घरफिचर्सनैसर्गिक संवेदना, वेळीच जाणा !

नैसर्गिक संवेदना, वेळीच जाणा !

Subscribe

केवळ कॅन्सर प्रतिबंधच नव्हे तर स्वास्थ्य रक्षणासाठीही वेगविचार अनिवार्य ठरतो. आमच्या कॅन्सर संशोधन प्रकल्पात कॅन्सर रुग्णांच्या आहार-विहाराच्या सवयींचा अभ्यास करताना अनेकांमध्ये अशा प्रकारच्या वेगावरोध व वेग उदीरणाच्या सवयी असल्याचे आढळले. वेगावरोध किंवा वेगउदीरणाची ज्या व्यक्तींना सवयच जडलेली असते त्यांना त्या त्या अवयवाचे कॅन्सरप्रमाणेच इतरही आजार होण्याची संभावना असते.

मागील सदरात आपण आहार, निद्रा व ब्रह्मचर्य या आरोग्य रक्षणात महत्त्वाची भूमिका बजावणार्‍या तसेच शरीररूपी इमारतीला आधारभूत अशा तीन उपस्तंभाबाबत माहिती जाणून घेतली. आजच्या सदरात आपण वेगावरोध या आयुर्वेदातील वैशिष्ट्यपूर्ण संकल्पनेबाबत जाणून घेणार आहोत.

- Advertisement -

सर्वप्रथम आपण वेग या शब्दाचा अर्थ जाणून घेऊ. वेग हा शब्द विज्-जाणे या गत्यर्थ धातूपासून बनला आहे. प्रवृत्तीसाठी म्हणजे कर्मासाठी उन्मुख किंवा उद्युक्त होणे म्हणजे वेग!

मानवी शरीराच्या संदर्भात विचार करीत असताना शरीराचे कामकाज मुख्यत: शरीराला आवश्यक असणारे पदार्थ स्वीकारणे व शरीराला नको असलेले पदार्थ योग्य वेळी बाहेर टाकणे यावर अवलंबून असते. हे पदार्थ शरीराच्या बाहेर टाकण्यासाठी व स्वीकारण्यासाठी नैसर्गिकत: काही संवेदना शरीरामार्फत व्यक्त होतात. या संवेदना, जाणीवा म्हणजेच वेग होय.

- Advertisement -

सध्याच्या धकाधकीच्या जीवनशैलीत शरीराच्या दैनंदिन कार्यक्रमाचा भाग असणार्‍या या नैसर्गिक संवेदनांकडे दुर्लक्ष केले जाते. यालाच वेगांचा अवरोध करणे असे म्हणतात. वेगावरोध हे रोगनिर्मितीमागील प्रमुख कारण आहे.

आयुर्वेदाने वेगाचे म्हणजेच या नैसर्गिक संवेदनांचे अधारणीय वेग व धारणीय वेग असे दोन प्रकार सांगितले आहेत. शरीराने धारण करण्यास अयोग्य अशा शारीरिक संवेदनांना अधारणीय वेग असे म्हटले जाते तर शरीराने धारण करण्यास योग्य अशा संवेदनांना धारणीय वेग असे म्हटले जाते.

आयुर्वेदाने-अधोमार्गाने सरणारा वायू, मलप्रवृत्ती, मूत्रवेग, ढेकर, शिंक, तहान, भूक, झोप, खोकला, श्रम केल्यानंतर लागणारा दम, जांभई, अश्रू, उलटी, शुक्रवेग (वीर्यप्रवृत्ती) या शरीराच्या नैसर्गिक संवेदनांचा म्हणजेच अधारणीय वेगांचा अवरोध करू नये असे सांगितले आहे.

या वेगांची संवेदना झाल्यास लगेचच त्यांची पूर्ती केल्याने शरीरातील वातदोषाचे व त्या त्या संबंधित अवयवांचे स्वास्थ्य रहाण्यास मदत होते. त्याचप्रमाणे या वेगांची संवेदना झाली नसतानाच बळेबळेच त्यांचे उदीरण करणे हेही शरीरास तितकेच घातक आहे.

केवळ कॅन्सर प्रतिबंधच नव्हे तर स्वास्थ्य रक्षणासाठीही वेगविचार अनिवार्य ठरतो. आमच्या कॅन्सर संशोधन प्रकल्पात कॅन्सर रुग्णांच्या आहार-विहाराच्या सवयींचा अभ्यास करताना अनेकांमध्ये अशा प्रकारच्या वेगावरोध व वेग उदीरणाच्या सवयी असल्याचे आढळले. विशेषत: लहान आतडे, मोठे आतडे व गुदभागाचा कॅन्सर असलेल्या व्यक्तींत अधोवात व मलाच्या वेगावरोधाचा इतिहास, मूत्राशय-वृक्काच्या-पौरुषग्रंथीच्या कॅन्सरमध्ये मूत्रप्रवृत्तीच्या वेगाच्या अवरोधाची सवय तर आमाशय- ग्रहणी-पित्ताशयाच्या कॅन्सरमध्ये भूकेची वेळ न सांभाळल्याचे अनेक रुग्णांत आढळले. अशी वेगावरोध किंवा वेगउदीरणाची ज्या व्यक्तींना सवयच जडलेली असते त्यांना त्या त्या अवयवाचे कॅन्सरप्रमाणेच इतरही आजार होण्याची संभावना असते.

आता आपण शरीरास धारण करण्यास योग्य असे धारणीय वेग समजून घेऊ.
आयुर्वेदाने शरीराने धारण करण्यास योग्य अशा धारणीय मानसिक, वाचिक व शारीरिक वेगांचे वर्णन केले आहे.

१. धारणीय मानसिक वेग – लोभ, शोक, क्रोध, मान, भय, निर्लज्जता, ईर्ष्या, एखाद्या विषयाविषयी
आसक्ती, दुसर्‍याकडील वस्तूच्या अपहरणाची इच्छा या मानसिक उर्मींचा धारणीय मानसिक वेगात समावेश होतो.

२. धारणीय वाचिक वेग – अतिशय बोलणे, कडवट बोलणे, चुगली करणे, असत्य बोलणे, प्रसंगावधान न
ठेवून बोलणे हे धारणीय वाचिक वेग होत.

३. धारणीय शारीरिक वेग – दुसर्‍याला त्रास देण्याच्या हेतूने केलेल्या सर्व शारीरिक क्रिया. उदा. – चोरी, मारामारी इ. यांचा धारणीय शारीरिक वेगात समावेश होतो.

या धारणीय मानसिक, वाचिक व शारीरिक वेगांवर नियंत्रण न ठेवल्यास त्यांचा उद्रेक होतो. परिणामी मन:स्ताप होऊन स्वास्थ्य बिघडते. म्हणून या वेगांच्या नियंत्रणासाठी संयमाची व मनोबल वाढविण्याची अतिशय आवश्यकता असते.
म्हणूनच आयुर्वेदाने आरोग्य रक्षणासाठी मार्गदर्शन केलेला हा वेगविचार लक्षात ठेवून आचरण करणे महत्त्वाचे आहे.

-वैद्य स. प्र. सरदेशमुख
-ए. व्ही. पी., पीएच्. डी. (आयुर्वेद)
-संचालक, इंटिग्रेटेड कॅन्सर ट्रीटमेंट अ‍ॅण्ड रिसर्च सेंटर, वाघोली, पुणे

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -