घरफिचर्समायमहानगर ब्लॉगअस्तनीतील निखारे आणि बांगलादेशी !

अस्तनीतील निखारे आणि बांगलादेशी !

Subscribe

सर्व काही सुरळीत सुरू असते, शांतता नांदते तेव्हा देशाचे शत्रू कशाची तरी तयारी करत असतात. आधी यंत्रणा पोखरून काढत पूर्वतयारी झाली की मग वेळ काळ बघून धमाका उडवून द्यायची त्यांची तयारी असते. हे करण्यासाठी आपले शेजारी पाकिस्तान आणि बांगलादेशी कायम टपून बसलेले असतात. खरेतर नव्याने हे काही सांगायची गरज नाही. पण, मुंबई आणि राज्यातील झोपडपट्ट्या या बांगलादेशी आणि पाकिस्तानी घुसखोरांचे अड्डे आहेत, हे समजूनही सुरक्षा यंत्रणा त्याकडे दुर्लक्ष करणार असेल तर तो देशासमोरचा खूप मोठा धोका आहे, हे लक्षात घ्यायला हवे. एका बांगलादेशी नागरिकाला भारतात घुसखोरी करण्यासाठी किती पैसे लागतात? फक्त 150 रूपये. केवळ दीडशे रुपयांत भारतात प्रवेश मिळतो. हजार-दीड हजाराचे पॅकेज दिले, की त्याला बांगलादेशातून उचलून मुंबईत स्थिरस्थावर करेपर्यंत सारेच काम केले जाते. ही माहिती काही ऐकीव नाही.

बांगलादेशी घुसखोरांवर कारवाई करणार्‍या विशेष शाखेने ती दिली आहे. गेल्या दीड वर्षामध्ये मुंबई शहरात भारतीय म्हणून स्थायिक होऊ पाहणार्‍या दीड हजार बांगलादेशी घुसखोरांना विशेष शाखेने अटक केली. त्यापैकी सुमारे पाचशे घुसखोरांना मायदेशी पोचविण्यात आले. मात्र अधिकारी मुंबईत पोहोचण्याआधी हे घुसखोर परतलेले असतात, हे दुर्दैव आहे. बांगलादेशींना भारतात घुसविण्यासाठी एजंटांच्या टोळ्या बीएसएफ आणि बांगलादेश रायफल्स जवानांशी संधान साधून आहेत. मुंबईतून बांगलादेश आणि पुन्हा मुंबईत आणून सोडण्यासाठी अवघे दीड ते दोन हजार रुपये आकारले जातात. त्यात तो एजंट रेल्वेचे तिकीटही काढतो. विनारोकटोक सीमापार नेतो आणि पुन्हा भारतात आणूनही सोडतो. एखादा भारतीय आपल्या गावी जाऊन पोटापाण्यासाठी पुन्हा शहरात येऊन बिनदिक्कत राहण्यासारखा हा प्रकार झाला. हेच बांगलादेशी आणि पाकिस्तानी मग जिहादच्या नावाखाली भारतीय मातीमधील तरुणांची डोकी भडकविण्याचे उद्योग करतात आणि मग त्यामुळे देशाच्या सुरक्षेला मोठा धोका निर्माण होतो. या देशात अस्तनीतील निखारे आहेत, तोपर्यंत हे प्रकार सुरूच राहणार आहेत. ते कोण आहेत, हे वेळीच ओळखून त्यांच्यावर कारवाई केल्यास भविष्यातील मोठे अनर्थ टळू शकतात.

- Advertisement -

हे आता सांगण्याची गरज म्हणजे कागदपत्रांच्या आधारे भारतीय नागरिक असल्याचे दस्तावेज तयार करून त्याआधारे शेकडो बांगलादेशी नागरिक मुंबई तसेच आजूबाजूच्या परिसरात राहत असल्याची धक्कादायक माहिती पुन्हा एकदा समोर आली आहे. बोगस भारतीय कागदपत्रांवर राहणार्‍या 85 बांगलादेशींचा महाराष्ट्र एटीएसच्या पथकाने पर्दाफाश केला आहे. विशेष म्हणजे, एटीएसच्या या कारवाईमुळे पासपोर्टसह इतर भारतीय ओळखपत्र बनवून देणारे मोठे रॅकेट उघडकीस आले आहे. एटीएसच्या अधिकार्‍यांनी या प्रकरणात पासपोर्ट एजंट आणि चार बांगलादेशी नागरिकांसह आठ जणांना अटक केली आहे. शिवडी येथील स्मशानभूमी परिसरात अक्रम शेख हा बांगलादेशी घुसखोर राहत असल्याची माहिती एटीएसच्या काळाचौकी युनिटला मिळाली. एटीएसच्या पथकाने शिवडी येथून अक्रम याला ताब्यात घेतले. चौकशीमध्ये त्याचे पूर्ण नाव अक्रम नूर नबी ओल्लाउद्दीन शेख असून तो घुसखोरी करून भारतात आल्याचे समजले. भारतामध्ये वास्तव्य करताना कुणाला संशय येऊ नये, यासाठी अक्रम याने मुंब्रा येथील रफिक सय्यद याच्याकडून बोगस आधारकार्ड, पॅनकार्ड तसेच भारतीय पासपोर्ट बनवून घेतल्याचे सांगितले.

याआधारे गुन्हा दाखल करून एटीएसच्या पथकाने तपास सुरू केला. पासपोर्ट एजंट असलेल्या रफिकला मुंब्रा येथून अटक करण्यात आली. 2013 पासून एजंटचे काम करणार्‍या सय्यद याने पासपोर्टसाठी ऑनलाइन पद्धतीने सादर केलेल्या कागदपत्रांची छाननी केली असता, 446 जणांना त्याने पासपोर्ट काढून दिल्याची माहिती मिळाली. ही सर्व कागदपत्रे तपासली असता 85 बांगलादेशी घुसखोरांना त्याने बनावट ओळखपत्रांच्या आधारे पासपोर्ट काढून दिल्याचे समोर आले. प्रकरणाचे गांभीर्य ओळखून सखोल तपास केला असता रफिक सय्यद हा मोठे रॅकेट चालवत असल्याचे समोर आले. रफिक सय्यद हा पॅनकार्ड, आधारकार्ड, रेशनकार्ड, विजेचे बिल, शाळा सोडल्याचा तसेच जन्माचा दाखला, बँक खात्याचे पासबुक यांसह अन्य कागदपत्रे त्याच्या इतर साथीदारांकडून तयार करून घेत असल्याचे निष्पन्न झाले. शाळा आणि जन्माचे बोगस दाखले देणारा इद्रिस शेख, बनावट रबरी शिक्के बनविणारा अविन केदारे, खोटे बँक पासबुक आणि रेशनकार्ड बनविणारा नितीन निकम यांना मुंबई आणि ठाण्याच्या वेगवगेळ्या भागातून अटक करण्यात आली. या रॅकेटने 85 बांगलादेशी घुसखोरांना बोगस कागदपत्रे बनवून दिली आहेत.

- Advertisement -

यापैकी अक्रम शेख, सोहेल शेख, अब्दुलखैर शेख आणि अबुल हाशम उर्फ अबुल शेख या चौघांची ओळख पटविण्यात एटीएसला यश आले असून त्यांना या प्रकरणात अटक करण्यात आली. या सर्वांकडून बनावट भारतीय दस्तावेज, बांगलादेशी चलन, भारतीय रोख रक्कम, बोगस स्टॅम्प बनविण्यासाठी लागणारे साहित्य, लॅपटॉप, मोबाइल, सीम कार्ड तसेच इतर बरेच साहित्य हस्तगत केले. सात वर्षांपासून रफिक आणि त्याचे साथीदार बोगस कागदपत्रांवर पासपोर्ट काढून देत होते. पासपोर्ट काढतेवेळी अनेक शासकीय यंत्रणांचा यामध्ये सहभाग असतो. त्यामुळे त्यांनी सादर केलेल्या कागदपत्रांची पडताळणी कुणी आणि कशी केली? वास्तव्याच्या पत्त्याबाबत शहानिशा केली का? या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी शासकीय अधिकारी आणि कर्मचारी यांचीदेखील या प्रकरणात चौकशी व्हायला हवी. हेच ते अस्तनीतील निखारे. या देशात राहून या मातीशी बेईमानी करणारे देशद्रोही! यांना कठोर शिक्षा झाली तर हजार, दोन हजार रुपये घेऊन बांगलादेशी सीमेपासून सुरू असलेल्या या भयानक प्रकाराला थोडाफार आळा बसू शकेल.

मुंबई शहर, उपनगरच नव्हे तर ठाणे, पुणे या ठिकाणच्या झोपड्यांमध्ये बांगलादेशी घुसखोर मोठ्या संख्येने आहेत. ज्या ठिकाणी नव्याने झोपड्या उभारल्या जातात त्या ठिकाणी हे घुसखोर राहत असल्याचे दिसून आले आहे. मग ते कांदळवनाची कत्तल करून उभी रहात असलेली विक्रोळी कन्नमवार नगरची झोपडपट्टी असो की दहिसरची गणपत पाटील झोपडपट्टी असो. गणपत पाटील नगर तर आता धारावी झोपडपट्टीला मागे टाकून आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी होऊ घातली आहे. गेल्या दहा बारा वर्षातील ही झोपडपट्टी असून शिवसेनेची मुंबईत सत्ता असताना त्यांच्या लोकप्रतिनिधींच्या डोळ्यादेखत या ठिकाणी हजारोंच्या संख्येने या ठिकाणी झोपड्या उभ्या राहिल्या आहेत. एका रात्रीत बांबू आणि पत्रे ठोकून झोपड्या उभ्या राहतात आणि त्या परिसरात मुंबई महापालिका अधिकार्‍यांना याची माहिती नसते म्हणजे दिव्याखालचा अंधार किती काळाकुट्ट आहे, हे लक्षात येते.

आजचा अंधार उद्या काळरात्र म्हणून तुमच्या घरदाराला विळखा घालेल त्यावेळी डोळे उघडतील, पण तोपर्यंत बराच उशीर झालेला असेल… या सर्व झोपड्यांमध्ये फक्त घुसखोरच राहत नाहीत तर पिस्तुल, धारदार शस्त्रे आणि अमली पदार्थांचे हे अड्डे बनले आहेत. गेली अनेक वर्षे शांतचित्त असलेले विक्रोळीचे कन्नमवार नगर आज चोर्‍यामार्‍या आणि गुन्हेगारीमुळे उजेडात येत असून ते खूप धोकादायक आहे. वांद्रे रेल्वे स्थानकाच्या दोन्ही बाजूला उभ्या असलेल्या गरीब नगरच्या झोपड्या, बेहरामपाडा तसेच मानखुर्द येथे पसरत चाललेल्या झोपड्या या घुसखोरांना आश्रय देणार्‍या असतील तर त्यावर वेळीच कारवाई व्हायला हवी. काही महिन्यांपूर्वी गरीब नगरच्या काही झोपड्या अचानक जळून खाक झाल्या.

या ठिकाणी मोठ्या संख्येने बांगलादेशी रहातात तसेच काही घुसखोर पाकिस्तानीसुद्धा रहात असल्याचे दिसून आले आहे. या ठिकाणी महापालिकेच्या अधिकार्‍यांनी झोपड्या तोडण्याची कारवाई सुरू करताच अचानक आग लागली. ही आग लागली नव्हती तर लावण्यात आली होती आणि ती लावणारे शकील आणि त्याचे सहकारी होते. हा शकील म्हणजे 2012 च्या दंगलीतील आरोपी होता. शेवटी तपासात पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या. देशविरोधी कटकारस्थाने शिजवणार्‍यांना आणि त्यांच्या अड्ड्यांना आताच रोखले पाहिजे. नाही तर भविष्यात महाराष्ट्राचा आसाम आणि पश्चिम बंगाल होण्यास फार काळ लागणार नाही. मतांच्या राजकारणासाठी कोणी देशाच्या मुळावर येत असेल तर त्याला वेळीच ठेचला पाहिजे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -