घरफिचर्समायमहानगर ब्लॉगहरवले आभाळ ज्यांचे हो तयांचा सोबती...!

हरवले आभाळ ज्यांचे हो तयांचा सोबती…!

Subscribe

सिंधुताईंचा जगाकडे बघण्याचा दृष्टिकोन सकारात्मक होता. त्या सांगत, स्त्री कधीही हरणार नाही, कारण तिला वेदना म्हणजे काय हे पक्कं ठाऊक असतं. विदर्भात हजारो शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या, पण एका तरी शेतकर्‍याच्या बायकोनं आत्महत्या केल्याचं कधी ऐकलं आहे का? ती कधीही या जगातून पळ काढणार नाही. कारण स्त्रीची वेदना तिला जगायला शिकवत असते. ताई म्हणतात, ओल्या मातीचा ओलावा मला कधीच मिळाला नाही. मी खडकावरच रुजले. म्हणूनच माझी मुलं पक्की आणि चिवट आहेत ती कधीच मोडून पडणार नाहीत.

हरवले आभाळ ज्यांचे हो तयांचा सोबती
सापडेना वाट ज्यांना हो तयांचा सारथी
साधना करिती तुझी जे नित्य तव सहवास दे..
जाणवाया दुर्बलांचे दुःख आणि वेदना
तेवत्या राहो सदा रंध्रातुनी संवेदना
धमन्यातल्या रुधिरास या खल भेदण्याची आस दे
सामर्थ्य या शब्दांस आणि अर्थ या जगण्यास दे

नामवंत गीतकार गुरु ठाकूर यांचे हे प्रेरणादायी गीत नैराश्याने ग्रासलेल्या प्रत्येकाला जगण्याची नवीन उमेद आणि उर्मी देत असते. अनाथ मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी आपले संपूर्ण आयुष्य अर्पण करणार्‍या आणि शेकडो-हजारो अनाथ मुलांची हक्काची माय बनलेल्या ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळ यांचे मंगळवारी निधन झाले आणि अनाथ असलेल्या मुलांचेच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राचे काळीज अक्षरशः हेलावून आणि गलबलून गेले. आई गेल्याचे दुःख काय असते, त्याच्या वेदना सिंधुताई सपकाळ यांच्या निधनाच्या बातम्यांनी उभ्या महाराष्ट्राने अनुभवल्या.

- Advertisement -

चिंधी.. सिंधू .. ते अनाथांची माई.. स्वातंत्र्यानंतर तसेच स्वातंत्र्यापूर्वीदेखील गोरगरीब, तळागाळातील भारतीय महिलांची स्थिती अत्यंत हलाखीची होती. या देशाने तसेच महाराष्ट्रनेदेखील स्त्रियांना सन्मानपूर्वक जीवन जगता यावे यासाठी अनेक कायदे करून ठेवले आहेत. मात्र तरीदेखील समाजातील गोरगरीब, तळागाळातील महिलांच्या नशिबी असलेले भोग, समाजाकडून मिळणारी हिन दर्जाची वागणूक, स्त्री म्हणून वाट्याला येणार्‍या प्रचंड हालअपेष्टा यामध्ये तसूभरही सुधारणा झालेली दिसून येत नाही. मात्र जन्माला आल्यापासून त्यासोबत असलेले अठराविश्व दारिद्य्र, वैयक्तिक आणि सार्वजनिक जीवनात पराकोटीचा संघर्ष, सर्वत्र होणारी प्रचंड अडवणूक इतकी भयाण आणि प्रचंड प्रतिकूल परिस्थिती स्वतःच्या आयुष्यात असतानादेखील सिंधुताई सपकाळ या शेकडो अनाथ मुलांच्या आई आणि माई झाल्या.

माईचा जन्म बाल दिनाचा, अर्थात तोही ज्यावर्षी भारताला स्वातंत्र्य मिळाले त्या स्वातंत्र्य पर्वातला. 14 नोव्हेंबर 1947 मध्ये महाराष्ट्रातील विदर्भातील वर्धा येथील जंगल नवरगाव हे माईंचे जन्मगाव. घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची. गावही मागासलेले.. गावाला शिक्षणाचा गंध नाही. घरची ही परिस्थिती तशीच. वडील अभिषेक साठे अत्यंत सामान्य परिस्थितीत उदरनिर्वाह कसाबसा करणारे. सिंधुताईंचे मूळ नाव चिंधी होते. चिंधी म्हणजे अर्थातच नकोशी असलेली मुलगी. मात्र या अत्यंत खडतर परिस्थितीत चिंधी चौथीपर्यंत शिकली आणि त्यांचा विवाह वयाच्या अवघ्या नवव्या वर्षी त्यांच्यापेक्षा तब्बल 26 वर्षांनी मोठ्या असलेल्या श्रीहरी सपकाळ यांच्याशी झाला. आणि चिंधीची वयाच्या नवव्या वर्षी सिंधू झाली. तळागाळातीलच नव्हे तर एकूणच भारतीय महिलांचा खरा संघर्ष हा त्यांच्या विवाहानंतरच सुरू होत असतो, असे म्हटले तर ती कोणालाही अतिशयोक्ती वाटू नये. सिंधुताईंच्या बाबतीत तर त्या आगीतून फुफाट्यात आल्या होत्या.

- Advertisement -

वयाच्या अठराव्या वर्षापर्यंत सिंधुताईंची तीन बाळंतपणं झाली होती. चौथ्या बाळंतपणाच्या वेळी त्यांनी जो पराकोटीचा संघर्ष केला तो जर त्यांच्याच शब्दात सांगायचा झाला तर..‘चौथ्या बाळंतपणासमयी सिंधुताईंबाबत त्यांच्या नवर्‍याच्या मनात संशय निर्माण झाला आणि पूर्ण दिवस त्यांच्या नवर्‍याने त्यांना बेदम मारहाण केली. गुरांच्या लाथा बसून मरतील म्हणून तशा अर्धमेल्या अवस्थेत त्यांना गोठ्यात टाकलं. त्या अवस्थेतच त्यांची कन्या जन्माला आली. मात्र नवर्‍याने घराबाहेर हाकललं.. गावकर्‍यांनी हाकललं… या माराने अर्धमेल्या झालेल्या सिंधुताई माहेरी आल्या, मात्र सख्ख्या आईनेदेखील पाठ फिरवली.

पोटाची खळगी भरण्यासाठी, दोन घासासाठी भीक मागण्याची वेळ सिंधुताईंवर आली. परभणी, नांदेड, मनमाड रेल्वे स्थानकांवर त्या भीक मागत जायच्या. चतकोर भाकर खाऊन फेकून दिलेलं एखादं फळ हाती लागेल म्हणून त्या रात्रभर रेल्वे रुळांच्या बाजूने फिरायच्या. या लाचार आयुष्याला कंटाळून त्यांनी जळगावमधील पिंपराळा स्थानकाजवळ आत्महत्येचा प्रयत्नही केला. मात्र जन्म दिलेली लहान मुलगी आपल्याविना मरेल, तिचा जीव घेतल्याचे पाप लागेल म्हणून त्या माघारी फिरल्या, मग पुन्हा भीक मागत पोट भरणं सुरू झालं… कमालीचे दारिद्य्र उपासमार पदोपदी कशी अग्निपरीक्षा घेत असते हे सांगताना सिंधुताईंनी केलेली ही कविता खूप काही बोलून जाणारी आहे.

‘ये ऊन किती कडक तापते बाई अंगाची फुटते लाही
दोन दिसाचा शिळा तुकडा वाढा चालेल.. ..आम्हा वाढा..
दार नका लावू पुन्हा येणार नाही..’

पोटाच्या आगीने आणि पराकोटीच्या गरिबीने होरपळून गेलेल्या सिंधुताई यांना कधी रेल्वे स्टेशनवर भिकार्‍यांच्या मदतीने निवारा करावा लागला तर कधी पोटातील आग शमवण्यासाठी स्मशानभूमीतील चितेचा आधार घ्यावा लागला. मात्र एवढ्या भयाण आणि भीषण परिस्थितीमध्ये सिंधूताईंमधील प्रेमळ ‘माई’ जिवंत राहिली. त्यांनी स्वतः भीक मागून आणलेले अन्न एकट्याने न खाता त्यांच्यासोबत असलेल्या भिकार्‍यांमध्ये वाटून खात. प्रत्यक्षात कुबेरालाही लाजवेल एवढी मनाची आणि कृतीची श्रीमंती सिंधुताईंच्या नसानसात भरलेली होती. अनाथ मुलांच्या बाबतीत त्यांच्या हृदयात असलेली ओतप्रोत माया, कमालीचे कारुण्य आणि मुख्य म्हणजे प्रतिकूल परिस्थितीशी झुंजण्याची असलेली जन्मजात ऊर्जा सिंधुताईना..हजारो अनाथ बालकांची लाडकी ..प्रेमळ ‘माई ’ बनवून गेली. त्यामुळेच त्यांनी ‘दुःखापर्यंत येते ती आई आणि वेदना पदरात घेते ती माई’ या ओळी अगदी पूर्णपणे सार्थ करून दाखवल्या आहेत.

आज महाराष्ट्रात माईंचे चार अनाथाश्रम आहेत. अकराशेच्या आसपास अनाथ बालके तिथे आनंदाने आणि समाधानाने राहतात. चिखलदरा येथे माईंनी मुलींचे वस्तीगृह सुरू केले होते, तिथे आज शंभर मुली शिक्षण घेत आहेत. आणि स्वबळावर आयुष्यात उभ्या राहत आहेत. आजमितीला तब्बल दीड हजाराहून अधिक मुलांच्या सिंधुताई या हक्काच्या माई आहेत. यामध्ये कचराकुंडीत फेकून देण्यात आलेल्या दोन दिवसाच्या कोवळ्या अर्भकाचापासून ते स्वतःच्या पोटच्या गोळ्यांनाही नकोशा झालेल्या बहात्तर वर्षांपर्यंतच्या वृद्धांपर्यंत सर्वच त्यांची मुलं आहेत. त्यांच्या या ममता सदनमध्ये जशी अनाथ मुले आहेत, तशाच विधवा परितक्त्या आणि मनोरुग्ण यांनाही मायेची ऊब मिळते. आज घडीला माईंना तब्बल चारशे सुना आणि 250 च्यावर जावई आहेत, बहुसंख्य मुलं शिकून-सवरून आयुष्यात स्वतःच्या पायावर ठामपणे उभी आहेत. माई मोठ्या अभिमानाने सांगतात, माझी मुलं डॉक्टर, वकील, शिक्षक, इंजिनियर आहेत.

वर्धा जिल्ह्यामध्ये एक वृद्धाश्रम गोरक्षण केंद्र आणि चिखलदर्‍याला महिलांसाठी वसतीगृह माईंनी सुरू केला आहे. गाईंबाबत माईंना कमालीची आस्था आहे. याचं कारण सांगताना त्या म्हणतात, जेव्हा जन्मदात्या आईने पाठ फिरवली, तेव्हा गोठ्यातल्या गाईने मला संरक्षण दिलं. तिच्या ऋणातून उतराई होणे शक्यच नाही. त्यामुळे मी गाईलाच माझी माय मानलं. वर्धा येथे गोरक्षण केंद्र निर्माण करून माईंनी गाईंबाबतची वचन पूर्तता केली. भाकड किंवा निरुपयोगी झाल्यामुळे रस्त्यावर सोडलेल्या गाईंचा किंवा अगदी कावळ्यांनी डोळे फोडून जखमी केलेल्या गायींचा सांभाळ माईंच्या या गोरक्षण केंद्रात मोठ्या प्रेमाने केला जातो.

माईंचा जगाकडे बघण्याचा दृष्टिकोन एवढ्या प्रतिकूल परिस्थितीतदेखील सकारात्मक होता. त्या सांगत, स्त्री कधीही हरणार नाही, कारण तिला वेदना म्हणजे काय हे पक्कं ठाऊक असतं. विदर्भात हजारो शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या पण एका तरी शेतकर्‍याच्या बायकोनं आत्महत्या केल्याचं कधी ऐकलं आहे का? ती कधीही या जगातून पळ काढणार नाही. कारण स्त्रीची वेदना तिला जगायला शिकवत असते. बाई म्हणतात, ओल्या मातीचा ओलावा मला कधीच मिळाला नाही, मी खडकावरच रुजले, पण म्हणूनच माझी मुलं पक्की आणि चिवट आहेत ती कधीच मोडून पडणार नाहीत.

सिंधुताई सपकाळ यांना पद्मश्री या केंद्र सरकारच्या बहुप्रतिष्ठित सन्मानाबरोबरच 172 विविध पुरस्कार मिळाले आहेत. मात्र त्यातही ज्यांच्यामुळे तसंच ज्यांच्यासाठी सिंधुताईंना बेघर व्हावे लागले, त्या पिंपरीमदीच्या गावकर्‍यांनी माईंचं कौतुक केलं आणि माईंना आश्चर्य वाटलं. माईंनी त्या वेळी केलेल्या आंदोलनामुळे आज येथील गावकर्‍यांना शेणासाठी प्रतिमहिना हजार रुपये तरी मिळू लागले आहेत. एकेकाळी जो गाव माझ्यावर थुंकला तोच गाव माझ्या नावाने आज जयजयकार करतो, असं अभिमानानं सांगताना सिंधुताई म्हणतात माझं नाव झाल्यावर माझे पतीही माझ्याकडे आले. त्यांना सांभाळणारं कोणीच नव्हतं. मी त्यांना सांगितलं की, मी तुमची आई होऊ शकेन, पत्नी मात्र कधीही होणार नाही, पटत असेल तर रहा. आज माझ्या आश्रमातील मुलं त्यांचा नीट सांभाळ करत आहेत, हे निखारे मी स्वतःहून पदरात बांधून घेतले आहेत. जिवंत असेपर्यंत मी त्यांची राख होऊ देणार नाही, असं माईंनी ठणकावून सांगितलं होतं.

चाळीस वर्षांच्या आपल्या अत्यंत उपेक्षित प्रतिकूल अत्यंत खडतर खासगी आणि सार्वजनिक आयुष्यात एवढा मोठा संसार स्वतःच्या हिमतीवर उभा करून त्याला जगवणार्‍या, वाढवणार्‍या आणि आयुष्याची स्पष्ट दिशा देणार्‍या सिंधुताई या खरोखरच तमाम भारतीयांपुढे एक वेगळाच आदर्श उभा करून गेल्या आहेत. त्यामुळे आयुष्याची चाळीस वर्षे प्रचंड खस्ता खाऊन माईंनी उभा केलेला हा संसार अखंडपणे, अविरतपणे आणि यशस्वीपणे पुढे घेऊन जाणे हीच सिंधुताईना खरीखुरी श्रद्धांजली ठरेल.

Sunil Jawdekarhttps://www.mymahanagar.com/author/sunil-jawdekar/
गेली २८ वर्षे वर्तमानपत्र क्षेत्रात कार्यरत. विविध राजकीय, सामाजिक, प्रशासकीय मुद्द्यांवर आणि पायाभूत सेवासुविधांवर लेखन.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -