घरफिचर्ससारांशधुलीचित्रातली रंगावली...

धुलीचित्रातली रंगावली…

Subscribe

सोमेश्वराने धुलीचित्र म्हणून आपल्या ग्रंथात रांगोळ्यांचा उल्लेख केला आहे. रांगोळ्यांची लोककला खान्देशात प्राचीन काळापासून चालत आली आहे. सोमेश्वराच्या लेखनाचा काळ लक्षात घेतला तरी शतकांचा इतिहास त्यांच्यामागे उभा असल्याचे लक्षात येते. भित्तीचित्रांच्या मुळातून जन्माला आलेली रांगोळी हिंदू संस्कृतीची निर्मिती आहे. रामप्रहरी सडासंमार्जन झाल्यावर खान्देशी स्रीच्या बोटातून सुटणारी शीरगोल्याची पिठाची धार सराईतासारखी जमिनीवर रांगोळ्या निर्माण करते. कोठारघरातल्या जात्यापासून तर घरासमोर काढलेल्या रांगोळ्या पहिल्या की पावित्र्याचा स्पर्श मनाला होतो. शहरी व खेड्यातील जी खान्देशी संस्कृती जिवंत आहे तिचे हे सुचिन्ह आहे.

-रणजितसिंह राजपूत

खान्देशातील अजिंठा-वेरुळच्या मनमोहक कलाविष्काराइतकेच जगाचे लक्ष वेधून घेणार्‍या खान्देशच्या संस्कृतीचे लोकदैवत आणि खान्देशी भाषा हेही अविभाज्य अंग आहेत. लोकदैवतं ही तर इथल्या समाजाची प्रतिबिंबच आहेत. त्यामुळे खान्देशच्या रांगोळी संस्कृतीच्या प्राचीन अवशेषांच्या खुणा लोकदैवतांमध्ये आढळून येतात. खान्देशच्या लोकदैवतांच्या विधी उत्सवातूनच इथल्या रांगोळीच्या विकासक्रमाचा अभ्यास करता येतो. रेषांचा वापर करून गुहेतील भिंतीवर चित्रे काढण्याची कला सर्व कलात प्राचीनतम कला मानली गेली आहे. आदिमानवाच्या मनातील पहिला उद्रेक, स्पंदन गुहाचित्रातील रेघोट्यातून व्यक्त झाला आहे.

- Advertisement -

प्राचीन खान्देशच्या भौगोलिक नकाशानुसार वेरूळ, अजिंठा पितळखोरे या ठिकाणी जी भित्तीचित्रे उपलब्ध आहेत त्यावरून आदिमानवाच्या भावनांचे स्वरूप कळू शकते. भावनांचा संघर्ष हा मानवी जीवनातील सर्वात आकर्षक केंद्रबिंदू आहे. दोन प्राण्यांची झुंज दाखवून हा संघर्ष रेषातून उतरतो, तर कुठे निर्बल प्राण्यांवर सबलाने मिळवलेल्या विजयात तो संघर्ष विजिगीषू रूप घेतो. प्राण्यांच्या अवयवांचे रेखाटन करताना दाखवलेली सूक्ष्मता ही अशा वेळी लक्षणीय असते. या रेखनातून कलात्मकता सहजता आढळत नाही, पण रेषांचा वापर ज्या दिशेने प्रारंभी झाला ती दिशा मानवी जीवनातील उत्क्रांती ज्या पद्धतीने झाली त्यावर प्रकाश टाकते.

त्याचबरोबर भित्तीचित्र काढण्याची ही कला खान्देशातील आजच्या रांगोळी संस्कृतीचे मूल रूप असल्याचेही दिसून येते. भित्तीचित्रे काढण्याची ही लोककला खान्देशात प्राचीन काळापासून चालत आली आहे. धुळ्यातील राजवाडे संशोधन केंद्रात व समर्थ वाग्देवता मंदिरातही उपलब्ध आहेत. चालुक्य वंशाचा राजा सोमेश्वर याने लिहिलेल्या ‘अभिलाषतीर्थ चिंतामणी’ ग्रंथात तर या भित्तीचित्रांचा सविस्तर विचार केलेला आढळतो. विद्धचित्र, अविद्धचित्र, रसचित्र व धुलीचित्र (रांगोळी चित्र) असे चार प्रकार त्याने सांगितले आहेत.

- Advertisement -

अशी ही भित्तीचित्रे आजही अहिराणीच्या खेड्यापाड्यातून पाहायला मिळतात. देवळाच्या गाभार्‍यात कमानींवर काढलेली धार्मिक चित्रे खान्देशातील अनेक देवळांमधून आढळून येतात. देव ज्या कोनाड्यात ठेवले असतील तो कोनाडा गेरूच्या लाल रंगाने, चुन्याच्या पांढर्‍या रेषांनी चित्रित झालेला दिसेल. या रेषांनी कधी तुळशीची पाने तर कधी मंजिर्‍या दाखवलेल्या असतील, तर कुठे शंख, स्वस्तिक, ओमचे चिन्ह उमटलेले असेल.

गोपाळांची घरे अशा भित्तीचित्रांनी खच्चून भरलेली दिसतात. भिंतींच्या खालच्या वरच्या बाजूला उभ्या आडव्या रेषांची नक्षी काढलेली असते. नक्षीच्या या दोन रेषात प्राण्यांची, फुलांची, पक्ष्यांची, पानांची, झाडांची चित्रे काढलेली असतात. गायीची धार काढण्याचा प्रसंग किंवा गायीच्या स्तनातून दूध काढणारे पाडस हमखास चित्रित झालेले दिसतात. पोळा हा अहिराणी संस्कृतीत गणला गेलेला महत्त्वाचा सन आहे. पोळ्याच्या आदल्या दिवशी खान्देशी स्रिया पिठोळीची पूजा करतात. भिंती पोतेर्‍याने पोतेरतात. त्यावर चुन्याच्या निवळीने अथवा गेरूने विविध प्रकारची चित्रे काढतात.

बैलांची जोडी, मोट हाकत असलेला शेतकरी, गवताचा भारा डोक्यावर वाहून नेणारी शेतकरी स्री, बैलगाडीतून अन्नधान्य वाहून नेणारा शेतकरी, शेतात पेरलेले धनधान्य यांची चित्रे काढून स्रिया त्यांची पूजा करतात. अशा प्रकारची चित्रे जात्याच्या वर्तुळाकार आकाराभोवतीही साकारली जातात. कारण या सर्व धनधान्याला मूर्त आणि खाण्यायोग्य बनवण्याचे काम शतकानुशतके जात्याने केले आहे. अशा या जात्याला यानिमित्ताने पूजनीय स्थान अहिराणीच्या संस्कृतीत असल्याचे दिसून येते. जात्यावरच्या खान्देशी ओव्या तर कधीच बहिणाबाई चौधरींनी अटकेपार पोहचवल्या आहेत हे नव्याने येथे सांगण्याची आवश्यकता नसली तरी त्याचा उल्लेख अपरिहार्य आहे. पूर्वी ही जात्याची चित्रे विविध प्रकारच्या धान्याच्या पिठाने, चुन्याने अथवा गेरूने काढली जायची.

आज काळाच्या ओघात या तिघांची जागा आधुनिक रांगोळ्यांनी घेतली. त्यात आता अमर्याद रंगांची उधळण होऊ लागली आहे. जोपर्यंतया पिठोळीची पूजा खान्देशी स्री अशा प्रकारे करीत नाही तोपर्यंत खिरा खाणे वर्ज्य असते. या पूजेनंतरच ती शेतातील खिरा खाण्यास प्रारंभ करते. ही सर्व भित्तीचित्रे खान्देशातील अहिराणी संस्कृतीच्या यथार्थ प्रतिमा आहेत. इथल्या शेतकरी जीवनाला या चित्रांनी किंवा रांगोळी चित्रांनी एक प्रकारचा उद्गार दिला आहे. आजूबाजूची जागा पांढर्‍या मातीने किंवा शेणाने पोतेरतात व भिंत, जमीन ओली असतानाच त्यावर बोटांनीच उत्थित स्वरूपात नक्षी व कानबाईची चित्रे काढतात.

गौरी, कानबाई, रानबाई, गुलाबाई, गौराई या अस्सल खान्देशी लोकदैवतांच्या उत्सवांनी इथल्या रांगोळीला एक मानाचे स्थान प्राप्त करून दिले आहे. या सर्व उत्सवांमध्ये रांगोळीचित्रे, भित्तीचित्रे काढण्याची प्रथा आहे. कानबाईचा उत्सव इथे मोठ्या प्रमाणावर केला जातो. कानबाईच्या उत्सवापूर्वी घराच्या भिंती, जात्याच्या शेवटी ओल असतानाच त्यावर चुना किंवा पिठाने उत्थित भागावर रंगकाम केले जाते.

 या कामासाठी अलीकडे रांगोळीचाही उपयोग काही ठिकाणी केला जातो. या भागात अक्षयतृतीयेच्या नऊ दिवस अगोदर गौराई बसवतात. गौराई ही पार्वतीचं प्रतीक होय. पार्वतीचे माहेर म्हणजे खान्देश ही पूर्वापार चालत आलेली कल्पना या उत्सवाच्या मुळाशी आहे. या गौराईची प्रतिमा सुताराने तयार केलेली असते. तिची स्थापना ज्या कोनाड्यात करतात त्या कोनाड्याजवळील कमानींचा भाग हा उभ्या-आडव्या रेषांनी साकारलेल्या नक्षीने व मधला भाग गौराईच्या चित्रांनी भरतात. नक्षी आंब्याच्या पानांची असते. मधून मधून देठ असलेल्या कैर्‍या काढतात. देठ असलेली कैरी गौराईला मुद्दाम अर्पण करतात.

नागपंचमी हा संस्कृती संगमाचा अवशेष रूपाने उरलेला महत्त्वाचा सन उभ्या खान्देशात मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. या दिवशी सुना माहेरी जातात, झोक्यावर बसून कथात्मक गाणी म्हणतात. खेड्यातून या दिवशी अंगणात रांगोळीच्या माध्यमातून तर भिंतीवर भित्तीचित्रांच्या माध्यमातून नागाची चित्रे काढली जातात. ही चित्रे मोजकीच असतात. एक मोठा नाग, त्यामागे नागाचे जोडपे व नंतर तीन-चार लहान लहान नागांची पिल्ले एवढीच ही चित्रे. ही मोजकी चित्रे म्हणजे आजच्या रांगोळीच्या विकासक्रमाचे टप्पेच नव्हेत काय?

ज्या एकाकी जीवनात आदिमानवाने भ्रमणाला प्रारंभ केला त्याचा विकास कुटुंब जीवनात झाला. एकाकी जीवनापासून समूह जीवनाच्या आदर्श कल्पनेकडे झालेल्या वैचारिक विकासाची प्रतीके म्हणजे ही मोजकी चित्रे. या नागाच्या चित्रात रेषांनी जी वळणे घेतली आहेत तीही लक्षणीय आहेत. प्रारंभापासून रेषा ज्या क्रमाने वाढली तो क्रम नागाच्या चित्रात दिसतो. जिभेची व फुत्काराची प्रतीके असलेल्या तिरप्या पण सरळ रेषा, फणीजवळील गोलाकार मधल्या शरीराचा वक्राकार फुगीर भाग, शेपटीकडील आत झुकलेला निमुळता आकार दिसतो.

जिभेतील फुत्कार दाखवणारी रेषा ही अस्पष्ट दिसते. फुगीर व गोलाकार रेषेत धिटाई दिसते, तर निमुळती रेषा अस्थिर व तितकीच गतिशील वाटते. रेषा ही माणसाला सरळ रूपात गवसली की वक्राकार रूपात हे सांगणे कठीण आहे. एक मात्र खरे आहे की रेषांना विविध प्रकारचे आकार देण्याचे सामर्थ्य अपरीष्कृत मनातही आहे. त्याची जाणीव या रांगोळी व भित्तीचित्रांमधून होते. रेषा सरळ रूपात अवतरते तेव्हा खंबीर भावना ती व्यक्त करते. हीच रेषा भावनेप्रमाणे जेव्हा विविध आकार शोधते तेव्हा तिचे रूपही बदलते. सराईत चित्रकाराच्या हाताने उमटणार्‍या रंगरेषेचे जे कलारूप असेल, तसल्या प्रकारचे रूप या लोककलेतील रेषेला नसते. त्या रेषांमधून त्यांच्या जाणिवा अभिव्यक्त झालेल्या असतात.

या रेषांमधला सराईतपणा, धिटाई आपल्याला वेड लावते. ही रेषा कुठे निरुंद, कुठे सैल सुटलेली असेल तर काही ठिकाणी अत्यंत बांधेसूद रूप घेईल. कारण जाणिवेच्या सूक्ष्म अभेदाची अभिव्यक्ती कलावंताला करावयाची असते. अपरीष्कृत मनाने निर्माण केलेल्या या भित्तीचित्रांमागे ही कलात्मक जाणीव असणे शक्य नाही. कारण खान्देशी लोककला विशिष्ट आचारधर्मातून उतरली आहे. या चित्रांचा ओरखडा किंवा बिंदू आवेशपूर्ण असतो. त्यातील स्पंदनशील आवेशपूर्ण जीवनच त्या रेषांमागे उभे असते. त्यांच्या दैनंदिन व्यावहारिक व सांस्कृतिक जीवनातून ही भिंतीवरील, जमिनीवरील रांगोळी चित्रांची लोककला खान्देशात आजही जिवंत आहे.

-(लेखक महाराष्ट्र शासनात जिल्हा माहिती अधिकारी आहेत)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -