घरफिचर्ससारांशबटेश्वर मंदिर समूह

बटेश्वर मंदिर समूह

Subscribe

मध्य प्रदेशमधील मुरेना शहरापासून किंवा ग्वाल्हेर शहरापासून बटेश्वर मंदिर समूह ३५ किलोमीटर अंतरावर आहे. सुमारे १३०० वर्षांपूर्वी चंबळच्या जंगलात गुर्जर प्रतिहार वंशाच्या राजांनी बलुआ दगडांमधून ही मंदिरे बांधली होती. साधारण सातव्या-आठव्या शतकात ही मंदिरे बांधली असावीत असे मानले जाते. भारतीय स्थापत्य कलेचा, शिल्पकलेचा हा खरोखर अप्रतिम खजिना आहे. त्या काळात कोणतीही यंत्रसामुग्री नसताना दगडामध्ये एवढे सुंदर कोरीव काम कसे केले असेल याचे आश्चर्य वाटते.

-पुष्पा गोटखिंडीकर

आम्ही काही मित्रमंडळी नुकतेच मध्य प्रदेश, राजस्थानच्या ट्रीपला जाऊन आलो. झाशी, ओरछा, ग्वाल्हेर पाहून आम्ही आता भरतपूरकडे जायला निघणार होतो. ऑन द वे काही प्रेक्षणीय स्थळे, मंदिरे आहेत जिथे फारसे पर्यटक फिरकत नाहीत, अशी माहिती आम्हाला मिळाली. आम्ही सगळे सत्तरीच्या पुढचे हौशी पर्यटक. थोडा त्रास पडला तरी चालेल, जिथे फारसं कुणी फिरकत नाही तिथे आपणच आधी फिरकायचं. असे आम्ही सर्वजण उत्साही. सकाळी आम्ही साडेसात वाजता आमच्या कारने ग्वाल्हेरहून निघालो.

- Advertisement -

निर्मनुष्य रस्ता, वाहनांची वर्दळ नाही, आजूबाजूला दुकान, हॉटेल, एखादी चहाची टपरी, काही काही नाही, सुनसुनाटी रस्ता. मध्य प्रदेश आणि राजस्थानची बॉर्डरदरम्यानचा चंबळ घाट परिसर. ग्वाल्हेरपासून ३०-३५ किलोमीटर अंतर आलो असू आणि आम्हाला रस्त्यात बटेश्वर मंदिराचा बोर्ड दिसला आणि जवळच एक छोटेसे नवीन स्वच्छ, सुंदर, सुशोभीत हिरव्यागार वनश्रीने नटलेले असे हॉटेल दिसले. वाटेत काही खायला मिळणार नाही, हॉटेल्स नाहीत असे समजल्यामुळे आम्ही आमच्याबरोबर भरपूर खाद्यपदार्थ घेऊन ठेवले होते आणि आता अचानक सुंदर हॉटेल दिसल्यावर आम्ही सर्वजण बेहद खूश झालो.

जणू काही ते हॉटेल आमच्याकरिताच नव्याने सुरू झाले होते. त्या हॉटेलमध्ये पराठे, ऑमलेट-पाव, पोहे असे मोजकेच पदार्थ होते. मग काय जे मिळेल ते स्वाहा. नाश्ता कम जेवण केले आणि बटेश्वर पाहावयास गेलो आणि डोळे विस्फारून पाहतच राहिलो. अनेक सुंदर मंदिरांचा समूह, अनेक मंदिरं पडलेली, काही भग्न मूर्ती, अनेक कोरीव काम केलेले खांब, अनेक मंदिरांवरील नुसतेच कळस हे सर्व प्रचंड मोठ्या परिसरात पसरलेले. दोन डोळ्यांच्या दुर्बिणीत मावणे अशक्य. किती किती फोटो काढू असे प्रत्येकाला होऊन गेले होते आणि मग मात्र त्या मंदिर समूह परिसराची आम्ही माहिती घेतली ती पुढीलप्रमाणे.

- Advertisement -

मध्य प्रदेशमधील मुरेना शहरापासून किंवा ग्वाल्हेर शहरापासून बटेश्वर मंदिर समूह ३५ किलोमीटर अंतरावर आहे. सुमारे १३०० वर्षांपूर्वी चंबळच्या जंगलात गुर्जर प्रतिहार वंशाच्या राजांनी बलुआ दगडांमधून ही मंदिरे बांधली होती. साधारण सातव्या-आठव्या शतकात ही मंदिरे बांधली असावीत असे मानले जाते. भारतीय स्थापत्य कलेचा, शिल्पकलेचा हा खरोखर अप्रतिम खजिना आहे. त्या काळात कोणतीही यंत्रसामुग्री नसताना दगडामध्ये एवढे सुंदर कोरीव काम कसे केले असेल याचे आश्चर्य वाटते, परंतु पाऊस आणि भूकंप यामुळे या मंदिरांची पडझड झाली आणि त्याचे अवशेष सगळे मातीमध्ये गाडले गेले.

मंदिरांचे कळस, विविध मूर्ती, सुंदर कोरीव काम केलेले दगडी खांब, मंदिराचे दरवाजे हे सर्व आपल्याला या ठिकाणी इतस्तत: विखुरलेले आढळतात. १३०० वर्षांपूर्वी एवढे सुंदर मोठे मंदिर समूह जे भारतामध्ये अन्यत्र कुठेही नाहीत हे कसे बांधले असतील याचे आपल्याला नक्कीच कुतूहल वाटते, परंतु भारतीय पुरातत्त्व विभागाच्या अथक प्रयत्नातून आज जवळपास दोनशे सव्वा दोनशे मंदिरांचे अवशेष एक एक करून जोडत जोडत ही मंदिरे पूर्णत्वास नेली आहेत. लहान मुले जिक्सा पझल कसे एक एक तुकडा करत जोडतात तद्वत या मंदिरांची पुनर्बांधणी केली आहे.

२००५ पर्यंत येथे जाणे अत्यंत मुश्कील होते. या चंबळच्या जंगलात निर्भयसिंग गुर्जर हा प्रमुख डाकू आपल्या साथीदारांसह वास्तव्यास होता. सर्व परिसर या डाकूंनी आपल्या ताब्यात घेतला होता. खाकी वर्दीतले पोलीसही येथे जायला घाबरत असत. त्यामुळे इतर लोकांची तर गोष्टच सोडा, परंतु भारतीय पुरातत्त्व खात्याचे प्रमुख के. के. मोहमद यांचे योगदान, त्यांनी केलेला संघर्ष, त्यांनी घेतलेली प्रचंड मेहनत यामुळेच हे मंदिर समूह पुनर्निर्माण होताना आपल्याला दिसत आहे. के. के. मोहमद मोठ्या मुश्किलीने, साहसपूर्वक आपल्या साथीदारांसह निर्भयसिंग डाकूला भेटले व मंदिर पुनर्बांधणी करण्याकरिता आपण सहकार्य करावे, असे निर्भयसिंगला त्यांनी सांगितले.

निर्भयसिंग शिवभक्त होता. त्याच्यामुळेच ह्या मंदिरांचे रक्षण झाले आहे. नाहीतर येथील मूर्ती, त्यांचे अवशेष यांची तस्करी होऊ शकली असती, असे के. के. मोहमद यांनी निर्भयसिंगला सांगताच तोही खूश झाला. शिवानेच मंदिराचे रक्षण करण्यास आपल्याला पाठवले आहे, असे तोही स्वत: मानत असे आणि गुर्जर प्रतिहारचा तो स्वत:ला वंशज मानत असे. त्यामुळेच त्याने मंदिर पुनर्बांधणी करण्यास सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. (८ नोव्हेंबर २००५ पोलीस एन्काऊंटरमध्ये निर्भयसिंगचा मृत्यू झाला.)

येथे प्रमुख मंदिरात शिवलिंग स्थापित आहे. लोक येऊन त्याची पूजाअर्चा करतात. तसेच इतरत्र ब्रह्मा, विष्णू ह्या मूर्तीही आपल्याला आढळतात. मंदिराचे पुनर्निर्माण करताना आणि दगड एकमेकांना जोडताना स्टीलचा उपयोग केला आहे. हा सर्व परिसर मानवी वसाहतीपासून दूर एकांतात असून सर्व बाजूंनी गर्द झाडीने वेढलेला आहे. येथे नीरव शांतता असून त्यामुळे मोरांचे, विविध पक्ष्यांचे आवाज ऐकायला मिळतात.

जवळपास २५ एकर परिसरात हा मंदिर समूह आपल्याला आढळतो. बरीच मंदिरे भारतीय पुरातत्त्व विभागाच्या परिश्रमाने उभारली आहेत तरी अजूनही बरेच काम बाकी आहे. या मंदिरांच्या मधोमध एक मोठा तलाव असून त्यात नैसर्गिक पाण्याचा स्रोत आहे. तसेच येथे एक हनुमानाची मूर्तीही सापडली असून त्याच्या पायापाशी रति व कामदेव यांच्या प्रतिमा आहेत. ही हनुमानाची मूर्तीही पुनर्स्थापित केली आहे. साधारणपणे ५ ते ५० फूट उंचीपर्यंत ही मंदिरे पुनर्निर्मित केली आहेत.

एकेकाळी गुर्जर प्रतिहार राजांचे वैभव असलेले, मधल्या काळात डाकूंचे निवासस्थान बनलेले आणि आता भारतीय पुरातत्त्व विभागाच्या प्रयत्नाने दोनशेच्या वर मंदिर समूह पाहताना आपण खरोखरंच स्तिमित होऊन जातो. ‘एक अंत एक आरंभ का शुभारंभ होगा,’ या उक्तीनुसार भारतातील हा सर्वात मोठा मंदिर समूह असेल.

संपूर्ण जगातून पर्यटक येतील आणि भेट देतील, असा विश्वास भारतीय पुरातत्त्व विभागाचे प्रमुख के. के. मोहमद यांना वाटतो. येथून जवळच पडावली गढी असून ५०-६० पायर्‍या चढल्यावर या गढीवर दहाव्या-अकराव्या शतकातील सुंदर मंदिर आपल्या नजरेस पडते. या मंदिराच्या भिंतीवर तसेच छतावर रामसीता विवाह, शंकर पार्वती विवाह, विष्णूचे दहा अवतार,कृष्णलीला तसेच रामायण कथा प्रतिमांच्या रूपात कोरलेल्या आहेत.

येथून थोडे पुढे गेल्यावर मितावली नावाचे ठिकाण असून डोंगरावर सुंदर ६४ योगिनी मंदिर आहे. मध्यभागी शिवाचे मंदिर असून त्याची रोज पूजाअर्चा केली जाते. या मंदिरावरूनच दिल्लीमधील संसद भवनाचे बांधकाम झाले होते.

आपण सर्वांनीही जरूर या परिसरास तसेच बटेश्वर मंदिर समूहास भेट द्यावी. हा प्राचीन भारतीय संस्कृतीतील अमूल्य खजिना जपण्यासाठी आपण सर्वजण सहकार्य करूया.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -