नसीब अपना अपना…

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे प्रतिरुप म्हणजे राज ठाकरे असेच एकेकाळी शिवसैनिक मानत होेते; पण पुढे राज शिवसेनेतून बाहेर पडले आणि त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पक्ष स्थापन केला. त्याला सुरुवातीला मोठा प्रतिसाद मिळाला; पण अलीकडे त्या पक्षाच्या उमेदवारांना आपले डिपॉझिट वाचवणे अवघड झालेे आहे. राज ठाकरे आता नव्या दमाने मैदानात उतरले आहेत, नाशिकला त्यांनी नुकतीच भेट दिली. दुसर्‍या बाजूला काहीही आसभास नसताना शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे राज्याचे मुख्यमंत्री झाले. त्यांनी जवळजवळ दोन वर्षांचा कार्यकाल व्यवस्थितरित्या पूर्ण केला आहे. आक्रमक भाषण शैलीच्या राज ठाकरेंच्या सभांना प्रचंड गर्दी जमते, तर दुसर्‍या बाजूला सौम्य स्वभावाचे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले. म्हणतात ना, नसीब अपना अपना...

mns leader raj thackeray and cm uddhav thackeray political journey
नसीब अपना अपना...

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महापालिका निवडणुकांच्या निमित्ताने पुन्हा एकदा नव्या दमाने सुरुवात केली आहे. नाशिक महापालिकेने मनसेला साथ दिली होती, त्यामुळेच त्यांनी नाशिकमधूनच सुरुवात केली आहे. त्यासाठी ते नाशिकला गेले होेते. नाशिकची जबाबदारी त्यांनी त्यांचे पुत्र अमित यांच्याकडे दिली आहे. नाशिकची सत्ता मनसेला मिळाली होती; पण पुढे त्यांना ती गमवावी लागली. ती पुन्हा मिळण्यासाठी आणि राज्यभरात मनसेचा प्रभाव वाढावा, यासाठी राज ठाकरे यांची धडपड सुरू आहे. शिवसेनेत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर राज ठाकरे असे समीकरण जनमतावर पक्के झाले होते; पण पुढे परिस्थिती बदलली आणि बाळासाहेबांनंतर उद्धव ठाकरे यांनी पक्षांची सूत्रे आपल्या हाती घेतली. राज ठाकरे यांनी त्यानंतर शिवसेना सोडली आणि ते बाहेर पडले. त्यानंतर त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा आपला स्वतंत्र पक्ष स्थापन केला.

सुरुवातीला राज ठाकरे यांच्या पक्षाला निवडणुकांच्या राजकारणात चांगले यश मिळाले. राज्यातील विधानसभा निवडणुकीत त्यांचे १३ आमदार निवडून आले. बर्‍याच ठिकाणी नगरसेवक निवडून आले. त्यामुळे पुढे हा पक्ष शिवसेनेला पर्याय ठरू शकले, अशा शक्यता वर्तवल्या जाऊ लागल्या होत्या. कारण यशाच्या मागे जग असते. त्यामुळेच काहीही करून माणसे यशस्वी होण्यासाठी धडपडत असतात. कारण एकदा माणूस यशस्वी झाला की, तो कसा यशस्वी झाला, याचा कुणी शोध घेत नाही, मग त्याने ते यश मिळवण्यासाठी कुठलाही मार्ग स्वीकारला की पवित्र होऊन जातो, इतके जीवनात यशस्वी होण्याला महत्व असते. राज ठाकरे यांच्या पक्षाला मिळालेल्या यशानंतर त्यांनी गुजरातचा विकास पाहण्यासाठी तिकडचा दौरा केला, तेव्हा नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री होते. पुढील काळात मोदींनी महाराष्ट्रामध्ये आपल्यासोबत बोलणी करावीत, त्यांनी शिवसेनेकडे जाऊ नये, असे राज यांना वाटू लागले होते.

त्यातूनच मग नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधानपदाच्या उमेदवारीला राज ठाकरे यांनी समर्थन दिले; पण काळ जसा पुढे पुढे सरकत गेला, तशी परिस्थिती बदलत गेली. निवडणुका लागतात, तेव्हा राज ठाकरे यांच्या सभांना प्रचंड गर्दी जमते. लोक जोरदार टाळ्या वाजवतात. हशा, कोट्या, कोपरखळ्या यांचा पाऊस पडतो. राज ठाकरे यांच्या चौफेर टोलेबाजीत समोरची प्रचंड गर्दी न्हाऊन निघते. पण जेव्हा प्रत्यक्ष मतदानाचा दिवस येतो, तेव्हा या गर्दीला मनसेच्या निवडणूक चिन्हाचे बटण दाबायचा विसर पडतो. त्यामुळे मनसेच्या उमेदवारांना आपली डिपॉझिट्सही वाचवणे अवघड होऊन बसते. त्यात पुन्हा जे विजयी होतात, ते राज ठाकरेंसोबत फार काळ राहत नाहीत, अगदी मुंबई महापालिकेतील मनसेचे सात नगरसेवक पक्षाचा त्याग करून शिवसेनेत गेले. अशी परिस्थिती का आणि कशामुळे होते याचा विचार राज ठाकरे यांनीही केला असेल.

संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर सर्वसामान्य माणसाला प्रथम हक्क आणि न्याय मिळेल, अशी आशा निर्माण झाली होती. पण काँग्रेस पक्षाचे नेते आम्ही राष्ट्रीय पक्ष असल्यामुळे आम्ही सगळ्या देशाचा विचार करतो, प्रादेशिक विचार करत नाही. केंद्रातील काँग्रेसचे नेते सामान्य मराठी माणसाच्या नोकरीधंद्याकडे लक्ष द्यायला तयार नव्हते. अशा वेळी मराठी माणसाची झालेली कोंडी फोडण्यासाठी एका बिनधास्त नेत्याची आणि संघटनेची गरज होती, त्यातूनच शिवसेनेचा जन्म झाला. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासारखे झुंजार नेतृत्व मिळाले. शिवसेनेमुळे राज्यात सामान्य मराठी लोकांना एक व्यासपीठ मिळाले. त्यातूनच त्यांच्यामध्ये नवा आत्मविश्वास निर्माण झाला.

ते नगरसेवक, आमदार, खासदार, मंत्री झाले. काँग्रेससारखा प्रस्थापित पक्ष ज्यांची दखलही घेत नव्हता, अशा लोकांना शिवसेनेने नवे व्यासपीठ आणि नवा आत्मविश्वास मिळवून दिला. काँग्रेसचा प्रभाव आणि लक्ष हे प्रामुख्याने पश्चिम महाराष्ट्राकडे असे. कोकणाकडे त्यांचे फारसे लक्ष नसे. निवडणुका आल्या की, प्रचारासाठीच ही मंडळी कोकणात येत आणि ‘ताई माई अक्का, विचार करा पक्का, आणि हातावर मारा शिक्का’ अशा आरोळ्या देत असत. आणि त्यांच्या जीपगाड्या पाहण्यासाठी गावातली पोरे धावत असत. अशा राजकीयदृष्ठ्या उपेक्षित असलेल्या कोकणपट्टीत शिवसेनेला राजकीय विस्तारासाठी स्पेस मिळाली. त्यामुळे शिवसेना आणि कोकण हे जीवाभावाचे नाते निर्माण झाले. केवळ भगव्या रंगामुळे अनेकांचा पोटापाण्याचा प्रश्न सुटला. मुंबईसारख्या आर्थिक राजधानीत मानसन्मान मिळाला. आर्थिक परिस्थिती सुधारली.

मुंबई महापालिकेत तर गेली २५ वर्षे शिवसेनेची सत्ता आहे. मुंबई हा मराठी माणसाच्या दृष्टीने हळवा कोपरा आहे. कारण मुंबईसह महाराष्ट्र मिळवण्यासाठी मराठी माणसाने खूप मोठा लढा दिला होता, त्यात १०५ जणांना आपले जीव गमवावे लागले होते. अशा या मुंबईमध्ये आता मराठी माणसांचा टक्का कमी होत आहे. ही शिवसेनेसाठी चिंतेची बाब आहे. कारण मराठी माणूस हा त्यांचा हुकमी मतदार आहे. भाजप हा त्यांचा पूर्वी मित्र असला तरी आता तो कडवा स्पर्धक झालेला आहे. त्यात आता एक दुसरी गोष्ट घडत आहे की, ती म्हणजे राज ठाकरे यांचा मनसे शिवसेनेचा स्पर्धक असलेल्या भाजपची हातमिळवणी करेल, अशी चर्चा अधूनमधून डोके वर काढत आहेत. पण एकेकाळी भाजपने भूमीपुत्रांसाठी लढणार्‍या आणि प्रांतीयवादी म्हणवल्या जाणार्‍या शिवसेनेसोबत युती करून राज्यातील आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमधील सत्ता मिळवली होती.

आता शिवसेना भाजपचे मानायला तयार नसल्यामुळे त्यांची युती तुटली आणि शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत गेली. आता तर शिवसेनेला राष्ट्रीय पक्ष होण्याचे वेध लागले आहेत. शिवसेनेेचे नेते संजय राऊत म्हणत आहेत की, शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे हे आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत, ते उद्या देशाचे पंतप्रधानही होतील,अशा वेळी त्यांना शरद पवारांच्या नावाचाही विसर पडतो. शिवसेना जशी राष्ट्रीय होण्याकडे झुकत आहे, तशी त्यांची इथल्या मूळ मराठी माणसांवरची पकड ढिली होण्याची शक्यता जास्त आहे. कारण सध्या जरी त्याचे महाविकास आघाडी अंतर्गत काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत एकत्रिकरण झाले असले तरी ते भविष्य काळात किती टिकेल हा एक प्रश्न आहे. कारण या दोन पक्षांची राजकीय विचारसरणी ही काही शिवसेनेशी जुळणारी नाही. शिवसेनेेने केलल्या या आघाडीमुळे सर्वसामान्य शिवसैनिकांची कोंडी झाली आहे. कारण आजवर विरोधात असलेल्या दोन्ही काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या सोबत ते प्रचारात कसे उतरणार, हा प्रश्न त्यांच्यासमोर आहे.

शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री होतील, असा त्यांनाही अंदाज नव्हता; पण शिवसेनेचा मुख्यमंत्री व्हावा, या आग्रहामुळे त्यांना ती जबाबदारी घ्यावी लागली. आता संजय राऊत त्यांचे नाव पंतप्रधानपदासाठी घेऊ लागले आहेत. पण त्याचवेळी स्थापनेनंतर सुरुवातीला जोर घेणार्‍या मनसेचा प्रभाव ओसरत चालला आहे. शिवसेनेच्या बदललेल्या भूमिकेमुळे राज्यात निर्माण झालेली स्पेस मनसे भरू शकेल का, असा मुद्दा आहे. राज ठाकरे यांना त्यासाठी नवी रणनीती आखावी लागेल. फारसा कुणाला आसभास नसताना सौम्य स्वभावाचे उद्धव ठाकरे हे राज्याचे मुख्यमंत्री होऊन दोन वर्षे उत्तम प्रकारे संतुलन साधून राज्य करत आहेत. त्यांचा आपुलकीने भरलेला प्रेमळ आवाज लोकांना आता भावू लागला आहे.

त्यामुळे काँग्रेस, राष्ट्रवादीची चिंता वाढू लागली आहे. पण त्याच सोबत दुसर्‍या बाजूला शिवसेनाप्रमुखांचे उत्तराधिकारी म्हणून गणले गेलेले राज ठाकरे यांना पक्षाच्या पुनरुज्जीवनासाठी पुन्हा कंबर कसून मैदानात उतरावे लागले आहे. नाशिक महापालिकेची मिळालेली सत्ता त्यांना गमावावी लागली. पुन्हा ती मिळवण्यासाठी ते मैदानात उतरले आहेत. राज ठाकरे प्रचंड परिश्रम करत आहेत; पण बरेचदा परिश्रमाला नशिबाचीही साथ लागते, असा अनुभव येत असतो. कारण नशिबाचा वारा आपल्याला अनुकूल दिशेने वाहत असेल तरच त्याचा आपल्याला उपयोग असतो. नाही तर कितीही ताकद लावली तरी ती व्यर्थ जाते.

उद्धव ठाकरे यांना नशिबाची साथ नक्कीच मिळाली आहे. त्यामुळे प्रत्यक्ष राजकारणात उतरणे हे ठाकरेंच्या जीन्समध्ये नाही, असे म्हणून आधी जाहीर करून नंतर मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीतून राज ठाकरे यांनी माघार घेतली होती, तर फारसा आसभास नसलेले उद्धव ठाकरे अनपेक्षितपणे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले. ते म्हणतात ना, नसीब अपना अपना…