घरफिचर्सनाना आणि नाना!

नाना आणि नाना!

Subscribe

माझ्या आयुष्यात दोन नाना आले. त्या दोघांचा माझ्या जीवनावर मोठा प्रभाव आहे. एक नाना माझ्या रक्ताच्या नात्याचा आहे. माझ्या वडिलांचा धाकटा भाऊ. ज्याचा हात धरून त्याच्या नजरेने मी जगातील सर्वात सुंदर असा वेंगुर्ला गाव बघितला आहे. माझे बालपण गावी गेले नसले तरी माझ्या मातीची अंतरीची ओढ या काकामुळे मला लागली. दुसरे नाना माझे कोणी थेट काका, मामा नाहीत. ते फक्त नाना आहेत. माजी सैनिक. ज्यांच्या तोंडून नाही हा शब्द मी कधी ऐकला नाही. पण हे दोन्ही नाना पुढे कालौघात वेगवेगळ्या कारणांमुळे माझ्यापासून दूर जात आहेत, याची खंत मनाला खुपत आहे.

नाना या दोन अक्षरी नावांनी माझे अवघे आयुष्य व्यापून राहिले आहे. आज या दोन अक्षरांचे दोन्ही नाना माझ्यासाठी या जगात आहेत आणि एका अर्थाने नाहीतही… हे सांगताना माझा जीव घाबराघुबरा होतो, डोळे भरून येतात… आपली जीवाभावाची माणसे आपल्यापासून दूर जाताना या जगाच्या कालचक्राचे काटे वाकडे तिकडे फिरताना पाहून आपण मानत नसलो तरी कोणी तरी हे आपल्याला ठरवून तर दाखवत नाही ना… अशी शंका उगाचच मनाला चाटून जाते; पण, हा विचार तात्पुरता असतो. एक नाना माझ्या रक्ताच्या नात्याचा आहे. माझ्या वडिलांचा धाकटा भाऊ. ज्याचा हात धरून त्याच्या नजरेने मी जगातील सर्वात सुंदर असा आमचा वेंगुर्ला गाव बघितला आहे. माझे बालपण गावी गेले नसले तरी माझ्या मातीची अंतरीची ओढ या काकामुळे मला लागली. दुसरे नाना माझे कोणी थेट काका, मामा नाहीत. ते फक्त नाना आहेत.

माजी सैनिक. ज्यांच्या तोंडून नाही हा शब्द मी कधी ऐकला नाही. सैनिक ते माजी शिक्षक असा प्रवास करून निवृत्तीनंतर कोकणात स्थायिक होऊनही ज्या माणसाला येथील भाऊबंदकीचा कधी स्पर्श झाला नाही. आभाळाएवढे विशाल मन घेऊन जन्माला आलेला हा माणूस कधी रडका चेहरा करून बसलेला मी कधी पाहिला नाही. सतत सकारात्मक वृत्ती. सामाजिक कामाला वाहून घेताना दुसर्‍याला प्रोत्साहित करण्याच्या गुणाने सारा गाव आपल्या प्रेमात पाडणारा. वेळेला पक्के आणि दिला शब्द कधीही मागे घेणार नाही, अशी वृत्ती.

- Advertisement -

मी वयाच्या पाचव्या वर्षी वेंगुर्ले सोडले. वडील गिरणीत कामाला होते आणि सायन चुनाभट्टीला आपल्या मोठ्या भावाबरोबर राहत होते. झोपडपट्टीत या आमच्या अण्णा काकाची दहा बाय बाराची पत्र्याची खोली होती. या खोलीत अण्णांचे कुटुंब आणि आम्ही गावातील अशी छोटी मोठी मिळून दहा एक माणसे राहत होतो. खोली छोटी होती; पण माणसे मोठ्या मनाची होती. चार सहा महिन्यांनी नाना आणि बाकीचे लोक दोन पाच दिवसांसाठी येऊन राहायचे. या दिवसांत नानाच्या तोंडून शेतीभातीची, आंब्या-काजूची, सणासुदीची, गाव रहाटीची, ताजा माशांची आणि आमच्या घरापासून जवळच असणार्‍या समुद्राच्या गजाली ऐकताना वेंगुर्ला तो जणू कवेत घेऊन मुंबईला आलाय, असे मला वाटत राहायचे आणि शरीर मुंबईत असले तरी मनाने गावी फिरून आलेले असायचे… नानाबरोबर शेतीला असणार्‍या आईची आठवण येऊन भा. रा. तांबेची कविता मनी पिंगा घालून जीव वेडावत असे.

घरची गरीब परिस्थिती असल्याने गावाला जाणे वर्षातून एकदाही परवडणारे नव्हते. पण, का कोण जाणे ही गरिबीसुद्धा इतकी परीक्षा घेणारी होती की गावाहून मुंबईत शिकायला पहिलीत आलेला मी थेट सहावीत असताना गावी गेलो. आणि सहावीनंतर नोकरीला लागल्यानंतर वेंगुर्ल्याला पाय लागले. तोपर्यंत नाना हा माझ्यासाठी वेंगुर्ल्याचा ‘संजय’ होता. त्याच्या नजरेतून मी गाव फिरून आलेलो होतो. आमच्या घरातला मी पहिला पदवीधर. पदवी आणि नोकरी हातात हात घेऊन आल्याने माझी वेंगुर्ल्याकडे जाणारी वाट सोपी झाली. गणपती, जत्रा, आंब्या काजूचे दिवस, मिरग, पाऊस, मानसी खाडी, वेंगुर्ले बंदराला धडक मारणारा गाजता समुद्र, त्याच्यावर लक्ष ठेवून असणारा फिरता दीपस्तंभ आणि सातेरी, रामेश्वर, मानसीश्वर हे सारे जवळून अनुभवताना देव आणि निर्सगाचे हे अद्भुत सौंदर्य श्वासात भरून राहिले.

- Advertisement -

माझ्या वडिलांना ते धरून सात भाऊ. मोठे सहा भाऊ फक्त शेतीत एवढ्या मोठ्या कुटुंबाचे पोट भरत नाही म्हणून पन्नाशीच्या दशकात मुंबईला आले. फक्त नाना गावाला राहिला. खरेतर तोसुद्धा मुंबईला येणार होता. उंचपुरा, उत्तम शरीरयष्टी आणि देखणा नाना मॅट्रिकही होता. त्याला मुंबईत कुठेही नोकरी मिळाली असती; पण, आमची आजी आणि मोठे काका यांनी त्याला घरभाट सांभाळण्यासाठी गावात ठेवले. त्याच्या मनाविरुद्ध. पण, त्यानंतर तो जो गावात रमला तो कायमचा. त्याच्या भावांची आणि कधी माझीही काही छोट्या मोठ्या कारणांमुळे वादावादी झाली की आजही सांगतो, ‘तुम्ही मुंबईक गेलास मोठे झालास, मी रवलय हयसर गाव गाव करीत. म्हशी, जोत, शेती आणि नारळ आंबे करत. तुमचा घर सांभाळीत’. नाना गावाला एकटा नव्हता. सुरुवातीला माझ्या आईसह आणखी दोन काकी आणि मिलचा संप झाल्यानंतर भाऊ काका त्याच्या मदतीला गावाला होते. या सर्वांच्या सोबतीने तो कुळभाट पुढे नेत होता. पावसाळी उन्हाळी शेती, भाजीपाला, दुधाच्या चार म्हशी, आंब्या- काजूच्या आधाराने घराला सावरत होता. शेतीत तो घाम गाळत असताना माझी आई आणि काकी भाजीपाला विकून आलेले पैसे त्याच्या हातात ठेवत होते. सर्वात मोठी काकीही म्हशींना सांभाळत दुधाचे पैसे त्याच्याच हातात ठेवत होती. सोबत मुंबईतल्या भावांचा मोठा आधार होता.

गावात नानाला कुठली गोष्ट कमी पडली आणि भावांनी त्याला मदत केली नाही, असे कधी झाले नाही. तो गावचा कर्ता होता, लहान असूनही त्याच्या शब्दाला मान होता. आमच्या अण्णा काकांचे त्याच्यावर विशेष प्रेम. त्याला चांगले कपडे, सोन्याची चेन, अंगठी घालून आपला देखणा भाऊ आणखी रुबाबदार दिसला पाहिजे, असे त्यांना मनापासून वाटे. इतरांपेक्षा आपला भाऊ भारी वाटला पाहिजे, असा त्यांचा कायम अट्टाहास राहिला. घर एक राहिले पाहिजे, यासाठी मोठे काका पुढे असताना अण्णा काकांनी नानाला आपलासा करत घर सावरण्याचे मोठे काम केले. गावाला काही कमी पडले तर प्रसंगी अण्णांनी तसेच माझ्या बाबांनीही आपल्या बायकांचे दागिने मोडण्यास मागे पुढे पाहिले नाही. घर चालत होते. नानाने आंब्याचा व्यापार करायला सुरुवात केल्यानंतर घराला चांगले दिवस येतील, असे वाटत होते. पण, कष्टाळू असणार्‍या नानाला व्यापारातल्या खाणाखुणा कधी समजल्या नाहीत. त्याचा व्यवसाय आतबट्याचा ठरला. त्याला कधीच मोठे यश मिळाले नाही. धंद्यात सावरण्यासाठी सर्व भावांनी मिळून त्याला मदत केली खरी; पण शेवटपर्यंत त्याला यश आले नाही.

शेती एके शेती नंतर करत राहणार्‍या नाना तसेच भाऊ काकांची मुले मोठी होत असताना त्यांना पुढे आयुष्यात उभे करायची जबाबदारी त्यांच्या भावांच्या मागे मी आणि माझ्या कुटुंबाने घेतली. आम्ही फार मोठे काही करत नव्हतो. घरचा वारसा पुढे चालवत होतो. दिवस आपलेपणाचे होते आणि आपली माणसे स्वतःच्या पायावर उभी राहिली पाहिजे, हा मनाचा प्रामाणिकपणा होता, पण कुठे काय चुकले माहीत नाही, नानाला इतकी वर्षे एकत्र कुटुंबाचे सांभाळलेले कुळभाट फक्त स्वतःचे वाटू लागले. त्याची री मग इतरांनी ओढली आणि अनेक वर्षांपासून माझा मित्र असणारा हा काका माझ्यापासून दूर गेला. मी खूप दुखावलो गेलो. असे का व्हावे याचे उत्तर मला अजूनही सापडले नाही. पण, कोकणी माणूस गजाली मारण्यात आणि रंगवण्यात हुशार असल्याने त्याच्याकडून ऐकलेली ही लोककथा आपल्या मुळावर आली की काय, असे मला का कोण जाणे उगाचच वाटून राहते. राम सीतेबरोबर वनवासाला निघाला. लक्ष्मण म्हणाला, ‘दादा जेथे तू तेथे मी’. राम उत्तरला, ‘14 वर्षांचा वनवास आहे, खडतर आहे. तुला खूप त्रास होईल. लक्ष्मण म्हणतो, मी तुझ्याविना जगू शकत नाही. तू मला सोबत नेले नाहीस तर मी जीवाचा त्याग करेन. बंधुप्रेम पाहून राम गहिवरला आणि वनवास सुरू झाला.

मजल दरमजल करत रामाने महाराष्ट्रात प्रवेश केला. विदर्भातून नाशिक करत पश्चिम महाराष्ट्रातून कोल्हापूरच्या दिशेने कूच केले. राधानगरीतून आंबोलीत प्रवेश करताच लक्ष्मण म्हणाला, दादा मी इतके महिने आपला सर्व सामान एकट्यान टकलेवरून घेऊन चललंय, पण तू कधी माका एकदा तरी इचारलय की मी घेव काय. नाय मा, आता माका तुझा सामान नको आणि वनवास. मी घराक जातंय.’ ही दंतकथा असो की गोष्ट, पण कोकणच्या देवदत्त मातीला भावबंदकीचा अधिकचा शाप मिळाला आहे काय? माझ्याकडे त्याचे उत्तर नाही. पण, माझा नाना काकावर असलेल्या विश्वासाला तडा गेल्यासारखा झाला. दोघांमधील अंतर कमी करण्याचा त्याने प्रयत्न केला खरा; पण मीच लांब राहिलो… मी चुकलो का, असा विचार येतो तेव्हा इतकी वर्षे आपण जपलेल्या विश्वासाला गेलेल्या तड्याचे करायचे काय? असा प्रश्न जीव कातावून टाकतो.

दुसरे नाना चैतन्याचा मूर्तिमंत झरा. आम्ही गावचे सामाजिक मंडळ स्थापन केल्यानंतर या निवृत्त सैनिक शिक्षकाशी आलेला संपर्क म्हणजे माणसाने सतत वाहत कसं असलं पाहिजे, याचा मिळालेला धडा होता. निवृत्तीनंतर या माणसाने सैनिक पतसंस्था, निवृत्त सैनिक मंडळ, गावचे मंडळ, सामाजिक संस्था यांच्याशी स्वतःला बांधून घेतले. देवदेव करत न बसता आणि दुसरा काय करतो याचा फार विचार न करता मी समाजाला काय देतोय हे तनी मनी स्वतःला बजावत हा माणूस पायाला भिंगरी लावल्यासारखा फिरला. गावात कुठलाही सामाजिक कार्यक्रम असला की नाना वेळेत हजर. अगदी टेबल खुर्च्या लावण्यापासून ते पाहुण्यांची उठबस करण्यात ते पुढे असत. मंडळाचा अध्यक्ष म्हणून मिरवण्यापेक्षा आणि भाषणे ठोकण्यात नानांना कधीच रस नव्हता. तो आपला प्रांत नाही. उलट कार्यक्रम सुटसुटीत आणि वेळेत झाला पाहिजे यावर त्यांचा कायम कटाक्ष राहिला.

