कोरोनावर सकारात्मक ऊर्जेचा उतारा 

पनवेल, उपजिल्हा रुग्णालय
कोरोना हा आजार सकारात्मक ऊर्जेने अर्धा बरा होतो, त्यामुळे रुग्णांना जरी अन्य वेळी सिनेमातील गाणी ऐकण्याची सवय असली तरी कोरोनाग्रस्त म्हणून जेंव्हा ते रुग्णालयाच्या बेडवर होते तेंव्हा त्यांना सिनेमाच्या गाण्यांपेक्षा भक्ती गीते, देवांच्या आरत्या ऐकाव्याशा वाटत होत्या. अनेकजण प्राणायाम करत होते, त्यामुळे कोरोनातून बाहेर पडण्यासाठी औषधोपचारासोबत अशा आध्यात्मिक प्रयत्नांचाही तितकाच परिणाम होतो, हे लक्षात आले. श्रद्धेच्या बळावर कोरोनावर मात करता येते. भारतभूमी मुळातच आध्यात्मिक संस्कृतीची आहे, प्रत्येकजण कोणत्या ना कोणत्या श्रद्धास्थानाशी जोडलेला असतो, त्यामुळेच त्यांच्यात कोरोनाच्या काळात सकारात्मक ऊर्जा वाढत जाते. म्हणूनच भारतात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण अधिक आहे, याउलट अमेरिका, इटली, ब्रिटेन या अत्यंत वैद्यकीयदृष्ट्या प्रगत असलेल्या देशांमध्ये मात्र भारताच्या तुलनेत मृतांची संख्या खूप जास्त आहे, यामागे हेच कारण आहे. 
कोरोना असा आजार आहे की, तुम्ही म्हणाल मी बाहेर प्रवासात असताना हातात ग्लोज घालतो, तोंडाला मास्क लावतो, लोकांपासून अंतर ठेवतो, बाहेरचे खात-पीत नाही, घरी आल्यावर गरम पाणी पितो, अंघोळ करतो, कपडे गरम पाण्यात धुतो, हे सर्व करत असल्याने मला कोरोना होऊच शकत नाही. अशांना मी प्रामाणिकपणे सांगतो की, तुम्ही असा समज करून घेऊ नका. कोरोना आता बऱ्यापैकी पसरला आहे, मोठ्या संख्येने प्रत्यक्ष – अप्रत्यक्ष अनेकजण कोरोनाबाधित असतात जे दिवसभरात आपल्या कोणत्या ना कोणत्या मार्गाने संपर्कात येतात, अशा वेळी आपण सतत सतर्क असूच अशी खात्री स्वतःलाही देऊ शकत नाही, त्यामुळे नोकरदार वर्गाने आता हि मानसिकता करून घ्यावी. मी देखील वरील सर्व सुरक्षेचे नियम पाळून दररोज कार्यालयात जात होतो, मात्र तरीही मला कोरोनाची लागण झाली. मला कोरोना होणार नाही, अशी मानसिकता मी बाळगून होतो त्यामुळे जेंव्हा कोरोना झाला तेंव्हा खचून गेलो.
२ जुलै रोजी सकाळी मला प्रचंड डोकेदुखी सुरु झाली, दुपारी ताप १०२ होता, संध्याकाळपासून जुलाब सुरु झाले. सलग ५ दिवस ताप होता, व्हायरल असेल म्हणून खाजगी डॉक्टरकडे उपचार घेतले, डेंग्यू, मलेरियाची चाचणी केली, रिपोर्ट नॉर्मल निघाले, त्यामुळे अखेर डॉक्टरांनी कोरोनाची चाचणी करण्यास सांगितले आणि माझी धाकधूक सुरु झाली. एक शहाणपण सुचले पहिल्या दिवसापासून मी स्वतःला बेडरूममध्ये विलगीकरण करून घेतले, पत्नी आणि मुलगी यांच्यापासून दूर गेलो. त्यामुळे आज त्या सुरक्षित आहेत. आजही अनेकांना खासगी डॉक्टर कोरोनाची फक्त चाचणी करायला सांगतात, ती कशी आणि कुठे करायची हे समजावण्याच्या भानगडीत पडत नाहीत, थोडक्यात म्हणजे त्या डॉक्टरला समजून आले असते कि हा रुग्ण कोरोनाचा संशयित बनला आहे, त्यामुळे तो रुग्णाला लवकर कटवण्याचा प्रयत्न करतो. असाच अनुभव आलेला मी अखेर चाचणी कुठून करायची, कुठे नोंद करायची, चाचणीसाठी खाजगी डॉक्टर चिठ्ठी लिहून देत नाहीत, मलाही हाच अनुभव आला, अखेर विचारपूस केल्यांनतर पनवेल महापालिका आरोग्य केंद्रात नाव नोंदणी केली, त्याप्रमाणे खासगी लॅबमध्ये टेस्ट केली, रिपोर्ट पॉसिटीव्ह आला. त्याच वेळी सोसायटीतील पदाधिकाऱयांना सविस्तर कल्पना दिली, त्यांना विश्वासात घेतल्याने, ते सहकार्याच्या भूमिकेत आले, माझ्या पत्नीला धीर देऊ लागले, दुसरीकडे महापालिकेचे डॉक्टर घरी आले, त्यांनी ऑक्सिजन तपासल्यावर ९९ असल्याचे पाहून म्हणाले तुम्ही घरीच रहा, चांगले आहात, नाहीतर क्वारंटाईल सेंटरमध्ये राहा. परंतु मला ताप, जुलाब हि लक्षणे असल्यामुळे मला रुग्णालयातच दाखल करण्याची मी विनंती केली, त्यावर तुमचा वैद्यकीय विमा आहे का, खासगी रुग्णालयात जाऊ शकता का, अशी विचारणा होवू लागली. मात्र याला मी नकार दिल्याने अखेर मला पनवेल उप जिल्हा रुग्णालयात आणण्यात आले तिथेही बेड नसल्याने तुम्हाला दाखल करून घेणार नाही, असे सांगण्यात येऊ लागले, खूप विनंत्या केल्यानंतर दाखल करून घेण्यात आले.

कोरोनावर सरकारी रुग्णालयातच योग्य उपचार होतात असा ठाम विश्वास माझा झाला आहे. सरकारी रुग्णालयात न जाता कर्ज काढून खासगी रुग्णालयात उपचार घेणाऱ्यांनी हि बाब समजून घ्यावी. एका वॉर्डमध्ये १४ बेड होते. ज्या रुग्णांना सौम्य लक्षणे असतात त्यांच्याकरता स्वतंत्र वॉर्ड आणि ज्यांना ऑक्सिजनची गरज आहे त्यांना स्वतंत्र वॉर्ड असतो. त्या वॉर्डमध्ये प्रत्येक बेडवर ऑक्सिजनची यंत्रणा असते. गंभीर रुग्णांसाठी स्वतंत्र वॉर्ड, याशिवाय अतिदक्षता विभाग आहे. ज्या रुग्णांना मधुमेह, रक्तदाब असे आजार असतात, त्यांचा रोज सकाळी आणि रात्री मधुमेह तपासाला जातो, रक्तदाब तपासाला जातो, त्याप्रमाणे त्यांना त्यावरही औषधोपचार केला जातो. सकाळी नाश्ता दिला जातो, दुपारी आणि रात्री जेवण दिले जाते, तीन चपात्या, एक सुकी भाजी, एक पातळ भाजी, आमटी, भात असे पदार्थ असतात, सकाळ, संध्याकाळ चहा दिला जातो. दिवस – रात्र नर्स पीपीई किट घालून वारंवार वॉर्डमध्ये येऊन रुग्णाला सलाईन लावणे, इंजेक्शन देणे, ऑक्सिजन लावणे, वयस्क रुग्णाला दैनंदिन कृती करणे शक्य होत नाही, त्यासाठी त्यांना मदत करणे अशा सर्व कृती करतात, त्यावेळी आपले कुणीही जवळ नसते, अशा वेळी या नर्स आपली बहीण, मुलगी, मैत्रीण या भावनेने रुग्णांना सांभाळून घेतात. वयस्करांना काका, तरुणांना दादा असे संबोधित करत होत्या. डॉक्टरही पीपीई किट घालून वॉर्डमध्ये येऊन रुग्णाची विचारपूस करत होते. रुग्नांचे एक्सरे, इसिजी काढले जातात, रक्ताचे नमुने घेऊन त्यांची तपासणी केली जाते, ६ दिवस, १० दिवस, १२ किंवा १४ दिवस असा प्रकारे रुग्नाची रिकव्हरी होते त्याप्रमाणे त्यांना घरी पाठवण्यात येते. त्यासाठी रुग्णाला रुग्णवाहिकेतून घरापर्यंत सोडले जाते. दाखल होतानाही १ रुपया भरावा लागत नाही आणि रुग्ण बरा झाल्यावर त्याला रुग्णवाहिकेतून घरापर्यंत सोडेपर्यंतही १ रुपया भरावा लागत नाही.
रुग्णालयात असताना मला सकारात्मक राहता यावे म्हणून आधी सोशल मीडियापासून दूर राहिलो, बातम्या पाहणे बंद केले, मित्र मंडळी, नातेवाईक यांचे फोन घेणे बंद केले, एकांतवास अनुभवण्याचा प्रयत्न केला, त्या जोडीला नामसाधना, ध्यान धारणा केली. आध्यात्मिक दिनचर्येने सकारात्मक ऊर्जा वाढली. अशक्तपणा, जेवण न जाणे, अंगदुखी, अशा परिस्थितीत केवळ आध्यात्मिक शक्तीने मला सकारात्मक शक्ती, ऊर्जा मिळाली. वॉर्डमध्ये मी एकटाच नव्हतो जो आध्यात्मिक साधना करत होतो, असे इतरही रुग्ण होते, जे सकाळ, संध्याकाळ भक्ती गीते, भजने, आरत्या ऐकत होते, कुणीही सिनेमाची गाणी ऐकत नव्हते.
सांगायचा मुद्दा हा आहे की, कोरोना हा आजार सकारात्मक ऊर्जेने अर्धा बरा होतो, त्यामुळे रुग्णांना जरी अन्य वेळी सिनेमातील गाणी ऐकण्याची सवय असली तरी कोरोनाग्रस्त म्हणून जेंव्हा ते रुग्णालयाच्या बेडवर होते तेंव्हा त्यांना सिनेमाच्या गाण्यांपेक्षा भक्ती गीते, देवांच्या आरत्या ऐकाव्याशा वाटत होत्या. अनेकजण प्राणायाम करत होते, त्यामुळे कोरोनातून बाहेर पडण्यासाठी औषधोपचारासोबत अशा आध्यात्मिक प्रयत्नांचाही तितकाच परिणाम होतो, हे लक्षात आले. श्रद्धेच्या बळावर कोरोनावर मात करता येते. भारतभूमी मुळातच आध्यात्मिक संस्कृतीची आहे, प्रत्येकजण कोणत्या ना कोणत्या श्रद्धास्थानाशी जोडलेला असतो, त्यामुळेच त्यांच्यात कोरोनाच्या काळात सकारात्मक ऊर्जा वाढत जाते. म्हणूनच भारतात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण अधिक आहे, याउलट अमेरिका, इटली, ब्रिटेन या अत्यंत वैद्यकीयदृष्ट्या प्रगत असलेल्या देशांमध्ये मात्र भारताच्या तुलनेत मृतांची संख्या खूप जास्त आहे, यामागे हेच कारण आहे. तेथील समाजव्यवस्था चंगळवादी आहे, केवळ मौजमजा करणे, फास्ट फूड खाणे, मद्यपान, अमलीपदार्थ सेवन करणे, अशी बहुतेकांची दिनचर्या असते. त्यामुळे तेथील रुग्णांना जेंव्हा कोरोना होतो तेंव्हा औषधोपचारासोबत सकारात्मक ऊर्जा मिळवण्यासाठी कोणतेही ज्ञान नसल्याने तेथील रुग्ण आधीच खचून जातात आणि औषधोपचाराला प्रतिसाद देणे बंद करतात. कारण कोरोना हा मुळातच सकारात्मक ऊर्जेशिवाय लवकर बरा होऊ शकत नाही.
शेजारी पाजारी, नातेवाईक कोरोना होऊनही घरी ठणठणीत बरे होऊन येत आहेत, हे पाहिल्यावर आता भारतीयांमधील कोरोनाची भीती निघून गेली आहे, कालपर्यंत जे कोरोना हा भयंकर आजार आहे, जीवघेणा आहे, असे सांगत एकमेकांना घाबरवत होते तेच आता कोरोना झाला तरी घाबरायचे नाही, साधा ताप आहे, १५ दिवस सांभाळायचे बाकी काही नाही, असे बिनधास्त सांगत आहेत. हा देखील सकारात्मकतेचा टप्पा आहे. हि मानसिकता खऱ्या अर्थाने समाजात अनलॉक सुरु झाल्याचे द्योतक आहे.