घरफिचर्समायमहानगर ब्लॉगमनाची नाही जनाची तरी बाळगा !

मनाची नाही जनाची तरी बाळगा !

Subscribe

संजय राऊत हे एका दैनिकाचे कार्यकारी संपादक आणि संसदेच्या ज्या सभागृहात बुद्धिजीवी प्रतिनिधित्व करतात, त्या राज्यसभेचे सदस्य आहेत, तर किरीट सोमय्या हे व्यवसायाने चार्टर्ड अकाउंटंट आहेत. अतिशय अवघड असणारी सीएची परीक्षा सोमय्या 1979 साली उत्तीर्ण झालेत.

शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणि भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी रोज ज्या गलिच्छ भाषेत आरोप -प्रत्यारोपाचा खेळ चालवला आहे तो पाहून त्यांच्या ‘डर्टी पॉलिटिक्स’चा सामान्य माणसाला अतोनात वीट आलेला आहे. त्यामुळे या दोघांनी आता मनाची नाही तर जनाची तरी लाज बाळगावी, असे महाराष्ट्रातील तमाम विचारशील जनतेच्या वतीने त्यांना सांगण्याची वेळ आली आहे. सध्या राजकारणात सर्वाधिक बाष्कळ आणि बालिश टिकाटिप्पणी करणार्‍या नेत्यांचा क्रम जर पाहिला तर त्यात संजय राऊत,किरीट सोमय्या, प्रवीण दरेकर, नारायण राणे आणि प्रसाद लाड अशी क्रमवारी आहे. याकडे पाहिल्यानंतर हे सगळे सद्गृहस्थ मागच्या निवडणुकीत निवडून आलेले नाहीत हेदेखील एक वास्तव आहे. अपवाद प्रसाद लाडांचा. त्यांना अजून तरी कोणत्या पक्षाने निवडणूक लढवू दिलेली नाही. सुसंस्कृत माणसाला आपल्या घरातील दूरचित्रवाणीवरून बातम्या किंवा राजकीय चर्चांचा कार्यक्रम पाहताना शरमेने मान खाली घालावी लागेल, अशी दोन व्यक्तिमत्व म्हणजे संजय राऊत आणि किरीट सोमय्या.

यापैकीचे संजय राऊत हे एका दैनिकाचे कार्यकारी संपादक आणि संसदेच्या ज्या सभागृहात बुद्धिजीवी प्रतिनिधित्व करतात, त्या राज्यसभेचे सदस्य आहेत, तर किरीट सोमय्या हे व्यवसायाने चार्टर्ड अकाउंटंट आहेत. अतिशय अवघड असणारी सीएची परीक्षा सोमय्या 1979 साली उत्तीर्ण झालेत. एक जण आकड्यांच्या खेळात वाकबगार आहे तर दुसरे शब्दप्रभू आहेत. आम्ही त्यांना शब्दप्रभू म्हणण्याचं कारण इतकंच की, ज्या शिवसेनाप्रमुखांबरोबर गेली तीन दशकं आमचे तात्विक मतभेद होते त्या शिवसेनाप्रमुखांचे शब्द आणि उच्चार हे नेमकेपणाने पकडण्याचं काम राऊत महोदयांनी केलेलं आहे. ते स्वतःला शिवसेनाप्रमुखांचे शागिर्द म्हणवत असले तरी त्यांच्या काकणभर अधिक निष्ठा आणि श्रद्धा या राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा असलेल्या शरद पवार यांच्यावरच आहेत हे आता लपून राहिलेलं नाही.

- Advertisement -

किंबहुना, शरद पवारांवर असलेल्या निष्ठा हेच आपल्या राजकारणाचं सौभाग्य म्हणत महाविकास आघाडीचा संसार मांडणार्‍या मांडवकरांमध्ये ते अग्रणी आहेत. आपल्याच चाणक्यनीतीने पक्षाचा सर्वोच्च नेता मुख्यमंत्रीपदावर स्थानापन्न असल्यामुळे पक्षात अथपासून इतिपर्यंत बोलण्याचा ठेका आपणच घेतल्यासारखं ‘रोखठोक’कार वावरत असतात. गेल्या सुमारे सव्वा दोन वर्षात तर त्यांनी आपण एका दैनिकाचे कार्यकारी संपादक आहोत, हे विसरून रोज सकाळी सुरू केलेले आकांडतांडव पाहताना कुणाही सभ्य माणसाला सिसारी आल्याशिवाय राहत नाही.

शिवसेनेने आतापर्यंत अनेक उपर्‍या-टिपर्‍यांना राज्यसभेवर पाठविले. कधी पक्षनिधीसाठी थैल्या खाली करणार्‍यांना तर कधी स्मार्ट मित्र ‘मटा’मध्ये बसून पक्षप्रमुखांना ‘नायक’ करणार्‍यांना सेनेकडून राज्यसभेवर पाठवण्यात आलंय. त्या तुलनेत संजय राऊत यांच्या निष्ठा अधिक ‘हायजेनिक’ होत्या. मात्र गेल्या दोन वर्षात राऊत आपला अधिक वेळ ‘मातोश्री’पेक्षा ‘सिल्वरओक’वर अधिक व्यतीत करतात. अवघे आठ नऊ खासदार गाठीशी असताना आणि अख्खी कारकीर्द उपप्रादेशिक नेते ठरलेल्या शरद पवारांना जी पंतप्रधानपदाची स्वप्नं पडतात त्या स्वप्नरंजनाला मूर्त स्वरूप देण्याचं महत्कार्य आपल्यालाच पार पाडायचं आहे असं समजून राऊतांचा धडपड सुरू आहे. गेली तीस वर्षं ‘सामना’च्या कार्यकारी संपादक पदावर घट्ट मांड ठोकून बसलेले संजय राऊत हे काहीसे बेताल आणि बेसावध वागत आणि जगत असल्याचं गेल्या काही घटनांकडे पाहिल्यावर दिसते.

