घरफिचर्ससारांशभावनातरंगी थँक्यू

भावनातरंगी थँक्यू

Subscribe

आपली ‘थँक्यू’ शब्दाची देवाण-घेवाण सकाळपासून रात्रीपर्यंत किती वेळा होते ते मोजणं जरा अशक्यच. आनंद, कृतज्ञता, समाधान, शांती, कृतार्थता इ. सकारात्मक भावना समोरच्या व्यक्तीच्या अंतकरणापर्यंत पोहचवण्याचा हा अगदी छोटा ‘थँक्यू’ नावाचा जादूगार. जणू प्रत्येकाचा अगदी जवळचा सखाच जणू! या ‘थँक्यू’ शब्दाला विविध रंग आहेत. विविध भावनांचे तरंग आहेत. काही वेळा स्पर्शातूनदेखील ‘थँक्यू’च्या भावना एकमेकांच्या अंतकरणापर्यंत पोहचतात. माझ्या मैत्रिणीच्या मिस्टरांची अचानक बायपास सर्जरी करावी लागली. त्यावेळी तिला मी थोडी पैशांची मदत केली. मी तिला भेटायला गेल्यावर तिने मला घट्ट मिठी मारली आणि म्हणाली, ‘थँक्यू’! तू ऐनवेळी देवासारखी धावून आलीस. तो तिचा ‘थँक्यू’ माझ्या अंतकरणापर्यंत जाऊन पोहचला.

— सविता एरंडे

आई, संध्याकाळी चक्कर मारायला जाणार आहात का? माझी एकुलती एक सून ‘लीना’ मला विचारत होती. हो, जाईन ना! का गं? अहो, ही किराणा सामानाची यादी किराणावाल्याकडे द्यायची होती, जाताना द्याल का? हो देईन की! पण एवढंच आहे ना सामान? मी घेऊन येईन येताना.

- Advertisement -

संध्याकाळी मी सामान आणायच्या निमित्तानं बाहेर चक्कर मारायला निघाले.

दुकानदाराकडून सामान घेतलं. थोडीशी जडच झाली पिशवी म्हणून रिक्षावाल्याची वाट बघत थांबले. एका मध्यमवयीन रिक्षावाल्या दादांनी रिक्षा थांबवली व ताई, कुठं जायचंय? असं विचारलं. मी पत्ता सांगून रिक्षात बसले.

- Advertisement -

घर येताच रिक्षा थांबली व मी सामानाची जड पिशवी रिक्षातून उतरवू लागले. तेवढ्यात रिक्षावाले दादा माझ्या मदतीला धावले. त्यांनी ती सामानाची जड पिशवी माझ्या घराच्या दाराजवळ आणून ठेवली. मला फार बरे वाटले. मी खूश होऊन त्याला ठरलेल्या पैशांपेक्षा दहा रुपये जास्तच दिले व थँक्यू हं दादा! असं म्हणाले. लगेच तो म्हणाला ताई, उलट मीच तुम्हाला थँक्यू म्हणायला हवं. ताई, थँक्यू म्हणणार्‍या तुम्हीच पहिल्यांदा मला भेटलात. नाहीतर आमच्यासारख्या रिक्षावाल्यांशी काही लोक विनाकारण हुज्जत घालत बसतात. ‘थँक्यू’ तर बाजूलाच राहिलं.

ताई, खरंच आज खूप बरं वाटलं, तुम्ही थँक्यू म्हणालात हे ऐकून!

रिक्षावाले दादा एकदम खूश झाले. त्यांच्या चेहर्‍यावरचा तो आनंद पाहून मलाही खूप छान वाटले.

खरंतर ‘थँक्यू’ किती छोटा शब्द पण ‘आभारी आहे’ असं म्हणण्यापेक्षा अगदी पटकन तोंडातून निघणारा असा ‘जादूई’च शब्द जणू! हा दोन अक्षरी आशयगर्भी शब्द सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपण कळत नकळत कितीतरी वेळा उच्चारत असतो. आपल्या कानावरही पडत असतो आणि बरीचशी कामे अगदी सोपी होऊन जातात. भाजी मंडईत भाजी घेतल्यानंतर भाजीवाली दोन कोथिंबिरीच्या काड्या, कढीपत्ता पण देते, तेव्हा आपण खूश होऊन तिला ‘थँक्यू’ म्हणतो, तेव्हा तिचं मिश्कील हास्य खूप काही सांगून जातं. जणू काही ताई, परत या हं! असंच ती सांगत असते. आपणही कोथिंबीर, कढीपत्ता याचे पैसे तिनं घेतले नाही म्हणून खूश असतो. ‘थँक्यू’चा अर्थ कदाचित तिला समजला नसेल, पण ताई आपल्याला ‘छान’ म्हणाल्या हे तिच्या डोळ्यातील आनंदातून दिसते. खरंच बिचारी मोठ्या मनाची आहे, अशी आपल्या मनाची समजूत घालून आपण निघतो तेव्हा तिचं व आपलं नातं मनात घट्ट झालेलं असतं. पुन्हा आपण जेव्हा भाजी घ्यायला जाऊ तेव्हा आपले डोळे नकळत तिचा शोध घेऊ लागतात असा माझा तरी अनुभव आहे.

कालच शेजारची छोटी परी धावत धावत माझ्याकडे आली आणि आजी, थँक्यू, थँक्यू, थँक्यू, असं तीन वेळा म्हणत हातात काहीतरी गिफ्ट घेऊन घरभर धावायला लागली. परी, काय आहे बघू हातात? कसला एवढा आनंद झालाय? आजी, काल तुम्ही शिकविलेला श्लोक मी आज वर्गात मोठ्या आवाजात अगदी न घाबरता पाठ म्हणून दाखवला. आज आमच्या शाळेत कॉम्पिटिशन होती. हे बघा ना, मला किती मस्त प्राईज मिळालंय! थँक्यू, थँक्यू, थँक्यू, हं आजी! तिचा तो आनंद घरभर आनंदाचा वर्षाव करत होता. तिचा माझ्याबद्दलचा आदर दुणावला होता व ‘थँक्यू’ असं ती सारखं म्हणत होती. तिच्या त्या ‘थँक्यू’नं मी पण मनोमन सुखावले. असे हे आनंदाचे क्षण अनेक वेळा आपल्या जीवनात येतात आणि ‘थँक्यू’चे स्वर आळवून जातात.

‘आभारी आहे’ ‘धन्यवाद!’ यापेक्षा ‘थँक्यू ’ हा शब्द ‘शॉर्ट बट स्वीट’ असा आहे. मराठीत आता सध्या अनेक इंग्रजाळलेले शब्द प्रत्येकाच्या तोंडी नियमित येताना दिसतात. ‘थँक्यू’ हा शब्द अगदी लहानपणापासून कानावर पडत आहे. त्यामुळे तो जणू काही मराठीच शब्द आहे असं नव्या पिढीला वाटतंय. अगदी एक वर्षाचं बाळ अगदी हट्ट न करता दूध पितं तेव्हा आई त्याला ‘थँक्यू’ हं! किती शहाणं बाळ माझं ते, असं म्हणते. तेव्हापासून ‘थँक्यू’ हा शब्द कितीतरी वेळा त्याच्या कानावर पडत असतो आणि ते बालकदेखील त्याचा वापर करू लागते.

परवा रखमाला सुट्टी हवी होती. म्हणून ती सांगायला आली. मी तिला सुट्टी तर दिलीच, पण तिला गावाला जायचंय म्हणून दोनशे रुपये जास्तच दिले. तिला खूप आनंद झाला. तो आनंद तिच्या डोळ्यातून ओसंडून वाहत होता. ती आनंदानं मला म्हणत होती, ताई, ठांकू, ठांकू. ताई, तुम्ही लई माझा भार हलका केला, असा बगा तिचं ते ‘ठांकू, ठांकू’ ऐकताना मला पण खूप छान वाटत होतं. मी गालातल्या गालात हसत तिचे ते शब्द कानात साठवत होते. अशी ही ‘थँक्यू’ची किमया अजबच आहे. भर उन्हात पाठीवरून सिलिंडर घेऊन जिने चढत चढत येणार्‍या दादांना प्यायला पाणी दिल्यानंतर त्यांच्या तोंडातून येणारा ‘थँक्यू’ हा शब्द तर कृतज्ञतेने ओथंबलेला असाच. किती गहिरा अर्थ भरलेला असतो त्या ‘थँक्यू’ या शब्दात. पाणी देणार्‍याच्या अंतकरणात समाधानाचं चांदणं व पाणी पिणार्‍याच्या अंतकरणात शांततेची कोजागिरी!

या ‘थँक्यू’ शब्दाची देवाण-घेवाण सकाळपासून रात्रीपर्यंत किती वेळा होते ते मोजणं जरा अशक्यच. आनंद, कृतज्ञता, समाधान, शांती, कृतार्थता इ. सकारात्मक भावना समोरच्या व्यक्तीच्या अंतकरणापर्यंत पोहचवण्याचा हा अगदी छोटा ‘थँक्यू ’ नावाचा जादूगार जणू प्रत्येकाचा अगदी जवळचा सखाच जणू! या ‘थँक्यू’ शब्दाला विविध रंग आहेत. विविध भावनांचे तरंग आहेत. काही वेळा स्पर्शातूनदेखील ‘थँक्यू’च्या भावना एकमेकांच्या अंतकरणापर्यंत पोहचतात. माझ्या मैत्रिणीच्या मिस्टरांची अचानक बायपास सर्जरी करावी लागली. त्यावेळी तिला मी थोडी पैशांची मदत केली.

मी तिला भेटायला गेल्यावर तिने मला घट्ट मिठी मारली व ‘थँक्यू’! तू ऐनवेळी देवासारखी धावून आलीस, तो तिचा ‘थँक्यू’ माझ्या अंतकरणापर्यंत जाऊन पोहचला. या शब्दातून कितीतरी कृतज्ञतेचे अर्थ मला उमगले. स्पर्शाच्या अबोल भाषेतूनदेखील हा शब्द दुसर्‍या व्यक्तीच्या हृदयापर्यंत जाऊन पोहचतो. कितीतरी मनातल्या गोष्टी सांगणारा हा शब्द! कधी कधी एखादी व्यक्ती घाई गडबडीत किंवा अन्य कारणांमुळे ‘थँक्यू ’म्हणायचं विसरून जाते तेव्हा लगेचच कमाल आहे या बाईची किंवा माणसाची! साधं ‘थँक्यू’सुद्धा म्हणाला/म्हणाली नाही, असे शब्दही कानावर पडत असतात. म्हणजे या ‘थँक्यू’मुळे अपेक्षाभंगाचं शल्यही मनाला टोचायला लागतं.

आपल्याला हे सुंदर आयुष्य मिळालंय म्हणून त्या जगन्नियंत्याला ‘थँक्यू’ म्हणायलाच हवं नाही का? ‘थँक्यू’ या शब्दामुळं एखाद्या व्यक्तीला प्रेरणा पण मिळते व भविष्यातील प्रगती दुप्पट वेगाने होते. आपल्या कामाची कोणीतरी दखल घेतंय, आपल्या कामाचं कौतुक होतंय ही भावना सुखावणारी अशीच असते, नाही का? मग ‘थँक्यू’ म्हणायला कशाला विसरायचं? आपली नाती घट्ट करण्यासाठी ‘थँक्यू’ म्हणायलाच हवं ना?

अगदी छोटुकल्या ‘थँक्यू’ला नेहमीसाठी अलगदपणे हृदयाच्या कुपीत सांभाळूया.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -