घरफिचर्ससारांशकाळ कसोटीचा आहे...

काळ कसोटीचा आहे…

Subscribe

आजचा युवक द्विधा मनस्थितीत सापडला आहे. नेमकी कोणत्या पक्षाची भूमिका आपल्यासाठी योग्य राहील. रोजगाराचा प्रश्न समोर असताना दुसर्‍याच गोष्टींकडे आपले लक्ष वेधून घेतले जात असेल तर काय करावे..? आपण स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करत आहोत. भारतीय संविधान निर्माण होण्यापूर्वी आणि निर्माण झाल्यानंतर देखील. अनेक राजकीय विश्लेषकांनी विधान केले होते की, भारत हा देश कधीच राष्ट्र म्हणून उभा राहू शकणार नाही. कारण या देशात वेगवेगळ्या जाती-धर्माचे लोक राहतात आणि ते स्वमग्न आहेत. त्यांचे हे भाकीत आजपर्यंत आपण खोटे ठरवले. यापुढेही आपल्या एकसंध राहून मतभेद मिटवावे लागणार आहेत, कारण सध्या काळ कसोटीचा आहे.

राजकीय स्वार्थापोटी मध्ययुगीन कालखंडामध्ये मोगल सत्तेने आपल्या घरातच फोडाफोडीचे राजकारण केले. सम्राट होण्याच्या आकांक्षापोटी अनन्वित गुन्हे केले. कधी कधी त्यांचा हा स्वार्थ त्यांच्यासाठी जीवघेणा ठरला. तर कधी नको असताना सैनिकांना युद्ध करावे लागले. दोन्ही बाजूंच्या लाखो सैनिकांची घरे उध्वस्त झाले. हाती मात्र शून्य आले. सत्ता ही येते आणि जाते पण त्या-त्या काळात झालेली हानी भरून निघत नाही. आजही जागतिक स्तरावर हीच अवस्था आपल्याला पाहायला मिळते. युक्रेन आणि रशियामध्ये सुरू असलेले युद्ध जनता आणि सैनिक यांना नको असताना लादलेले युद्ध आहे. युरोपातील काही बडी राष्टे्र युक्रेन या देशाला शस्त्रांचा पुरवठा कमी पडू देणार नाही अशी ग्वाही देत आहेत. पण सगळ्यात मोठी खंत ही आहे की, समंजसपणे भूमिका घेऊन हे युद्ध थांबावे यासाठी समोर कोणीच येत नाही. एकविसाव्या आणि आधुनिक युगात युद्ध ही गोष्ट परवडणारी नाही तरी त्या युद्धाला खतपाणी घालण्यासाठी अनेक लोक तयार आहेत. या सगळ्यांमध्ये खतपाणी घालत आहेत त्यांचे कोणतेही नुकसान होणार नाही. पण त्या ठिकाणच्या जनतेला आणि सैनिकांना या सगळ्या गोष्टींचा सामना करावा लागतो. आजची ही हानी जगाला कोणत्याच प्रकारे परवडणारी नाही.

अण्वस्त्र हे स्वतः किती पुढारलेले आहोत तसेच इतरांवर आपला वचक राहावा यासाठी निर्माण केले गेले. अनेक तज्ज्ञांनी मत व्यक्त केले होते की, याचा वापर होऊ नये अन्यथा जगभर अशांतता माजेल. वित्तहानी, जीवितहानी किती प्रमाणात होईल याची मोजदाद करता येणार नाही. प्रत्येक देशाचा एखादा विशिष्ट असा अजेंडा असतो, पण त्याच्या पाठीमागे धावत असताना सगळ्या गोष्टींचा सारासार विचार करणे आजच्या घडीला तितकेच महत्वाचे आहे. पण तो विचार नेमका कोणी करायचा.? हादेखील सर्वात मोठा प्रश्न.. जग बदलत आहे आणि बदलत्या जगात परिवर्तनीय भूमिका घेणे काळाची गरजदेखील आहे. पण ते परिवर्तन जर मानवाला युद्धाच्या माध्यमातून अधोगतीकडे घेऊन जात असेल तर काय कामाचे..?
चार्ल्स डार्विन यांचा उत्क्रांतिवादाचा सिद्धांत असे सांगतो की, प्रत्येक जीव स्वतःचे अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी प्रयत्न करतो. मानवानेदेखील स्वतःची प्रगती केली आणि आज तो पृथ्वीवरील सर्वात बुद्धिमान प्राणी म्हणून गणला गेला.

- Advertisement -

पण तोच बुद्धिवान प्राणी आज बुद्धिहीन झाला आहे की काय..? हा प्रश्न पडतो. या उत्क्रांतिवादाच्या सिद्धांतानुसार टप्प्याटप्प्याने होत गेलेला विकास अतिशय देखणा आहे. पण काही तज्ज्ञांनी असे भाकीत केले होते की, एका टप्प्यानंतर परतीचा प्रवास सुरू होईल. किंवा अलीकडे सोशल मीडियावर एक गोष्ट अत्यंत व्हायरल होताना दिसते. आदिमानवाचे प्रगत अवस्थेत वाढत जाणारे फोटो दाखवले जातात. आणि एक माणूस समोरून येतो आणि म्हणतो, ‘चल रे बाबा समोर काही खरे नाही आपले अश्मयुग बरे..’ खरेच आपण पुन्हा रानटी अवस्थेकडे जात आहोत का..? जिथे भावना नाही, फक्त शिकार करून जगण्यासाठी स्वतःचे अस्तित्व टिकवण्यासाठी इतरांचा बळी घेत आहोत. नाही आजच्या घडीला हे परवडणारे नाही.

भारतीय म्हणूनदेखील जागतिक स्तरावरची ही समस्या आज ना उद्या आपल्या दारात येईल. त्यावेळी आपण नेमकी कोणती भूमिका घ्यायची यासाठी आंतरराष्ट्रीय संबंध कशा प्रकारचे आहे हे तपासणे गरजेचे आहे. पण या सगळ्या गोष्टींकडे आजच्या युवकांनी विचार करावा यासाठी त्यांची क्रयशक्ती दुसर्‍या बाजूने वळवली जाते. या महिन्यात तापलेले भोंग्याचे राजकारण आपण यापूर्वीच्या लेखांमध्ये पाहिले. तो मुद्दा संपत नाही तोच दुसरा मुद्दा देखील समोर देण्यात येतो. सोशल मीडियावर या गोष्टींचा सुळसुळाट आपल्याला पाहायला मिळतो. ज्यांना या सर्व गोष्टींचा फायदा करून घ्यायचा असतो ते स्वतःचा फायदा करून घेतात. पण आजच्या पिढीच्या हातात मात्र शून्य राहतो. त्या शून्याला घेऊन ना समोरचे आयुष्य जगता येते, नाही मरता येत. असं वाटतं कधी कधी हे संपेल पण उद्या कोणीतरी झोपेतून उठल्यासारखे हिंदूंनी पाच मुले जन्माला घालावीत असे विधान करतात. आपल्याकडे लक्ष वेधून घेतात. खरेच हे किती हास्यास्पद आहे. भारताकडे जगातील काही राष्ट्रे नेतृत्वाची क्षमता असलेला देश म्हणून पाहतात. त्यांच्या या आशावादाला आपण खरे उतरू पाहायला जातो तर असे काही घडते ज्यामुळे पुन्हा आपण पाठीमागे ओढले जातो.

- Advertisement -

आजचा युवक द्विधा मनस्थितीत सापडला आहे. नेमकी कोणत्या पक्षाची भूमिका आपल्यासाठी योग्य राहील. रोजगाराचा प्रश्न समोर असताना दुसर्‍याच गोष्टींकडे आपले लक्ष वेधून घेतले जात असेल तर काय करावे..? आपण स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करत आहोत. भारतीय संविधान निर्माण होण्यापूर्वी आणि निर्माण झाल्यानंतर देखील. अनेक राजकीय विश्लेषकांनी विधान केले होते की, भारत हा देश कधीच राष्ट्र म्हणून उभा राहू शकणार नाही. कारण या देशात वेगवेगळ्या जाती-धर्माचे लोक राहतात आणि ते स्वमग्न आहेत. त्यांचे हे भाकीत आजपर्यंत आपण खोटे ठरवले. कारण भारतीय संविधानाचा पाया डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मजबूत बनवला. त्यानंतर तत्कालीन राज्यकर्त्यांसमोर जे प्रश्न होते ते संविधान अंमलबजावणी झाल्यानंतर अर्धेअधिक सुटले. तसे प्रयत्न प्रत्येक टप्प्यावर झाले. पण आज जात, धर्म, पंथ, भाषा सत्ता या सर्व बाबींना महत्व देऊन आपण काय साध्य करत आहोत..? एका नव्या संविधानवादी भारताचा जन्म होताना आपण पाहिला.

आज गरज आहे पुन्हा देशातील युवकांना त्यांच्या क्रयशक्तीची योग्य वाट दाखवून देण्याची.. अवतीभवतीच्या सगळ्याच शक्यता आणि अशक्यतांचा मागोवा घेता येणं शक्य असतं… पण त्या पाठीमागे धावताना होणारी होरपळ आणि वाया जाणारी शक्ती ही भरून निघत नाही. आजूबाजूला अशा अनेक गोष्टी घडत असतात त्यातून आपल्याला खूप काही शिकायला मिळतं. चांगले काय ते स्वीकारून वाईट संपवण्याची इच्छाशक्ती महत्वाची आहे. एखादे नेतृत्व डोळे झाकून कधीच स्वीकारता येत नाही. त्यासाठी सत्य काय आहे हे शोधून, कार्यकारण भाव जाणून मगच आपण कुठे जायचे? कोणता रस्ता निवडायचा? हे ठरवावे लागणार आहे. उत्क्रांतिवादाचा आणखी एक समोरचा टप्पा आपल्याला गाठावा लागणार आहे. जिथे जगाला आपली आणखी एक नवीन ओळख करून द्यायची आहे. हे सगळे करत असताना काही अंशी राजकीय वाद-प्रतिवाद बाजूला ठेवावे लागतील. मन हरवलेल्या जगात माणूसपण जिवंत ठेवावे लागणार आहे. मान्य आहे हा कसोटीचा काळ पण यातून खूप काही शिकता येण्यासारखं आणि जगता येण्यासारखं आहे. फक्त जिद्द आणि इच्छाशक्ती ही दोन साधने आपल्याजवळ ठेवून समोर जाऊया. अन्यथा अरविंद जगताप यांनी म्हटल्याप्रमाणे आपली हीच अवस्था होईल, विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती…?

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -