घरफिचर्समायमहानगर ब्लॉगशरद पवार पंतप्रधान व्हावेत!

शरद पवार पंतप्रधान व्हावेत!

Subscribe

युपीएच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची नियुक्ती होणार, अशी बातमी गुरुवारी म्हणजे पवारांच्या ८० व्या वाढदिवसाच्या दोन दिवस अगोदर गाजली. या बातमीमुळे एक मराठी माणूस पंतप्रधान व्हावा ही मराठी माणसाच्या मनातील सुप्त इच्छा त्यामुळे पुन्हा जागृत झाली. युपीएचे अध्यक्ष ही पंतप्रधान होण्याच्या शर्यतीचा पहिला मुक्काम आहे. त्यामुळे पवार आता पंतप्रधान होण्याच्या दिशेने आगेकूच करत आहेत, असे वाटल्यास नवल नाही. अर्थात काही तासांनंतर त्या बातमीचा पवारांनी स्पष्ट शब्दात इन्कार केला. मात्र काही तास का असेनात पवार कसे पंतप्रधान होऊ शकतात, या चर्चांना उधाण आले. त्यावरून अनेक उलटसुलट बातम्या प्रतिक्रिया आल्या आहेत. त्यातल्या सकारात्मक प्रतिक्रिया अर्थातच पवारांच्या समर्थकांच्या आहेत आणि हेटाळणीयुक्त नकारात्मक प्रतिक्रिया राजकीय विरोधकांच्या आहेत. पण त्या टवाळखोर प्रतिक्रियांमध्येही एक गट असा आहे, जो पवार विरोधक नसून पवारांचा चाहता आहे. पण त्यांच्या नाकर्तेपणाने त्यांच्यावर रागावलेला आहे.

पवारांपेक्षाही अशा वर्गाची मोठी अपेक्षा होती आणि पवारांकडून ती पूर्ण होऊ शकली नाही, म्हणून रागावलेला असा तो वर्ग आहे. सहाजिकच असा अपेक्षाभंग झालेल्यांची प्रतिक्रिया तीव्र आणि तिखट असते. पण त्याचीच दुसरी बाजू अशी असते, की त्यांच्या अपेक्षा पूर्ण होण्याची किंचित शक्यता दिसली, तरी असे रागावलेले क्षणार्धात आपला राग गुंडाळून त्याच पवारांच्या मागे ठामपणे उभे रहातील यात शंका नाही. आणि अशा लोकांची संख्या पवार समर्थकांपेक्षा मोठी आहे. म्हणूनच तशी कुठलीही शक्यता असेल वा समीकरण जुळणार असेल, तर शरद पवार यांनी त्यात विचारपूर्वक प्रयत्न करून पुढाकार घेतला पाहिजे. पण आपल्या समर्थक वर्गाला खूश करण्यासाठी ते प्रयत्न असता कामा नयेत, तर ज्यांच्या अपेक्षा आहेत, त्यांचे समाधान करण्यासाठी प्रयत्न व्हावेत. त्यांना मराठी माणूस पंतप्रधान झालेला बघायची अतीव इच्छा आहे आणि ती शक्यता केवळ पवारांच्याच बाबतीत शक्य आहे. पण त्या दिशेने प्रयत्न करताना एक गोष्ट ठामपणे निश्चित करून वाटचाल झाली पाहिजे.

- Advertisement -

नेहमीच्या राजकारणातली पवारांची धरसोडवृत्ती वा तडजोडीला शरण जाण्याच्या स्वभावाला पवारांनी पहिला रामराम ठोकला पाहिजे. मोदींच्या स्पर्धेत कोणी अन्य विरोधी नेता उतरू शकत असेल, तर तो फक्त शरद पवार हाच आहे. ही जाणीवच सर्व पक्षांना पवारांकडे बघायला भाग पाडते आहे. कारण त्याखेरीज दुसरा कोणी चेहराच विरोधकांपाशी नाही. ही देशातील इतर तमाम लहानसहान पक्षांची व नेत्यांची अपेक्षा आहे. त्यातून काँग्रेससारख्या देशव्यापी मरगळलेल्या पक्षाचीही सुटका नाही. म्हणूनच आपली प्रतिमा, अनुभव आणि कुवत ही जमेची बाजू मनाशी पक्की करूनच पवारांनी पुढली पावले उचलली पाहिजेत. १९९६ सालात भाजपाला सत्तेपासून रोखण्यासाठी तमाम विरोधकांनी बहुमताचे गणित जमवले, पण त्यांच्यापाशी नेतृत्व नव्हते. तेव्हा बंगालचे मुख्यमंत्री ज्योतू बसू यांचे नाव पुढे आलेले होते. आज त्याच जागी शरद पवार हे एकमेव नाव विरोधकांच्या यादीत आहे. वय अनुभव आणि समज असलेला त्यांच्याखेरीज अन्य कोणी नेता नाही. म्हणूनच राष्ट्रवादी काँग्रेस किती खासदार लोकसभेत निवडून आणू शकते, ती बाब दुय्यम असून देशभरच्या बिगर भाजपा नेत्यांना एकत्र नांदवू शकेल असा नेता, ही पवारांची जमेची बाजू आहे. ती विचारात घेऊन पवार हालचाली करणार असतील तर महाराष्ट्रातील चित्रही बदलून जाऊ शकते.

अनेकदा त्यांच्या हयातीत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब खुलेपणाने सांगायचे. शरदबाबू पंतप्रधान होणार असतील, तर त्यांना माझा पाठिंबाच राहील. ती गंमत नव्हती. तर ते सत्य बोलत होते. पंतप्रधानपदावर दावा करू शकेल आणि तिथपर्यंत मजल मारू शकेल, असा एकमेव नेता राज्यात होता व आहे, त्याचे नाव शरद पवार. मराठी माणसाला पंतप्रधान होताना बघण्यासाठी बाळासाहेब आपले राजकीय हेवेदावे बाजूला टाकायला तयार होते, तर सामान्य मराठी माणूस त्यांच्यापेक्षा वेगळा विचार करूच शकत नाही. ही प्रत्येक भाषिक राज्यातील जनतेची मनिषा असते. ही अस्मिताच मोदींनाही उपयोगी ठरलेली आहे. ५६ टक्के मते व सर्वच्यासर्व लोकसभेच्या जागा गुजरातने मोदींना दिल्या. महाराष्ट्र त्यापेक्षा वेगळा असू शकत नाही. मात्र नुसता पंतप्रधान असून चालत नाही. त्याचा दबदबाही तितकाच असला पाहिजे.

- Advertisement -

मनमोहन सिंग पंतप्रधान झाले म्हणून त्यांच्यामागे पंजाब उभा राहिला नाही, की देवेगौडांच्या मागे कर्नाटकही एकदिलाने उभा राहिला नव्हता. पण गुजरात मोदींच्या पाठीशी ठामपणे उभा राहू शकला. त्याच कारणास्तव महाराष्ट्रही पूर्ण शक्तीनिशी पवारांच्या मागे उभा राहू शकतो. त्याच दिशेने पवारांना प्रयत्न करावे लागतील. मोदी भाजपाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार झाल्यानंतर त्यांच्याच इशार्‍यावर व संमतीने त्यांचा पक्ष व एनडीएची आघाडी चाललेली होती. नेत्याची अवज्ञा कोणी करत नव्हता व उरलेल्या नेत्यांमधली भांडणे व विवाद मोदींच्या हस्तक्षेपाने संपुष्टात येत होते. पवारांनी विरोधी आघाडीचे नेतृत्व घ्यायचे असेल, तर त्यांच्याकडे तितके निर्णायक अधिकार आघाडीतील बाकीच्या पक्ष व नेत्यांनी दिले पाहिजेत आणि पवारांच्या शब्दाचा मानही राखला पाहिजे. ही अट घालून व इतरांना ती स्वीकारायला लावूनच पवारांनी त्या आखाड्यात उतरले पाहिजे. ते अशक्य अजिबात नाही. कारण योग्य नेता ही इतरांची गरज असून पवारांची लाचारी नाही.

मोदींच्या गुजरातमधील यशाचे रहस्य त्यांच्याही आधी शरद पवार यांना उमजले होते आणि त्यांनी ते बोलूनही दाखवलेले होते. त्यांना आज ते आठवत नसेल. तर पवारांनी आठदहा वर्षांपूर्वी शेखर गुप्ता यांना दिलेल्या मुलाखतीचा तो भाग हुडकून पुन्हा ऐकावा. एनडीटीव्ही या वाहिनीच्या ‘वॉक द टॉक’ या कार्यक्रमात पवार म्हणाले होते, शेजारी राज्याकडे बघा. तिथला मुख्यमंत्री राज्याच्या विकासासाठी धडपडतो आहे आणि अवघी गुजराती जनता त्याच्यामागे ठामपणे उभी राहिली आहे. नेत्याच्या पाठीशी जनता कशी वा का उभी रहाते, त्याची जाण पवारांना आहे. म्हणूनच आपल्या पक्षाचे चारसहा खासदार नसतील, तर पंतप्रधान पदाची स्वप्ने बघण्यात अर्थ नाही, हे दोन वर्षांपूर्वी पवारांचे विधान पटणारे नाही. विषय परिस्थिती व राजकीय समीकरणाचा असतो. आज मोदींना पराभूत करण्यासाठी सगळेच विरोधी पक्ष उतावळे झाले आहेत आणि त्यांच्यापाशी नेतृत्वाचा दुष्काळ आहे.

तो फक्त शरद पवार संपवू शकतात. पण पवारांना आघाडीत घेताना व पवारांनी अशा आघाडीत जाताना, संख्याबळाचे गणित मांडून चालणार नाही. कारण पवारांच्या पक्षाचे खासदार किती निवडून येतील, ती बाब दुय्यम असून आघाडीचे गणित बहुमतापर्यंत पोहोचत असेल, तर निवडून आलेल्यांना कोण समर्थपणे हाताळू शकेल, ही बाब निर्णायक आहे. ममतांपासून राहुलपर्यंत ते कोणालाही साधणारे काम नाही. पण पवार अशी आघाडी लिलया चालवू शकतात, याविषयी त्यांच्या शत्रूंच्याही मनात शंका नाही. सहाजिकच आपला पक्ष वा संख्याबळापेक्षाही पवारांनी आपली कुवत व अनुभवाची बोली आघाडीत जाताना लावली पाहिजे. एकदा त्यात त्यांना यश मिळाले व बाकीच्या देशभरच्या विरोधी व प्रादेशिक पक्षांनी त्यांचे निर्विवाद नेतृत्व पत्करले, तर अवघा महाराष्ट्रही पवारांच्या मागे ठामपणे उभा राहू शकतो. मराठी माणूस तितका उदार व समजदार नक्कीच आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -