विवाहबाह्य जवळीकता!

विवाहबाह्य संबंधांचे प्रमाण अलीकडे वाढले आहेच. पण त्यातही नात्यातील अशा संबंधांमुळे अधिक चिंता वाढली आहे. अर्थात, स्त्रीच्या बाबतीत केवळ शारीरिक आकर्षण हा मुद्दा विवाहबाह्य संबंधाला कारणीभूत नसतो. तिला जर पतीकडून प्रेम, योग्य वागणूक, आदर, सुरक्षितता मिळत नसेल, कुटुंबातील दुसरा कुणीही पुरुष ही गरज भागवत असेल आणि त्यातून तिला मानसिक तसेच भावनिक समाधान मिळत असेल तर त्यातून असे संबंध निर्माण होतात.

काही प्रकरणांमध्ये घरातील मोठे अथवा वयस्कर पुरुष आपल्या नात्यातील लहान मुली अथवा युवती यांना मानसिक दबाव टाकून, त्यांना मौजमजेला पैसे पुरवून, वेळप्रसंगी विश्वासात घेऊन, गोड बोलून त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करताना दिसतात. लहान मुली अथवा युवती या सगळ्या बाबतीत अतिशय अनभिज्ञ असल्यामुळे, त्यांची शारीरिक मानसिक वाढ पुरेशी झालेली नसल्यामुळे, आपल्यासोबत नेमक काय आणि का होत आहे हेच त्यांना समजत नसते. त्या मोठ्या कालावधीसाठी असा त्रास सहन करत राहतात, पण कुठेही त्याची वाच्यता करीत नाहीत. तर काही ठिकाणी चंगळवाद आणि संबंधित व्यक्तीकडून मिळणारे आर्थिक लाभ यामुळे कमी वयातील मुली आहे त्या परिस्थितीचा आनंदाने स्वीकार करताना दिसतात. अनेकदा कमी वयाच्या मुलींना भीती दाखवून, धमकी देऊन त्यांचा गैरफायदा कुटुंबातील पुरुष मंडळींकडून घेतला जातो.

कुटुंबातील अनेक असे नातेसंबंध आहेत ज्यांना आपण पवित्र मानतो. त्या नात्यात कुठेही अनैतिकता असूच शकत नाही अथवा असायलाच नको, असे एकंदरीत समाजमत असते. तरीही अशा स्वरूपाचे कोणतेही नातेसंबंध उघडकीस आले किंवा त्यातून काही संसार उद्ध्वस्त झाले तर त्याचा दोष महिलांना दिला जातो, महिलेला व्यभिचारी ठरवले जाते. त्या महिलेने कोणत्या परिस्थितीमध्ये, कशा मनःस्थितीमध्ये अथवा का, कोणत्या कारणास्तव असे पाऊल उचलले, तिला नेमकी कोणती अडचण होती, तिला काय अपेक्षित होते यावर कोणीही फारसा विचार करत नाही. परंतु तिच्या या कृत्यामुळे कुटुंबाची इज्जत मानसन्मान कसा धुळीला मिळाला यावरून तिला आयुष्यभर बोलणी ऐकावी लागतात. अशा प्रकारच्या संबंधात महिलांनाच चुकीचे आणि बेजबाबदार अथवा चरित्रहीन ठरवण्याकडे सगळ्यांचा कल असतो असे लक्षात येते.

कुटुंबातच विवाहबाह्य संबंध ठेवण्यासाठी प्राधान्य देणार्‍या स्त्रियांना जेंव्हा समुपदेशन केले जाते तेव्हा हेच जाणवते की पतीपासून त्या ज्या सुखाला वंचित आहेत ते मिळविण्यासाठी त्यांनी असे प्रेम स्वीकारले आहे. याठिकाणी समाज फक्त त्यांच्यातील शारीरिक संबंध अधोरेखित करतो, परंतु अशा महिलांशी बोलल्यावर लक्षात येते की, शारीरिक संबंधांपलीकडेदेखील त्यांच्या अशा काही भावना, अपेक्षा, गरजा आहेत ज्या पतीने कधीही समजून घेतल्या नाहीयेत. पत्नी म्हणून त्या स्त्रीला मिळणारे प्रेम, वागणूक, आदर, सुरक्षितता, काळजी जर कुटुंबातील दुसरा कोणताही पुरुष देत असेल, आणि त्यातून तिला मानसिक भावनिक समाधान मिळत असेल तर त्यात गैर काय, असा सवाल या स्त्रिया करतात. आम्हाला जगण्याचा, सुख उपभोगण्याचा अधिकार नाही का, आम्ही कुठे, कोणाजवळ मन मोकळे करणार, आमच्यासाठी कोणीतरी हक्काचे आहे, वेळप्रसंगी धावून येणारं आहे, आमचं सांत्वन करणारा हक्काचा माणूस आमच्या आयुष्यात आहे, हे आम्हाला जास्त महत्वाचे वाटते.

काही महिलांच्या प्रकरणात त्या तरुण वयातच घटस्फोटिता अथवा विधवा असल्यामुळे, स्वतः कमावत्या नसल्याकारणाने, स्वतःच्या मुलांची जबाबदारी त्यांच्यावर असल्याने, माहेरील किंवा इतर ठिकाणी कोणाचाही हवा तसा भक्कम आर्थिक भावनिक आधार नसल्याने सासरी राहून, अथवा एकट्या राहूनच आपले जीवन नवर्‍याच्या मृत्यूपश्चात जगत असतात. या महिलांना स्वतःचे अस्तित्व टिकवणे, स्वतःच्या मुलांचे संगोपन करणे यासाठी कोणताही पर्याय उपलब्ध नसतो आणि त्यातून आपण चुकतोय किंवा आपण जे करतोय ते नैतिकतेला धरून नाही हे माहिती असूनदेखील अशा संबंधांच्या आहारी गेलेल्या दिसतात.

यामध्ये समोरील व्यक्ती नात्याने आपली कोण लागते याहीपेक्षा ती व्यक्ती चांगल्या वाईट प्रसंगात सुखदुःखात आपल्याला साथ देते आहे हे त्यांच्यासाठी खूप महत्वाचे असते. आपला समाज आजही एकट्या महिलेकडे पाहण्याचा दृष्टिकोन दूषित ठेवतो. त्यामुळे अशा एकाकी आयुष्य जगणार्‍या महिला जर कुटुंबातील कोणी सदस्य त्यांना साथ देत असेल तर ती आनंदाने स्वीकारतात. बाहेरील परक्या पुरुषाने आपला गैरफायदा घेण्यापेक्षा, आपली फसवणूक होण्यापेक्षा आपल्याला, आपल्या मुलांना जर घरातूनच प्रेम, जिव्हाळा मिळत असेल तर त्यात नात्याची मर्यादा का आणावी आणि कुठंपर्यंत एकट्याने आयुष्य काढावे या विचारातून असे धाडस केले जाते.

कुटुंबातील सदस्यांमधील परस्परांशी असलेल्या अनैतिक संबंधांमुळे मानहानी, बदनामी, सुरू असलेला संसार मोडण्याची भीती, सगळ्यांच्या नजरेतून उतरण्याची शक्यता, कायमस्वरूपी काही नातेसंबंध संपुष्टात येण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात असते. पण खूपदा जितके दिवस चालेल तितके चालूदे, जेव्हा कोणाला कळेल तेव्हा बघता येईल असे धोरण ठेऊन हे संबंध काहीठिकाणी केवळ स्वार्थ साधण्यासाठी, तात्पुरत्या मजेसाठीदेखील ठवलेले असतात. अतिशय अल्प कालावधीचा विचार करुन केवळ टाइमपास, थोडा बदल, थ्रिल, कुटुंबातील एखाद्याचा बदला घेणे, एखाद्याचा सुड घेणे, स्वतःचा काही विशिष्ट हेतू साध्य करुन घेणे, प्रॉपर्टी पैसा बळकावण्यासाठीसुद्धा अशा संबंधांचा वापर केला जातो.

जोपर्यंत सर्व गुपचूप आणि सुरळीत सुरू आहे तोपर्यंत ठीक अन्यथा अशा स्वरूपाच्या संबंधात जेव्हा कोणत्याही कारणास्तव वाईटपणा येतो, अशी प्रकरणे गळ्याशी येतात किंवा त्यातून कोणताही गुन्हा, घातपात घडतो किंवा मानसिक क्लेश निर्माण होतो तेव्हा प्रत्येक जण स्वतःचा बचाव करणे, समोरच्याला जबाबदार धरणे, स्वतःची बाजू सावरणे अशीच भूमिका घेताना दिसतात. यामध्ये पण कुटुंबातील इतर सदस्य कोणाची किती साथ देतात, काय भूमिका घेतात, कोणावर किती विश्वास ठेवतात आणि कोणाच्या डोक्यावर या सगळ्याचे खापर फोडतात हा प्रत्येक कुटुंबाचा, प्रत्येकाच्या वैचारिक कुवतीचा वेगवेगळा प्रश्न असतो.

अशा स्वरूपाच्या कुटुंबातील अनैतिक संबंधात गुंतलेल्या व्यक्ती त्यांना या रिलेशनपासून काही त्रास जरी झाला तरी पटकन कुठे दाद अथवा न्याय मागू शकत नाही. जे काही आपल्यासोबत घडतंय किंवा चाललंय ते सहन करण्यापलीकडे कोणताही पर्याय अशा केसमध्ये शक्य नसतो. एकदा अशा चुकीच्या नात्यात अडकल्यावर परत माघारी फिरणे अवघड होऊन जाते. समोरील व्यक्ती तिच्या मर्जीनुसार इच्छेनुसार आपल्याला नाचवू शकते, वेळप्रसंगी आपल्याकडून कोणतेही चुकीचे काम करुन घेऊ शकते अथवा आपला वापर त्याच्या सोयीनुसार करु शकते. याला स्त्री पुरुष कोणीच अपवाद नाही.

शक्यतो आपल्या जोडीदारासोबत ज्या बाबतीत आपले सुर जुळत नाहीत, आवडीनिवडी, स्वभाव जुळत नाहीत त्याच जर कुटुंबातील इतर कोणत्याही सदस्यांशी जुळल्या, विचार जुळले, दोघांचेही वैवाहिक आयुष्य बिनसलेले असले, आपापल्या जीवनसाथीकडून अपेक्षाभंग झालेले असले, तरुण वयात विवाह जमत नसला, अथवा वैवाहिक जोडीदारापासून काही कारणास्तव वेगळं राहावं लागत असेल तर शारीरिक, भावनिक गरजा भागवण्यासाठी कोणत्याही दोन व्यक्तींना जवळ यायला वेळ लागत नाही. त्यातूनच अशा स्वरूपाचे कुटुंबांतर्गत अनैतिक संबंध उदयाला येतात. परंतु अशा प्रकारच्या कोणत्याही संबंधांचे आयुष्य अतिशय अल्प असते आणि त्याला कोणत्याही कायद्याचा, समाजाचा अथवा कुटुंबाचा पाठिंबा अथवा आधार असत नाही. अशा नातेसंबंधांमधून फक्त कुटुंब दुभंगणे, माणसे दुरावणे, अपमान सहन करणे हेच वाट्याला येताना दिसते.

अशा नात्यामध्ये तुम्ही एकमेकांवर किती खरं प्रेम केलं, तुमच्यात किती प्रामाणिकपणा, बांधिलकी होती, एकमेकांना काय दिलं काय घेतलं, एकमेकांसाठी किती त्याग केला, कसले बलिदान दिले, एकमेकांना किती सहकार्य केले, मदत केली, एकमेकांना किती सांभाळलं आणि सावरलं, किती जपलं, जीव लावला, परस्परांच्या आयुष्यातील किती मोठी पोकळी तुम्ही भरून काढली, तुमचा एकत्र येण्याचा उद्देश किती प्रामाणिक, प्रांजल होता अथवा कोणत्या त्रासदायक परिस्थितीमुळे असे नाते निर्माण झाले, याच्याशी सूतराम घेणंदेणं कोणाला नसते. फक्त आणि फक्त अनैतिकता हे एकच लेबल अशा नात्यांना लावलं जातं आणि त्यातून मनस्ताप, पश्चाताप, बदनामी याव्यतिरिक्त हातात काहीही येत नाही. त्यामुळे क्षणिक मोहापायी, अथवा तात्पुरत्या फायद्यासाठी आपल्याच हाताने आपल्या आयुष्याला, आपल्या कुटुंबातील प्रतिमेला, सामाजिक प्रतिष्ठेला तडा जाईल असे कोणतेही कृत्य आपल्याकडून होऊ देऊ नये. अशा स्वरूपाच्या कोणत्याही रिलेशनशिपमध्ये जाताना खूप दूरचा आणि सर्वांगीण विचार, त्याचे चांगले वाईट परिणाम लक्षात घेणे आवश्यक आहे.