मी मंडळाचा सचिव असल्याने त्यांच्याशी सतत संपर्क. त्यांच्या चालण्याबोलण्यात जसा वेग होता, तसा तो बोलण्यातही आणि विशेष म्हणजे मुद्याचा होता. उगाच इकडच्या तिकडच्या फालतूच्या गप्पा मारण्यात त्यांना रस नव्हता. ‘हा बोल काय म्हणतोस. काय काम करायचे आहे. कुठले काम बाकी आहे. मी आहे काळजी करू नकोस’. नानांचा आश्वासक सूर लागला की काम करायला स्फूर्ती यायची. नाना आणि आमच्या सहकार्‍यांच्या सोबतीने वेंगुर्ले परबवाडा गावात आम्ही अनेक सामाजिक कामे केली. यात जलस्वराज्य योजना या सर्वात मोठ्या कामाचा समावेश होता. गावचे तळे खोल खोदून त्यात एका भागात विहीर खोदून गावची पाण्याची मोठी तहान भागवली गेली. याचबरोबर गावच्या चारही बाजूंनी बंधारे बांधून पावसाचे पाणी अडवण्यात आले. घरगुती गणेश मूर्ती स्पर्धा, गणपती सजावट स्पर्धा, गुणवान विद्यार्थी सत्कार, सर्वोत्तम शेतकरी स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम, स्नेहमेळावा असे अनेक उपक्रम राबवण्यात आले आणि ते आजही सुरू आहेत.

नाना आणि त्यांची पत्नी सरोज हे गावातील आदर्श जोडपे आहे. सरोजबाई गावच्या सरपंचही राहिल्या आहेत. नानाच्या घरात नेहमीच माणसांचा राबता राहिला आहे. नानांनी सत्तरी पार केली तरी त्यांचा वावर हा तरुणाला लाजवेल असा राहिला आहे. त्यांच्या खांद्यावर हात टाकून गप्पा मारताना ते मित्रासारखे वाटतात. सहजतेने ते दोन माणसांमधील वयाचे अंतर कमी करतात ते बघण्याचा आनंद काही वेगळाच असतो. त्यांच्या पुतणीची माँटीची छोटी तीन वर्षांची मुलगी ज्या सहजतेने नानांबरोबर वावरते त्याच जवळकीने त्यांचा नामांकित वकील भाचा कौस्तुभही आपल्या मामाबरोबर मित्रासारखा वागतो… हेच नव्हे तर गावात आणि गावाबाहेर प्रत्येकाशी नाना आनंदाचा झरा होऊन जातात. हा आनंदाचा झरा चार महिन्यांपूर्वी झालेल्या एका अपघातात अचानक थांबला. एका कामानिमित्त मोटर सायकलवरून नेहमीच्या शिस्तीने निघालेल्या नानांच्या गाडीला मागून आलेल्या कारने धडक दिली.

सरोजबाईंना फार मोठी दुखापत झाली नाही; पण नानांच्या मेंदूला मार बसला. त्यांच्या मुलाने सर्व वैद्यकीय सेवा देऊन त्यांना यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला, पण नाना आज शरीराने आपल्यात आहेत, पण मेंदू काम करत नाही. सर्व एका जागेवर करावे लागते. सतत धावणारा माणूस असा अचानक काही बोलेनासा झाला हे पाहूनच जीवाची तगमग होते. मात्र एवढा मोठा धक्का बसूनही त्यांचे कुटुंब निराश झालेले नाही. त्यांच्या वागण्या बोलण्यातून नानांसारखा आनंद वाहत असताना दिसतो. कदाचित आपले दुःख ते दाखवत नसावेत. नानांच्या सैनिकी पेशाप्रमाणे तेसुद्धा मनाने खंबीर असावेत. नानांना गावाला मी बघायला गेलो तेव्हा त्यांचा हात हातात घेतला तेव्हा ते पटकन उठून बसतील आणि ‘कधी आलास. बरा आहेस ना. बोल आता काय काम करूया’, असे चटकन म्हणतील. हा समज यावेळी खोटा ठरला आणि टचकन माझ्या डोळ्यात पाणी आले… मी नि:शब्द झालो.

कालपर्यंत माझे दोस्त असणारे दोन्ही नाना आज दूर चाललेत हा नियतीचा कुठला खेळ आहे, मला सांगता येणार नाही. पण, हा खेळ जीवघेणा आहे.

Sanjay Parab
Sanjay Parabhttps://www.mymahanagar.com/author/psanjay/
गेली ३२ वर्षे पत्रकारितेचा अनुभव. राजकीय, पर्यावरण, क्रीडा आणि सामाजिक विषयांवर विपुल लेखन. प्रिंट आणि डिजिटल मीडियामध्ये कार्यरत.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -