घरफिचर्समायमहानगर ब्लॉगमजबुरीच्या दगडाखालचा हात!

मजबुरीच्या दगडाखालचा हात!

Subscribe

महाराष्ट्रात अंबानींच्या घरासमोरील स्फोटके प्रकरण, निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे प्रकरण आणि आता मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्र प्रकरणावरून सध्या राजकीय धुळवड रंगली आहे. होळीला अजून काही दिवस बाकी असताना आरोप-प्रत्यारोपाचे रंग एकमेकांवर फेकून एकमेकांची तोंडे काळी करण्याचा शिवसेना-भाजप-राष्ट्रवादी काँग्रेसचा खेळ ऐन रंगात आला आहे. याचवेळी काँग्रेसवर कोणच रंग टाकत नसल्याने आपण काय करावे हेच त्यांना कळलेले नाही. खरेतर 2014 पासूनच त्यांना काय करायला हवे हे कळलेले नसल्याने त्यांचा चेहरा पांढरा फटक पडून भाजपचा चेहरा मात्र नको तितका उजळला आहे. सध्या शिवसेना कोमात आणि भाजप जोमात असताना शिवसेना नेते संजय राऊत यांनी अनेक रंग एकत्र करत ते उधळले आहेत.

दिल्लीत पत्रकार परिषद घेत त्यांनी महाराष्ट्रातील महाविकास आघाडी ही शिवसेनेची राजकीय मजबुरी आहे आणि हे सर्व भाजपमुळे झाले आहे. तिन्ही पक्षांची वेगवेगळी विचारधारा आहे. पण, आम्ही हिंदुत्वाशी कुठलीही तडजोड केली नाही आणि हिंदुत्वाचा अजेंडा बदलला नाही, असे रंग दाखवले आहेत. शिवसेनेचे रंग कसे बदलतात, हे आतापर्यंत अनेक वेळा लोकांनी पाहिलेले आहे, त्यात नवीन काहीच नाही. पण, आता महाविकास आघाडीच्या निमित्ताने एकत्र येऊन पुरोगामी रंग लावल्यावर त्याची दीड वर्षात लाज वाटावी म्हणजे लग्न होऊन घटस्फोटाची भाषा बोलायला सुरुवात केल्यासारखी आहे. सचिन वाझे प्रकरणात लाज गेल्यानंतर झालेला हा पश्चात्ताप आहे का? पण, एकूणच वाझेसारख्या एका कनिष्ठ अधिकार्‍याला नको तितके मोठे करण्याचा प्रकार शिवसेनेच्या अंगाशी आला आहे. भस्मासूराला वर दिल्यानंतर तो इतरांबरोबर ज्याने वर दिलाय त्याच्या डोक्यावर हात ठेवून त्यालासुद्धा भस्मसात करतो, असे आपण पुराणात वाचले होते. आता पुराणातील वांगी पुराणातच ठेवा असे कोणी सांगेल, पण राजकीय मजबुरी हीसुद्धा पुराणातील वांगीच आहेत.

- Advertisement -

एकत्र असताना ज्या हिंदुत्वाच्या ‘फेविकोल का जोड’ ठरलेल्या मुद्यावर सेना-भाजप एकत्र आले होते, त्या वेळी यापुढे एकसाथ वाटचाल करायची आहे त्या हिंदुत्वाच्या संकल्पना काय आहेत, ज्या मुद्यावर एकत्र येत आहोत ते हिंदुत्व कसे आहे, याचा विचार त्या वेळी ना सेनेने केला, ना भाजपने. काही वर्षांपूर्वी शरद पवार यांनी देशात गैरकाँग्रेसवादी राजकीय पर्याय असायला हवा आणि तो सशक्त असायला हवा, यासाठी प्रयत्न सुरू केले. त्या पार्श्वभूमीवर सेना-भाजपची युती झाली. ही युती ज्या हिंदुत्वाच्या मुद्यावर झाली तो सेनेने आणि भाजपने आपल्याला हवा तसा घेतला, इतकाच त्याचा अर्थ. भाजपचे हिंदुत्व कसे आहे, हे शिवसेनेने समजून घेतले नाही आणि शिवसेनेचे हिंदुत्व कसे आहे, हे लक्षात घ्यायची गरज भाजपला कधी वाटली नाही! त्यामुळे वेगळे झाल्यावर हे दोन्ही पक्ष आता परस्परांच्या हिंदुत्वाच्या संकल्पनांवर टीकास्त्र सोडताना दिसत आहेत. ज्यातून शेंडी-जानव्यांचे हिंदुत्व वेगळे, मंदिरे आणि ढोल बडवायचे हिंदुत्व वेगळे, असा सगळा सावळागोंधळ सुरू आहे. सेना काय अन भाजप काय यांचा हिंदुत्वाशी, या वैश्विक जीवनपद्धतीशी वा या संकल्पनेशी कितपत संबंध येतो, हा प्रश्न उपस्थित केला तर याचे उत्तर हास्यास्पद येते.

हे स्पष्ट असे सत्ताकारण आहे, यात हिंदुत्वाचा मुद्दा जोडणे गैर ठरेल. सेना-भाजप सत्तेसाठी एकत्र आले होते, त्यांनी एकत्रपणे विरोधी बाकांवर बसण्याचा अनुभव घेतला, सत्ताही एकत्रितपणे राबवली. मग नेमके कुठे चुकले? सेना-भाजपमध्ये असे काय वितुष्ट निर्माण झाले, ज्यामुळे 35 वर्षे एकत्र वाटचाल केल्यानंतर काडीमोड घ्यावासा वाटला? या प्रश्नांची उत्तरे सेना-भाजपमध्ये निवडणूकपूर्व आणि ऐन निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या घडामोडींच्या आधारेही देता येतील. भाजपवाले सांगतील की, शिवसेनेने आमची फसवणूक, कोंडी केली होती. इतकी वर्षे सेनेसोबत फरफटत गेलो होतो, पण त्यांचे नखरे, मागण्या आता सहन करण्यापलीकडे जात होत्या वगैरे. त्यांच्या दृष्टीने ते स्वाभाविकच मानावे लागेल. तर ज्यांना आजवर आम्ही समविचारी मानत होतो, त्यांनी शब्द देऊन आमची फसवणूक केली, असा दावा शिवसेना करेल. पण तटस्थपणे विचार करायचा झाल्यास भाजपला महाराष्ट्रातील सत्ता स्थापनेची संधी देवेंद्र फडणवीस यांच्या (अति)आत्मविश्वासाने गमवावी लागली आहे का, याचे उत्तर ‘होय’ असेच येते.

- Advertisement -

काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या कारभाराचा जनतेला बराच अनुभव आहे, त्यांच्या काळात रोज नवा भ्रष्टाचार बाहेर पडत असतो. तो झाला नाही तर जनताही हळहळते! या दोन्ही पक्षांना आजवर धारेवर धरणारी शिवसेनाच सध्या त्यांच्यासह सत्तेत सहभागी आहे, ही नवी गोष्ट आहे. या महाविकास आघाडीत शिवसेनेची पुरती कोंडी झाली, तर ती स्वतःहून बाहेर पडेल अथवा पवारांना वाटेल तेव्हा ते हे सरकार पाडतील, हे स्पष्ट आहे. पण यासाठी भाजप किंवा फडणवीस यांनी प्रयत्न करून प्रतिमा डागाळून घ्यायचे काहीच कारण नाही. पण, तसे ते करताना दिसत आहेत. यातून ते सत्तेसाठी किती आसुसलेले आहेत, हे दिसून येते. या सर्व बाजूंचा विचार करता एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदावर येऊन आता अठरा एक महिन्यांचा काळ लोटला आहे. आता त्यांची प्रशासनावर घट्ट पकड असायला हवी होती. पण, सुरुवातीपासून त्यांनी यात फार लक्ष घातले नाही आणि आता वाझे प्रकरणानंतर सर्व संकटे त्यांच्याभोवती फिरताना दिसत आहेत. पाच वर्षे सत्ताकारण केलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाबरोबर गृहमंत्रीपद हाती ठेवून सत्तेचे दोर आपल्या हातून निसटणार नाहीत, याची पुरेपूर काळजी घेतली होती. सनदी अधिकार्‍यांबरोबरच पोलीस प्रशासनावर त्यांची करडी नजर होती. मुख्यमंत्री म्हणून त्यांची स्वतःची एक समांतर व्यवस्था होती.

मुख्य म्हणजे ते आधी कोणावर अवलंबून नव्हते. उलट उद्धव ठाकरे यांनी सत्ता आल्यानंतर फडणवीस यांच्या मर्जीतील अनेक सनदी तसेच पोलीस प्रशासनातील अनेक अधिकार्‍यांना त्याच जागी ठेवले आणि हेच अधिकारी खडानखडा माहिती फडणवीस यांना देत आहेत. आज विरोधी पक्षनेते आपल्या नेहमीच्या वरच्या स्वरात आणि हाती कागद घेऊन उद्धव ठाकरे सरकारवर का हल्लाबोल करत आहेत, याचे कारणच हेच आहे. दरबारी राजकारण करत लोकांमधून निवडून न आलेल्या काही मोजक्या मंत्र्यांवर विश्वास ठेवण्याचा अतिआत्मविश्वास मुख्यमंत्र्यांच्या अंगाशी आला आहे. उद्धव ठाकरे यांची लोकांमध्ये चांगली प्रतिमा तयार होऊन हे सरकार पाच वर्षे चालेल, असे वाटत असताना आता चारी बाजूने सरकारवर हल्ले होत आहेत. पण, अजूनही वेळ गेलेली नाही. उद्धव ठाकरेंनी आता स्वतः पुढे येऊन या संकटाचा सामना करायला हवा. एवढ्यातच महाविकास आघाडी सरकार म्हणजे राजकीय मजबुरी आहे, असे संजय राऊत यांनी मान्य करणे म्हणजे आपल्या पराभवाची कबुली देणे होय. केंद्राच्या भीतीने पुन्हा एकदा शिवसेना भाजपशी सूत जमवू पाहत असेल तर ती त्यांची राजकीय मजबुरी नव्हे तर राजकीय आत्महत्या ठरेल…

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -