदनावती येथे फावल्या वेळात त्यांनी दुभाषी रामराम बसूंकडे बंगालीचा अभ्यास केला. या संदर्भात संस्कृतचे महत्त्व जाणून संस्कृतचाही त्यांनी चांगला अभ्यास केला. ह्याच सुमारास नापूरकर भोसल्यांचे वकील वेणीरामपंत यांचे आश्रित वैजनाथशास्त्री कानफाडे यांच्या मदतीने त्याने मराठीचाही अभ्यास केला. 1799 मध्ये इंग्लंडहून ख्रिस्ती धर्मप्रचारार्थ मार्शमन, वॉर्ड, ब्रॅड्सन व ग्रांट हिंदुस्थानात श्रीरामपूर येथे आले. त्यांनी कॅरींच्या मदतीने बॅष्टिस्ट मिशनचे केंद्र तेथे स्थापन केले.

- Advertisement -

श्रीरामपूर येथे जम बसताच कॅरीनी तेथे एक चर्च, शाळा व छापखाना उभारला आणि आपल्या सहकांर्‍याच्या मदतीने धर्मप्रसारास प्रारंभ केला. या सुमारासच ईस्ट इंडिया कंपनीने कोलकाता येथे फोर्ट विल्यम कॉलेजची स्थापना केली (4 मे 1800). एप्रिल 1801 मध्ये कॅरींची या कॉलेजात संस्कृत, बंगाली व मराठीचे प्राध्यापक म्हणून नेमणूक झाली. मृत्युंजय विद्यालंकार, रामराम बसू व वैजनाथशास्त्री कानफाडे यांच्या मदतीने कॅरींनी आधुनिक बंगाली गद्याचा व मराठी गद्याचा तसेच ह्या भांषातील मुद्रणव्यवसायाचा पाया घातला. कॅरी व त्यांच्या सहकार्‍यांनी बायबलचा सर्व हिंदुस्थानी भाषांत व प्रमुख बोलीत अनुवाद करण्याचे योजिले होते आणि त्यासाठी छापखाना सुरू केला होता. छापखान्याचे आवश्यक साहित्य इंग्लंडवरुन आणले; परंतु मुख्य प्रश्न हिंदुस्थानी भाषांच्या टंकांचा होता. कॅरीने टंक पाडण्याचे काम सर विल्किन्झ यांच्या हाताखाली तयार झालेल्या पंचानन नावाच्या लोहाराकडून करुन घेतले. कॅरींनी स्थापन केलेला छापखाना पुढे श्रीरामपूर मिशन प्रेस म्हणून ओळखला जाऊ लागला.

कॅरीने ग्रामर ऑफ मराठा लँग्वेज (1805) व डिक्शनरी ऑफ मराठा लँग्वेज (1810) हे ग्रंथ तयार करुन प्रसिद्ध केले. मराठीतील हे पहिले मुद्रित गद्यपुस्तक होय. यापुढील सोळा वर्षांत त्याने बायबलचा जुना व नवा करार मराठीत भागशः प्रसिद्ध केला. याशिवाय त्याने वैजनाथशास्त्री कानफाडे यांच्याकडून मूळ बंगालीवरून सिंहासन बत्तिशी (1814), हितोपदेश (1815) आणि प्रतापदित्य चरित्र (1816) हे तीन मराठी अनुवाद करून घेतले. महाराष्ट्रात ग्रंथप्रकाशनाचा आरंभ 1822 मध्ये पंचोपाख्यान ग्रंथाने झाला असला, तरी त्यापूर्वी बंगालमध्ये झालेली मराठी ग्रंथनिर्मिती लक्षात घेता, मराठी ग्रंथमुद्रणाच्या आणि प्रकाशनाच्या आद्यप्रर्वतनाचे श्रेय विल्यम कॅरीकडेच जाते. श्रीरामपूर येथे त्यांचे 9 जून 1834 रोजी निधन झाले.

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -