घरफिचर्ससारांशनिसर्ग आणि माणसाचे नाते!

निसर्ग आणि माणसाचे नाते!

Subscribe

‘हरितदृष्टी : जैवविविधता आणि शाश्वत विकासाचे शिक्षण’ हे बसवंत विठाबाई बाबाराव यांनी त्यांच्या अभ्यास संशोधन आणि वैयक्तिक अनुभवातून लिहिलेले पुस्तक आहे. हे पुस्तक हातात पडले तेव्हा सुरुवातीला असे वाटले की शेती, जंगल, वनस्पती, जैवविविधता आणि यात होणारे बदल आणि प्रदूषण याबद्दलची माहिती असावी. खरंतर मला स्वतःला या विषयात रूची असल्याने मी पुस्तक वाचायला सुरुवात केली. मनोगत वाचत असतानाच माझी उत्सुकता वाढली होती. एखादा लेख वाचायला घेतला की त्यापुढच्या लेखामधे काय लिहिलेले असेल इतकी ती उत्सुकता ताणली जायची.

वाचकाला मंत्रमुग्ध करण्याचे संपूर्ण श्रेय लेखकाला, त्याच्या ओघवत्या लेखन शैलीला जाते. कारण लेखकाने हे लिहिताना केवळ माहिती स्वरूपात न लिहिता ते स्वतःच्या अनुभव स्वरूपात आणि सर्वसामान्यांना समजतील अशा भाषेत लिहिले. साहजिकच एकेका लेखातून एखाद्या प्रश्नाची उकल होण्यासह एखादी कथा वाचल्याचाही फील येतो. शेती, जंगल या विषयावरचे पुस्तक म्हटलं की हे ग्रामीण भागातील लोकांसाठी असे वाटू शकते, मात्र हा गैरसमज पुस्तक वाचल्यानंतर दूर होतो. हे पुस्तक जितके ग्रामीण भागातील लोकांसाठी उपयुक्त आहे, तितकेच शहरी भागात राहणार्‍या लोकांसाठीही महत्त्वाचे आहे. टेरेस गार्डनिंगपासून ते शाश्वत जीवनशैलीपर्यंतच्या अनेक विषयांना हे पुस्तक स्पर्श करते. आपण जरी शहरात राहत असू, तरी आपल्या बहुतेकांची नाळ ही ग्रामीण भागाशी जोडलेली आहे. बालपणीच्या माझ्या आठवणींमधील अनेक गोष्टींचा पुनर्प्रवास या पुस्तकातून मला करता आला. शेताबद्दल माहिती असली तरी जंगले, तेथील जैवविविधता, रानभाज्या, त्याला जोडून येणार्‍या सणांबद्दल नवीन माहिती मिळाली.

रानभाज्यांबद्दल नुसती माहिती न देता त्याच्या आजूबाजूला असणारे मानवी जीवन आणि सण, उत्सव याबद्दल अतिशय रंजक लिखाण पुस्तकात वाचायला मिळाले. वेळा अमावस्येचे इतके सुरेख वर्णन मी पहिल्यांदाच वाचले. राजकारण, राजकीय निर्णय आणि राजकारणी यांना लेखकाने वगळले नाही.

- Advertisement -

शेतीविषयक योजना आणि धोरणे याचे सद्य:परिस्थितीतील अचूक आणि मार्मिक विश्लेषण पुस्तकात आहे. तसेच सध्याच्या शेतकर्‍याचा शेतीकडे बघण्याचा दृष्टिकोन, शेतीचे बाजारीकरण इत्यादी बाबी ही अभ्यासपूर्ण रितीने मांडल्या आहेत.

निर्सगत: कोणतीच गोष्ट समसमान नाही, तर माणसाने हा हट्ट का करावा? असे अनेक निसर्ग आणि माणसाच्या नात्यातील प्रश्न समोर आणले आहेत आणि त्याची उत्तरेही शोधण्याचा प्रयत्न केला आहे. प्रश्न मांडत असताना या प्रश्नांची उत्तरे शोधणार्‍या माणसांची धडपडही लेखकाने अतिशय तळमळीने मांडली आहे. गीता तिडके या आश्रमशाळेत शिकवणार्‍या शिक्षिकेबद्दलच्या लेखातून अनेकांना प्रेरणा मिळू शकेल. शेतातल्या आंब्याच्या झाडाबद्दलचे लिखाण सर्वात जास्त मला आवडले. डोळ्यांसमोर त्या झाडाचे आणि त्याभोवतीच्या माणसांचे चित्र उभे राहील असे हे लिखाण. केवळ झाड आणि निसर्ग नाही, तर त्या झाडांभोवतीची माणसे, नाती, त्यातील भावनांचे चढउतार हे सगळे पुस्तकात वाचायला मिळाले. शेतीच्या उत्सवाबद्दल लिहिताना रानभाज्या फळांचे रसाळ वर्णन याबरोबर माझ्या आठवणीही जाग्या झाल्या. मी अनुभवलेल्या वेळा अमावस्येच्या आंबिलाची चव अजून माझ्या जिभेवर आहे, पण गेले कित्येक वर्षांपासून हे अनुभवले नाही, पण लेखक त्याच्या लिखानातून मला परत या अनुभवांकडे घेऊन गेले.

- Advertisement -

सद्य:स्थितीबद्दलच्या लिखाणात नाराजीचा सूर असला तरी लेखक स्वत: वेगवेगळे प्रयोग करीत आहेत. त्यांची प्रत्यक्ष नाळ मातीशी जोडली गेलेली आहे. त्यामुळे ते मला आशावादी वाटतात. पुस्तक वाचून झाल्यावर त्यातील काही लेख मी माझ्या आठ वर्षांच्या मुलीलाही वाचून दाखवले. तिलाही खूपच आवडले. अनेक नवीन प्रकारची माहिती तिला कळलीच, पण आपल्या आजूबाजूपेक्षा किती निर्सगात विविधता आहे हेही समजले.

पक्ष्यांची, भाज्यांची, झाडांची नुसती नावे ऐकूनही ती अवाक् झाली. ‘जंगलातील भटकंती’ हा लेख वाचताना तिलाही वाटले की आपण खूप काही मोठ्ठं, महत्त्वाचं असं ‘मिस’ करीत आहोत. अजूनही त्याबद्दल प्रश्न विचारणे सुरूच आहे. तिच्या प्रतिक्रियांवरून वाटले की हे पुस्तक मुलांसाठीही महत्त्वाचे आहे. लहानपणापासूनच संवेदना जाग्या झाल्या तर निर्सगाचे संवर्धन करण्यासाठी वेगळे काही करावे लागणार नाही. त्यामुळे ज्यांच्याकडे मुले आहेत, त्यांनी हे पुस्तक जरूर वाचून दाखवावे किंवा वाचावयास द्यावे. या पुस्तकातील लेखांमधून स्वतःच्या अनुभवांच्या दर्शनपटाचा उलगडा केल्याबद्दल लेखकाचे खूप आभार!

=पुस्तक : हरितदृष्टी: जैवविविधता आणि शाश्वत विकासाचे शिक्षण
=लेखक : बसवंत विठाबाई बाबाराव
=प्रकाशन : हरिती आणि वनराई
=पृष्ठे : २०८
=किंमत : २५५

–विजया कुलकर्णी, पुणे

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -