भाऊंची शाळा!

school
प्रातिनिधिक छायाचित्र
समुद्राला असलेल्या ओहोटीमुळे पाण्याच्या जोरकस लाटा किनारी येणं थांबलं होतं. ‘महासागर’ च्या टेरेस वरुन खिन्न नजरेनं देवाभाऊ नागपूरकर आत गेलेल्या लाटांकडे एकटक शून्यात बघत होते. त्यांना समुद्राच्या ओहोटीत स्वत:चंच रुप दिसत होतं. कुशाभाऊं भगतचंदांनी उठाभाऊंना मुख्यमंत्रीपदी राहण्याचा मार्ग मोटाभाईंच्या आदेशानंच मोकळा करुन दिल्यानं आता गाजभवनवर जाण्याचंही काम नव्हतं. त्यामुळे आपलाच ‘गुजरा हुआ जमाना’ देवाभाऊ आठवत असतानाच टेरेसवर दत्तू सावधपणे आला. त्यानं गांभीर्य ओळखलं आणि म्हणाला, सायब फुलचंद आलाय. त्याला कटिंगसाठी बोलवलंय ना?… देवाभाऊ काहीसे खडबडून जागं होऊन सागर दर्शनातून बाहेर पडले. महासागर बंगला तसा समुद्राला अगदीच बिल्गुन वसलेला. इथं बराचवेळ आदर्श नांदेडकरांचं वास्तव्य होतं. इथूनच तर ते दादा मालवणकरांना ठेंगा दाखवून ‘वर्षा’वर गेले होते…तस्सा बंगला लक्कीच, पण ‘वर्षा’ तले दिवस आठवून देवाभाऊंचं मन चलबिचल होत होतं.
सायब येईपर्यंत फुलचंदनं जुनी वर्तमानपत्र अंथरुन तयारी पूर्ण केली होती. कोरोनामुळे त्यानं एरव्हीचं सॅनिटायझेशन आज आणखीनच व्यवस्थित करुन घेतलं होतं. केसांच काय करायचं याच्या सूचना फुलचंदला देवाभाऊंकडून दिल्या गेल्या. नेहमीची हेअरस्टाईल बदलल्यामुळे फूलचंदच्या चेहऱ्यावरचे भाव काहीसे गोंधळलेले साफ‌ दिसत होते. होता होईतो त्याने ते लपवण्याचा प्रयत्न केला. एरव्ही मिडीयम आकारांच्या केसांचा उभा दिसणारा कोंबडा डाव्या बाजूला ओढून अधिक लक्षणीयरित्या कपाळावर खेचण्याच्या सूचना दिल्यानं एरव्ही गोरा- गोमटा गोल गुबगुबीत दिसणारा देवाभाऊंचा चेहरा थोडा जास्तच इनोसंट वाटायला लागला होता… इतका की नागपूरात पहिल्यांदा कार्पोरेटर झाल्यावर होता तस्साचं डिट्टो…
त्यात दादा बारामतीकर भल्यापहाटे येऊन पुन्हा माघारी फिरल्यानं नशिबानं जी त्यांची थट्टा मांडली तेव्हापास्नं त्यांनी जाकीटांना पण सुट्टी दिलीय. अगदीच महत्त्वाचं सेशना-बिशनाचं काही असलं तरंच जाकीट… नाहीतर पाचवर्षं ते सकाळी उठल्यापास्नं बिछान्यावर पाठ टेकेपर्यंत जाकीटातच असायचे…आता किमान दिवसांत किमान दोनदा तरी आपल्याच लोकांबरोबर व्हिडीओ कॉन्फरन्स करतात, चांगल-चुंगलं बोलतात… ज्या नवनिर्यातींनी त्यांना काहीबाही सांगून भल्तीकडे नेलं त्यांनाही भाऊंनी “दो गज दूरीवर” ठेवलंय…आणि ती टारगटपोरं भाऊंना कसल्यातरी फळांच्या नावांनी हिणवायची त्यामुळेच त्यांनी वजन घटवून पोटाचा घेरही आटवलाय! देवाभाऊंनी एवढं सगळं केलं आणि त्यात पद पण गेलं..
साहजिकच अमितावैनींच्या चेहऱ्यावरचा पेज थ्री वाला गुलाबी ‘ग्लो’ पण कमीच झाला होता. ते म्हणतात, ना पदाला आणि यशाला स्वत:ची लकाकी असतेच ना… अगदी तस्संच बगा! पण देवाभाऊंच्या या लूकचं सिक्रेट कळायला तीन-चार दिवस जावे लागले. कारण देवाभाऊंनी याच साळसूद चेहऱ्यानं भाऊ जळगावकरांचा पोलिटिकल ‘गेम’ केला तरी सगळ्याच चायनलांवरुन दादासाहेब कोल्हापूरेंनी त्यांना ‘कमालीचा सज्जन माणूस’ असं प्रमाणपत्रंच देऊन टाकलं.
आता भाऊंच्या गेममध्ये त्यांचाही वाटा होताच की… पण जळगावकर सांगतात तस्साच ‘रबरस्टॅंप’सारखाच… पण मग त्यांनीही बुधवारी चायनलांच्या मॅरेथॉन लायवा मध्ये तर कमालच केली. बीजेपी माझाच्या मुलाखतीत त्यांनी अँकरीन बाईंना २३ मिनिटांत ५ वेळा ज्ञानदा ताई – ज्ञानदा ताई म्हणत आपल्या अंगचं स्त्रीदाक्षिण्य दाखवलं खरं, पण त्याचवेळी स्वत:त भावी मुख्यमंत्री पाहणाऱ्या पद्मजाताई परळीकरांना भाऊ- दादासो जोडीनं स्क्रॅपमध्येच काढून टाकलं. निखिलभाऊ गडेकरांचा एक हुकमी एक्का असलेल्या उर्जावान चंदूअण्णा विदर्भकरांना पण अडगळीत टाकण्यात आलं. बरं त्यांचं ‌’क्वाॅरंटाईन’ करण्याचं कारण काय दादासोंनी सांगितलं नाही. ते म्हणले, विदर्भकरांनी ते दिल्लीच्या ‘टास्क फोर्स’लाच इचारायला पायजे.
खरं सांगायचं तर ही या सगळ्या ‘बिग्गीज’ची वाताहत होण्याचे संकेत केव्हाचेच मिळाले होते. ते लक्षात घेऊनच विनोबा गावडेंनी आपल्याला संघटनात्मक काम करायचं सांगून कट मारली. खरा हुश्शार गडी तोच. म्हणून तर इलेक्शनमध्ये तिक्टाचा भुस्काट झाल्यापासून तर त्यांनी लगोलग त्यांचा पीआर बघणाऱ्या विंदा गोरेगांवकरांचं सगळ्यात आधी आभारप्रदर्शन केलं. त्यांना नव्या दमाच्या प्रवीण मुंबैकरांकडे पीआर बगण्यासाठी पाठवून दिलं… गावडेसायबांनी तर देवाभाऊंचा इतका धस्का घेतलाय की, आपल्या लेटरहेडवरुन सगळी माजी पदं वगैरेच काढून टाकली. आणि नव्या लेटरहेड वर ठेवलंय फक्त ‘विनोबा गावडे’ बास्सं सिर्फ ‘नामही काफी है’…खरंच आहे म्हणा, ब्रॅंडिंग करावं तरं गावडेभाऊंनी… मग ते कोकणातल्या आंब्याचं असू द्यात नायतर डिपार्टमेंटात न घेतलेल्या निर्णयाचं…या मर्राठी गड्यानं आपल्या जिभेवर आणि ‘आवडीं’वर काम केलं असतं तर त्याचं काम निघायचं काय कारण न्हवतं…पण म्हणतात ना, विनाशकाले विपरित बुद्धी…
तसं तर इच्छुकांची संख्या दसपट मोठी होती. पण काहींनी स्वत:चं काळाची पावलं ओळखली. तर दादा मालवणकरांना  लालबागहून कोकणात जाऊन पहिला सुरुंग लावणाऱ्या प्रदिप जराठांनी आपल्या अंगची बनियागिरी दाखवत देवाभाऊंना लांबूनच ‘ध्यान रखजो’ केलं…तसंही त्यांना निखिल भाऊ गडेकरांच्या बंदरावरचे खारे वारे लागलेच आहेत. कोकणातल्या  राजाभाऊ कणकवलीकरांना कातळावर आमराई लावायचा परवाना दिलाय, पण त्यांचे वांद्र्याकडे बघून डोळे मिचकावणं सुरुच असल्यानं त्यांचाही विषय संपला होता.
केशुभाई पाध्येंनी पाच वर्ष प्राईम टायमात केलेल्या 20-20 च्या फटकेबाजीच्या स्कोअरशीटस् एव्हाना संघव्यवस्थापनाकडे जमा झाल्यात. पुणे, सांगली, कोल्हापूर, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, मराठवड्यातून बऱ्याच जणांना या वासंतिक विधानसभा महोत्सवात सहभागी व्हायचं होतं. कारण काय शीएम मॅच खेळणार म्हणजे नो टेन्शन वाला मामला होता… म्हणून सगळी जिवाची ओढाताण! पण अनेकांना पावसाळी गुळाचा शब्द दिलाय…
पार्टीत सॉलिड्ड राडा आहे. पण मोटाभाईचा आशिर्वाद देवाभाऊंच्या बाजूने असल्याने सगळेच चिडीचूप दबा भरुन बसलेत. या दुष्काळी दिवसांत हातात काही सुभेदारी असायलाच हवी यासाठी दादासाहेब कोल्हापूरे छोटूभाई गोदरावाल्यांच्या आदेश बरहुकुम तेलकट चेहऱ्यानं देवाभाऊला सावरतायत. यात देवाभाऊच्या काळजीपेक्षा धन्याची इच्छा म्हंजे आदेश समजून सगळं करतायत. मोठ्या महत्प्रयासानं निखिलभाऊ गडेकरांना शक्तीहीन केल्यावर देवाभाऊची मोटाभाईच्या प्रेमामुळे वरती लुडबूड नको म्हणून त्याला इथेच खिळवून खेळवतं ठेवण्याची जबाबदारी हाही इच्छेतल्या आदेशाचाचं भाग आहे.
जळगावकर, परळीकर, विदर्भकर हे तिघंही बहुजनांचे मासलीडर आहेतच. त्यामुळे अश्या कुणालाही गल्लीतच  धोबीपछाड दिली जातेय तर ती कुणाला नकोय. आणि त्या बदल्यात चार दोन बोनसायींना जगवायचं असेल तर कुठला दिल्लीश्वर नाही म्हणेल?
दादासाहेब कोल्हापुरेंनी अगदी मायक्रो प्लानिंगनं भाऊ जळगावकरांना अंगावर घेतलंय. भाषेचा पोत आणि आवाजाची पट्टीही परिषदेला साजेशी… त्यांना ४० वर्षात किती दिलंय याचा पाढाही अस्सा वाचला की यांना आता आणखी किती हवंय? अस्से प्रश्न ऐकणाऱ्यालाही पडतील. देवाभाऊ- दादासाहेब दोघांनीही या इच्छुकांना आपल्या गोडबोले पध्दतीनं असं काही गुंडाळून टाकलं की भले भले अवाक् झाले. या गुंडाळण्याच्याच भाऊंना, ताईंना आणि त्यांच्या समर्थकांनाही अधिक वेदना झाल्यात. कारण काय विचारता अहो गुरुची विद्या गुरुला दिलीय, पठ्ठ्यानं… या वेदना खूपच क्लेशदायक होत्या, म्हणूनच तिक्टाच्या घोळाला चार दिवस उलटले तरी परळीकर ताईंनी दादासो कोल्हापूरेंना फोन पण केला नाय. पण फंटरांनी मात्र एका टरबूज्याची रंगोटी करुन त्याला रागाच्या भरात जोड्यांनी बडवला…बिच्चारा टरबूज्या! करतं कोणं भरतं कोणं?
सगळा मामलाचं सेण्टि करायचा प्रयत्न म्हणून भाऊ जळगावकरांनी पुन्हा पार्टीची शाळा घ्यायला सुरुवात केलीय. भर्ल्या  डोळ्यांनी निष्ठा, खस्ता, पक्ष, अन्याय असं बरंच काही बोलायला सुरुवात केलीय… त्याचा काय किंवा ताईंच्या अॅक्टिंगचा काहीच इफेक्ट देवाभाऊला पडत नाही आणि डॅमेज कंट्रोलचं म्हटलं तर पार्टीला काहीच फरक पडत नाहीय…कारण भाऊंनी जशी इमोशनल शाळा घ्यायला सुरुवात केलीय तश्या शाळांचा तर आपला मोठाभाय फाऊंडरच हाय ना… सध्या तर त्यांनी १३० कोटींच्या देशाचीच शाळा भरवायला घेतलीय. कधी सांगतात दिवे लावा…कधी सांगतात थाळ्या वाजवा… आणि आपण पण गपगुमान येड्यावानी वाजवून घेतोय… तिथे ताई – भाऊंच्या शाळेची काय कथा…नाय का!
@बातमीवाला..!