घरफिचर्समायमहानगर ब्लॉगराजकीय नेत्यांचे करमणुकीचे सीमोल्लंघन

राजकीय नेत्यांचे करमणुकीचे सीमोल्लंघन

Subscribe

देशाच्या आणि महाराष्ट्राच्या राजकारणाला दिशा देऊ शकणार्‍या 3 महत्वाच्या राजकीय घडामोडी विजयादशमीच्या मुहूर्तावर महाराष्ट्रात घडल्या. त्यातील पहिली घडामोड म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय असलेल्या नागपूर मुक्कामी सरसंघचालक मोहन भागवत यांचे संघाच्या स्वयंसेवकांसमोर दसर्‍याच्या मुहूर्तावर झालेले मुक्तचिंतन होय. तर दुसरीकडे शिवसेना पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या परंपरागत ऐतिहासिक दसरा मेळाव्यात राजकीय फटकेबाजी करणारे केलेले भाषण आणि तिसरीकडे भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी भगवान गडावर केलेले भाषण यांचा उल्लेख करता येईल.

भाजप सत्तेत असला आणि नसला तरीही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडे एक बलाढ्य स्वयंसेवी शिस्तबद्ध संघटना म्हणून पाहिले जाते. त्यात आता केंद्रात गेल्या सहा वर्षांपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे सरकार सत्तेत आहे. त्यामुळे भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक ही खर्‍या अर्थाने भारतातील सत्तेच्या रथाची दोन प्रमुख चाके आहेत.

- Advertisement -

त्यामुळे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत हे भाजपला आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कोणत्या प्रकारे मार्गदर्शन करतात याकडे देशवासीयांचे लक्ष लागलेले होते. मात्र देशातील ढासळत्या राजकीय मूल्यांवर ताशेरे ओढत असताना सर्व राजकीय पक्षांचे कान उपटण्याचे काम सरसंघचालकांनी केले ते अत्यंत योग्यच झाले. सद्य:स्थितीत देशातील राजकारणाच्या स्तराबाबत अप्रत्यक्षपणे चिंता व्यक्त करत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी सत्ताप्राप्तीसाठी प्रयत्न करणे यात नवीन काही नाही. मात्र, त्या प्रक्रियेत विवेकाचे पालन व्हायला हवे. राजकारणातील स्पर्धा ही शत्रूंमध्ये चालणारे युद्ध नाही. स्पर्धा निकोप व्हायला हवी व त्यामुळे समाजात कटुता निर्माण होऊ नये.

अशा स्थितीचा लाभ देशात कलह निर्माण करणारे देशविदेशातील तत्वे घेतात याची जाण सर्वांनी ठेवली पाहिजे, असे परखड मत सरसंघचालकांनी व्यक्त केले. डॉ. भागवत यांचे हे मौलिक आणि अमूल्य विचार संघाशी वैचारिक निष्ठा ठेवणार्‍या केंद्रातील भाजपा नेत्यांनी जरी अमलात आणले तरी सरसंघचालकांचे विजयादशमीचे मुक्त चिंतन भरून पावले असे म्हटले तर ती अतिशयोक्ती ठरू नये. विविधतेत एकता ही भारताची ताकद आहे. मात्र अल्पसंख्याक तसेच अनुसूचित जाती-जमातीच्या लोकांमध्ये द्वेषपूर्ण गोष्टी पसरवून संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे. भारत तेरे टुकडे होंगे, अशा घोषणा देणारे लोक या कारस्थानी मंडळींमध्ये सहभागी आहेत. शासन-प्रशासनाच्या कुठल्या निर्णयावर किंवा समाजात घडणार्‍या चांगल्या वाईट घटनांवर विरोध दर्शवत असताना राष्ट्रीय एकात्मतेची जाणीव व सन्मान ठेवला पाहिजे हे त्यांचे विचार नक्कीच अनुकरणीय आहेत.

- Advertisement -

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही भागवतांचे विचार अनुकरणीय वाटावेत यातच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या व्यापक विचारसरणीचे यश सामावलेले आहे. अर्थात, केंद्रातील आणि राज्यातील भाजप नेते संघाच्या विचारांचे कितपत पालन करतात यावरही भागवतांच्या भाषणाचे महत्व अवलंबून आहे.

किमान सरसंघचालकांच्या उपदेशानंतर तरी भाजपचे केंद्रातील सरकार देशातील विविध राज्यांमध्ये असलेल्या विरोधी पक्षांच्या राज्य सरकारांशी समन्वयाने आणि न्यायाने वागेल, अशी अपेक्षा करणे यापुढे तरी व्यर्थ ठरू नये एवढीच अपेक्षा यातून व्यक्त करणे गैर ठरणार नाही.

शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे झालेले भाषण म्हणजे राजकीय तमाशाचा फड म्हणावा लागेल. विजयादशमीच्या दिवशी महाराष्ट्रात उद्धव ठाकरे आणि भगवान गडावर पंकजा मुंडे यांच्या झालेल्या भाषणाकडे महाराष्ट्रातील आणि देशातील जनतेचे मोफत मनोरंजन म्हणावे लागेल. एरवी केवळ शिवसैनिकांसमोर भाषण करणारे शिवसेना पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरे हे उत्तम वक्ते म्हणून भाषण करत असतीलही. मात्र महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी दसरा मेळाव्यात केलेले भाषण जरी त्यांना ते राजकीय वाटत असले तरीही राज्यातील जनतेच्या दृष्टीने ते सुमार दर्जाचे होते असेच म्हणावे लागेल. उद्धव ठाकरे यांच्या भाषणात कोणतेही राजकीय नावीन्यदेखील नव्हते. भाजप, नरेंद्र मोदी, आणि हिंदुत्वाच्या मुद्यावरून केलेली टीका तसेच राणे पिता-पुत्रांच्या केलेला हेटाळणीकारक उल्लेख याव्यतिरिक्त महाराष्ट्राच्या हिताचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भाषणात काहीही नव्हते.

उद्धव ठाकरे यांच्या भाषणात नवीन काही नसले तरी त्यामुळे त्यांच्यावर टीका करण्याची संधी साधणार्‍या भाजप नेत्यांनी आणि नारायण राणे यांनीही महाराष्ट्राची करमणूक करण्याखेरीज अन्य काहीही साधले नाही. ठाकरे घराण्यातील शिवसेनेचा पहिला मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्रातील जनतेसमोर विकासाची योजना आणण्याचे ती जाहीर करण्याची नामी संधी शिवसेना पक्षप्रमुख म्हणूनही उद्धव ठाकरे यांच्यासमोर होती. मात्र उद्धव ठाकरे यांच्यासारख्या नेतृत्वाने ही सुवर्ण संधी गमावली असेच म्हणावे लागेल. शिवसेना ही महाराष्ट्रातील भूमिपुत्रांची आक्रमक संघटना म्हणून ओळखली जायची, त्यानंतर राजकीय तडजोडीसाठी शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदुत्वाशी शिवसेनेची नाळ जोडली. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हे देशातील जहाल आणि अत्यंत आक्रमक हिंदुत्ववादी नेते म्हणून ओळखले जायचे.

त्यामुळे जेव्हा अयोध्येमध्ये बाबरी मशीद पाडल्यानंतर जेव्हा भाजप नेत्यांनी बाबरी पाडल्याचे पातक शिवसेनेवर ढकलले तेव्हा देशात केवळ शिवसेनाप्रमुख हे एकच असे नेते होते की ज्यांनी मोठ्या अभिमानाने आणि जाहीरपणे बाबरी मशीद शिवसैनिकांनी पाडली असेल तर त्याचा मला अभिमान आहे, असे विधान करण्याचे धाडस दाखवले. त्यामुळे शिवसेनाप्रमुखांचे हिंदुत्व आणि सध्याचे शिवसेना पक्षप्रमुख महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे हिंदुत्व याच्यात जमीन-अस्मानाचा फरक पडू लागल्याचे सामान्य जनतेला वाटू लागले आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी भाजपला हिंदुत्वाचे धडे शिकवण्यापेक्षा शिवसेनाप्रमुखांचे हिंदुत्वाचे विचार जरी आत्मसात केले तरी खूप झाले असेच म्हणावे लागेल. कारण शिवसेना जरी हिदुंत्वाची भाषा करत असली आणि आमचे हिंदुत्व हे ज्वलंत आणि जिवंत आहे, असे म्हणत असली तरी त्यांनी महाराष्ट्राची सत्ता हस्तगत करण्यासाठी त्यांनी त्यांच्या हिंदुत्वावर सडकून टीका करणार्‍या काँग्रेस आणि राष्ट्रवादीशी हातमिळवणी केली आहे. त्यांनी सत्तेसाठी आपल्या तत्वाशी तडजोड केलेली आहे. त्यामुळे लोकांच्या मनात हिंदुत्ववादी म्हणून शिवसेनेची जी प्रतिमा होती, तिला धक्का बसलेला आहे.

भाजपच्या नेत्या व स्वतःला महाराष्ट्राच्या जनतेच्या मनातील मुख्यमंत्री म्हणवून घेणार्‍या पंकजा मुंडे यांचे भगवान गडावरील भाषणही असेच काहीसे होते. स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांची पाठीशी असलेले पुण्याई हीच काय ती पंकजा मुंडे यांची गेल्या काही वर्षातील कमाई आहे. मात्र भाजपचे एक जेष्ठ नेते एकनाथ खडसे हे भाजप सोडून राष्ट्रवादीत दाखल झाल्यामुळे आता भाजपमधील अन्य मंडळींनाही पक्षांतराचे वेध लागले असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. त्यामध्ये एक नाव पंकजा मुंडे यांचेही असून ते अधून-मधून घेतले जाते. मराठवाड्यातील ओबीसी समाजाच्या महिला नेत्या म्हणून पंकजा मुंडे यांना भाजपच्या राज्यातील राजकारणावर पकड हवी आहे. देवेंद्र फडणवीस जोपर्यंत व राज्यातील राजकारणात प्रमुखपदावर आहेत तोपर्यंत पंकजा मुंडे आणि विनोद तावडे यांना तरी महाराष्ट्र भाजपात सर्वोच्च पद मिळणे अशक्यप्राय आहे. मात्र तरीही पंकजा मुंडे यांना मुंबईतील शिवाजी पार्क शक्तिप्रदर्शनाने भरवून दाखवून स्वतःचे राजकीय स्थान बळकट करून घ्यायचे आहे.

मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस, बहुजनांचे संभाव्य मुख्यमंत्री एकनाथ खडसे, महाराष्ट्रातील जनतेच्या मनातील मुख्यमंत्री पंकजा मुंडे यांचे खरोखरच सीमोल्लंघन करतो की बारामतीकर काका-पुतणे या सार्‍यांना सीमा पार करत स्वतःच सीमोल्लंघन करतात हे नजीकच्या भविष्यात दिसून येईल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -