घरफिचर्ससारांशकुस्तीचे धडे

कुस्तीचे धडे

Subscribe

कुस्तीची लोकप्रियता देशभर असली, तरी या खेळाची माहिती देणारी पुस्तके कमी आहेत आणि खेळाडू व स्पर्धांची माहिती असलेली पुस्तके तर दुर्मिळच म्हणावी लागतील. आता कुस्ती समालोचक म्हणूनच प्रसिद्ध असलेले शंकरराव पुजारी (कोथळकर) यांनी लिहिलेले ‘भारतीय कुस्ती : इतिहास आणि परंपरा’ हे पुस्तक नुकतेच टोकियो ऑलिंपिक सुरू होण्यापूर्वी प्रकाशित झाले आहे. शब्दांकन प्रकाशक रावसाहेब पुजारी यांचे आहे. पुस्तकाचे दोन भाग असून पहिल्या भागात कुस्तीची ओळख, परंपरा, प्रेरणा, पहिलवानांचा-कुस्ती खेळाडूंचा आहार-विहार ही माहिती आहे. दुसरा भाग माझी जीवनगाथा, हा असून त्यात लेखकाने आपली कुस्ती खेळाडू ते प्रख्यात समालोचक अशी वाटचाल अतिशय रंजकतेने सांगितली आहे.

खेळाडूच्या शक्तीची, बुद्धीची परीक्षा पाहणारा खेळ म्हणजे कुस्ती. दीर्घकाळ हा खेळ पुरुषांचाच समजला जात होता. मात्र गेल्या काही वर्षांत महिला कुस्ती खेळाडूही तयार होत आहेत आणि ऑलिंपिक तसेच इतर आंतरराष्ट्रीय तसेच जागतिक स्पर्धांतही आता पुरुषांप्रमाणेच महिलांचाही सहभाग असतो. खाशाबा जाधव यांनी 1952 मध्ये ऑलिंपिकमध्ये भारताचे पहिले कुस्तीमधील पदक मिळवले होते. त्यानंतर सुशील कुमारने दोन (बीजिंग 2008 रौप्य आणि लंडन 2012 ब्राँझ) आणि योगेश्वर दत्तने लंडनमध्ये ब्राँझ पदक मिळवले. गेल्या 2016 च्या ऑलिंपिकमध्ये साक्षी मलिकने महिलांमध्ये तो मान मिळवला. आता टोकियोला यामध्ये कोण भर घालणार याची उत्सुकता आहे.

फोगट भगिनींनीही आंतरराष्ट्रीय स्तरावर चांगले यश मिळवले, त्यांची लोकप्रियता पाहून मग ‘दंगल’ या चित्रपटाची निर्मितीही करण्यात आली. पाठोपाठ कुस्तीला मध्यवर्ती ठेवून काही चित्रपटही निघाले. पण कुस्तीवरील पहिला चित्रपट मराठीत भालजी पेंढारकर यांनी बनवला होता, त्याचं नाव तांबडी माती.

- Advertisement -

कुस्तीची लोकप्रियता देशभर असली, तरी या खेळाची माहिती देणारी पुस्तके कमी आहेत आणि खेळाडू व स्पर्धांची माहिती असलेली पुस्तके तर दुर्मिळच म्हणावी लागतील. आता कुस्ती समालोचक म्हणूनच प्रसिद्ध असलेले शंकरराव पुजारी (कोथळकर) यांनी लिहिलेले ‘भारतीय कुस्ती : इतिहास आणि परंपरा’ हे पुस्तक नुकतेच टोकियो ऑलिंपिक सुरू होण्यापूर्वी प्रकाशित झाले आहे. शब्दांकन प्रकाशक रावसाहेब पुजारी यांचे आहे.

पुस्तकाचे दोन भाग असून पहिल्या भागात कुस्तीची ओळख, परंपरा, प्रेरणा, पहिलवानांचा-कुस्ती खेळाडूंचा आहार-विहार ही माहिती आहे. याबरोबरच कुस्तीची प्रमुख केंद्रे, प्रमुख आयुधे-साधने पोषाख, आखाडा इ.; मातीवरील, मॅटवरील कुस्ती, प्रमुख डाव, गाजणारी मैदाने आणि कुस्त्या, हिंदकेसरी, महाराष्ट्र केसरी स्पर्धेची वाटचाल, आणि मोठ्या पहिलवानांच्या आठवणी आहेत. दुसरा भाग माझी जीवनगाथा, हा असून त्यात लेखकाने आपली कुस्ती खेळाडू ते प्रख्यात समालोचक अशी वाटचाल कोणत्या प्रकारे झाली ते अतिशय रंजकतेने सांगितले आहे. एका प्रकरणामध्ये पत्रकार दशरथ पारेकर यांनी शंकररावांचा जीवनपट थोडक्यात रेखाटला असून त्याला पुजारी यांच्या चित्रमय जीवनपटाची जोडही आहे.

- Advertisement -

पुस्तक वाचताना लेखकाची आवड प्रामुख्याने मातीवरची कुस्ती ही असल्याचे वारंवार जाणवत राहाते. मात्र आंतरराष्ट्रीय कुस्ती मॅटवरच खेळवली जाते, मात्र भारतीय कुस्ती ही प्रामुख्याने लाल मातीवरच विकसित झाली आहे असे लेखक सांगतो. मात्र आंतराष्ट्रीय ख्याती मिळवायची तर मॅटला पर्याय नाही, शिवाय आता मॅटवर चमकणार्‍या मल्लांना चांगली करियर करता येते हे राहुल आवारे, नरसिंग यादव आणि विजय चौधरी यांनी डीवायएसपी बनून दाखवून दिले आहे. अन्य राज्यांतही मल्लांना अशा संधी मिळताहेत. तेव्हा आता मॅटवरच पूर्ण लक्ष द्यायला हवे. मातीतील सराव हा फारतर सुरुवातीचे धडे गिरवण्यासाठी, सरावासाठी काही प्रमाणात उपयोगी ठरतो. पण लेखक यावर भर देत नाही.

महाराष्ट्रात अजूनही मातीवरील कुस्त्यांचे गावोगावचे फड गर्दी खेचतात. समालोचन करताना लेखकाला लोकांची आवड जाणवते, म्हणून लेखकाला मातीवरील कुस्ती ही महाराष्ट्राची शान आहे, असे वाटते. खर्‍या क्रीडाप्रेमींना मात्र यापेक्षा मॅटवर आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकलेल्या खेळाडूंचेच कौतुक आहे. मारुती माने, गणपत आंदळकर आणि हरिश्चंद्र बिराजदार असे नामांकित मल्ल आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकले, हे विसरता येणार नाही. त्यामुळे मल्लांनाही आदरणीय असलेल्या श्रीपती खंचनाळे वगैरेंची महती कमी नाही, हेही खरेच. हरिश्चंद्रने नंतर आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकलेले अनेक नामांकित शिष्य तयार केले.

लेखक समालोचक म्हणून गावोगावी ख्यातकीर्त आहे. तेथे होणारी मातीच्या आखाड्यातील कुस्ती त्याला आवडणे साहजिकच आहे. पण तरीही त्याने मॅटवरील कुस्तीकडे दुर्लक्ष न करता त्याबाबतची माहितीदेखील दिली आहे, ही बाब महत्वाची. कुस्तीच्या डावांची माहिती खेळाडूंना तसेच प्रेक्षकांसाठीही खूप उपयुक्त ठरू शकते. त्याचप्रमाणे कुस्तीचे नियम दिले असते तर पुस्तकाची उपयुक्तता वाढली असती. महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेची अधिवेशने आणि महाराष्ट्र केसरी पद मिळवणार्‍यांची जंत्री ही संदर्भासाठी खूपच मोलाची आहे. हिंदकेसरी स्पर्धेची माहिती देऊन महाराष्ट्राच्या हिंदकेसरी मिळवणार्‍या मल्लांची माहिती आणि छायाचित्रेे देण्यात आली आहेत. कोल्हापूरच्या कुस्तीची परंपरा लेखकाने अगदी शाहू महाराजांच्या काळापासून, इमाम बक्षपासून दिली आहे. मात्र आता कोल्हापूर हे राज्यातील कुस्तीचे केंद्र न राहता ते पुण्याकडे सरकले आहे, याची खंत त्याला आहे. याबरोबरच चंदगीराम, कर्तार सिंग, सतपाल, योगेश्वर आणि गुरु हनुमान यांची माहिती दिली असती तर हा खरोखर भारतीय कुस्तीचा इतिहास झाला असता.

गाजलेल्या कुस्त्या, कुस्तीगीरांची थोडक्यात माहिती, आठवणी, किस्से अशी माहिती दिल्यामुळे पुस्तक वाचकांना खिळवून ठेवणारे आहे. त्याहूनही वाचनीय लेखकाच्या जडणघडणीचा दुसरा भाग आहे. वडील कुस्तीगीर. त्यामुळे लहानपणापासूनच कुस्ती. पण कुस्तीसाठी शिक्षणात गती असूनही वडिलांनी शिक्षण थांबवून कुस्तीचेच धडे दिले. लेखकाने नावही कमावले. नंतर अनेक अडचणी आल्याने कुस्ती सोडावी लागली, तरीही लेखक कुस्तीपासून कधीच दूर गेला नाही, या ना त्या प्रकारे तो कुस्तीशी संबंधितच राहिला.

1970 च्या दशकाच्या सुरुवातीला पहिलवान, आमदार संभाजी पवार यांनी आग्रह केल्याने समालोचन केले आणि मग त्याचीच कारकीर्द कशी बनली, हे सांगितले आहे. दरम्यान अध्यात्माची ओढ लागल्याने पुजारी पोथीवाचन, भजन, कीर्तनाकडे आकर्षित झाले, पंढरीचे वारकरी बनले. कोथळीकर मंडळींच्या साथीने स्वतंत्र वारी सुरू करून तिच्या आयोजनाची जबाबदारी कशी पार पाडली, ही प्रकरणे वाचनीय आहेत. खरे तर पुजारी आता महाराष्ट्रामध्ये गावोगाव माहीत झाले आहेत. त्यामुळे त्यांच्यावर सध्याच्या काळात येत असलेल्या बायोपिक्चर प्रमाणे चित्रपट चांगल्या दिग्दर्शकाने बनवायला हवा. त्यांच्या पुस्तकातील जीवनपटाच्या रूपाने पटकथा तयारच आहे.

आर्टपेपरवरील या पुस्तकात रंगीत छायाचित्रांची लयलूट असल्याने ते वाचनीय, तसेच प्रेक्षणीयही झाले आहे.

-भारतीय कुस्ती : इतिहास आणि परंपरा
-लेखक : शंकरराव पुजारी (कोथळीकर)
-शब्दांकन : रावसाहेब पुजारी
-प्रकाशक : तेजस प्रकाशन, कोल्हापूर
-पाने : 204; किंमत : 300रु.
-आ. श्री. केतकर

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -