घरफिचर्ससारांशमुंबई दर्शन

मुंबई दर्शन

Subscribe

शालेय सहल म्हटलं की वर्गातील सवंगड्यांसोबत एक दिवस मनमुराद बागडण्याची, धम्माल करण्याची सुवर्णसंधी. बाईंनी वर्गात सहलीचा मुद्दा काढताच वर्गातून पहिला प्रश्न यायचा, कुठल्या ठिकाणी जायचे आहे...? उत्तर काहीसे अपेक्षितच. आमची एकदिवसीय शालेय सहल ठरलेली असायची. ती म्हणजे मुंबई दर्शन. आता पुढचा मुद्दा म्हणजे आईवडिलांकडून सहमती पत्रावर सही आणणे अन् दिलेल्या तारखेपर्यंत सहलीचे पैसे भरणे. हे सोपस्कार पार पाडताना जी मज्जा यायची ती औरच...!

–कस्तुरी देवरुखकर

मागच्या लेखामध्ये मी अलिबाग आणि बडोदे या दोन ठिकाणच्या भटकंतीचे वर्णन केले होते. भटकंतीच्या या दुसर्‍या भागात अशाच काही सहलींचे अनुभव कथन करणार आहे.

- Advertisement -

शिर्डीचे साईबाबा आपल्यापैकी बर्‍याच जणांचे श्रद्धास्थान आहेत. त्यायोगे शिर्डीला जाण्याचा योगही आला असेलच. असाच शिर्डीला जाण्याचा योग आम्हालाही आला. हा प्रवासही ट्रेनने करण्याचे ठरले. रात्रीच्या प्रहरी दिवसभराचा आळस झटकून मुंबापुरी पुन्हा नव्याने जागी झाल्यावर आम्ही प्रवासाला निघालो. पहाटे पाचच्या सुमारास शिर्डी स्थानकावर ट्रेन येऊन थांबली. तिथल्या हवेत छानसा गारवा अन् तजेलदारपणा होता. स्थानकाबाहेर पाऊल टाकताच प्रसन्न वाटले.

साई मंदिराजवळील परिसरातच संस्थेद्वारे भक्तनिवास उभारण्यात आले आहे. आम्ही तिथेच मुक्काम करायचे ठरवले. थोड्या विश्रांतीनंतर तयार होऊन मंदिराच्या दिशेने रवाना झालो. साई मंदिरात भाविकांनी नेहमीप्रमाणे गर्दी केली होती. जवळपास अर्धा तास रांगेत उभे राहिल्यावर साईबाबांचे दर्शन मिळाले. बाबांची शांत, प्रसन्न मुद्रा पाहिल्यावर रांगेत उभे राहून आलेला सारा शीण नाहीसा झाला अन् चित्त प्रफुल्लित झाले. तिथल्या वातावरणातच एक प्रकारची सकारात्मक ऊर्जा आहे. त्यामुळे मला नेहमीच मंदिराच्या आवारात आयुष्याचा नवा सूर गवसतो.

- Advertisement -

ही मंदिरं नुसते धार्मिक स्थळ नसून तिथे काम करणारे पुजारी, सफाई कामगार, हार-फुले, प्रसादाची पाकिटे विकणारे व तत्सम पूजेचे साहित्य विकणारे तसेच खेळणी, प्रत्येक प्रकारचे शृंगाराचे साहित्य विकणारे, तिथला स्थानिक मेवा विकणारे दुकानदार उदा. शिर्डीला मनुका, पेरू खूप छान मिळतात. या निरनिराळ्या फळांच्या विक्रेत्यांना रोजगार मिळवून देणारे हे उत्तम ठिकाण असते हे विसरता येणार नाही. शिर्डीच्या बाजारपेठेत फिरताना एखाद्या जत्रेत फिरतोय असा भास होतो. आम्हीही थोडीफार खरेदी केली. साई प्रसादालय जिथे साई संस्थानतर्फे सर्वसामान्यांना परवडेल अशा अत्यल्प दरात भोजन व्यवस्था केलेली आहे, तिथे दोन दिवस भोजनाचा आनंद घेतला. तिसर्‍या दिवशी शिर्डीच्या गुलाबी थंडीची शाल पांघरून स्वगृही परतलो.

भटकंती कोल्हापूरची

कोल्हापूरचा प्रवास म्हणजे माझ्या प्रकृतीला न मानवणारा म्हणजेच चारचाकीचा प्रवास होता, ज्याला इंग्रजीत बाय रोड प्रवास करणे म्हणतात. मी, माझे पती, दीड वर्षाची लहान मुलगी, आई-वडील, बहीण असे सहकुटुंब प्रवासाला निघालो. सर्वांत पहिला मुक्काम थेट कोल्हापूर येथे होता. सुरुवातीला महाराष्ट्राच्या परंपरेनुसार आधी ज्योतिबा डोंगरावर जाऊन महाराष्ट्राचे आराध्यदैवत ज्योतिबांचे दर्शन घेतले. ज्योतिबाच्या नावाने चांगभलंच्या गजरात गुलालाची मुक्त उधळण करीत मंदिराला प्रदक्षिणा घातली. कोल्हापूर शहर म्हटल्यावर नजरेसमोर येते ती जगतजननी कुलस्वामीनी अंबाबाई. श्री महालक्ष्मी मंदिराचे बांधकाम पुरातन असले तरी तितकेच सुंदर अन् मजबूत आहे. मंदिरातील दगडी तटबंदी, चहूदिशांना असलेली प्रवेशद्वारे, दीपस्तंभ, भव्य सभामंडप, गाभारा, जागोजागी दिसणारा शिल्पकलेचा नमुना अन् ह्या सर्वात मंदिराच्या गाभार्‍यात शोभणारी, भाविकांना संकटमुक्त करणारी, आशीर्वाद देणारी लक्ष्मी मातेची अतिशय सुंदर मूर्ती पाहून डोळ्यांचे पारणे फिटते.

आम्ही भक्तिभावाने मातेचे दर्शन घेतले व मंदिराच्या आवारात असलेल्या दुकानातून कोल्हापुरी साज, बांगड्या, कंदी पेढे, गुलकंद बर्फी, कुंदा… अशी मनसोक्त खरेदी केली. दुसर्‍या दिवशी पन्हाळ्यावर भटकंती करायचे ठरले होते. त्याप्रमाणे पन्हाळा किल्ल्यावर जाण्यास सज्ज झालो. तुम्ही महाराष्ट्रातील कुठल्याही गड अथवा किल्ल्यावर जा, आपल्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज व त्यांचे शूरवीर मावळे यांचे अस्तित्व आजही तिथे जाणवते. कारण त्यांच्या कष्टाचे, रक्ताच्या एक एक थेंबाचे शिंपण घेऊन इतिहासाची साक्ष देत ती ऐतिहासिक वास्तू उभी असते. तिथे गेल्यावर विलक्षण मनःशांती लाभली. तिथल्या दगडी भिंतींना स्पर्श केल्यावर अंगात स्फुरण चढते हा अनुभव घेतलेली व्यक्ती आयुष्यात कधी गडकिल्ल्यावर तिथल्या वास्तूचा अपमान होईल असे वर्तन करणार नाही, मात्र तेवढी सद्सद्विवेकबुद्धी अन् अंतरीच्या जाणिवा जागृत व्हायला हव्यात. नाहीतर वरवरचा देखावा करून काय उपयोग…! असो.

पन्हाळ्यावरील काही तास काळजात साठवत तिथून पुढे आम्ही कोल्हापूरमधील बाजारपेठेत खास कोल्हापुरी चप्पल, सुरेख नक्षीदार चादरी आणि अन्य काही वस्तूंची खरेदी करून तिथल्या प्रसिद्ध तांबडा पांढरा रस्स्यांचा आस्वाद घेऊन मुक्कामी परतलो.

भटकंती शालेय सहलींची

शालेय सहल म्हटलं की वर्गातील सवंगड्यांसोबत एक दिवस मनमुराद बागडण्याची, धम्माल करण्याची सुवर्णसंधी. बाईंनी वर्गात सहलीचा मुद्दा काढताच वर्गातून पहिला प्रश्न यायचा, कुठल्या ठिकाणी जायचे आहे…? उत्तर काहीसे अपेक्षितच. आमची एकदिवसीय शालेय सहल ठरलेली असायची. ती म्हणजे मुंबई दर्शन. आता पुढचा मुद्दा म्हणजे आईवडिलांकडून सहमती पत्रावर सही आणणे अन् दिलेल्या तारखेपर्यंत सहलीचे पैसे भरणे. हे सोपस्कार पार पाडताना जी मज्जा यायची ती औरच…! सहलीच्या दिवशी सकाळी सहा वाजता शाळेचा कडक इस्त्री केलेला गणवेश परिधान करून आम्ही शाळकरी मुले शाळेच्या पटांगणात एकत्र जमायचो.

मला अजूनही सहलीचा विषय निघाला की आईने त्या दिवशी डब्यात दिलेली बटाट्याची भाजी अन् गरमागरम पुरी आठवते. त्यावेळी सहलीला जाताना वर्षातून एकदा मला मोठे महागातले चॉकलेट म्हणजे त्यावेळचे वीस ते तीस रुपये किमतीचे चॉकलेट मिळायचे. त्यासोबत सहलीसंदर्भात आईवडिलांच्या सूचना असायच्या त्या वेगळ्याच, तर शिक्षक अन् पालकांच्या सूचनांचा, नियमांचा अल्पोपहार घेतल्यानंतर प्रवासाला सुरुवात व्हायची. मुंबईत म्हणाल तर गेट वे ऑफ इंडिया, राणीची बाग, नेहरू सायन्स सेंटर, नेहरू तारांगण, मत्स्यालय, म्हातारीचा बूट, हँगींग गार्डन, हरे रामा हरे कृष्ण मंदिर… अशा काही ठिकाणांना हमखास भेट दिली जायची. त्या दिवसातील महत्त्वाचा तास म्हणजे जेवणाकरिता मिळालेली सुट्टी.

प्रत्येकाने आईकडून हट्टाने बनवून घेतलेला जेवणाचा खास मेनू एकमेकांसोबत वाटण्यात मोठे सुख असायचे. तो डब्यातला खाऊ चविष्ट लागायचा, कारण त्यात आईच्या मायेचा गोडवा उतरलेला असायचा. दिवसभराच्या भटकंतीत वेळ कसा जायचा ते कळायचेसुद्धा नाही. रात्री शाळेत परतल्यावर शाळेच्या प्रवेशद्वारावर आतुरतेने अन् काहीशी काळजी करीत डोळ्यांत तेल घालून वाट पाहत असणारे आमचे आईवडील नजरेस पडताच मोठा आनंद व्हायचा. कारण सहलीतील गमतीजमती त्यांना सांगायची व ते सांगत असताना लहान भावंडांना चिडवत गप्पा मारायची घाई झालेली असायची.

तर अशी ही भटकंती, आठवणीतील भ्रमंती, कधीही न संपणारी, सुखावणारी अन् जगण्याच्या कक्षा रूंदावणारी…! तुम्हाला कशी वाटली ते जरूर सांगा.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -