मी निगेटिव्ह निघालो, पण कस्तुरबा रुग्णालयात… एका रुग्णाचा स्वानुभव

एक संशयित रुग्ण म्हणून माझा प्रवास, अनुभव आणि शासन, संबंधित यंत्रणांना सूचना

kasturba hospital
CoronaVirus: कस्तुरबात अत्याधुनिक आयसोलेशन वॉर्डाच्या स्वतंत्र इमारती होणार

मी १७ मार्च रोजी यु.के.हून विमानाने निघालो आणि व्हाया दुबई असा प्रवास करत १८ मार्चला मुंबईला पोहोचलो. मुंबई एअरपोर्टवर थोडीशी चौकशी आणि शरीराचे तापमान नॉर्मल असल्याने मला घरी जाऊ देण्यात आले. परदेशातील आणि भारतातील हवामान एकदम उलट असल्याने मला दुसर्‍या दिवशी सर्दीचा त्रास होऊ लागला. सद्यपरिस्थितीची कल्पना असल्याने मी अंगावर न काढता नजिकच्या डॉक्टरांकडे गेलो. डॉक्टरांना माझ्या परदेश प्रवासाची माहिती असल्याने त्यांनी मला कस्तुरबा हॉस्पिटलला जाण्याचा सल्ला दिला. त्यानुसार मी ताबडतोब कस्तुरबा हॉस्पिटलला पोहोचलो. परंतु तेथे प्रवेश करताच काही गोष्टी खटकल्या. त्यानुषंगाने मला काही सूचना कराव्याशा वाटतात.

(मला माहीत आहे की, महाराष्ट्र शासन, आरोग्य यंत्रणा, पोलीस आदी संबंधित यंत्रणांवर या ‘कोरोना’मुळे प्रचंड ताण पडत आहे. जीव धोक्यात घालून ते आपले कर्तव्य पार पाडत आहेत. परंतु या विषाणूचा प्रसार रोखण्याकरिता आणि रुग्णांना चांगले उपचार मिळण्याकरिता काही उपाय करणे गरजेचे आहे.)

(१) कस्तुरबात प्रवेश करताच माझ्यासह अनेक संशयित रुग्ण गोंधळलेल्या अवस्थेत होते. कारण ‘आत आलो, आता पुढे काय…?’ असा प्रश्न आमच्यासमोर होता. म्हणून पहिल्यांदाच आलेल्या रुग्णांना अचूक मार्गदर्शनाची तिथे गरज आहे. जेणेकरून तो रुग्ण इतरत्र न फिरता योग्य ठिकाणी जाईल.

(२) आलेल्या रुग्णांच्या सोबत दोन-दोन, तीन-तीन नातेवाईक होते. या सगळ्यांची बसण्याची व्यवस्था एकत्रच होती. म्हणजे रुग्ण आणि नातेवाईकांची एकत्र गर्दी होती. इतकेच नाही तर हे नातेवाईक ओपीडीमध्येही येऊन बसत होते. म्हणजे रुग्ण ज्या वस्तू हाताळत होते किंवा जिथे हात लावत होते तेथेच हे नातेवाईकही हात लावत होते. हे फारच गंभीर आहे. या सर्व वस्तू, प्लॅस्टिक खुर्च्या, दरवाजाचे हॅण्डल यांना सॅनिटायझरने वेळोवेळी स्वच्छ करणे गरजेचे आहे.

(३) थोड्या वेळाने डॉक्टरांनी माझी तपासणी केली आणि काही प्राथमिक प्रश्न विचारले. त्यानुसार मी यु.के.वरून आलो असे सांगितले. मग मला २४ तास अ‍ॅडमिट व्हावे लागेल, असे सुचवण्यात आले. परंतु माझे कोणतेही डॉक्युमेंट तपासले नाहीत वा मागितले नाहीत. असे डॉक्युमेंट न तपासल्यामुळे कोणी खोटी माहिती सांगण्याची शक्यता नाकारता येत नाही. सरकार आणि रुग्णालय अशा लोकांना अनेक सुविधा विनामूल्य पुरवत असते.

(४) इथल्या संपूर्ण ओपीडी आणि प्रतिक्षालयाची सॅनिटायझरने वेळोवेळी स्वच्छता होणे गरजेचे आहेत. तसेच तेथे कर्तव्यावर असलेल्या पोलिसांना पुरेसे मास्क, हॅण्डग्लोव्हज आणि सॅनिटायझर उपलब्ध होणे महत्त्वाचे आहेत. इथेच संभाव्य पॉझिटिव्ह रुग्ण, संशयित रुग्ण आणि नातेवाईक एकत्र असतात. काळजी घेतली नाही, तर करोना विषाणूचा संसर्ग इथूनच इतरांना होण्याची शक्यता आहे.

(५) दुसरे महत्त्वाचे म्हणजे, प्राथमिक तपासणी केल्यानंतर सर्वांना एकाच वॉर्डमध्ये अ‍ॅडमिट केले जाते. तपासणीसाठी नेलेल्या नमुन्यांची चाचणी पॉझिटिव्ह की निगेटिव्ह हे २४ तासांनंतर कळते. तोपर्यंत सर्व रुग्ण एकत्रच असतात. खरं तर इथंच जास्त धोका असतो. कारण या २४ तासांत पॉझिटिव्ह रुग्णांनी अनेक वस्तूंना हात लावलेला असतो. त्याच वस्तूंना कदाचित निगेटिव्ह असणार्‍या लोकांचाही स्पर्श होऊन तेही करोनाबाधीत होण्याची दाट शक्यता असते. याची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे इथल्या स्वच्छतागृहांकडेही लक्ष देण्याची गरज आहे.

(६) हॉस्पिटलमध्ये जेवण, चहा, नाश्ता पुरवणारे कर्मचारी हॅण्डग्लोव्हज घालत नाहीत. उघड्या हातांनीच ते पाण्याचा तांब्या सर्व रुग्णांना देत असतात. याचा धोका रुग्णांना आणि त्या कर्मचार्‍यांनाही आहे. त्या कर्मचार्‍यांनीही हॅण्डग्लोव्हज आणि सॅनिटायझर वापरणे गरजेचे आहे. तसेच डॉक्टरांनाही पुरेशा प्रमाणात ग्लोव्हजची आवश्यकता असल्याचे माझ्या निदर्शनास आले.

(७) हॉस्पिटलमधील खुर्च्या, कॉट, दरवाजे आणि इतर वस्तूंचे सॅनिटायझरचा वापर करून निर्जंतुकीकरण करण्याकरिता सध्याच्या काळात विशेष अतिरिक्त कर्मचारी नियुक्त करणे गरजेचे आहे.

(८) …आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे, हॉस्पिटलच्या गेटच्या आत पेशंट सोडून नातेवाईकांना प्रवेश देऊ नये. कारण हे नातेवाईक येताना सुदृढ असतात, परंतु काही पेशंटसोबत हॉस्पिटलमध्ये असताना इथल्या खुर्च्या, दरवाजांच्या कड्या व इतर ठिकाणी स्पर्श करतात. त्यामुळे दुर्दैवाने हॉस्पिटलमधून बाहेर जाताना संसर्गित ठिकाणचा एखादा कोरोना विषाणू सोबत घेऊन जाण्याची भीती आहे. त्यामुळे नातेवाईकांना गेटच्या आत प्रवेश देता कामा नये.

सुदैवाने माझी चाचणी ‘निगेटिव्ह’ आली. मी २४ तास कस्तुरबा हॉस्पिटलमध्ये अ‍ॅडमिट होतो. या काळात मला सुचवाव्या वाटणार्‍या गोष्टी वर नमूद केल्या आहेत. ‘करोना’चा फैलाव रोखला जावा व कस्तुरबातील डॉक्टर, नर्सेस, वॉर्डबॉय, पोलिसांसह तिथले रुग्ण, नातेवाईक व इतर स्टाफ यांनी निरोगी रहावे हीच यामागची भावना आहे. काही उणिवा जरुर असल्या तरी त्यांचे आताचे योगदान आणि कर्तव्याला सलाम.

कृपया शासन आणि प्रशासनाने सकारात्मक विचार करावा.


लेखक राम धुरी यांनी त्यांचे कस्तुरबा रुग्णालयातील स्वानुभव ब्लॉगच्या माध्यमातून मांडले आहे.