स्त्रीजीवनचा चित्रमय कोलाज

अनुजनाथ या केरळमधील चौदा वर्षांच्या मुलाने आपल्या आईला घरात सतत काम करताना पाहिलं होतं. एवढंच नव्हे तर तिच्यासारख्याच आजूबाजूच्या कष्ट करणार्‍या असंख्य स्त्रियाही त्याने पाहिल्या होत्या. त्या घरी असल्या तरी त्यांना कोणत्याही प्रकारची उसंत मिळत नव्हती, हे त्याच्या लक्षात आलं. त्या कोणत्या ना कोणत्या कामात प्रचंड व्यस्त होत्या. अगदी सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत त्यांची काही ना काही कामे सुरू होती. मग त्याने आई आणि आजूबाजूच्या इतर ग्रामीण स्त्रियांच्या जगण्याचा एक चित्रमय कोलाज तयार करण्याचे ठरवले. त्यातून त्याने एक अप्रतिम चित्र साकार केले. त्याच्या या चित्राला जागतिक प्रसिद्धी मिळाली आहे. दुर्दैवाने त्याची आई आज हयात नाही, पण त्याने आपल्या चित्राच्या माध्यमातून स्त्रियांच्या श्रमाला दुर्लक्षित करणार्‍यांचे डोळे उघडले आहेत.

‘भारतीय स्त्री जीवन’ या ग्रंथाच्या एका प्रकरणात गीता साने यांनी स्त्री प्रश्नांच्या पार्श्वभूमीचा विचार करत असताना स्त्रियांच्या अगदी प्रारंभिक जगण्याविषयी आणि तिच्या स्थानाविषयी एक महत्त्वाचे निरीक्षण नोंदवले आहे. त्यांनी असं म्हटलंय, ‘श्रम विभाजनामुळे स्त्री व पुरुष हे गट वेगळे झाले आणि हा भेदच स्त्रीच्या दास्याला कारणीभूत झाला. त्याकाळी कुठल्याही गटाचे काम कमी प्रतीचे मानलेले नव्हते. ‘पुरुषी’ व ‘बायकी’ असा भेदही कामांमध्ये नव्हता. स्त्री स्वतंत्र होती व शेतकरी गटात तिला जास्त स्वातंत्र्य होते. तिच्या प्रज्ञेला घुमारे फुटत होते. मानवी विकासाला ती हातभार लावीत होती.

उत्पादन वाढवणारी नवनवीन साधने ती शोधून तयार करीत होती. त्या साधनांचे स्वामित्वही तिच्याकडे होते. तिच्या गटात हळूहळू मुलांना झेपणारे काम मिळू लागले. सुपीक प्रदेशात शेतीचे उत्पन्न जमातीच्या निर्वाहाला पुरेल इतके वाढल्यावर पारध व कंदमुळे गोळा करण्याचे काम दुय्यम ठरून सारी जमात शेतीवर राबू लागली. आणि शेतीवरच विसंबू लागली. स्त्रीने विकास करून वाढवलेले काम पुरुषाने स्वीकारले याचा अर्थ, तोवर स्त्री-पुरुष असा वर्गभेद अस्तित्वात आलेला नव्हता. कोणतेही काम बायकी म्हणून हिणकस ठरलेले नव्हते.’ अर्थात ही गोष्ट काही शतकांपूर्वीची असली तरी स्त्रियांच्या कामाला कमी लेखणे किंवा तिला हिणवणे हे आजही घडत आहेच. विशेषतः सध्याच्या प्रचंड आधुनिक वगैरे म्हणवल्या जाणार्‍या काळात हे चित्र दुर्दैवाने अधिक ठळक होत आहे.

स्त्रियांच्या कामाची पत का आणि कशी? घसरली असा प्रश्न पडणे स्वाभाविक आहे. मागच्या काही दशकांपासून स्त्रियांचा सार्वजनिक वावर प्रचंड वाढला आहे. मानवी संस्कृतीला व्यापून असलेल्या बहुतेक सर्वच क्षेत्रात स्त्रियांनी आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला आहे. या काळात स्त्रियांच्या चळवळीही मोठ्या प्रमाणात गतिमान झाल्या आणि न्याय हक्काच्या लढाईचा संघर्षही लढला गेला. या संघर्षाचे काही बरे परिणाम नक्कीच झाले. विशेषतः कायद्याने समानता आणली गेल्यामुळे स्त्रियांच्या कर्तृत्वाचे अवकाश अधिक विस्तृत झाले. म्हणजे नोकरी व्यवसाय करणार्‍या किंवा तत्सम क्षेत्रात वावरणार्‍या स्त्रीवर्गाला किमान प्रतिष्ठा मिळाली, परंतु त्याचबरोबर घर-संसार सांभाळणार्‍या, शेती वगैरे करणार्‍या स्त्रियांना मात्र ही प्रतिष्ठा मिळाली नाही. स्त्रियांचे ‘घरीच’ असणे हे कमीपणाचे ठरवले गेले. ‘गृहिणी’ असण्याकडे कुत्सितपणे पाहिले गेले. तथापि गृहिणी असलेल्या स्त्रियांची दैनंदिनी जरी आपण पाहिली तरी तिच्या श्रमाची, व्यस्ततेची कल्पना आपल्याला सहज येऊ शकते.

या विषयावर चर्चा करण्याचं कारण म्हणजे सोशल मीडियात व्हायरल होत असलेलं एक अफलातून चित्र. अर्थात हे चित्र अगदी आत्ताच चित्रकाराने काढलेय असे नाही. ते जुनेच आहे. परंतु सध्या हे चित्र वेगाने व्हायरल होत आहे. अनेक जणांनी या चित्राविषयी आणि चित्रकाराविषयी बरंच काही लिहिलं आहे. मी ज्या चित्रकाराच्या चित्राविषयी बोलतोय त्याचं नाव आहे अनुजनाथ सिंधू विनयलाल. जेमतेम चौदा पंधरा वर्षाचा हा मुलगा केरळातल्या एका गावातला. अनुजनाथ सध्या त्याच्या सर्जनशीलतेने राष्ट्रीय पातळीवर चर्चेत आला आहे. अगदी लहानपणापासून चित्रकलेची आवड असणार्‍या अनुजनाथने शेकडो चित्रे काढली आहेत. आणि विशेष म्हणजे प्रत्येक चित्रातून त्याने काहीतरी मोलाचा संदेश दिला आहे. त्याचं हे चित्रकलेतलं अपवादात्मक कर्तृत्व पाहून त्याला तत्कालीन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्तेही सन्मानित करण्यात आले आहे. ‘चित्रामुळे मला शांती मिळते. चित्रामुळे मला एका नव्या जगाचा परिचय होतो.’ असं तो म्हणतो.

अनेक स्पर्धा जिंकणार्‍या अनुजच्या या चित्राने मात्र अनेकांना विचार करायला भाग पाडलं आहे. त्याची आई ‘गृहिणी’ होती. म्हणजे घरीच राहत होती. वडिलांना कोणी विचारले की, ‘तुमची बायको काय करते? ’ तर त्यांचं इतर पुरुषांसारखंच उत्तर ठरलेलं होतं, ‘काही नाही घरीच असते !’

परंतु अनुजनाथसारख्या संवेदनशील मुलाला वडिलांचे हे उत्तर मान्य नव्हते. खरं तर ‘त्याची आई घरी असते’ हे खरं असलं तरी ती घरी असते याचा अर्थ ती ‘काहीच करत नाही’ असा होत नाही. अनुजनाथनं आपल्या आईला घरात सतत काम करताना पाहिलं होतं. एवढंच नव्हे तर तिच्यासारख्याच आजूबाजूच्या कष्ट करणार्‍या असंख्य स्त्रियाही त्याने पाहिल्या होत्या. त्या घरी असल्या तरी त्यांना कोणत्याही प्रकारची उसंत मिळत नव्हती, हे त्याच्या लक्षात आलं. त्या कोणत्या ना कोणत्या कामात प्रचंड व्यस्त होत्या. अगदी सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत त्यांची काही ना काही कामे सुरू होती. मग त्याने आई आणि आजूबाजूच्या इतर ग्रामीण स्त्रियांच्या जगण्याचा एक चित्रमय कोलाज तयार करण्याचे ठरवले. त्याने एक अप्रतिम चित्र साकार केले. ‘ती घरीच असते’ याला त्याने दिलेलं हे एक उत्तर होतं. या चित्रात असंख्य स्त्रिया आहेत. कार्यमग्न असणार्‍या स्त्रिया.

कष्टकरी स्त्रियांची कितीतरी रूपं त्याने या चित्रात रेखाटली. स्वयंपाक करणारी, मुलांना आंघोळ घालणारी, त्यांना शाळेसाठी तयार करणारी, घर अंगणाची झाडलोट करणारी, आडातून पाणी शेंदणारी, भांडे घासणारी, गाईचं दूध काढणारी, उंचच उंच नारळाच्या झाडावरचे नारळ काढणारी अशी कितीतरी स्त्रीचित्रे त्याने रेखाटली. त्याची ही कल्पकता अत्यंत अफलातून म्हणायला हवी. स्त्रियांचे धावपळीचे जगणे तो रोज बघत होता. या जगण्यालाच त्याने चित्रबद्ध केले. आई घरी असली तरी ती किती व्यस्त असते आणि व्यस्त असूनही ती घरीच असते असा जो उपहास केला जातो तो अनुजनाथने या चित्राद्वारे खोडून काढला. हे चित्र खूप बोलके आहे. केरळ सरकारने या चित्राची दखल घेतली. अनुजनाथला पुरस्कारही देण्यात आला. आणि या चित्राची देशभरात चर्चा सुरु झाली. हे चित्र जगभर पोहोचले. कारण अनुजनाथने या चित्रातून संपूर्ण समाजाला एक नवीन वैचारिक दृष्टी दिली आहे. दुर्दैवाने त्याच्या आईचे अकाली निधन झाले, पण तिच्या विषयीची कृतज्ञता कायमच त्याच्या मनात आहे. त्याने आपल्या आईविषयी भावना व्यक्त करताना असं लिहिलंय, My Mother was my biggest cheearleader, and she would always encourage me to make each painting better than the previous one. With her faith and my fathers support, i hope to pursue this professionally after I complete my studies

हे चित्र पाहण्यापेक्षा अनुभवायला हवे असं मला वाटतं. कोणत्याही शब्दांचा वापर न करता केवळ चित्रभाषेतून असे प्रकट होण्याची त्याची ही कला केवळ अप्रतिम आहे. खरंतर स्त्री-पुरुष समतेचे तत्त्व आज सर्वांनी मान्य केलेले असले, तरी बहुतेक पुरुषांच्या नेणिवेत एक अहंकार दडलेला असतोच. त्या पार्श्वभूमीवर हे चित्र मला अधिक मोलाचं वाटतं. या दृश्य भाषेतून या छोट्या कलावंताने जो प्रश्न आणि जी सामाजिक मानसिकता अधोरेखित केली आहे तीसुद्धा अत्यंत महत्वाची आहे. कलानिर्मितीचा एक निकोप पैलू आणि दृष्टीकोन या मुलाने देशाला दाखवून दिला. एवढेच नव्हे तर रूढ सामाजिक धारणांनासुद्धा या चित्रामुळे छेद देण्यात आला आहे.

आपल्याकडे यापूर्वी अनेक चित्रांमुळे समाजावर मोठे आघात झाले आहेत. अनेक वाद उद्भवले आहेत. पण अनुजनाथने मात्र समाजाला अधिक संवेदनशील बनवले आहे. हे चित्र कलाकृती म्हणून सुंदर आहेच, पण त्यात विचारसौंदर्यही सामावले आहे. एक मुलगा असा विचार करू शकतो ही गोष्ट खूप अर्थपूर्ण म्हणायला हवी. हे केवळ चित्र नाही तर हा एक वैश्विक आशय आहे. म्हणूनच या मुलाची इथे नोंद घ्यावी वाटली. स्त्रियांच्या कामाची पत वाढविणारे हे चित्र आपणही जरूर समजून घ्या.

-र्पी. विठ्ठल