बुली बाई अ‍ॅपचे कुभांड

बुली बाईच्या घटनेनिमित्त महिलांच्या वर्तुळात मात्र अजून एक विषयदेखील समोर आला आहे. तो आहे सोशल मीडियावर महिलांनी फोटो पोस्ट करावेत की करु नयेत. कारण बुली बाई अ‍ॅपमध्ये वापरण्यात आलेले महिलांचे फोटो हे त्यांच्या खासगी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरचे आहेत. आरोपींनी कोणाच्या फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्रामवरचे फोटो बुली बाई अ‍ॅप, आणि सुल्ली डिल्ससाठी वापरले आहेत. यामुळे महिलांनी आपले फोटो सोशल मीडियावर टाकताना सतर्क राहायला हवे. कारण सोशल मीडियावर पोस्ट केलेल फोटो हे नंतर तुमचे राहत नाहीत. ते सार्वजनिक होतात.

सध्या देशभरात बुली बाई अ‍ॅपची जोरदार चर्चा आहे. या अ‍ॅपद्वारे मु्स्लीम महिलांचे फोटो सोशल मीडियावर प्रसिद्ध करून त्यांचा लिलाव करण्याचा प्रयत्न करण्यात आला. याप्रकरणी तीन जणांना अटक करण्यात आली असून पोलीस अधिक तपास करत आहेत. याचदरम्यान टेलीग्राम चॅनेलवरही हिंदू महिलांचे अश्लील फोटो शेअर केले जात असल्याचे समोर आले. त्यानंतर इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने हे चॅनेलच ब्लॉक केले आहे.

मागील वर्षी 31 डिसेंबरला दिल्लीतील एका मुस्लीम महिला पत्रकाराला बुली बाई अ‍ॅपवर तिचा फोटो प्रसिद्ध झाल्याचे कळले. त्यानंतर या महिलेने याप्रकरणी सायबर पोलिसात धाव घेतली. नंतर हे प्रकरण उजेडात आले. या अ‍ॅपवर मुंबईपासून दिल्ली ते बंगळुरू अशा देशातील विविध शहरातील मुस्लीम महिलांचे फोटो अपलोड करण्यात आले होते. यात ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी यांचाही फोटो प्रसिद्ध करण्यात आला आहे. पंधरा वर्षाच्या मुलीपासून 79 वर्षांच्या महिलेचे फोटो या अ‍ॅपवर प्रसिद्ध करण्यात आले आहेत. त्यांच्यावर अश्लील टिप्पणी करण्यात आली आहे.

या प्रकरणात अद्यापपर्यंत अटक करण्यात आलेले तिघेजण 18 ते 21 वयोगटातील तरुण आहेत. यात एका तरुणीचाही समावेश आहे. हे सर्व आरोपी हिंदू असल्याने याला काही दिवसात राजकीय वळण लागेल यात शंका नाही. दरम्यान, ज्या तिघा उच्चशिक्षित तरुणांनी हे कृत्य केले या कृत्यामागे त्यांचा काय उद्देश्य होता हे तपासातून समोर येईलच. पण याप्रकारामुळे सोशल मीडियाचा वापर करुन एखाद्याला आयुष्यातून उठवणे. समाजात तेढ निर्माण करणे किती सोपे आहे हे पुन्हा एकदा अधोरेखीत झाले आहे. सध्या हे प्रकरण पोलिसात असले तरी ज्या हिंदू-मुस्लीम महिलांचे फोटो बुली बाई आणि टेलीग्रामवर प्रसिद्ध करण्यात आले त्यांना किती त्रासाला सामोरे जावे लागले असेल याची कल्पनाच न केलेली बरी.

पण महिलांवर अशा प्रकारे ऑनलाईन हल्ला किंवा त्यांना बदनाम करण्याचे प्रकार याआधीही घडले असून ते आजतागायतही सुरुच आहेत. याआधी 4 जुलै 2020 रोजीही सुल्ली डिल्स अ‍ॅपवर अशाच प्रकारे मुस्लीम महिलांचे फोटो त्यांच्या परवानगीशिवाय अपलोड करण्यात आले होते. त्यांच्या फोटोशेजारी सुल्ली डिल्स असे लिहिण्यात आले होते तेव्हाही अशीच खळबळ उडाली होती. राष्ट्रीय महिला आयोगानेही याची दखल घेतली होती. त्यानंतर आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल यांनी दिल्ली पोलिसात तक्रार केली. त्यानंतर गिटहबने ते आक्षेपार्ह पोस्ट टाकणारे अकाउंट सस्पेंड केले.

जेव्हा जेव्हा अशा घटना घडतात तेव्हा त्या काही कालावधीपुरता ब्रेकींग न्यूजचा विषय ठरतो. मग तो विषय स्थानिक न राहता देशपातळीवर चर्चिला जातो. संबंधितांवर कारवाई करण्याच्या हालचाली सुरू होतात. चौकशी सुरू होते. तपासासाठी समित्या स्थापन केल्या जातात. पण या सर्व प्रक्रिया वेळ काढू असल्याने नंतर त्यांचा पाठपुरावा होतोच असे नाही. प्रकरण कोर्टात गेलं की ते न्यायप्रविष्ट होतं. न्यायप्रविष्ट प्रकरणांचा नंतर सामान्यांना विसरं पडतो. मग पुन्हा सहा महिन्यानंतर एखादी बुली बाई अ‍ॅपसारखी घटना समोर येते आणि पुन्हा तेच ते चौकशीचे, ब्रेकींगचे, राजकारणाचे गुर्‍हाळ सुरू होते. पण संबंधित आरोपींवर ठोस कारवाई केल्याचं कानावर पडत नाही. यामुळे महिलांवर अत्याचार करणार्‍यांचे आयतेच फावते. आपले कोणीच काही वाकडे करु शकत नाहीत या थाटात ही मंडळी समाजात पुन्हा बुली बाई अ‍ॅप आणि सुली डिल्ससारखे कारनामे करण्यास सज्ज होतात.

पण जर त्यांना वेळीच पायबंद घातला तर अशा प्रकारे महिलांच्या बदनामीच्या माध्यमातून दोन समाजात दुफळी निर्माण करण्याचा प्रयत्न करणार्‍यांना जन्माची अद्दल घडू शकेल. महिलांची कुचंबणा थांबेल. कारण प्रामुख्याने ज्या समाजाच्या महिलांना सध्या लक्ष्य केलं जात आहे, त्या समाजाच्या स्वत:च्या काही रुढी परंपरा आहेत. स्त्रियांप्रती त्यांचे वेगळे विचार आहेत. असे असतानाही आज संबंधित समाजातील महिला उच्च शिक्षण घेऊन स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करत आहेत. यामुळे समाजात स्वत:ची ओळख निर्माण करणार्‍या, सोशल मीडियावर स्वत:ची मत मांडणार्‍या महिलांनाच बुली बाई अ‍ॅपवर लक्ष्य केल करण्यात आलं आहे. यामुळे समाजातील या महिला पेटून उठल्या आहेत. आम्ही घरातल्यांच्या विरोधात, जाऊन समाजाच्या विरोधात जाऊन स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. यामुळे आमच्याबरोबर जेव्हा अशा घटना घडतात तेव्हा साहजिकच काळजीपोटी कुटुंबाकडून आमच्यावर पुन्हा बंधन लादली जातात. निकाह लावले जातात. आमचे शिक्षणही थांबवले जाते. अशा प्रतिक्रिया या समाजातील महिला व्यक्त करत आहेत.

तर ज्या टेलिग्रामवर हिंदू महिलांचे फोटो आणि अश्लील टिप्पणी करण्यात आल्या हे अ‍ॅप ब्लॉक करण्यात आले आहे. याबाबत अजूनतरी एकही हिंदू महिला पुढे आल्याचे वाचनात नाही. फक्त सोशल मीडियावर त्याबद्दल लोकांनी भरभरुन लिहिले आहे. शेवटी समाज कुठलाही असो महिलांची अब्रू दोन्ही समाजात महत्वाची आहे. आज बुली बाई अ‍ॅप, सुल्ली डिल्स या सारख्या घटना त्या त्या संबंधित महिलांचे आयुष्य मात्र ढवळून काढतात. यामुळे असे हीन कृत्य करणार्‍यांवर कडक कारवाई करायलाच हवी. मग ती व्यक्ती कोणत्याही धर्माची असो.

बुली बाईच्या घटनेनिमित्त महिलांच्या वर्तुळात मात्र अजून एक विषयदेखील समोर आला आहे. तो आहे सोशल मीडियावर महिलांनी फोटो पोस्ट करावेत की करु नयेत. कारण बुली बाई अ‍ॅपमध्ये वापरण्यात आलेले महिलांचे फोटो हे त्यांच्या खासगी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरचे आहेत. आरोपींनी कोणाच्या फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्रामवरचे फोटो बुली बाई अ‍ॅप, आणि सुल्ली डिल्ससाठी वापरले आहेत. यामुळे महिलांनी आपले फोटो सोशल मीडियावर टाकताना सतर्क राहायला हवे. कारण सोशल मीडियावर पोस्ट केलेल फोटो हे नंतर तुमचे राहत नाहीत. ते सार्वजनिक होतात. कोणी ते कॉपी केले, स्क्रीन शॉट काढला तर आपल्याला ते कळतही नाही. तुमच्या आनंदाच्या क्षणाचे काही फोटो तुमची डोकदुखी वाढवणारे ठरण्याची शक्यता आहे. बुली बाई घटनेमुळे मुस्लीमच नाही तर सोशल मीडियावर व्यक्त होणार्‍या प्रत्येक महिलेला धक्का बसला आहे. कारण भविष्यात अशी घटना कुणाच्याही बाबतीत होऊ शकते.