घरफिचर्समायमहानगर ब्लॉगकाँग्रेसने जयराम रमेश आठवावेत!

काँग्रेसने जयराम रमेश आठवावेत!

Subscribe

२०१३ च्या जुलै महिन्यात भाजपने मोदींना पंतप्रधानपदासाठी उमेदवार म्हणून घोषित केले. त्यावेळी भाजपतही कोणाला मोदींची क्षमता ओळखता आलेली नव्हती, ती ओळखणारा देशातील एकटा राजकीय नेता वा अभ्यासक जयराम रमेशच होते. त्यांनी तेव्हाच आपल्या काँग्रेस पक्षाला धोक्याचा इशारा दिलेला होता. नरेंद्र मोदी हे स्वातंत्र्योत्तर काळातील काँग्रेस समोरचे सर्वात मोठे आव्हान आहे, अशी टिप्पणी त्यांनी केली होती. पण त्यातला इशारा समजून घेणे बाजूला राहिले आणि त्यांच्यावरच मोदीभक्त असल्याचा शिक्का मारून त्यांच्या तोंडात बोळा कोंबला गेला होता.

कुठल्याही महामार्गावरून तुम्ही प्रवास करीत असाल, तर शेकडो लहानमोठे फलक तुम्हाला बघायला मिळतात. ते सामान्य प्रवाशांसाठी नसतात, तर जो कोणी वाहन चालक असेल, त्याच्यासाठी सावधानतेचे इशारे असतात. कुठे उजव्या किंवा डाव्या बाजूला वळण आहे, किंवा कुठे सहसा अपघात होतात, त्याच्या सूचना त्यातून दिलेल्या असतात. नवख्या ड्रायव्हरला वेगात गाडी पळवताना असलेला धोका त्यातून सुचित केलेला असतो. पण असे फलक त्या ड्रायव्हर किंवा त्याच्या वाहनाला अपघातातून संरक्षण अजिबात देत नाहीत. ते फक्त स्ंभाव्य धोक्याचा इशारा देतात. तो समजून घेतला तर अपघातापासून आपल्याला आपलेच संरक्षण करणे शक्य असते. उलट त्याकडे कानाडोळा केला तर अपघाताला आमंत्रणच दिले जात असते. अर्थात त्यामुळे अपघात टाळला जाईल अशी हमी कोणी देऊ शकत नाही.

पण सहसा कोणी तितका आगावूपणा करत नाही. पण काही अतिशहाणे असतात आणि त्यांना सूचना वा इशार्‍यापेक्षाही आपल्या कौशल्य व हिंमतीवर अधिक विश्वास असतो. ते अपघाताला आमंत्रण देण्यास पुढे सरसावलेले असतात. किंबहुना अशा धोक्यातूनही आपण कसे सहज निसटलो, त्यातही पुरूषार्थ सांगण्यात पुढेच असतात. मात्र म्हणून त्यांचा कपाळमोक्ष व्हायचे थांबत नाही. तो लांबू शकतो, व्यवहारातही तसेच असते. नको तितका धोका पत्करणे, हा शहाणपणा नसतोच. पण धोका कोणी समजावला असतानाही तो झिडकारण्यातला पुरूषार्थ जीवनात कुठेही घातपातालाच आमंत्रण देत असतो. काँग्रेस नेते जयराम रमेश नावाचा फलक असाच आहे व होता. पण त्याला झुगारण्यातला पुरूषार्थ काँग्रेसच्या कपाळमोक्षाला कारणीभूत झाला आहे. सध्याही काँग्रेसमध्ये तेच सुरू आहे.

- Advertisement -

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना खलनायक म्हणून रंगवण्याचे बंद करा आणि त्यांचे कुठले कार्यक्रम लोकप्रिय ठरले वा त्यातून त्यांना पुन्हा सत्ता मिळाली, त्याचे विधायक परिशीलन करा. असा सल्ला जयराम रमेश यांनी सुमारे तीन वर्षांपूर्वी आपल्याच पक्षाला दिला होता. एका पुस्तकाच्या प्रकाशनप्रसंगी बोलताना रमेश म्हणाले, नुसता विरोधासाठी विरोध वा एका व्यक्तीला खलनायक रंगवणे काँग्रेस पक्षाला महागात पडलेले आहे. मोदींच्या अनेक योजना लोकांपर्यंत पोहोचत आहेत आणि म्हणूनच त्यांना लागोपाठ दुसर्‍यांदा जनतेने कौल दिलेला आहे. त्यांना मिळालेली एकूण मते बघितली पाहिजेत.

पण २००९ च्या निवडणुकीत कुठेही राष्ट्रीय क्षितीजावर नसलेला हा नेता, अकस्मात २०१४ साली काँग्रेसला आव्हान होऊन कशाला पुढे येऊ शकला? त्याकडेही गंभीरपणे बघितले पाहिजे. त्याच्या आगमनाला किंवा स्वागताला तत्कालीन परिस्थिती कारण झालेली आहे. असे रमेश म्हणतात, तेव्हा ते स्वपक्षाचे कान उपटत असतात. २००९ साली काँग्रेसला वा युपीएला मतदाराने दुसरी संधी दिली, तेव्हा कुठलेही मोठे राजकीय आव्हान काँग्रेस समोर नव्हते. कोणी आव्हानच नसल्यामुळे पक्षाला सत्ता मिळू शकली. अर्थात त्यावेळी काँग्रेसचा दुसर्‍यांदा दारूण पराभव झाल्यावर रमेश यांना सुचलेले हे शहाणपण नव्हते. त्यांनी हाच इशारा २०१३ साली दिलेला होता आणि २०१८ सालातही दिलेला होता. पण तो काँग्रेसला कळलाच नाही.

- Advertisement -

२००९ सालात काँग्रेससमोर कुठले मोठे आव्हान नव्हते. पण विरोधात कोणी नसल्याची मस्ती किती असते, ती काँग्रेसने अल्पमताचे सरकार चालवितानाही दाखवलेली होती. ती मस्ती नुसतीच शिरजोरी नव्हती, तर किळसवाणा म्हणावा इतका सत्तेचा माज होता. पण त्याला विरोध करायला कोणी विरोधी राजकीय पक्ष वा नेता ठामपणे समोर आला नाही. लोकांच्या भावनांचा आवाज उठवायला अण्णा हजारे किंवा बाबा रामदेव अशा राजकारणबाह्य लोकांना मैदानात यावे लागले होते. तर त्यांचीही गळचेपी करायला सत्तेचा वापर काँग्रेसने क्रूरपणे केला होता. अण्णांना धरणे धरण्यापासून रोखताना हजारो लोकांची धरपकड केली होती आणि रामदेव बाबांना तर रामलिला मैदानातून मध्यरात्री पळवून लावण्यापर्यंत गुंडगिरी युपीए सरकारने केलेली होती. तितकेच नाही, निर्भया प्रकरणातही काँग्रेस पक्ष अत्यंत निर्दयपणे वागला होता. सहाजिकच त्याला सत्तेतून हटवणे अगत्याचे झाले होते.

पण रामदेव किंवा अण्णा हजारे राजकीय पर्याय नव्हते आणि लोक समर्थपणे राजकीय नेतृत्व देऊ शकेल अशा नेत्याचा शोध घेऊ लागले होते. ती राजकीय पोकळी भरून काढू शकेल असा नेता म्हणून नरेंद्र मोदी पुढे सरसावले. खरेतर त्यांना नेता म्हणून पुढे आणण्याचे कामही त्यांच्याच विरोधकांनी केलेले होते. ज्यांच्यावर सामान्य जनता रागावलेली व नाराज होती, असा प्रत्येक पक्ष व नेता नरेंद्र मोदींच्या नावाने कायम शिवीगाळ करत होता आणि एकप्रकारे मतदारासमोर नरेंद्र मोदींना पर्यायी नेता म्हणूनच सादर करीत होता. ज्यांच्याविषयी मतदाराला तिटकारा आलेला होता. त्यांना ज्याचा धोका वाटतो, तो आपोआप जनतेला पर्याय वाटला. कारण लोकांना नुसता नेता पंतप्रधान नको होता, तर मुजोर राजकारण्यांना वठणीवर आणू शकेल, धाक दाखवू शकेल असा कोणी हवा होता. या लोकांनी आपल्याला कोणाचा धाक आहे, त्याचीच साक्ष दिल्याने लोकांचे काम सोपे झाले आणि २०१३ च्या आरंभी भारतीय क्षितीजावर मोदींचा उदय झाला होता.

इथे रमेश यांचे विधान समजून घेतले पाहिजे. २००९ पासून २०१४ पर्यंत परिस्थितीनेच मोदींना राजकीय क्षितीजावर आणले, असेही त्यांनी उगाच म्हटलेले नाही. काँग्रेस व गांधी घराण्याच्या मस्तवाल वागण्याने जी राजकीय दुर्दशा देशाची करून टाकलेली होती, त्या स्थितीने मोदी हा उपाय बनवला होता. असेच रमेश यांना म्हणायचे आहे. आणखी काहीकाळ काँग्रेसच्या हाती सत्ता राहिली तर देश दिवाळखोरीत जायला वेळ लागणर नाही, अशी मानसिकता काँग्रेस व युपीएने निर्माण केली. म्हणून मोदींचे काम सोपे होऊन गेले होते. कारण तेव्हा लोकांना कल्याणकारी वा विकास करणारा नेता अजिबात नको होता. काँग्रेसी दिवाळखोरीतून मुक्ती देईल, असाच नेता लोक शोधत होते आणि त्याच मतदाराला गुजरातचे विकास मॉडेल भुरळ घालून गेले. काँग्रेसी अनागोंदी विरुद्ध गुजरातचे सुसह्य प्रशासन, असा तुलनात्मक प्रकार लोकांसमोर होता आणि तिथेच मोदी बाजी मारून गेले होते. हे केवळ जयराम रमेश सांगतात, असेही नाही, तेव्हाही त्यांनी तेच सांगितले होते.

पण ऐकायला कोण तयार होता? २०१३ च्या जुलै महिन्यात भाजपने मोदींना पंतप्रधान पदासाठी उमेदवार म्हणून घोषित केले. त्यावेळी भाजपतही कोणाला मोदींची क्षमता ओळखता आलेली नव्हती, ती ओळखणारा देशातील एकटा राजकीय नेता वा अभ्यासक जयराम रमेशच होते. त्यांनी तेव्हाच आपल्या काँग्रेस पक्षाला धोक्याचा इशारा दिलेला होता. नरेंद्र मोदी हे स्वातंत्र्योत्तर काळातील काँग्रेस समोरचे सर्वात मोठे आव्हान आहे, अशी टिप्पणी त्यांनी केली होती. पण त्यातला इशारा समजून घेणे बाजूला राहिले आणि त्यांच्यावरच मोदीभक्त असल्याचा शिक्का मारून त्यांच्या तोंडात बोळा कोंबला गेला होता. म्हणून सत्य सिद्ध व्हायचे थांबले नाही, की काँग्रेसला कोणी दुर्दशेपासून वाचवू शकला नाही. २०१४ सालच्या लोकसभा निवडणुकीत इतिहासात काँग्रेसचा इतका मोठा पराभव कधी झाला नव्हता आणि तेच सत्य रमेश सांगत नव्हते का? आजही काँग्रेसच्या पराभवाची मालिका सुरू आहे.

पश्चिम बंगालमध्ये काँग्रेस भुईसपाट झाला आहे. आसाममध्ये हरला. तामिळनाडूत डीएमकेसोबत आहेत म्हणून सत्तेत स्थान आहे. केरळमध्ये देखील काँग्रेसला संधी मिळाली नाही. पण तरीही काँग्रेसची मोदी बदनामीची मोहीम काही थांबलेली नाही. टुलकिट हा त्याचाच प्रकार आहे. भल्यावाईट पद्धतीने मोदींची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केला तर मोदी हरतील, असे काँग्रेसच्या नेत्यांना वाटत असेल तर त्यांनी आजही तीन वर्षांपूर्वीचे आपले नेते जयराम रमेश यांचे वक्तव्य तपासून पहावे. कारण सलग तीनदा तेच बरोबर ठरले आहेत. यापुढेही तेच बरोबर ठरण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे टुलकिट किंवा तत्सम खोटेनाटे करून मोदींची प्रतिमा मलिन होईल या स्वप्नरंजनात राहणे काँग्रेसने आता तरी थांबवावे. त्यापेक्षा जनतेसाठी कामे करून आपल्या पक्षाला गतवैभव प्राप्त करून द्यावे. पण आजतरी काँग्रेस त्यातून बाहेर पडू इच्छित नाही, हेच खरे.

Santosh Malkarhttps://www.mymahanagar.com/author/msantosh/
आपलं महानगर मुंबई आवृत्ती निवासी संपादक. गेली २५ वर्षे पत्रकारितेत आहे. आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -