15 ऑगस्ट, हॉकी आणि स्वातंत्र्य दिन!

स्वातंत्र्यदिनाच्या संदर्भामध्ये एक योगायोगाची बाब आहे. पारतंत्र्यात असतानाही आपले खेळाडू आंतरराष्ट्रीय स्पर्धांत खेळत होते. 1920 पासून भारताचे पथक अधिकृतपणे ऑलिंपिकमध्ये सहभागी होऊ लागले. आणि केवळ आठच वर्षांनी भारताने पहिले वहिले सुवर्णपदक मिळवले. 1928 च्या अ‍ॅमस्टरडॅम ऑलिंपिकमध्ये. हॉकी या खेळामध्ये. ऑलिंपिकमध्ये हॉकीचे पुनरागमन व्हावे यासाठी भारतीय ऑलिंपिक असोसिएशनने खूप प्रयत्न केले होते. त्याचे फलित म्हणून हॉकीचा पुन्हा ऑलिंपिकमध्ये समावेश करण्यात आला. विशेष म्हणजे पहिल्यांदाच ऑलिंपिकमध्ये खेळताना भारतीय हॉकी संघाने सुवर्णपदकाला गवसणी घातली. ती गौरवगाथा लिहिली गेली मेजर ध्यानचंद यांच्या बहुमोल कामगिरीने.

कोविडच्या काळातील जनसामान्यांवरील बंधने, सोमवार 15 ऑगस्टला बर्‍याच प्रमाणात काढून घेतली जाणार आहेत. म्हणजे आपल्याला आता बर्‍याच प्रमाणात स्वातंत्र्याचा अनुभव घेता येईल. स्वातंत्र्यदिनाचा मुहूर्त म्हटले तर थोडा उशिराचाच. पण तरीही तो साधण्यात येणार आहे, हे महत्वाचे. त्यामुळेच या स्वातंत्र्यदिनी लोक खरोखरच तो मनापासून साजरा करतील. या दिवशी आपण स्वातंत्र्यलढ्यासाठी प्रयत्न करणार्‍यांचे स्मरण करतो. त्यांनी मिळवून दिलेले स्वातंत्र्य टिकवण्यासाठी प्रयत्नशील राहण्याचा निर्धार करतो. आजच्या काळात याला फार महत्व आले आहे, कारण आपल्याच सरकारकडून लोकांच्या व्यक्तिस्वातंत्र्यावर घाला घातला जात आहे, विविध नियंत्रणे लागू करण्यात येत आहेत व त्यामुळेच खर्‍या अर्थाने पुन्हा स्वातंत्र्य मिळण्यासाठी प्रयत्न करण्याचा लढा द्यावा लागणार आहे. मुख्य म्हणजे ज्यांनी आणीबाणीविरुद्धच्या मोहिमेला दुसरा स्वातंत्र्यलढा म्हटले होते, त्यांनी आता सर्वसामान्यांवर, अघोषित आणीबाणी आणून, तिसरा स्वातंत्र्यलढा देण्याची वेळ अगदी जाणीवपूर्वक आणली आहे.

स्वातंत्र्यदिनाच्या संदर्भामध्ये एक योगायोगाची बाब आहे. पारतंत्र्यात असतानाही आपले खेळाडू आंतरराष्ट्रीय स्पर्धांत खेळत होते. 1920 पासून भारताचे पथक अधिकृतपणे ऑलिंपिकमध्ये सहभागी होऊ लागले. आणि केवळ आठच वर्षांनी भारताने पहिले वहिले सुवर्णपदक मिळवले. 1928 च्या अ‍ॅमस्टरडॅम ऑलिंपिकमध्ये. हॉकी या खेळामध्ये. ऑलिंपिकमध्ये हॉकीचे पुनरागमन व्हावे यासाठी भारतीय ऑलिंपिक असोसिएशनने खूप प्रयत्न केले होते. त्याचे फलित म्हणून हॉकीचा पुन्हा ऑलिंपिकमध्ये समावेश करण्यात आला. विशेष म्हणजे पहिल्यांदाच ऑलिंपिकमध्ये खेळताना भारतीय हॉकी संघाने सुवर्णपदकाला गवसणी घातली. ती गौरवगाथा लिहिली गेली मेजर ध्यानचंद यांच्या बहुमोल कामगिरीने. स्पर्धेत खेळाव्या लागलेल्या एकूण पाच सामन्यांमध्ये त्यांनी संघाच्या 29 पैकी 14 गोल नोंदवले होते. भारताने नंतरच्या दोन ऑलिंपिकमध्येही सुवर्णपदकी चाल कायम ठेवली. 1932 च्या लॉस एंजेलिस ऑलिंपिकमध्ये खेळाव्या लागलेल्या केवळ दोन सामन्यांत भारताने 35 गोल केले होते आणि त्यात ध्यानचंद यांचा वाटा 11 गोलचा होता.

नंतरचे 1936 चे बर्लिन ऑलिंपिक महत्वाचे होते. कारण हिटलरला आपले वंशश्रेष्ठत्व सिद्ध करून दाखवायाचे होते. त्याचा हा बेत हाणून पाडायचा निश्चय अनेक देशांतील खेळाडूंनी केला होता. त्याप्रमाणेच झाले. हिटलरची अपेक्षा होती, तसे घडले नाही. उलट कृष्णवर्णीय धावपटू जेसी ओवेन्सने धावण्याच्या शर्यती आणि रीलेमध्ये सुवर्णपदके मिळवून अफलातून कामगिरी तर केलीच, शिवाय लांब उडीचे सुवर्णपदकही नवा उच्चांक, 8.06 मी. नोंदवून मिळवले.(तो 32 वर्षांनी अमेरिकेच्याच बॉब बीमनने मेक्सिको ऑलिंपिकमध्ये मागे टाकला.) अनेकांना हे प्रेरणादायी होते. मात्र गर्विष्ठ हिटलरने जेसी ओवेन्सबरोबर हात मिळवण्यासही नकार देऊन आपल्या मनाचा क्षुद्रपणा दाखवून दिला.

बर्लिनआधीच्या दोन ऑलिंपिकमध्ये भारताने हॉकीचे सुवर्णपदक मिळवले होते. आता हॅट्ट्रिक करण्याची संधी होती. अनुभवी ध्यानचंद यांच्याकडे संघाचे नेतृत्व होते. त्यामुळे त्यांना ही लाख मोलाची संधी दवडायची नव्हती. भारताने साखळी सामन्यांत प्रथम हंगेरीला 4-0 आणि नंतर अमेरिकेला 7-0 आणि जपानला 9-0 असे पराभूत केले आणि बाद फेरीत प्रवेश केला. उपान्यफेरीत त्यांनी फ्रान्सवर 9-0 असा दणदणीत विजय मिळवून मोठ्या दिमाखात अंतिम फेरी गाठली. ऑलिंपिकआधीच्या सराव सामन्यामध्ये जर्मन संघाने भारताला 4-1 असे हरवले होते आणि त्यामुळे त्यांना आपणच ऑलिंपिक सुवर्णपदक जिंकणार असा विश्वास होता. पण सराव सामन्यातील पराभवाचे दडपण न घेता, भारताचे खेळाडू तिरंगी झेंड्याला अभिवादन करून मैदानावर उतरले. सामन्यामध्ये भारताने जबरदस्त खेळ करून यजमानांच्या संघावर 8-1 असा मोठा विजय मिळवला. जर्मन संघाने केलेला गोल हा या स्पर्धेतील भारतावर लागलेला एकमेव गोल होता. या विजयाने भारताने ऑलिंपिक सुवर्णपदकांची हॅट्ट्रिक केली. तो दिवस होता 15 ऑगस्ट 1936. योगायोग असा की, बारा वर्षांनी 15 ऑगस्टलाच भारताला स्वातंत्र्य मिळाले.

स्वातंत्र्यप्राप्तीआधीच अशा प्रकारे जगावर प्रभुत्व गाजवण्याच्या इच्छेने प्रेरित झालेल्या जर्मनीला त्यांच्याच देशात पाणी पाजण्याचा पराक्रम भारताने केला होता. तोही भारतीय खेळाडूच कर्णधार असताना. आधीच्या ऑलिंपिक स्पर्धांत भारतीय हॉकी संघाचे नेतृत्व भारतात जन्म नसलेल्या, पण नंतर भारतात असलेल्या युरोपियन खेळाडूंकडे होते. म्हणूनच ध्यानचंद यांच्या संघाचा विजय अनमोल होता. कारण हा संघ खराखुरा भारताचा होता. देशामध्ये ब्रिटिश राजवट असली, तरी हा संघ जणू स्वतंत्रच होता आणि त्याप्रमाणेच तो खेळला. त्यांचा खेळ एवढा आकर्षक होता की, जर्मन प्रेक्षकांनाही त्याने भुरळ घातली होती. हे खेळाडू जणू खेळत नव्हते तर आपल्या कलेचे प्रदर्शन घडवत होते असे वाटावे असे त्यांचे पदलालित्य होते. ओवेन्सपासून दूर राहणार्‍या हिटलरने ध्यानचंद यांचे मात्र खुल्या मनाने अभिनंदन केले. असेही सांगतले जाते की, त्याने ध्यानचंद यांना ते जर्मनीत आले तर मोठी नोकरी देण्याचे आश्वासन दिले होते. पण ध्यानचंद यांनी, केवळ देशप्रेमामुळे, त्याचा प्रस्ताव स्वीकारला नाही.

सध्याच्या सरकारने खेलरत्न पारितोषकाचे नाव राजीव गांधी खेलरत्न पारितोषक होते ते बदलून ध्यानचंद खेलरत्न पारितोषक करण्याची घोषणा केली. अर्थात ध्यानचंद यांच्या कर्तृत्वाचा आदरच करायचा होता, तर त्यांच्या नावाने एखादी हॉकी अकादमी, वा सर्व प्रमुख केंद्रांमध्ये कृत्रिम हिरवळीची मैदाने उपलब्ध करून देता आली असती. किंवा त्यांच्या नावे करंडक ठेवून राष्ट्रीय वा आंतरराष्ट्रीय स्पर्धा सुरू करता आली असती व ते उचितच झाले असते. पंजाबमधील सुरजीत अकादमीतील तब्बल आठ खेळाडू यंदा कांस्यपदक मिळवणार्‍या भारतीय हॉकी संघात होते, यावरून अशा प्रकारे योजना आखल्या तर त्यांचा किती फायदा होतो हे स्पष्टच होते.

नव्या पिढीतील युवकांना ध्यानचंद यांची महती ठाऊक नसेल. त्यांच्यासाठी थोडी माहिती.

ध्यानचंद यांचे वडील हॉकी खेळत. त्यांच्यामुळेच ध्यानचंद आणि त्यांचा भाऊ रूपचंद हॉकी खेळू लागले. वडिलांप्रमाणे तेही लष्करात दाखल झाले. तेथेच त्यांनी आपल्या खेळाची चमक दाखवण्यास सुरुवात केली. त्यांची निवड प्रथम लष्कराच्या आणि नंतर भारतीय संघात झाली. प्रथमपासूनच त्यांना चेंडूवर ताबा राखण्याची कला अवगत होती. अचूक पासेस आणि प्रतिस्पर्ध्यांना चकवून चेंडू नेणे यात ते वाकबगार होते. त्यांच्याकडे चेंडू गेला की, त्यांच्या इच्छेविरुद्ध कुणालाही, कितीही प्रयत्न केले तरी तो मिळवणे अवघड नाही, तर अशक्यच असे. चेंडूवरील नियंत्रण आणि हुकूमत हेच त्यांच्या यशाचे रहस्य होते. त्यांचा खेळ पाहताना प्रेक्षकांना वाटायचे की चेंडू त्यांच्या आज्ञेत आहे. ते त्याच्या इच्छेनुसार चेंडू कुठेही धाडू शकत. त्यांच्या स्टिकपुढे चेंडू आला की, तो ते नेत आणि थेट गोल करूनच परतत. त्यामुळेच अनेकांना चेंडू त्यांच्या स्टिकला चिकटून बसतो असा संशय यायचा. याच कारणाने त्यांची स्टिकअनेकदा तपासली गेली. अनेकदा त्यांना स्टिक बदलायला सांगण्यात आले. त्यावेळी त्यांचा एक सहकारी म्हणाला होताः त्याच्या हातात आजोबाची काठी दिलीत तरीही तो एवढाच चांगला खेळेल. म्हणूनच त्यांना हॉकीचा जादूगार म्हटले जात असे.

त्यांच्या या गुणवत्तेमुळेच त्यांना पहिल्या सुवर्णपदकानंतर नोकरीत बढती देण्यात आली. पण त्यामुळे नंतरच्या दोन ऑलिंपिकच्या वेळी संघ निवडीसाठी झालेल्या चाचणीसाठी जाण्याकरता त्यांना रजा देण्यात आली नव्हती. तरीही त्यांची थेट संघात निवड करण्यात आली होती. हे कुणालाही खटकले नव्हते!

अलाहाबाद येथे 28 ऑगस्ट 1905 रोजी जन्मलेला हा महान खेळाडू 1948 पर्यंत आंतरराष्ट्रीय सामने खेळला. त्या काळात आंतरराष्ट्रीय सामन्यांत त्यांनी एकूण 400 गोल केले होते. 1956 मध्ये निवृत्तीच्या वेळी ते लष्करात मेजरपदावर होते. त्याच वर्षी भारत सरकारने त्यांना पद्मभूषण हा मानाचा किताब दिला होता. 4 डिसेंबर 1979 रोजी दिल्लीत त्यांचे निधन झाले. 1964 नंतरच्या काळात हॉकीची घसरणच होत राहिली. (अपवाद 1975 चा विश्वचषक विजय आणि मॉस्को ऑलिंपिकमधील सुवर्णपदक) बीजिंग आलिंपिकसाठी हॉकीत पात्रही न ठरण्याची नामुष्की भारतावर ओढवली, तेव्हा ध्यानचंद यांचे मोल सर्वांना उमगले आणि त्यांना भारतरत्न किताब मिळावा अशी जोरदार मागणी होऊ लागली व ती नंतर अधिकाधिक आग्रहाने करण्यात येत आहे.

या स्वातंत्रदिनाच्या निमित्ताने पारतंत्र्याच्या काळातही खेळातील स्वातंत्र्य दाखवणार्‍या भारताच्या या महान खेळाडूचे स्मरण करणे हे प्रत्येक क्रीडाप्रेमीचे कर्तव्यच आहे.