रहस्यमय संन्यासी

अमर भारती हे एक अशी व्यक्ती आहेत ज्यांनी त्यांची जिद्द आणि दृढ हेतूमुळे जगाला थक्क केले आहे. तब्बल 48 वर्षांपासून ते एक हात हवेत उंचावून उभे आहेत. पण त्यांनी असे का आणि कोणासाठी केले असावे? अमर भारती हे काही लहानपणापासूनच असे नव्हते. काही वर्षांपूर्वी एक सर्वसामान्य व्यक्ती म्हणून ते आयुष्य जगत होते. ते बँकेत कामाला होते. एके दिवशी अचानक त्यांनी कुटुंब, संसार, नोकरी, मित्र-नातेवाईक हे सगळे सोडून धार्मिक मार्गावर चालण्याचा निर्णय घेतला. त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य भगवान शंकराच्या पायी समर्पित करायचे ठरवले.

जगात सगळीकडेच विविध स्वभावांची माणसे आहेत. काही देवभोळी असतात तर काही अंधश्रद्धाळू, काही माणसे अगदी प्रॅक्टिकल आणि रॅशनल विचार करणारी आणि फक्त विज्ञान आणि लॉजिक मानणारी असतात. जग तंत्रज्ञानाच्या दृष्टीने दिवसेंदिवस पुढे जात आहे. खरंतर त्यामुळे लॉजिकवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणार्‍या व्यक्ती आणि घटनांवर विश्वास ठेवणारी माणसे आता कमी असायला हवीत, पण घडतेय मात्र उलटेच! काही लोक इच्छाशक्तीच्या जोरावर असे काही अचाट करून दाखवतात, की आपल्याला त्यामागचे शास्त्रीय कारण लक्षात येत नाही. याचे एक उदाहरण म्हणजे अमर भारती हे होत. अमर भारती हे एक साधू आहेत. काही लोक त्यांना ऋषी समजतात, तर काही लोक त्यांना रहस्यमय संन्यासी म्हणून ओळखतात.

अमर भारती हे एक अशी व्यक्ती आहेत ज्यांनी त्यांची जिद्द आणि दृढ हेतूमुळे जगाला थक्क केले आहे. तब्बल 48 वर्षांपासून ते एक हात हवेत उंचावून उभे आहेत. पण त्यांनी असे का आणि कोणासाठी केले असावे? अमर भारती हे काही लहानपणापासूनच असे नव्हते. काही वर्षांपूर्वी एक सर्वसामान्य व्यक्ती म्हणून ते आयुष्य जगत होते. ते बँकेत कामाला होते. त्यांचे स्वतःचे पत्नी आणि तीन मुले असे कुटुंब होते. त्यांच्या आयुष्यात तसे सगळे व्यवस्थित सुरू होते. एके दिवशी अचानक त्यांनी कुटुंब,संसार, नोकरी, मित्र-नातेवाईक हे सगळे सोडून धार्मिक मार्गावर चालण्याचा निर्णय घेतला. त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य भगवान शंकराच्या पायी समर्पित करायचे ठरवले.

संन्यास घेतल्यानंतरही अमर भारती यांच्या मनात अशा गोष्टी करण्याची इच्छा होत असे ज्या एखाद्या साधुसाठी किंवा संन्यास घेतलेल्या व्यक्तीसाठी वर्जित आहेत. आपले मन केवळ देवाच्या ठायी असावे आणि इतर कुठलेही विचार मनात येऊ नयेत तसेच भगवान शंकरावरची आपली भक्ती व श्रद्धा अधिक दृढ करण्यासाठी त्यांनी एक हात हवेत उंचावून तो आयुष्यभर तसाच ठेवण्याचा निर्णय घेतला. आपल्याला शाळेत हात वर करण्याची शिक्षा झाली की काहीच वेळात आपले हात दुखू लागत असत. एखाद्या सामान्य माणसाला असा हात हवेत 5 मिनिटंही धरून ठेवणं शक्य नाही, पण अमर भारती यांनी 1973 सालापासून त्यांचा हात असाच हवेत उंचावून ठेवला आहे. तेव्हापासून आजतागायत त्यांनी हात खाली केला नाही. सुरुवातीला हे सोपे नव्हते. त्यांना खूप वेदना होत होत्या. पण त्यांच्या इच्छाशक्तीमुळे त्यांनी त्या सगळ्या वेदनांवर विजय मिळवला. सगळ्या वेदना सहन केल्या.

सुरुवातीची दोन वर्षे त्यांच्या हाताला वेदना जाणवत होत्या, पण त्यानंतर हळूहळू हात इतका बधिर झाला, की त्यांची दुखण्याची भावनाही नाहीशी झाली. त्यांचा हात कायमचा बधिर झाला. आज इतकी वर्षे झाली तरी त्यांचा हात कायमचा हवेतच राहिलाय. आता त्यांना तो हात खाली आणण्याची इच्छा झाली तरीही तसे करणे त्यांना शक्य नाही. हात हवेत उंचावून ठेवण्यामागे अमर भारती यांची शिवाप्रती भक्ती तर होतीच त्याशिवाय दुसरा हेतू म्हणजे समाजहिताच्या भावनेतून जागृत होऊन त्यांनी हा निर्णय घेतला. त्यांच्या मनात जागतिक शांततेची इच्छा आणि युद्धाविरुद्ध भावनाही होती.

एका मुलाखतीत अमर भारती म्हणाले होते की, आपण एकमेकांशी का भांडतो, आपल्यात इतका द्वेष आणि वैर का आहे? सर्व भारतीयांनी शांततेत राहावे अशी माझी इच्छा आहे. किंबहुना, संपूर्ण जगात शांतता नांदावी अशी माझी इच्छा आहे. आज जगातील अनेक लोक अमर भारतींना ओळखतात. काही लोकांनी त्यांच्यासारखे होण्याचा प्रयत्नही केला, परंतु ते अयशस्वी झाले. पण अमर भारती आजही त्यांचा हात पूर्वीप्रमाणेच हवेत उंचावून आहेत. त्यांचा हा रेकॉर्ड मोडणे अजून तरी कुणाला शक्य झाले नाही.

— तन्मय गांगुर्डे