- Advertisement -

या सगळ्या अभियानाचा एक भाग म्हणून राऊत रोज सकाळी चॅनेलवाल्या दांडेकरांना न चुकता बाईट देतात. चॅनेल पत्रकारांवर आमचा मुळीच राग नाही, पण ज्या स्वरुपाची ‘बाईट’ पत्रकारिता जग मुठीत घेणार्‍या या विलक्षण माध्यमातून सध्या देशभर सुरू आहे ते पाहिल्यानंतर सगळा मामला कठीण असल्याचं लक्षात येतंय. रोज सकाळी खंड न पाडता बोलायचंच आहे म्हणजे काहीही बोललं तरी या मंडळींना ते दाखवायचंच आहे, असा समज राऊत आणि ‘दांडेकर’ या दोघांनीही करून घेतलेला आहे. राऊत हे त्यांच्या देहबोली, अंगविक्षेप, शब्दफेक, केशभूषा आणि वेशभूषा यांच्या माध्यमातून या महाराष्ट्रात आणि देशात आपणच अग्रमानांकित राजकारणी आहोत असं सांगण्याचा आटोकाट प्रयत्न करतात. मात्र या सगळ्यात धक्कादायक म्हणजे 20 वर्षांच्या राजकीय कारकिर्दीत राऊत यांनी एकही जाहीर निवडणूक लढवलेली नाही. किंबहुना, निवडणूक लढवण्यासाठी ना पक्षाने त्यांना योग्य समजलं ना निवडणुकीचं शास्त्र राऊत स्वानुभवातून समजून घेऊ शकले.

जी गोष्ट संजय राऊतांची तीच किरीट सोमय्यांची. व्यवसायानं चार्टर्ड अकाउंटंट असल्यामुळे अंकशास्त्र, विषय, नोंदी, कागदपत्रं या सगळ्या गोष्टी माहिती असल्यामुळे आणि ते हातात आयतं आणून देणार्‍या व्यवस्थेची कमतरता नसल्यामुळे सोमय्या अनेक राजकारणी, उद्योगपती, बिल्डर, बँका आणि संस्था यांच्या मागे लागलेले असतात. किरीट सोमय्या हा गुजराती कुटुंबातील तरुण मुळातच धडपड्या आणि चळवळ्या स्वभावाचा. मराठी मुलीशी विवाहबद्ध झालेल्या या तरुणाला मुलुंडसारख्या सुसंस्कृत आणि सुशिक्षित मतदारांच्या उपनगरांमध्ये आपलं राजकारण आणि समाजकारण करताना आपल्या अंगचा नटसम्राट कधीच लपवता आला नाही. मग घटना कोणतीही असू द्या, नाटकबाजी हा सोमय्यांचा स्थायीभाव झाला आहे. याच सोमय्यांनी लालकृष्ण आडवाणी यांना मुलुंडमध्ये दांडिया खेळायला भाग पडलं होतं तर उपनगरीय रेल्वेच्या फलाटांची उंची मोजताना हेच सोमय्या महाशय स्वतः मोजपट्टी घेऊन कॅमेर्‍यासमोर गाडी आणि फलाट यांच्यातील गॅपमध्ये पाय घालून ड्रामाबाजी करत असत.

आपल्यावर होणारा मराठीद्वेष्टा असा आरोप पुसून काढण्यासाठी कधी ते गोविंदा होऊन हंडी फोडण्याचं नाटक करत. तर कधी समस्त पृथ्वीवरचा भ्रष्टाचार निपटून काढण्याचा विडा आपणच उचललेला आहे अशा आविर्भावात राज्यभर फिरत असतात. मात्र चारीही दिशांना हिंडून केलेल्या खोदकामांमध्ये पक्षहित किती आणि स्वहित किती, याचा त्यांना विसर पडताना दिसतो. कारण स्वत:च्या पक्षातील प्रवीण दरेकर, प्रसाद लाड, नारायण राणे यांच्यासारखी नररत्ने असताना आपण इतरत्र फिरतोय म्हणजे आपलं ठेवायचं झाकून आणि दुसर्‍याचं बघायचं वाकून अशीच सोमय्यांची रीत झाली आहे. संजय राऊत असो नाहीतर किरीट सोमय्या, त्यांचं पातळी सोडून वागणं, बोलणं आणि वावरणं थांबण्याची नितांत गरज आहे. हे दोघे ज्या पातळीवर जाऊन एकमेकांवर बेधुंद बैलांसारखे तुटून पडतायत ते बघून त्यांच्या पक्षांच्या प्रमुखांनी तरी त्यांना वेसण घालावी, असे महाराष्ट्रातील संवेदनशील माणसांना मनोमन वाटत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -