दृष्टी आड सृष्टी!

बहुतेक लोक त्यांच्या दृष्टीची जी मर्यादा असते तीच जगाचीही मर्यादा असते असे मानतात, पण काही जण तसे मानत नाहीत आणि असेच लोक स्वतःची एक महान प्रतिभा साकार करतात. आपल्या दृष्टीची मर्यादा व्यापक बनवा आणि मग सहज सोप्या होणार्‍या बदलांना सामोरे जा. आता या क्षणी तुम्हाला जसे आयुष्य दिसत आहे तेच तुमचे भविष्यकालीन चित्र आहे असे समजू नका. कारण कदाचित तुम्ही काही गोष्टी तुमच्या भीतीतून, तुमच्या मर्यादेतून आणि तुमच्या खोट्या समजुतीतून बघितल्या असतील.

एका दवाखान्यात दोन रुग्णांना भरती केलेले होते. ते दोघेही एकाच खोलीत असल्याने साहजिकच एकाचा पलंग खिडकीजवळ होता आणि दुसर्‍याचा पलंग दाराजवळ होता. खिडकीजवळच्या पलंगावरचा रुग्ण थोडाफार उठू शकत होता. तेही मोठ्या कष्टाने! दाराजवळच्या रुग्णाला तेही शक्य नव्हते. कुणी उठून बसवले तरच तो उठू शकत होता. तेही उश्यांचा आधार घेऊनच त्याला बसणे-उठणे शक्य होत होते. काही दिवस गेले. दोघांची एकमेकांशी ओळख झाली. काही संवाद होऊ लागले. वेळ कसा घालवायचा हा जीवघेणा प्रश्न दोघांसमोर होताच. यावर खिडकीजवळच्या रुग्णाने एक उपाय शोधून काढला. तो प्रयत्नपूर्वक उठून बसे. खिडकीतून बाहेरचे जे दिसे त्याचे वर्णन करू लागे. त्याचे सांगणे एवढे छान होते की दाराजवळच्या रुग्णाला न बघताही सारे बघत आहोत असा अनुभव येई.

दोघांचाही चांगला वेळ जायचा, पण एके दिवशी खिडकीजवळच्या रुग्णाने प्राण सोडला. त्या दुसर्‍या रुग्णालाही एक उत्तम सोबती गमावल्याचे वाईट वाटत होते. तिथले सारे निरव निरव झाल्यावर तिथल्या सेवकांना दाराजवळचा रुग्ण म्हणाला की, मला खिडकीजवळ असलेला पलंग मिळेल का? अडचण काहीच नव्हती. रुग्णाला हलवण्यात आले. नर्स आल्यावर तो रुग्ण म्हणाला की, सिस्टर मला उठवून बसवाल का? नर्सने रुग्णाला जागेवर उठवून बसवले. त्याने खिडकीतून बाहेर पाहिले आणि त्याला धक्काच बसला. तिथून काहीच दिसत नव्हते. दिसत होती ती फक्त बाहेरची एक भिंत. नर्सला त्याने सारे सांगितले तेव्हा ती म्हणाली, कसे शक्य आहे? इथून ही भिंतच दिसते आणि इथल्या आधीच्या रुग्णाला तीही दिसणे शक्य नव्हते कारण ते तर आंधळे होते.

तो रुग्ण आंधळा होता, पण तरीही त्याने त्याच्या दृष्टीआडच्या असलेल्या काल्पनिक व मनोहारी सृष्टीचे वर्णन करून त्या दुसर्‍या रुग्णाला सुखावले. जेणेकरून त्याला जगण्यासाठी व्यापक दृष्टी मिळेल. अशाच प्रकारे आपल्या दृष्टीआड आपली कल्पनेची, विचारांची सुंदर सृष्टी असते, परंतु आपल्याला ती पाहता यायला हवी. आंधळा असूनसुद्धा त्याची दृष्टी एवढी स्वच्छंद होती, मग आपल्याला तर देवाने सर्व काही देऊन परिपूर्ण पाठवलं आहे. मग तरीही अनेकदा आपल्याकडे काय नाही याकडे आपले एवढे बारीक लक्ष असते की समोरच्या याचकाकडे लक्षही जात नाही. आपण सायकलवरून जात असू तर पायी चालणार्‍याकडे पाहावे व समाधान मानावे की आपल्याकडे सायकल तरी आहे. जर आपण मोटरसायकलवरून जात असू तर सायकल व पादचार्‍याकडे पाहावे व समाधान मानावे की आपल्याकडे श्रम कमी करणारी मोटरसायकल तरी आहे, पण वास्तवात याच्या विरुद्ध वागलं जातं आणि मग असमाधानी, वैफल्यग्रस्त जीवन पदरात पडतं.

बहुतेक लोक त्यांच्या दृष्टीची जी मर्यादा असते तीच जगाचीही मर्यादा असते असे मानतात, पण काही जण तसे मानत नाहीत आणि असेच लोक स्वतःची एक महान प्रतिभा साकार करतात. आपल्या दृष्टीची मर्यादा व्यापक बनवा आणि मग सहज सोप्या होणार्‍या बदलांना सामोरे जा. आता या क्षणी तुम्हाला जसे आयुष्य दिसत आहे तेच तुमचे भविष्यकालीन चित्र आहे असे समजू नका. कारण कदाचित तुम्ही काही गोष्टी तुमच्या भीतीतून, तुमच्या मर्यादेतून आणि तुमच्या खोट्या समजुतीतून बघितल्या असतील, पण एकदा का तुम्ही तुमच्या चष्म्याच्या काचा स्वच्छ केल्या की मग तुम्हाला सगळे काही स्वच्छ दिसायला लागेल. मग अनेक नवनव्या शक्यता तुम्हाला दिसायला लागतील. लक्षात घ्या आपण जगाकडे ते जसे आहे तसे पाहण्यापेक्षा आपल्याला जसे वाटते तसे पाहायला हवे. एकदा की अंत:प्रेरणेने स्वत:बद्दल विश्वास वाटायला लागला की अशक्यप्राय गोष्टीदेखील सहज सोप्या होऊन जातात. प्रत्यक्षात तुमच्या जीवनाच्या शर्यतीत तुम्ही चार मिनिटांत एक मैल पार करू शकता? तुम्ही तुमच्या आयुष्यात अशक्यप्राय अशा गोष्टी करून विक्रम प्रस्थापित करू शकता. तुम्ही अमुक तमुक करू शकणार नाही ही खोटी समजूत मनातून काढून टाका आणि आपलाच पूर्वीचा विक्रम मोडा.

तुमचे विचार हे तुमचे वास्तव घडवत असतात. अखेरीस तुमचा विश्वासच तुम्हाला साफल्यमयता मिळवून देतो. मग आपल्या भविष्याचे भाकीतही तुम्ही सहज करू शकाल. कारण तुमचा विश्वास हा तुमच्याकडून कृती करून घेतो, पण तुम्ही जर कृतीच केली नाही तर ती तुमच्या विचारांबरोबर होणारच नाही. मग तुमच्या कृतीला काहीच अर्थ उरणार नाही आणि आवश्यक असणारे ध्येय प्रत्यक्ष कृतीत येणार नाही. तुमची अशक्यप्राय विचारधारा सगळे काही करून जाते. खरंतर आपली संकुचित विचारसरणी ही आपल्याला महानतेपासून वंचित ठेवते. खरे तर तुम्ही त्यापेक्षा कितीतरी चांगले आणि उत्तम कार्य करण्यासाठी जन्मले आहात.

अशी कुठलीही गोष्ट नाही की सर्वसाधारण माणूस करू शकणार नाही. तुमच्याकडे जर सर्वसाधारण बुद्धिमत्ता असेल तर तुम्ही नक्कीच सरस ठराल. खूप काही करू शकाल. तुमच्यातले जे उत्तमातले उत्तम आहे त्यासाठी उभे राहा. सर्वोत्कृष्टतेची बांधिलकी स्वीकारा. खर्‍या प्रयोगशील वृत्तीने नाविन्याचा शोध घ्या. प्रारंभी काही लोक तुमची गणना वेड्यात करतील. करू द्या, पण तुम्ही आपल्या मार्गावर दृढ राहा. फक्त एक लक्षात ठेवा. प्रत्येक महान लीडर निंदकाच्या चेष्टेचा प्रारंभी विषय होत असतोच. ते त्याच्याकडे बघून हसत असतात, पण अखेरीस तेच लोक त्या महान नेत्याच्या कर्तुत्वापुढे, व्यक्तिमत्वापुढे नतमस्तक होतात.

नेतृत्व श्रेष्ठ असलं की कर्तृत्व आपोआप सिद्ध होऊन जात असतं. कारण प्रत्येक लीडर हा निडरच तर असतो. नकारात्मक दृष्टीच्या लोकांसोबत गप्पा मारण्यापेक्षा प्रेम करण्याची तसेच गुणवान व्यक्तींना प्रोत्साहित करण्याची आणि मोठ्या स्वप्नवत गोष्टींच्या अधिकाधिक जवळ जाण्याची संधी आपण जोपासायला हवी आहे.

लोकांना ध्येयाप्रत जाण्यासाठी मदत करा. मग तेही तुम्हाला आनंदाने सहाय्यभूत ठरतील. खरे तर हे एक सामाजिक मूल्य आहे. समोरच्यातले उत्तमच पाहा आणि अतिशय करुणापूर्वक वर्तन करा. अर्थात उदार असणे म्हणजे कमकुवत असणे नव्हे. एक चांगली व्यक्ती बनणे म्हणजे अवतीभवतीच्या परिस्थितीनुसार धैर्यवान आणि बलशाली बनू नये असे नाही. असामान्य लीडरशिप म्हणजे करुणा आणि कठोरता यांतला एक समतोल होय.

आहात त्या ठिकाणावरून त्या दृश्याची रमणीयता टिपा, पण आपण कुठवर आलो आहोत याचेही भान ठेवा. सर्वात महत्त्वाचे म्हणजे आतापर्यंत जो प्रवास झाला त्याबद्दल कृतज्ञ असा. वर्तमान क्षणात जगा, पण हेही लक्षात असू द्या की तुमच्यात जी गुणवत्ता लपली आहे ती तुमच्यावर काही जबाबदारी टाकत असते. याचे भान असू द्यावे. मोठे लोक ही स्वतःच्या जखमांचे सुज्ञपणात, शहाणपणात रूपांतर करतात. जखमांना प्रतिष्ठा मिळवून देण्यापेक्षा वेदनांचा वेद बनवायला हवं असतं, परंतु हेच न जमल्याने अनेकदा आपण मागे राहतो.

यशाकडे जाण्यासाठी या सर्व मूल्यांची एक शिडी करा. एकूणच काय तर एखाद्या समस्येकडे समस्या म्हणून न पाहता त्यातून उभ्या राहू पाहणार्‍या इतर अनेक शक्यता वा पर्याय पाहा. याच गोष्टी तुमच्या जीवनाला अर्थ मिळवून देतील व महानतेकडे घेऊन जातील. लोक थोर बनतात ते त्यांच्यातील याच गुणांमुळे. कुठलीही चूक दोनदा झाली की ती चूकच ठरते. अंधारावर जेव्हा प्रकाश पडतो तेव्हा काळोख नाहीसा होतो. मग तुम्ही अधिकाधिक बलवान व्हाल आणि सशक्तही. खरे तर त्यासाठीच तुम्ही आहात. तुम्ही जर अवतीभवतीच्या जगाकडे, लोकांकडे एका वेगळ्या नजरेने पाहिले, तर खरोखरंच तुम्हाला तुमच्या दृष्टीच्या आड असलेली प्रतिभावान व सुज्ञ अशी सृष्टी नक्कीच पाहायला मिळेल.

–निकिता गांगुर्डे