घरफिचर्ससारांशधर्मांतरणाचे भीषण रूप

धर्मांतरणाचे भीषण रूप

Subscribe

‘द केरला स्टोरी’ हा सिनेमा वादग्रस्त ठरला, मात्र एकदाचा तो चित्रपटगृहांत प्रदर्शित झाला आहे. आपण वस्तुस्थिती मांडल्याचा दावा निर्माते, दिग्दर्शक काही उदाहरणांसह करीत आहेत. याबाबतचा खरे-खोटेपणा बाजूला ठेवला तर सादरीकरण, कथेची मांडणी, सिनेमॅटोग्राफी आणि संवाद याबाबत ही कलाकृती दिग्दर्शकाला इच्छित असलेला परिणाम प्रभावीरित्या साधते.

–आशिष निनगुरकर

इस दुनिया को सिर्फ अल्ला चलाता हैं, ओनली अल्ला…. ‘द केरला स्टेारी’ चित्रपटामध्ये असिफा नावाची व्यक्तिरेखा वरील वाक्य तिच्या सहविद्यार्थिनी शालिनी, गीतांजली आणि निमाला सांगते. शालिनी एक सामान्य घरची हिंदू मुलगी, तर गीतांजलीचे वडील कम्युनिस्ट विचारसरणीचे. ती देवधर्म वगैरे काहीही मानत नसते, मात्र जन्माने हिंदूच आहे, तर निमा ही धार्मिक ख्रिश्चन. पुढे असिफा तिच्या हिंदू आणि ख्रिस्ती रूममेट्सना विचारते, तुमचा देव कोणता? यावर अतिशय निरागस असलेली आणि टिपिकल केरळी हिंदू पद्धतीची वेशभूषा-केशभूषा असलेली शालिनी म्हणते, आय थिंक शिवा इज बिग! यावर त्या असिफाचे उत्तर- कौनसे गॉड को मानते हो, वो गॉड जो अपने वाईफ के मरने पर कॉमन मॅन की तरह रोता हो, वो गॉड कैसे हो सकता हैं? पुढे असिफाच्या या विधानावर शालिनी गप्प होते.

- Advertisement -

तिच्याकडे तर या प्रश्नाचे उत्तरच नसते. कारण तिला यासंदर्भातल्या धार्मिक संकल्पना आणि घटना याबद्दल काहीएक माहिती नसते. शेवटी चर्चा सुरू राहते की, हिंदू देवीदेवता कशा शक्तिहीन आहेत. हे म्हणणे शब्दांतून सिद्ध करण्यात असिफा यशस्वी होते. चित्रपटातले हे दृश्य पाहताना शालिनीसारख्या कितीतरी निरागस किशोरवयीन मुली आठवल्या, ज्या खोट्या प्रेमाच्या जाळ्यात अडकल्या आणि आयुष्य नरकवासात घालवून बसल्या. यांच्या आयुष्यातही असिफा नावाची कुणी ना कुणी व्यक्ती कधी ना कधी अस्तित्वात होतीच.

कधी मित्र, कधी मैत्रीण, कधी वरिष्ठ, तर कधी शेजार्‍याच्या रूपात, तर ‘द केरला स्टेारी’ चित्रपटातील असिफा ही खोटी वाटत नाही, ती तितकीच खरी वाटते जितकी ‘द काश्मीर फाईल्स’मधली ‘सरकार उनकी हैं, मगर प्रशासन अपना हैं’ म्हणणारी दहशतवादी समर्थक प्राध्यापक खरी वाटते. ही असिफा गैरमुस्लीम मुलींना फसवून त्यांना सीरियामध्ये ‘इसिस’च्या दहशतवादी कृत्यांत भरती करण्यासाठी पाठवण्याचे काम करताना दिसते. शालिनी, गीतांजली आणि निमा या तिन्ही मुलींचे धर्मपरिवर्तन करून त्यांना सीरियाला पाठवण्यासाठी असिफा काही मुस्लीम पुरुषांची मदत घेते. त्यांना आदेश देणारे काही धर्मांध लोकही आहेत.

- Advertisement -

हा धर्मांध म्हणतो, तुमच्याकडून त्या मुली कशा फसवल्या जात नाहीत? उन्हे करिब लाओ, खानदान से जुदा करावो, जिस्मानी रिश्ते बनाओ. जरूरत पडे तो उन्हे प्रेग्नंट करो! इतकेच काय तर दहशतवादी संघटनांकडून सूचित केल्याप्रमाणे अमली पदार्थांचा वापर करण्याचाही आग्रह करतो. हे सगळे पाहताना दुर्दैवी श्रद्धा वालकर आठवली. वसईच्या मराठमोळ्या श्रद्धाला म्हणे अमली पदार्थांचे व्यसन होते. आईबाबांना न जुमानता ती त्या आफताबबरोबर दिल्लीला ‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये राहायला गेली होती. अशाच संबंधातून मुलींना ‘ब्लॅकमेक’ करण्याच्याही घटना सर्रास घडल्या आहेत.

केरळमधील तीन युवतींच्या भोवती हे कथानक फिरतं. चित्रपटाच्या सुरुवातीलाच शालिनी उन्नीकृष्णन उर्फ फातिमा (अदा शर्मा) हिला अफगाणिस्तान सीमेवरील सुरक्षा प्रशासन ताब्यात घेतं. तिथं तिची चौकशी सुरू होते. तिथून कथा उलगडत जाते. शालिनी, गीतांजली (सिद्धी इदनानी), निमा (योगिता बिहानी) या तिघी आपापल्या शहरांतून केरळमधीलच कासरगोडच्या एका नर्सिंग स्कूलमध्ये प्रशिक्षणासाठी येतात. होस्टेलमध्ये त्यांच्याबरोबर आसिफा (सोनिया बलानी) असते. एकाच रूममध्ये राहणार्‍या या चौघींची घट्ट मैत्री होते, मात्र आसिफाच्या कटापासून या तिघी अनभिज्ञ असतात. आसिफा हळूहळू या तिघींना त्यांच्या मूळ धर्मापासून दूर नेते.

त्यांचं मतपरिवर्तन करून त्यांना एका विशिष्ट धर्माकडे आकर्षित करण्याचा तिचा गुप्त उद्देश आहे. यासाठी ती आपल्या बनावट भावांचा आधार घेते. सगळं काही नियोजित असतं. शालिनी आणि गीतांजली त्या बनावट भावांच्या प्रेमात पडतात. नंतर त्या तिघींचं पद्धतशीर ‘ब्रेन वॉश’ केलं जातं, त्यांना विशिष्ट धर्माकडे वळवलं जातं. निमा या भानगडीत पडत नाही. शालिनी आणि गीतांजली मात्र या जाळ्यात फसतात. नंतर असं काही घडतं की शालिनी आपली संस्कृती, सर्व काही सोडून ‘आयएसआयएस’मध्ये सामील होते आणि सीरियात जायला तयार होते. गीतांजलीला वास्तव कळतं आणि ती विरोध करते, तेव्हा तिला आत्महत्येस प्रवृत्त केलं जातं, तर निमावर सातत्यानं बलात्कार होतो.

अदाचा अभिनय वाखाणण्याजोगा आहे. त्याला कित्येक पैलू आहेत. केरळमध्ये आपल्या गावी तिरुवनंतपुरममध्ये असलेली खेळकर, निरागस, हुशार शालिनी ते इस्लामिक देशात फसलेली भयभीत, हतबल, अत्याचारपीडित फातिमा तिनं उत्कृष्टरित्या साकारली आहे. सिद्धी, योगिता, सोनिया यांनीही त्यांच्या भूमिकांना चांगला न्याय दिलाय. इतर कलावंतांनीही त्यांची कामं चोख केली आहेत. प्रशांतनु मोहापात्रानं केरळचं सौंदर्य आणि इस्लामिक देश, तेथील अत्याचार, हिंसाचार या परस्परभिन्न बाबी लीलया कॅमेराबद्ध केल्या आहेत. चित्रपट ‘डार्क’ झालाय.

हिंसात्मक आणि बलात्काराची दृश्ये विचलित करू शकतात, मात्र वास्तव पटवून देण्यास ती साह्यभूत ठरतात. चित्रपटाचं संकलन आणखी थोडं ‘टाईट’ असतं तर बरं झालं असतं, पण असो, विशिष्ट विचारधारा मानली नाही तर आपण ‘दोजख’ अर्थात नरकात जातो, असं आसिफा आपल्या तीन रूममेट्सना सतत पटवून देण्याचा प्रयत्न करीत असते, मात्र शालिनी, गीतांजली आणि निमाला जिवंतपणीच ‘दोजख’चं दर्शन होतं. इस्लामिक देशांतून औषधाच्या रूपात सर्रास येणारे अमली पदार्थ कसे तरुणांच्या गळी उतरविले जातात अन् त्यामुळे मानसिकता कशी हिंसात्मक होत जाते हेही वास्तव यात आहे.

आपली चूक कळल्यानंतर गीतांजली घरी परतते. कम्युनिस्ट विचार जपणार्‍या आपल्या वडिलांच्या मांडीवर डोकं ठेवून म्हणते, ‘पापा, आप ने विदेश के आदर्श बताने के बजाय हमारी संस्कृती, परंपरा के बारे में मुझे बताया होता तो अच्छा होता,’ हे दृश्य आणि त्याचा आशय भूसभुशीत असला तरी कथानकाच्या संदर्भात आणि त्यातून तयार झालेल्या मानसिकतेला प्रभावी ठरतो हे चित्रपटाचे यश आहे.

पॅरामेडिकल कॉलेजात शिकण्यासाठी होस्टेलच्या एका खोलीत असलेल्या इतर तीन तरुणींसोबत राहायला आलेली शालिनी उन्नीकृष्णन ही चित्रपटाचे मुख्य पात्र आहे. केरळी हिंदू कुटुंबात वाढलेली निरागस शालिनी इसिस दहशतवादाच्या सापळ्यात सापडते आणि मग तिच्या आयुष्याची कशी फरपट होते ही या चित्रपटाची कथा आहे. चित्रपट भारतातील आणि भारताबाहेरील दहशतवादाचे वास्तव बटबटीत स्वरूपात प्रेक्षकांपुढे ठेवतो. चित्रपटाचे चित्रीकरण अप्रतिम आहे.

सुरुवातीचा केरळातील सुंदर हिरवा निसर्ग आणि नंतरच्या अफगाणिस्तानातील रखरखीत करड्या पर्वतरांगा शालिनीच्या जीवन प्रवासाचा मार्ग दाखवतात. अदा शर्मा (शालिनी) आणि सोनिया बालानी (आसिफा बा) यांचा आणि इतर कलाकारांचा अभिनय उत्कृष्ट आहे. दोन काळातले फ्लॅशबॅक वापरून कथा सादर करण्याचे तंत्र चांगले जमून आले आहे. वेगवान कथानक प्रेक्षकाला खिळवून ठेवते. एक तरुणी आणि तिचा नवरा यांना त्या तरुणीने लिपस्टिक लावले या कारणामुळे क्रूर शिक्षा देण्यात येते. असे प्रसंग बीभत्स वाटले तरी परिणामकारक आहेत.

धर्मांतरणाचे भीषण रूप आणि त्याचे त्याहूनही भीषण परिणाम सादर करण्याचा सुदिप्तो सेनचा (दिग्दर्शक) प्रयत्न चांगला आहे, पण काही ठिकाणी ते प्रयत्न कमी पडतात. शालिनीला चित्रपटात दहशतवादी सिद्ध करण्यात येते. प्रत्यक्षात ती केवळ दहशतवाद्यांसोबत (स्वतःच्या इच्छेविरुद्ध) राहत असते. ती स्वतः कोणत्याही गुन्ह्यात सामील होत नाही. हा विरोधाभास जाणवण्यासारखा आहे. बलात्काराचे स्पष्ट आणि दीर्घ चित्रीकरण दाखविण्याची गरज नव्हती. काही ठिकाणचे पार्श्वसंगीतही टाळता आले असते.

वास्तविक हा सिनेमा किशोरवयीन मुलींनी आणि त्यांच्या पालकांनी आवर्जून पाहण्यासारखा आहे, मात्र या चित्रपटाला सेन्सॉर बोर्डाने प्रौढांसाठीचे सर्टिफिकेट दिले आहे. या परिक्षेपात ‘लव्ह जिहाद’विरोधात प्रखर सत्य मांडणार्‍या या सिनेमावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही मत व्यक्त केले आहे. ते म्हणतात की, ‘द केरला स्टोरी’ म्हणजे केवळ एका राज्यातील दहशतवादाचा दस्तावेज आहे. काही वर्षांपासून दहशतवादाचे एक आणखी स्वरूप निर्माण झाले आहे. बॉम्ब आणि बंदुकीचा आवाज तर येतो, पण समाजाला खिळखिळे करणार्‍या या दहशतवादाला आवाज नाही. ‘द केरला स्टोरी’ पाहणार्‍या प्रत्येक प्रेक्षकाला हेच वाटेल हे मात्र नक्की.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -