जादू की झप्पी!

Subscribe

शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांचे महाविकास आघाडीचे सरकार राज्यात स्थापन होऊन त्याचा राज्य कारभार सुरू झाला आहे. पण हे सरकार सहजासहजी अस्तित्वात आलेले नाही. या तिन्ही पक्षांमधील आमदारांचा समन्वय साधणे फार महत्त्वाचे होते, ती जबाबदारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी अत्यंत कुशलतेने पार पाडली. त्यांनी अनेक आमदारांचे जवळीकतेने आणि आपुलकीने स्वागत केले. त्यांची ही ‘जादू की झप्पी’ खरोखरच प्रभावी ठरली. आता पुढील काळातही त्यांना ही जादू टिकवून ठेवावी लागेल.

महाराष्ट्राची यावेळची विधानसभा निवडणूक एका वेगळ्याच कारणामुळे गाजली म्हणा किंवा वादग्रस्त ठरली. त्यामुळे राज्य आणि राज्यातील जनता एका विचित्र कोंडीत सापडली होती. कारण ज्या भाजप आणि शिवसेनेेने युती करून निवडणूक लढवली, त्यांचे निवडणूक झाल्यावर मुख्यमंत्रीपदावरून त्यांचे बिनसले. कारण शिवसेनेचे म्हणणे असे होते की, भाजपने जो समान सत्ता सूत्राचा वादा केला आहे, त्याचे त्यांच्याकडून पालन करण्यात येत नाही. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणत होते की, आजवर मी इतरांच्या पालखीचा भोई झालो, यापुढे होणार नाही. मी शिवसैनिकाला आता पालखीत बसवणार, तसा शब्द मी शिवसेनाप्रमुखांना दिला आहे. तर दुसर्‍या बाजूला भाजप शिवसेनेला मुख्यमंत्रीपद द्यायला तयार नव्हती. आम्ही शिवसेनाला असा शब्दच दिला नव्हता, असे त्यांचे म्हणणे होते, अशा वेळी सत्तास्थापनेची विचित्र कोंडी राज्यात निर्माण झाली होती. कारण लोकांनी युती म्हणून भाजप-शिवसेनेला मतदान केले होतेे, आता हेच युतीचे भागीदार असे अडून बसल्यामुळे ज्यांनी त्यांना मतदान केले, त्यांनाही तोंडात बोटे घालून बसण्याची पाळी आली होती. अशा ताणाताणीत राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली.

आम्हाला जनतेने विरोधात बसण्याचा कौल दिला आहे. सरकार स्थापन करण्याची जबाबदारी भाजप आणि शिवसेनेची आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार सांगत होते. पण १९९९ च्या विधानसभा निवडणुकीसारखी परिस्थिती निर्माण झालेली आहे, हे पवारांच्या लक्षात येत होते. त्यावेळी भाजपचे गोपीनाथ मुंडे मुख्यमंत्रीपदासाठी अडून बसल्यामुळे सत्ता स्थापनेला विलंब होत होता. हे पाहून शरद पवारांनी निवडणुकीत काँग्रेसच्या विरोधात प्रचार करूनही काँग्रेसशी आघाडी केली आणि राज्यात सत्ता काबीज केली. पण त्यावेळी काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे मिळून बहुमत झाले. त्यावेळी परिस्थिती वेगळी होती. यावेळी या दोघांचे बहुमत होत नव्हते. पण तिसरा पक्ष त्यांच्यासमोर होता. ती म्हणजे शिवसेना. उद्धव ठाकरे यांना कुठल्याही परिस्थितीत शिवसेनेचा मुख्यमंत्री बसवायचाच होता. त्यासाठी ते काहीही करायला तयार होते. हे पवारांनी चांगलेच हेरले होते. त्यामुळे त्यांनी हालचाली सुरू केल्या. उद्धव ठाकरे हे शरद पवारांच्या जवळ जाऊ लागले. शरद पवारांची सत्ता मिळवण्याची इच्छा असली तरी शिवसेना आणि राष्ट्रवादीला काँग्रेसची गरज होती. कारण काँग्रेसच्या मदतीशिवाय त्यांचे बहुमत होत नव्हते. पण काँग्रेस सुरुवातीला शिवसेनेला पाठिंबा द्यायला तयार नव्हती. पण पवारांनी जोर लावून भाजपला महाराष्ट्रासारख्या मोठ्या राज्यातून सत्तेपासून दूर ठेवण्याची चालून आलेली संधी सोडायची नाही, हे काँग्रेसच्या हायकंमाड सोनिया गांधी यांच्या गळी उतरवले. त्यातूनच पुढे काँग्रेस सत्तेत सहभागी व्हायलाही तयार झाली. शेवटी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांनी एकत्र येऊन राज्यात सत्ता स्थापन केली. खरे तर सुरुवातीला शिवसेनेला आदित्य ठाकरे यांनाच मुख्यमंत्री बनवायचे होते, म्हणूनच त्यांना विधानसभा निवडणुकीत उतरवून जिंकून आणण्यात आले होते. पण पवारांनी सगळ्या गोष्टींचा विचार करून उद्धव ठाकरे यांच्याच नावाचा आग्रह धरला आणि समतोल साधला.

- Advertisement -

एका बाजूला शरद पवार शिवसेना आणि काँग्रेसला हाताशी धरून सत्तेची सांगड घालत असताना रात्रीस खेळ झाला आणि अजित पवारांनी बंड केले आणि ते भाजपला जाऊन मिळाले. रातोरात देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्रीपदाची आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. हा राजकारणातील भीष्माचार्य शरद पवार आणि सगळ्याच पवार कुटुंबियांसाठी मोठाच धक्का होता. शेवटी मोठ्या हिमतीने शरद पवारांनी हे बंड शमवले. या सगळ्या राजकीय भूकंपात शरद पवार यांना भक्कमपणे साथ दिली ती त्यांची मुलगी सुप्रिया सुळे यांनी. शरद पवार यांच्यासोबत त्यांनी सत्तेचे सुकाणू संयमाने सांभाळले. अजित पवार यांना पुन्हा स्वगृही आणण्यासाठी सुप्रिया यांनी शर्थीचे प्रयत्न केले. शरद पवार यांचे वय आणि त्यांची पणाला लागलेली प्रतिष्ठा याचा विचार करायला भाऊ अजित पवार यांना भाग पाडले. त्यामुळे त्यांनी उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आणि शरद पवारांची प्रतिष्ठेच्या पेचातून सुटका केली. सुप्रियाताईंच्या शिष्टाईला यश आले. शेवटी अजित पवार कॅडबरी चॉकलेट घेऊन पवारांच्या ‘सिल्वर ओक’ या निवासस्थानी आले. विभाजनाच्या उंबरठ्यावर आलेले पवार घराणे पुन्हा एक झाले. राजकारणापलीकडे असलेल्या दादा आणि ताईंच्या आपलेपणाने हे शक्य झाले.

शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तीन पक्षांच्या आमदारांची एकत्र बैठक झाली. त्या सगळ्या आयोजनाची आणि त्यांच्या स्वागताची जबाबदारी सुप्रियाताईंनी सांभाळलेली होती. सगळ्या व्यवस्थेवर त्या बारकाईने लक्ष देत होत्या. जेव्हा दुसर्‍या दिवशी तिन्ही पक्षांचे आमदार शपथविधीसाठी विधानभवनात आले तेव्हा सुप्रियाताई यांनी स्वत: उभे राहून सगळ्यांचे आस्तेवाईकपणे स्वागत केले. आदित्य ठाकरे, राहित पवार यांची गळाभेट घेऊन त्यांचे कौतुक केले. ‘मुन्ना भाई एमबीबीएस’ या संजय दत्त याच्या चित्रपटानंतर ‘जादू की झप्पी’ फार प्रसिद्ध झाली. एखाद्याला आपण प्रेमाने आलिंगन दिले की, त्याच्या मनातील सगळी किल्मिषे आणि गैरसमज दूर होतात आणि पुन्हा एक आनंदी सहप्रवास सुरू होतो. सुप्रिया ताईंनी अशाच आपल्या जादूच्या झप्पीने अनेकांना आपलेसे केले आहे. त्यातूनच तिन्ही पक्षांच्या नेत्यांचा समन्वय साधला जाऊन नव्या सरकारची पायाभरणी झालेली आहे. महाराष्ट्रात पवार घराण्याचा दबदबा आहे. सगळ्यांना आपल्या पंखाखाली घेण्याचे कौशल्य शरद पवारांकडे आहे. पवारांना गॉड फादर मानणारे अनेक नेते विविध राजकीय पक्षांमध्ये आहेत. महाराष्ट्रात सगळ्या क्षेत्रांमध्ये पवारांच्या शब्दाला वजन आहे.

- Advertisement -

अनेकांना एकत्र आणून त्यांच्यात समन्वय साधण्याची कला शरद पवारांकडे आहे. सुप्रियाताईंनी तिच कला आपल्या बाबांकडून आत्मसात केलेली आहे, असेच त्यांच्या महाविकास आघाडीचे सरकार स्थापना करताना त्यांनी घेतलेल्या भूमिकेवरून दिसून आले. ठाकरे आणि पवार ही महाराष्ट्राच्या राजकारणातील प्रभावी घराणी आहेत. या दोघांची विचारसरणी वेगळी असली तरी त्यांचे घरोब्याचे संबंध आहेत. सुप्रियाताईंनी राज्यसभेची पहिल्यांदा निवडणूक लढवली त्यावेळी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांच्याविरोधात शिवसेनेचा उमेदवार दिला नव्हता. तसेच शरद पवार यांनी उद्धव ठाकरे यांची शिवसेनेचा मुख्यमंत्री होण्याची इच्छा पूर्ण केली. दिल्लीत शरद पवारांवर एका युवकाने हल्ला केला, त्यावेळी बाळासाहेबांनी त्या घटनेचा निषेध केला. सुप्रियाताईंच्या विवाहातही बाळासाहेबांचा पुढाकार होता, असे सुप्रियाताईंनीच एकदा सांगितले होेते. शिवसेना आणि राष्ट्रवादीने एकत्र येऊन काँग्रेसला सोबत घेऊन महाराष्ट्रात सत्ता स्थापन केलेली आहे. पुढील काळात महाविकास आघाडीची गाडी रुळावरून पुढे धावत राहण्यासाठी त्यांच्यात समन्वय रहावा लागेल, त्यासाठी पुढील काळात सुप्रियाताईंची भूमिका अतिशय महत्त्वाची असणार आहे.

Jaywant Rane
Jaywant Ranehttps://www.mymahanagar.com/author/rjaywant/
25 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत. राजकीय, सामाजिक, वैचारिक विषयांवर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -