घरफिचर्समायमहानगर ब्लॉगमायानगरीतील ‘गंदी बात’

मायानगरीतील ‘गंदी बात’

Subscribe

मायानगरी मुंबई…इथं हजारो लोक अभाळाएवढं स्वप्न घेऊन येतात. या स्वप्नपूर्तीसाठी जीवाचं रान करतात. यात चंदेरी दुनियेने मोहिनी घातलेली मंडळी असंख्य असते. त्यातील काहींना अभिनयाची मनोमन आवड असते तर, काहींना कमी वेळ आणि श्रमात श्रीमंत व्हायचं असतं. त्यासाठी निर्माते आणि दिग्दर्शकांचे उंबरे झिजवले जातात. पण दुर्देवानं बोटावर मोजण्याइतक्याच लोकांपर्यंत यशाचं सुख पोहचतं. बहुसंख्यांकांच्या पदरी अपयशच पडतं. स्वप्न भंग होण्याची कुणकुण लागते तेव्हा प्रचंड नैराश्य येतं आणि त्यातून मग हातून मोठी चूक होण्याची शक्यता निर्माण होते. अशा नैराश्यग्रस्त लोकांना हेरण्यासाठी एखादी टोळी तयार असतेच. ते अशा तरुणींना जाळ्यात ओढतात आणि त्यातून तयार होतात पॉर्न फिल्म. कमी श्रमात जास्त पैसा मिळण्याच्या आमिषापोटी असंख्य तरुणींचं आयुष्य उद्धस्त करणार्‍या पॉर्न इंडस्ट्रीचं हिडीस रुप काही दिवसांपूर्वी पुढे आलं. मढ परिसरातील एका बंगल्यात पॉर्न व्हिडिओ बनवणार्‍या फिल्म प्रॉडक्शन टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केला. या प्रकरणातून दररोज धक्कादायक माहिती समोर येत आहे.

या पॉर्न रॅकेटकडून हिंदी, इंग्रजीसह मराठी पॉर्न व्हिडिओदेखील बनवण्यात येत होते. तसेच, या रॅकेटमध्ये बॉलिवूडशी संबंधित काही बड्या व्यक्तींचा समावेश असण्याची शक्यताही नाकारता येत नाही. या पॉर्न रॅकेटचे गुजरात कनेक्शनही उघडकीस आले आहे. पोलिसांच्या मालमत्ता कक्षाने तन्वीर हाश्मी या ४० वर्षीय व्यक्तीला सुरत येथून बेड्या ठोकल्या. याशिवाय याच प्रकरणात अटक केलेल्या ‘गंदी बात’ फेम गहना वशिष्ठला एका व्हिडिओमागे लाखो रुपये मिळत असल्याची बाबही पुढे आली. पैशांचं तसंच वेब सिरीजमध्ये काम मिळवून देण्याचं आमिष दाखवत आजवर तब्बल १५ मुलींची पॉर्न फिल्म या टोळीने बनवल्याची माहितीही पोलिसांच्या हाती लागली आहे. यातील एका तरुणीने दिलेल्या माहितीनुसार, वेब सिरिजमध्ये काम देण्याच्या नावाने तरुणींची निवड केली जायची आणि काही दिवस सर्वसामान्य चित्रीकरण पार पडल्यानंतर नवख्या तरुणींना गुंगीचे औषध देऊन त्यांचे अश्लिल चित्रीकरण केले जाते. या रॅकेटच्या माध्यमातून एस्कॉर्ट सर्व्हिस किंवा वेश्या व्यवसायही केला जात असल्याची माहिती तपासात समोर आली आहे.

- Advertisement -

विशेष म्हणजे हे सर्व अश्लील व्हिडिओ या रॅकेटने कोरोना काळात तयार केले. खरंतर, या तरुणी व्यवस्थेच्या बळी पडलेल्या आहेत. यात कुणी मोठी अभिनेत्री होण्याचं स्वप्न घेऊन मुंबईत आलं तर कुणी कुटुंबाचं पोट भरण्यासाठी. पण राक्षसी वृत्तीच्या लोकांनी स्वप्नांसह तरुणींच्या आकांक्षांचा गळा घोटला. या तरुणींच्या असहायतेचा पुरेपूर फायदा उचलण्यात आला. बॉलिवूडशी संबंधित काही मंडळी उपनगरात बंगले भाड्याने घेऊन त्यात अश्लील चित्रफिती बनवण्याचा धंदा करतात हे यानिमित्तानं पुढे आलं आहे. हे प्रकरण म्हणजे हिमनगाचं टोक आहे. इंटरनेटवर पॉर्न फिल्मची संख्या बघता ही इंडस्ट्री किती मोठ्या प्रमाणात वाढली आहे याची कल्पना येते. त्यातून लक्षावधी मुली बळी पडल्या आहेत. पण पैशांमागे पळणार्‍या विकृतांनी या मुलींच्या जीवाची पर्वाही केली नाही. अर्थात ‘मागणी’ तसा ‘पुरवठा’ या न्यायाने भारतातील पॉर्न इंडस्ट्रीही वाढत आहे.

पॉर्न इंडस्ट्रिला पाश्चिमात्य देशांमध्ये ‘अधीकृत’ करण्यात आलं आहे. काही देशांमध्ये तर या इंडस्ट्रीने प्रतिष्ठा प्राप्त केली आहे. त्यातून अशा फिल्म्सचा प्रसार वाढला. या फिल्म्स भारतातही मोठ्या प्रमाणात बघितल्या जातात. इंटरनेटचं जाळं अस्ताव्यस्त पसरल्यानंतर आणि दरही सर्वसामान्यांच्या आवाक्यात आल्यानं त्याचे वापरकर्ते वाढले आहेत. काडीपेटीचा उपयोग चूल पेटवण्यासाठीही होतो आणि घर जाळण्यासाठीही. उपयोग कशासाठी करायचा ते वापरकर्त्याच्या हाती असतं. हेच तत्व इंटरनेटलाही लागू होतं. परंतु इंटरनेटचा गैरवापर करणार्‍यांची संख्या इतकी वाढली की, त्यातून आता अशा हिडीस पॉर्न इंडस्ट्रीला खतपाणी मिळत गेलं. एका अभ्यासानुसार जागतिक पातळीवर दररोज सरासरी ८.५६ मिनिट पॉर्न पाहिले जातात. भारतात हाच वेळ ८.२२ मिनिट आहे. धक्कादायक बाब म्हणजे यात ‘पुरोगामी’ महाराष्ट्र आघाडीवर आहे. महाराष्ट्रात तब्बल ८.३७ मिनिट पॉर्न फिल्म बघितले जातात. गंभीर बाब म्हणजे, जगभरातील नागरिक कोरोना विषाणूंची चिंता वाहत असताना, शास्त्रज्ञ आणि वैद्यकीय तज्ज्ञ कोरोनाच्या लसीच्या शोधात असताना पॉर्नप्रेमी मात्र पॉर्न ‘विषाणू’वाढीसाठी प्रयत्न करत होते. त्यासाठी लॉकडाऊनचा योग जुळून आणण्यात आला.

- Advertisement -

या काळात कायदा व सुव्यस्थेची मोठी जबाबदारी पोलिसांना पार पाडावी लागली. त्यात पोलीस व्यस्त असल्याच्या संधीचा फायदा उचलत अनेकांनी उपनगरात बंगले भाड्याने घेत त्यात पॉर्न फिल्मच्या चित्रीकरणाचा धंदा वाढीस लावला. अर्थात असले चित्रीकरण कमी काळात होत असल्यानं या फिल्म अवघ्या काही दिवसांतच संबंधित साईटवर टाकल्या जात. लॉकडाऊनमध्ये लोकांच्या हाताला काम नव्हते. अनेकांना नाइलाजास्तव घरी बसावं लागलं. रिकामं डोकं सैतानाचं घर असतं असं म्हणतात. त्याप्रमाणे रिकाम्या डोक्यांनी पॉर्नचा सहारा शोधला. त्यामुळे लॉकडाऊनच्या काळात पॉर्न साईटवरील ट्रॅफिक कमालीने वाढली. जगातील सर्वात मोठी पॉर्न वेबसाइट पॉर्नहबच्या आकडेवारीनुसार लॉकडाऊनदरम्यान, भारतातील पॉर्न वेबसाइट पाहणार्‍यांत ९५ टक्क्यांची वाढ झाली. अन्य देशांचा विचार करायचा झाल्यास लॉकडाऊनच्या काळात फ्रान्समध्ये ४० टक्यांनी, जर्मनीमध्ये २५, इटलीत ५५ तर रशियात ५६ टक्के ट्रॅफिक वाढल्याची नोंद झाली. यावरुन भारतीय आंबट शौकीनांचे बिभत्स रुप समोर येते.

याहीपेक्षा भयानक आकडे गुगलने जाहीर केले आहेत. भारतात ‘पॉर्न’ बंदी असतानाही ‘पॉर्न सर्च’मध्ये जगातील १० पैकी सात शहरे भारतातील आहेत. देशाची राजधानी दिल्लीत सर्वाधिक ‘पॉर्न सर्च’ केला जातो. त्यानंतर क्रमांक लागतो महाराष्ट्रातील पुण्याचा. भारतातील सातपैकी दोन शहरे महाराष्ट्रातील आहेत. या यादीत मुंबईचादेखील समावेश आहे. हे आकडे पॉर्न इंडस्ट्री वाढण्याच्या कारणांकडे अंगुलीनिर्देश करतात. महत्वाचे म्हणजे, उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार भारताने २०१५ मध्ये पॉर्न साईट्सवर बंदी घातली आहे. या काळात सुमारे ८५७ साईट्स बंद करण्यात आल्यात. असे असतानाही बंदी घालण्यात आलेल्या या साईट्स छुप्या पद्धतीने भारतात घुसखोरी करत आहेत. वापरकर्ते व्हर्च्युअल प्रायव्हेट नेटवर्क (व्हीपीएन)च्या माध्यमातून या अश्लील वेबसाइट पाहतात. व्हीपीएनद्वारे पॉर्न वेबसाईट्स पाहण्याच्या प्रमाणात ४०० टक्यांनी वाढ झाल्याचं वृत्त भारतीयांच्या चिंतेत वाढ करणारं आहे. याशिवाय इन्स्ट्राग्राम, व्हॉटसअ‍ॅपवरुनही लाखो ग्रुप्समधून भारतीय लोक पॉर्न बघण्याचा असुरी आनंद लुटतात. असला विकृत आनंद घेणार्‍यांच्या गरजा भागवण्यासाठी भारतात पॉर्न इंडस्ट्री फोफावते. ती रोखण्यासाठी तर नाहीच, पण पॉर्न बघण्याची मानसिकता बदलण्यासाठीही केंद्र सरकारकडून प्रयत्न होताना दिसत नाही.

लैंगिक शिक्षणाचा प्रशस्त पर्याय उपलब्ध असतानाही त्याकडे दुर्लक्ष करुन सरकार वरवरच्या उपाययोजना करण्याकडे लक्ष देते. त्यामुळेच मायानगरीत पॉर्न फिल्मची ‘गंदी बात’ वाढतेय! सरकारने इंटरनेटवरील पॉर्न फिल्मच्या ‘जन्मदात्यां’चा जरी शोध घेतला तरीही त्यातून खूप मोठे ‘नागडे सत्य’ बाहेर पडेल. ‘शुद्धीकरणा’ची ही प्रक्रिया एकदा होण्याची नितांत गरज आहे. त्यातून असंख्य तरुणींना दिलासा मिळू शकतो.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -