घरफिचर्सनागरिक, स्वातंत्र्योत्तर भारतातील अस्वस्थता!

नागरिक, स्वातंत्र्योत्तर भारतातील अस्वस्थता!

Subscribe

ऋत्विक घटकचं दिग्दर्शकीय पदार्पण असलेला ‘नागरिक’ रे आणि गुरुदत्त दोघांच्याही पुढे जाऊन नावाजल्या जाणार्‍या चित्रपटांच्याही बरीच वर्षे आधी संकल्पनात्मक पातळीवर निराशावाद, बेरोजगारी, गरिबी या समस्या हाताळतो. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशाच्या अंतर्गत कारभारात सुधारणा घडून येण्याची अपेक्षा असताना प्रत्यक्षात मात्र फाळणीमुळे निर्माण झालेला गोंधळ, देशाची विस्कळीत आर्थिक घडी यामुळे पुढील बराच काळ देशात अस्वस्थतेचं वातावरण होतं.

भारतीय आणि त्यातही पुन्हा बंगाली चित्रपटसृष्टीतील समांतर चित्रपट चळवळीचा विचार केल्यास आता सत्यजित रे, ऋत्विक घटक आणि मृणाल सेन ही नावं एका दमात घेतली जातात. असं असलं तरी प्रत्यक्ष त्यावेळी मात्र त्यांच्या कामाला मिळणार्‍या प्रतिसादाचा विचार करता एखादं नाव दुसर्‍याहून अधिक प्रसिद्ध असणं स्वाभाविक होतं. सत्यजित रेंच्या चित्रपटांना राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर मिळणारा प्रतिसाद, आणि त्यांच्या चित्रपटांचं निर्विवादपणे उत्तम असणं त्यांना लवकरच समांतर चित्रपट चळवळीच्या केंद्रस्थानी आणणारं ठरलं.

- Advertisement -

याउलट, ऋत्विक घटक यांच्या कामाला मात्र त्यांच्या हयातीत असताना अशा तर्‍हेचा प्रतिसाद मिळू शकला नव्हता. स्वतः रेंनी आपल्या समकालीन असलेल्या घटक यांच्या कामाचं महत्त्व लक्षात घेत त्यांचं काम आंतरराष्ट्रीय वर्तुळाच्या परिचयाचं करून देण्याचा प्रयत्न केला तरी त्याला एका विशिष्ट प्रमाणाहून अधिक यश मिळालं नाही. बंगाली कलात्मक चित्रपटांच्या सुरुवातीच्या काही चित्रपटांपैकी एक असलेला घटक यांचा पहिला चित्रपट ‘नागरिक’ १९५२ मध्ये, म्हणजे रेंच्या ‘पथेर पांचली’च्याही तीन वर्षे आधी तयार झाला असला तरी त्याच्या प्रदर्शनाला १९७७ चं वर्ष उजाडू द्यावं लागलं यातूनच या गोष्टीची कल्पना येऊ शकते.

ऋत्विक घटकचं दिग्दर्शकीय पदार्पण असलेला ‘नागरिक’ रे आणि गुरुदत्त दोघांच्याही पुढे जाऊन नावाजल्या जाणार्‍या चित्रपटांच्याही बरीच वर्षे आधी संकल्पनात्मक पातळीवर निराशावाद, बेरोजगारी, गरिबी या समस्या हाताळतो. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशाच्या अंतर्गत कारभारात सुधारणा घडून येण्याची अपेक्षा असताना प्रत्यक्षात मात्र फाळणीमुळे निर्माण झालेला गोंधळ, देशाची विस्कळीत आर्थिक घडी यामुळे पुढील बराच काळ देशात अस्वस्थतेचं वातावरण होतं. दारिद्य्र आणि बेरोजगारी या संज्ञा तर जणू पाचवीला पुजलेल्या होत्या. याच स्वातंत्र्योत्तर भारतातील कलकत्त्यात राहणारा रामू (सतींद्र भट्टाचार्य) हा समाजातील सुशिक्षित बेरोजगारांपैकी एक आहे.

- Advertisement -

पदवीधर असलेल्या रामूच्या हातात नोकरी नसल्याने रोजच्या गरजा पूर्ण करण्याइतक्या आर्थिक उत्पन्नाचीही मारामार आहे. आजारी वडिलांच्या पेन्शनवर सगळं कुटुंब अवलंबून आहे. वाढतं वय आणि वर कुटुंबाच्या सौंदर्याच्या अतर्क्य अपेक्षांमुळे सीता (सोवा सेन) या त्याच्या बहिणीच्या लग्नात अडथळे निर्माण होत आहेत. दर थोड्या दिवसांनी एखाद्या नव्या ठिकाणी मुलाखत देऊन नोकरीची आशा बाळगणारा रामू एक महिन्यात येणार्‍या संभाव्य पगाराच्या जीवावर स्वप्नाच्या माड्या बांधत असला तरी प्रत्यक्षात लक्तरं उडालेल्या घराचं भाडं थकलेलं आहे. निम्न मध्यमवर्गीय म्हणाव्याशा कुटुंबाची ही परिस्थिती तत्कालीन भारतातील बर्‍याच मोठ्या सामाजिक, आर्थिक वर्गाचं प्रतिनिधित्व करते.

रामू जिच्यावर प्रेम करतो त्या उमाच्या (केतकी दत्त) घरची परिस्थितीदेखील याहून निराळी नाही. तिची आजारी आई आणि बहीण शेफाली या त्रिकोणी कुटुंबाच्या मूलभूत गरजादेखील पूर्ण होण्याचे संकेत नाहीत. त्यांच्या घराशेजारी राहणार्‍या जतिनची (केश्तो मुखर्जी) परिस्थिती तर याहून अधिक हलाखीची आहे. रामूला जतिनची ही अवस्था सहन होत नसली तरी तो स्वतः सध्या आर्थिकदृष्ठ्या दुर्बल असल्याने इच्छा असूनही जतिनची किंवा उमाच्या कुटुंबाची मदत करू शकत नाही. रामूला प्रयत्न करूनही नोकरी मिळत नसल्याने त्याची आई सागरला (अजित बॅनर्जी) आपल्या घरात पेइंग गेस्ट म्हणून राहू देते. सागरदेखील इतरांप्रमाणेच पदवीधर असून नोकरीच्या शोधात आहे.

रामूपासून सागरपर्यंत इथली बहुतांशी सगळीच पात्रं बाह्य जगातील भौतिक गरजांशी थेट संबंध असणार्‍या समस्या आणि त्यांच्या जाणिवेने आंतरिक पातळीवर होणारी घालमेल अशा दोन्ही पातळ्यांवर ग्रासलेली आहेत. उत्तरोत्तर वाढत जाणारा निराशावाद ही यातील महत्त्वाची संकल्पना आहे. रामू नोकरीच्या शोधात फिरत असताना अगदी पदवीधर ते पीएचडी करणार्‍या लोकांपर्यंत सर्वच लोक सुशिक्षित बेरोजगार या बिरुदाचे मानकरी आहेत. आपल्या शैक्षणिक पात्रतेहून कमी दर्जाच्या कामासाठी हे लोक वणवण फिरताना दिसतात. आपल्यावर कुटुंबाचा भार असताना आपण कुटुंबाच्या भौतिक गरजा पूर्ण करणं तर दूरच; पण स्वतःचं आंतरिक समाधानसुद्धा करू शकत नसल्याच्या दुहेरी भावनेत निराशावादाचं मूळ दिसून येतं. अर्थात ‘नागरिक’चा शेवट निराशावादी नसला तरी त्याच्या एकूण लांबीदरम्यान त्याचा सूर निराशा आणि अस्वस्थतेकडे झुकणारा आहे.

‘नागरिक’ कलात्मक चित्रपटांच्या दृष्टीने किती महत्त्वाचा आहे हे त्याच्या चित्रणाची शैली, रूपकात्मक मांडणी आणि त्यातील संगीताचा वापर यातून दिसून येतं. त्यात पार्श्वभूमीवर चालणार्‍या मोजक्या गाण्यांमध्ये चित्रपटाचा अर्क एकवटला आहे. तत्कालीन परिस्थितीचं आणि समाजातील मोठा भाग व्यापणार्‍या घटकांच्या अस्वस्थतेचं नेमकं चित्रण करणार्‍या या चित्रपटाच्या सर्वसमावेशक वैश्विकतेमुळे त्याच्या नावाची समर्पकता दिसून येते. त्यामुळेच रेंसारख्या दिग्दर्शकाला आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील महत्त्वाच्या समीक्षकांना ऋत्विक घटक आणि त्यांचे चित्रपट भारतातील समांतर चित्रपट चळवळीच्या दृष्टीने महत्त्वाचे का वाटतात हे स्पष्ट होतं. शिवाय, काळ बदलला असला तरी सदर चित्रपटातील घटना आणि भावना अजूनही रेलेवंट आहेत यातच सगळं आलं.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -