Thursday, September 23, 2021
27 C
Mumbai
घर फिचर्स सारांश इग्नूने फलज्योतिषाबाबतचे अंनिसचे आव्हान स्वीकारावे...

इग्नूने फलज्योतिषाबाबतचे अंनिसचे आव्हान स्वीकारावे…

कुंडलीत रवि, शशी, राहू, केतू यांना चुकीचे संबोधून आणि सर्वात महत्वाचे म्हणजे ज्या पृथ्वीवर मानवी जीवन व्यतीत होत असते, तिलाच कुंडलीत स्थान नसणे, यामुळे कुंडलीतील जवळपास 50 टक्के बाबी फोल ठरतात. तरीही असा अशास्त्रीय विषय ‘इग्नू’ सारख्या मान्यताप्राप्त राष्ट्रीय मुक्त विद्यापीठातून शिकवण्याचा निर्णय का घेतला गेला असावा, असा प्रश्न पडतो. विद्यापीठाची ध्येय-धोरणे व योजना आखण्यात कार्यरत असलेल्या राष्ट्रीय स्तरावरील तज्ज्ञ मंडळीला हे समजत नाही, असे म्हणणे योग्य होणार नाही. तरीपण घेतलेल्या निर्णयाचा फेरविचार करण्याची गरज आहे, असे वाटते. फलज्योतिष हे शास्त्र नव्हे तर थोतांडच आहे, या मतावर महाराष्ट्र अंनिस ठाम आहे. इग्नूनेही महाराष्ट्र अंनिसच्या ह्या आव्हान प्रक्रियेला सामोरे जावे.

Related Story

- Advertisement -

भारताच्या माजी पंतप्रधान दिवंगत इंदिरा गांधी यांच्या नावाने कार्यरत असलेल्या, इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठातून पदव्युत्तर पदवी वर्गासाठी फलज्योतिष हा अभ्यासक्रम सुरू करण्याचा निर्णय नुकताच घेण्यात आला आहे. एखाद्या विषयाला शास्त्र का म्हणावे, याचे काही शास्त्रीय निकष असतात. त्यात प्रामुख्याने निरीक्षण, संरचना, प्रश्न, तर्क, अनुमान, प्रचिती, प्रयोग, निष्कर्ष अशा पर्यायांचा समावेश होतो. एखाद्या विषयाला शास्र ठरवताना यातील जास्तीतजास्त निकष वैज्ञानिक कसोट्या लावून तंतोतंत पाळले जातात की नाही, ते तपासले जाते. शिवाय ते निकष कुणीही व्यक्ती कुठेही, केव्हाही तपासू शकते, सिद्धता पडताळून पाहू शकते. अशाच विषयाला ‘शास्त्र’ म्हणून संबोधले जाते.

फलज्योतिष मात्र या निकषांच्या निरीक्षण ह्या पहिल्याच पायरीवर कसे फोल ठरते. ते आता आपण पाहू या.
कुंडलीतील नवग्रहांच्या आधारे फलज्योतिष सांगितले जाते किंवा तसा दावा फलज्योतिषांकडून केला जातो, त्यामध्ये रवी ह्या ग्रहाचा उल्लेख आहे. रवी म्हणजे सूर्य ! आता सूर्य हा ग्रह नसून तारा आहे, हे सहावी, सातवीत शिकणारं बारा, तेरा वर्षांचं मूलसुद्धा सांगू शकेल. मग फलज्योतिषांना हे कळत नाही, असे थोडेच आहे ?
या नवग्रहात चंद्राचाही ग्रह म्हणून समावेश आहे. मात्र चंद्र हा ग्रह नसून, तो पृथ्वीचा उपग्रह आहे. शिवाय चंद्रावर माणूस जाऊन आला आहे. तेथील मातीसुद्धा सोबत घेऊन आला आहे. आता बोला!!
राहू आणि केतू हे प्रचंड खतरनाक ग्रह असल्याचे सांगितले जाते. मात्र ते संपात बिंदू असून, प्रत्यक्षात ते अस्तित्वातच नाहीत. तरीही त्यांचा समावेश फलज्योतिषात केलेला आहे. ज्यांना अस्तित्वच नाही, जे काल्पनिक आहेत, त्यांचाही कुंडलीत समावेश करणे, ही बनवाबनवी नाही तर दुसरे काय ?
ज्या ग्रहावर माणसांचा व इतर जीवांचा जन्म होतो, तेथेच त्यांचे भरणपोषण होते, विकास होतो, तेथील सर्व बाबींचा त्यांच्या जीवनावर कमी-अधिक, चांगला-वाईट परिणाम होत असतो, अशा पृथ्वी या ग्रहाचा मात्र फलज्योतिषांनी गृहित धरलेल्या कुंडलीतील नवग्रहात समावेश केलेला नाही. कारण ते इथे तपासले जाऊ शकते. ही चलाखी आहे.

- Advertisement -

लोकांच्या दैनंदिन जीवनातील अडचणी, अडथळे, समस्या यामुळे लोक अगतिक, असहाय्य होऊन किंवा भविष्यात काय काय घडेल याबाबतची उत्सुकता, कुतूहल, ओढ जाणून घेण्यासाठी फलज्योतिषासारख्या अवैज्ञानिक बाबींच्या मागेमागे जातात. फलज्योतिषांच्या आमिषाला भुलतात. फलज्योतिषी अशा संधीचा उपयोग करून, लोकांना झुलवत ठेवतात आणि स्वतः मात्र गबर होतात. यासाठी विज्ञानाचाही मोठ्या प्रमाणात बेमालूमपणे वापर केला जातो, ही वस्तुस्थिती आहे.

मुळात हे संपूर्ण विश्व स्वायत्त असून, ते सतत गतिमान आहे. सूर्यमालिकेतील सर्व ग्रह, उपग्रह आणि त्यावरील प्रत्येक वस्तू वेगवेगळ्या गतीने, सतत गतिमान असते. मात्र तरीही आकाशातील कोट्यवधी किलोमीटर अंतरावर असलेल्या ग्रहांचा फक्त माणसाच्याच जीवनावर चांगला, वाईट परिणाम होतो, प्रत्येकाच्या जन्मवेळेवर तो अवलंबून असतो. असे सांगितले जाते. खरंतर सर्व विश्वच गतिमान असल्याने कुणाचीही निश्चित जन्म वेळ सांगणे शक्य नाही. मातेच्या गर्भात जीवनिर्मिती कोणत्या क्षणी झाली, हे अजून कुणीही सांगू शकले नाही किंवा तसे सांगणे योग्यही नाही. मात्र तरीही जन्म वेळ ठरवून, शुभाशुभ वेळ सांगितली जाते.

- Advertisement -

पृथ्वीवरूनच वेगवेगळे विधी करून, पळवाटा शोधून, त्या त्या व्यक्तीवरील ग्रहांच्या अरिष्टांतून त्या व्यक्तीच्या सुटकेचा दावा फलज्योतिषी करतात. म्हणजे आकाशातील ग्रहांचे आणि नक्षत्रांचे माणसाच्या जीवनावर नियंत्रण असते आणि त्यांना शांत करणे, काबूत ठेवणे, त्यांच्या त्रासातून यजमानाची सुटका करण्यासाठी दैवी तोडगे, उपाय करायला लावून, स्वतःचा फायदा करून घेणे, असे हे सूत्र आहे. पृथ्वीवर राहून आकाशातील ग्रहांवर फलज्योतिषांची सत्ता चालते, असा याचा अर्थ होतो. पत्रिकेत असलेला कडक मंगळ यांच्यापुढे शरणागती पत्करून, तरूण, तरूणांनींच्या विवाहाचा मार्ग मोकळा करतो..फलज्योतिषांच्या अशा अनेक करामती सांगता येतील. विशेष म्हणजे या निर्जीव ग्रहांना मानवी स्वभावाचे गुणधर्म चिकटवण्याचा हलकटपणाही संबंधितांनी केलेला आहे, असे दिसते. शनि रागीट, मंगळ कडक असे विविध मानवी स्वभावगुण ग्रहांनाही असतात, असे सांगितले जाते. अचेतन असलेल्या आकाशातील ग्रहांना इच्छाशक्ती, दैवीसामर्थ्य असते,असेही ठासून सांगितले जाते. मात्र कोरोनाच्या जीवघेण्यां संकटाबाबत दीड वर्षापूर्वीही आणि आजही, कुणीही फलज्योतिषी किंवा त्यांचा दावेदार कोरोनाबाबत निश्चित असे भविष्य वर्तवण्यास पुढे आला नाही. खरं तर यातच सारं काही आलं. फलज्योतिषाबाबत निर्णय घेण्याआधी विद्यापीठाने हा विचार करणे आवश्यक होते, असे वाटते.

एकूणच कुंडलीत रवि, शशी, राहू, केतू यांना चुकीचे संबोधून आणि सर्वात महत्वाचे म्हणजे ज्या पृथ्वीवर मानवी जीवन व्यतीत होत असते, तिलाच कुंडलीत स्थान नसणे, यामुळे कुंडलीतील जवळपास 50 टक्के बाबी फोल ठरतात. तरीही असा अशास्त्रीय विषय ‘इग्नू’ सारख्या मान्यताप्राप्त राष्ट्रीय मुक्त विद्यापीठातून शिकवण्याचा निर्णय का घेतला गेला असावा, असा प्रश्न पडतो. विद्यापीठाची ध्येय-धोरणे व योजना आखण्यात कार्यरत असलेल्या राष्ट्रीय स्तरावरील तज्ज्ञ मंडळीला हे समजत नाही, असे म्हणणे योग्य होणार नाही. तरीपण घेतलेल्या निर्णयाचा फेरविचार करण्याची गरज आहे, असे वाटते. खरंतर आता कुठे भारतीय समाज विज्ञान सृष्टीचा काही प्रमाणात आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाचा अल्प प्रमाणात वापर करीत असल्याचे दिसते. मात्र पुन्हा भारतीय समाजाला कालबाह्य झालेल्या, अशास्त्रीय आणि संविधानाशी विसंगत अशा बाबींच्या दावणीला बांधण्याचा अट्टाहास का केला जात आहे?

फलज्योतिषासारखी अशास्त्रीय असलेली, कालबाह्य झालेली बाब पुन्हा नव्या पिढीच्या गळी उतरवून, या नव्या पिढीला पुन्हा मानसिक गुलामगिरीच्या जोखडात अडकवण्याचा हा प्रयत्न असल्याचे दिसते. मूठभरांचे व्यावहारिक हित डोळ्यापुढे ठेवून, संपूर्ण भारतीय समाजाला पुन्हा जाणिवपूर्वक दैववादाकडे नेण्याचा आणि अंधश्रद्धेच्या गर्तेत ढकलण्याचा हा प्रयत्न आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.

भारतातील शिक्षण क्षेत्रात फलज्योतिषासारख्या अवैज्ञानिक बाबींचा समावेश करण्याचा काही हितसंबंधीतांचा प्रयत्न आणि राजकीय पातळीवरून तसा निर्णय घेतला जाणे व त्याच्या अंमलबजावणीचा आग्रह धरणे, ही बाब आपणास तशी नवीन नाही. 1975 साली जागतिक पातळीवर शास्त्रज्ञांनी, फलज्योतिष्य हे शास्त्र नव्हे तर थोतांड आहे, असे निक्षून सांगितले आणि नाकारलेले आहे. 2001 मध्ये पुन्हा हा विषय भारतीय विद्यापीठांतून शिकवला जावा, असा राजकीय पातळीवर निर्णय घेतला गेला. पण प्रा.यशपाल, भार्गव, डॉ. जयंत नारळीकर अशा थोर भारतीय शास्त्रज्ञांनी आणि अनेक पुरोगामी संस्था आणि महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीसारख्या अनेक संघटनांनी कडाडून विरोध करत, शास्त्रीय निकषांवर फलज्योतिषातील फोलपणा उघडा पाडला होता. त्यामुळे साधारण वीस वर्षांपूर्वी शिक्षण क्षेत्रात होऊ घातलेल्या या विषयाच्या समावेशाला पायबंद घालण्यात यश मिळाले होते. मात्र तरीही, नुकताच असा निर्णय पुन्हा का घेण्यात आला, याचा सुज्ञांनी सम्यकपणे विचार करून, शिक्षण क्षेत्रात घुसू पाहणारी ही कीड वेळीच ठेचून काढण्यासाठी, सनदशीर मार्गाने विरोध दर्शवायला हवा.

शिक्षणाने माणूस सुसंस्कृत, विवेकी होतो, विचार करायला प्रवृत्त होतो, चिकित्सक होतो, स्वतःमध्ये आणि समाजामध्ये योग्य परिवर्तन घडवून आणण्यासाठी प्रयत्नशील राहतो. एकूणच हळूहळू माणूस घडण्यासाठी शिक्षण महत्वाची भूमिका बजावते. निदान तशी अपेक्षा शिक्षणाकडून व्यक्त केलेली असते. विद्यापीठीय शिक्षणातून समाजोपयोगी विषयांचा केवळ अभ्यास करणे व उच्च पदवी मिळविणे एवढेच अपेक्षित नसून समाजातील ज्वलंत समस्यांवर सतत शास्रीय संशोधन करू शकतील, अशी संशोधनवृत्ती जोपासणारे विद्यार्थी तयार करणे, तयार होणे अपेक्षित आहे. भविष्यात कोरोनासारख्या कोणत्याही जीवघेण्या भयंकर संकटांचा यशस्वीपणे सामना करण्यासाठी विद्यापीठात दर्जेदार अभ्यासक्रमांचा समावेश करणे आणि प्रचंड क्षमतेचे, गुणवत्तापूर्ण असे संशोधक तयार होणे, अत्यंत आवश्यक आहे.

मात्र फलज्योतिषासारख्या थोतांडाचा विद्यापीठातील अभ्यासक्रमात समावेश करण्याचा विचार आणि निर्णय जेथे होतो, तेथे शास्रीय संशोधनाची अपेक्षा करणेच अरण्यरुदन ठरते. जेव्हा शिक्षण क्षेत्रातच अशास्त्रीय विचार करणारी मात्र, व्यावहारिक शहाणपण जोपासणारी व मूठभरांचे हित डोळ्यासमोर ठेवून निर्णय घेणारी माणसं कार्यरत असतात तेव्हा धर्म, अध्यात्म यांच्या नावाने नशीब, प्राक्तन, मुहूर्त, दैव अशा वेडगळ-खुळचट कल्पना, समजुती आणि अशास्रीय गोष्टींचा आग्रह धरला जातो. त्यामुळे साहजिकच समाजात अनेक अनिष्ट, अवैज्ञानिक, कालबाह्य झालेल्या रुढी, प्रथा, परंपरेचे पालन व जतन समाजाकडून होत राहते. अशावेळी शिक्षण क्षेत्रालाही, संविधानात आणि राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात समावेश असलेल्या वैज्ञानिक दृष्टिकोनाचा विसर पडला की काय, अशी शंका मनात बळावते.

राज्य, राष्ट्र यांच्याही कुंडल्यांची मांडणी फलज्योतिषी करतात. भविष्यात तेथे काय काय घडेल, हे सांगण्याचा आचरटपणाही काहीजण करतात. संदिग्ध भाषेचा वापर करून, भंपक आणि मोघम दावे छातीठोकपणे करण्यात काहीजण आघाडीवर असतात. छद्मविज्ञानाचा चलाखीने वापर करून, फलज्योतिष हे शास्त्रच आहे, असे भासवून ते पटविण्यात काहीजण माहीर असतात. फलज्योतिषांनी, फलज्योतिषाबाबत त्यांचे असे वेगवेगळे अवैज्ञानिक दावे, विधाने, सिद्धांत पुराव्यानिशी सिद्ध करण्यासाठी, महाराष्ट्र अंनिसने या सगळ्या फलज्योतिषांना मागील पंचवीस वर्षांपासून, महाराष्ट्रभर फिरून, पंचवीस लाख रुपयांचे जाहीर आव्हान दिलेले आहे. आजही ते आव्हान कायम आहे. दोन्ही बाजूकडील तज्ज्ञांच्या उपस्थितीत, नियंत्रित परिस्थितीत, दोन्ही बाजूंना पुरेपूर संधी देऊन, ही आव्हान प्रक्रिया समाधानकारकपणे पार पडल्यावर, तटस्थपणे जो निर्णय तज्ज्ञ देतील, तो दोन्ही बाजूंना मान्य करावा लागेल. फलज्योतिषी जर जिंकले तर त्यांना महाराष्ट्र अंनिसकडून पंचवीस लाख रुपये मिळतील. महाराष्ट्र अंनिसने आव्हान दिले असल्याने, आव्हान प्रक्रियेचे नियम आणि अटी अर्थातच महाराष्ट्र अंनिसच्या असतील. मात्र त्या जाचक आणि अवैज्ञानिक असणार नाहीत.

फलज्योतिष हे शास्त्र नव्हे तर थोतांडच आहे, या मतावर महाराष्ट्र अंनिस आजही ठाम आहे. इग्नूनेही महाराष्ट्र अंनिसच्या ह्या आव्हान प्रक्रियेला सामोरे जावे आणि मगच फलज्योतिष अभ्यासक्रम विद्यापीठात सुरू करण्याबाबतचा निर्णय घ्यावा, असे नम्र आवाहन करीत आहोत.

- Advertisement -