घरफिचर्ससनईवादक बिस्मिल्ला खाँ

सनईवादक बिस्मिल्ला खाँ

Subscribe

सनईवादन हा त्यांच्या घराण्याचा कौटुंबिक व्यवसाय असल्यामुळे लहानपणीच त्यांना आपल्या वडिलांकडून - खाँसाहेब पैगंबरबक्ष यांच्याकडून सनईवादनाचे संस्कार लाभले. त्यांनी आपल्या मामांकडे-खाँसाहेब अलिबक्ष यांच्याकडे वयाच्या सहाव्या वर्षापासून वाराणसी येथे सनईवादनाचे पद्धतशीर शिक्षण घेण्यास सुरुवात केली.

बिस्मिल्ला खाँ यांचा आज स्मृतिदिन. बिस्मिल्ला खाँ हे अखिल भारतीय कीर्तीचे सुप्रसिद्ध सनईवादक व भारतरत्न पुरस्काराचे मानकरी. त्यांचे मूळ नाव कमरूद्दिन खाँ. बिस्मिल्ला खाँ यांचा जन्म २१ मार्च १९१६ रोजी सनईवादकांच्या कुटुंबात बिहार प्रांतातील शहाबाद जिल्ह्यातील (आता- बक्सर जिल्हा) दुमराव या गावात झाला. त्यांचे आजोबा रसूल बक्ष हे दुमरावच्या दरबारी सनईवादक म्हणून नोकरीस होते. सनईवादन हा त्यांच्या घराण्याचा कौटुंबिक व्यवसाय असल्यामुळे लहानपणीच त्यांना आपल्या वडिलांकडून – खाँसाहेब पैगंबरबक्ष यांच्याकडून सनईवादनाचे संस्कार लाभले. त्यांनी आपल्या मामांकडे-खाँसाहेब अलिबक्ष यांच्याकडे वयाच्या सहाव्या वर्षापासून वाराणसी येथे सनईवादनाचे पद्धतशीर शिक्षण घेण्यास सुरुवात केली. तसेच विलायत हुसेन आणि सादिक अली यांच्याकडेही त्यांनी संगीताचे धडे घेतले. हळूहळू आपल्या मामांबरोबर, त्यांची साथ करण्यासाठी लग्नासारख्या उत्सवप्रसंगी तसेच संगीत संमेलनांत ते जाऊ लागले. त्यांच्याबरोबर बिस्मिल्ला खाँ यांनी वयाच्या अवघ्या चौदाव्या वर्षी अलाहाबादच्या अखिल भारतीय संगीत परिषदेत पहिल्यांदा सनई वादनाचा सार्वजनिक कार्यक्रम केला (१९३०). दुसरा कार्यक्रम लखनौ येथे, प्रदर्शनानिमित्त झालेल्या संगीत संमेलनात उत्तम वादनाबद्दल सुवर्णपदक मिळवले.

सनईसारख्या वाद्यावर गायकीचे सर्व प्रकार लीलया निर्माण करणारे अत्यंत सुरेल वादक म्हणून बिस्मिल्ला खाँ ख्यातनाम आहेत. गायन-वादनाच्या शैलींचा अपूर्व समन्वय त्यांच्या ठिकाणी दिसून येत असे. मींड, गमकादींचाही त्यात अंतर्भाव होतो. ख्याल, ठुमरी वगैरे संगीतप्रकारांप्रमाणेच कजरी, चैती, पूरबी अशा लोकधुनीही ते कौशल्याने हाताळत असत. सनईच्या फुंकीवर त्यांचे विलक्षण प्रभुत्व होते, त्यामुळे त्यांचे वादन अत्यंत भावपूर्ण होत असे. बिस्मिल्ला खाँ यांच्या असामान्य कलागुणांमुळे १९५५ मध्ये त्यांना ‘नॅशनल कल्चरल ऑर्गनायझेशन’ या राष्ट्रीय सांस्कृतिक संघटनेकडून ‘अखिल भारतीय शहनाई चक्रवर्ती’ हा किताब मिळाला. १९५६ मध्ये संगीत नाटक अकादमीतर्फे सन्मान लाभला आणि १९६१ मध्ये भारत सरकारकडून ‘पद्मश्री’ व १९६८ मध्ये ‘पद्मभूषण’ आणि १९८० मध्ये ‘पद्मविभूषण’ ह्या पुरस्कारांनी त्यांना गौरविण्यात आले. मध्य प्रदेश शासनाकडून तानसेन पुरस्काराने त्यांचा सन्मान करण्यात आला. ‘रॉयल नेपाळ आर्ट अकॅडमी’ तर्फेही त्यांना सर्वोच्च मान लाभला. २००१ मध्ये भारत सरकारने सनई वादनातील त्यांच्या अद्वितीय कामगिरीकरिता ‘भारतरत्न’ या सर्वोच्च पुरस्काराने त्यांना गौरविले.

- Advertisement -

भारताच्या पहिल्या स्वातंत्र्यदिनी सनईवादनाकरिता बिस्मिल्ला खाँ यांना पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी लाल किल्ल्यावर आमंत्रित केले होते. बिस्मिल्ला खाँ यांनी देश विदेशात अनेक ठिकाणी सनईवादनाचे कार्यक्रम केले. त्यांच्या सनईवादनाच्या ध्वनिमुद्रिका भारतात व परदेशांतही अत्यंत लोकप्रिय आहेत.गूंज उठी शहनाईया हिंदी चित्रपटातील त्यांचे सनईवादनही फार लोकप्रिय ठरले (१९५९). स्वदेस(२००४) या हिंदी चित्रपटासाठी देखील त्यांनी सनईवादन केलेले आहे. त्यांचे ज्येष्ठ चिरंजीव सनईवादनात व कनिष्ठ चिरंजीव नाझिम तबला व सनईवादनात निपुण आहेत. बिस्मिल्लाखाँ यांचा वाराणसी येथे २१ ऑगस्ट २००६ रोजी हृदयविकाराने मृत्यू झाला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -