घरफिचर्सराफेल से डर नही लगता साब...

राफेल से डर नही लगता साब…

Subscribe

‘ओम भग भ्रृगे भग्नी भागोदरी भस्मासे येवली ओम फट् स्वाहः’ असं म्हणत एक लिंबू जरी त्या पाकिस्तानवर भिरकावून दिला तरी अख्खा पाकिस्तान हिरोशिमा, नागासाकीसारखा बेचिराख व्हायला वेळ लागणार नाही. एवढी काळी विद्या प्रबळ होतेय. म्हणून आता ‘राफेल से डर नही लगता साब, निंबू से लगता है’ असं म्हणण्याची वेळ शत्रूवरच नाही तर मित्रावरही येऊन ठेपलीय.

दोनतीन वर्षांपूर्वी आपल्या भाईजानचा दबंग पाहिला होता. त्यातला तो एक डायलॉग इतकी वर्षे अगदी फिट्ट डोक्यात बसून राहिलाय. भाईजान काहीतरी मडकी फोडून बाहेर येतो. खिशातून पाचशेची नोट काढून सोनाक्षीपुढे धरून म्हणतो, “वो दो मटकीयों के लिए.”
“गलती हुई आपसे, गलती का दाम नही लेती मै.”
“दाम दे रहे है दान नही. प्यार से दे रहे है, रखलो. नही तो थप्पड मारकर भी दे सकते है.”

तेव्हा आपली सोनाक्षी लई attitude मध्ये म्हणते, “थप्पड से डर नही लगता साब, प्यार से लगता है.” जाम भारी. सगळी चरबी झटक्यात गळून पाडणारा हा डायलॉग. मग कितीतरी दिवस आम्हा कॉलेज कुमार आणि जास्त करून कुमारींच्या तोंडावर हा डायलॉग हमखास असायचा. तर आज हा परत आठवायचं कारण म्हणजे दसरा. साडेतीन मुहुर्तांपैकी एक असणारा हा दसरा सगळ्या शुभकार्यांची सुरुवात करायला अत्योत्तम मानला जातो. म्हणूनच असावं कदाचित, आपल्या ‘श्रद्धाळू’ सरकारनं मोठ्या खर्चानं, जमवाजमव करून राफेलचा घोडा आपल्या संरक्षण ताफ्यात जमा केला आणि विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर त्याची शास्त्रशुद्ध पूजाअर्चा करून शांतीही करवून घेतली. आता आम्हाला कोणतंच भय राहिलेलं नाही. आम्ही आता निर्धास्त झालोत.

- Advertisement -

आमच्या घरी – कोकणातही – आम्ही असंच करतो. दसर्‍याच्या शुभमुहूर्तावर आम्ही घरातील सारी शस्त्रं, विद्येचं साहित्य देवासमोर ठेवून त्याची यथासांग पूजाअर्चा करतो. देव आपलं भलं करो. आपलं संरक्षण करो, ही आमच्या भोळ्याभाबड्या कोकणी माणसाची भावना. तेव्हा आम्ही आमच्या बैलगाड्या सजवतो. सायकल, मोटारसायकल धुऊन, स्वच्छ करून त्याचीही पूजा करतो. नवं काय घ्यायचं असेल तर दसर्‍यासारखा शुभमुहूर्त शोधून सापडणार नाही. त्यामुळेच आपल्या सरकारनं दसर्‍याच्या मुहूर्तावर राफेल विमान घेतलं असावं. मग त्याचं शास्त्रशुद्ध पूजनही केलं. त्याच्यावर कुंकवाने ‘ॐ’ काढला. वर अमृताचं फळ ठेवून वाढवलं. काळा टिका लावला आणि अपघात होता नये म्हणून चाकांखाली दोन हिरव्या लिंबांचा बळी दिला. आमची भीती नाहीशी झाली. जुन्या ‘मिग 21’ च्या जागी आलेलं नवं राफेल आता एवढं सुरक्षित झालंय, की परत आपला अभिनंदन वर्धमान पाकिस्तानच्या विमानाचा पाठलाग न डगमगता ‘सेफली’ करू शकतो.

पडण्याचा, कोसळण्याचा तीळमात्रही धोका राहिलेला नाही. कारण ही विद्या खूप मोठी आहे. चमत्कारिक आहे. अगदी त्या पुष्पक विमानाच्या काळापासून चालत आलेली आहे. आपले देवही असेच करायचे. लिंबाचा बळी दिला, नारळ फोडला की अपघाताचा नो चान्स. म्हणून तर पुष्पक इतकी वर्षे चालू राहिलं. अगदी रामायणातही याचा उल्लेख आढळतो. जेव्हा राम लंकेवर स्वारी करायला गेला होता तेव्हा लंकेचा राजा नलकुबेर पुष्पक विमान उडवत होता. रावणानंही सीतेला विमानातूनच लंकेला आणलं होतं. तोच संदर्भ थेट संतकाळातही लागू होतो. आपले थोर संत तुकोबारायाही याच पुष्पक विमानानं वैकुंठाला गेले होते, असा इतिहास सांगतो. अशी या विद्येत फार मोठी जादू आहे.

- Advertisement -

या लिंबात फार मोठी अघोरी ताकद असते, याचा शोध हल्लीच काही महान संशोधकांनी लावल्याचं कानावर आलंय. खरंय, लिंबाचा सरबत एक नवा जोश देतो. लिंबाच्या दोन थेंबांनी भांड्यांवरचा चिकटपणा क्षणात नाहीसा होतो. त्याचप्रमाणे मनावरचा असा भीतीचा चिकटपणा नाहीसा करण्यासाठी लिंबाचा उपयोग हा होत असतोच. आपण घरासमोर काळं बाहुलं टांगतो. कारण ‘नजरेपासून’ संरक्षण व्हायला हवं. पण तरीही काहीवेळा नजर लागतेच. ही त्या काळ्या बाहुल्याचीच नजर नसावी ना, मला प्रश्न पडतो. पण लागलीच मी प्रश्नाची हत्या करतो. कारण माझ्या मनात ‘अंधश्रद्धा’ जन्म घेत असते. पण जेव्हा एखाद्या भागात डॉक्टर मिळत नाही, तेव्हा संकटात मदतीला धावून येतो तो भगतच असतो, हे मात्र विसरता नये. मग त्याने कापलेल्या लिंबातून रक्त आलं, की अचानक कोणत्यातरी अघटीताची चाहूल लागतेच. मग त्याने सांगितलेले उपाय करण्याशिवाय पर्यायच नसतो. कारण लिंबात ताकद असते ना…

परवाच आमच्या एका शेजार्‍याचा अपघात झाला. देवाची कृपा म्हणून थोडक्यात बचावला. पण बिचार्‍याचा एक पाय कायमचा निकामी झाला. मला आठवतंय, त्याच्या गाडीत दोनचार देवांचे फोटो वगैरे होते आणि सर्वांत महत्त्वाचं अस्त्र म्हणजे लिंबू, मिरची, कोळसा, बिब्बा असंही सारं तारेत लटकवलेलं होतं. मग अपघात झालाच कसा, मला प्रश्न पडला. देवांचा धावा केला असेलच ना त्याने तेव्हा? लिंबू असूनही दृष्ट कशी बरे लागली? की त्याने नाक्यावर चोवीस तास उभ्या असणार्‍या त्या ‘देवाचं’ ऐकलं नाही? कोण नडलं नक्की? मग तिथल्याच एका काकांनी माझी शंका दूर केली, ‘अरे लेकरा, ता लिंबू होता म्हणान पायारच निभावला, नायतर जीव जाव्क येळ लागलो नसतो.’ माझा गैरसमज दूर झाला. लिंबू नसतं तर… काय झालं असतं बिचार्‍याचं…? विचार करूनच शॉक आला. असे सगळेचजण जर लिंबं लावून गाड्या चालवू लागले, तर काय त्या खड्ड्यांची बिशाद! ‘बुरी नजरवाले तेरा मुँह काला’, ‘हॉर्न ओके प्लिज’ असं लिहून जाणारे ‘गुड्स करिअर’ अपघातापासून कोसो लांबच असतात ना! तसंही आता ‘आरे’ तूनही मेट्रो जाईल. त्यामुळे अपघात कमी होऊन जीवही कमी जातील. तसं राफेल हवेतूनच जाणारेय म्हणून तो विषयच संपला.

तसं म्हटलं तर विज्ञान प्रगत होतंय हल्ली दिवसेंदिवस. अनेक नवनवीन शोध उदयाला येताहेत. या बदलत्या युगात आपली संस्कृती आपणाला जोपासायला हवीय. आमचे सण, उत्सव आमची संस्कृती आहे. आम्ही आमची परंपरा जपतो. आम्हाला अभिमान आहे आमच्या परंपरेवर. विजयादशमी-दसर्‍याला आम्ही शस्त्रपूजन करतो. आमची कृतज्ञता व्यक्त करतो. अशी प्रत्येक गोष्टीची कृतज्ञता व्यक्त करणे, आमची परंपरा आहे. परंपरा आली की अर्थात श्रद्धाही आलीच; पण खरंच आपण श्रद्धा जोपासतोय की श्रद्धेचा बुरखा पांघरुण वावरणारी अंधश्रद्धा वाढवतोय, याचाही विचार व्हायला हवा. नाहीतर ‘श्रद्धा-अंधश्रद्धा आमचा फक्त लुबाडण्याचा धंदा’ हेच सगळीकडे दिसेल. आणि आता तर ‘ओम भग भ्रृगे भग्नी भागोदरी भस्मासे येवली ओम फट् स्वाहः’ असं म्हणत एक लिंबू जरी त्या पाकिस्तानवर भिरकावून दिला तरी अख्खा पाकिस्तान हिरोशिमा, नागासाकीसारखा बेचिराख व्हायला वेळ लागणार नाही. एवढी काळी विद्या प्रबळ होतेय. म्हणून आता ‘राफेल से डर नही लगता साब, निंबू से लगता है’ असं म्हणण्याची वेळ शत्रूवरच नाय तर मित्रावरही येऊन ठेपलीय.

– श्रेयश शिंदे

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -