घरफिचर्ससारांशपालकांच्या प्रबोधनाची गरज!

पालकांच्या प्रबोधनाची गरज!

Subscribe

मुलांना आनंदाने बहरू देण्याची गरज असताना शिक्षणाच्या तणावातून होणार्‍या आत्महत्या चिंताजनक आहेत. काल परवापर्यंत उच्च शिक्षणातील विद्यार्थी आत्महत्या करीत होते. आता मात्र शालेय शिक्षणातील विद्यार्थीदेखील आत्महत्या करीत आहेत. शिक्षणाचा मार्ग आनंददायी असतो. असे असताना शिक्षणामुळे आत्महत्या का होतात याचा विचार करण्याची गरज आहे, अन्यथा भविष्य अंधारमय होण्याचा धोका आहे. अंगी असलेल्या क्षमतेपेक्षा विद्यार्थ्यांकडून अधिक अपेक्षा केल्या गेल्या की मनात निराशा घर करते. त्यातून आत्महत्येचा मार्ग अनुसरला जातो. त्यामुळे आता मुलांकडून मोठ्या अपेक्षा बाळगणार्‍या पालकांचे प्रबोधन करण्याची गरज आहे.

नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या अहवालानुसार भारतात दररोज सुमारे साडेतीनशे विद्यार्थी आत्महत्या करीत असल्याचे नमूद करण्यात आले आहे. याचा अर्थ सरासरी दर चार-पाच मिनिटाला एक आत्महत्या होत आहे. विद्यार्थ्यांच्या आत्महत्या या राष्ट्रासाठी आणि समाजासाठी अधिक चिंताजनक आहेत. मुलांची क्षमता, अभिरूची, कल लक्षात न घेता विद्यार्थ्यांवर लादल्या जाणार्‍या अपेक्षा मुलांचे भविष्य उद्ध्वस्त करीत आहेत. मुलांना ज्या वाटेने जायचेच नाही त्या वाटा पालकांना हव्या आहेत. त्यामुळे पालकांच्या अपेक्षांचे ओझे असह्य झाल्याने विद्यार्थी मृत्यूला कवटाळत आहेत. शिक्षण हे आनंदाची वाट निर्माण करण्यासाठी, विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या सुप्तगुणांचा विकास साधण्यासाठी आहे, विद्यार्थ्यांच्या वाटा समृद्ध करण्यासाठी आहे.

या गोष्टी शिक्षणातून साध्य करण्याचे उद्दिष्ट आहे म्हणूनच त्या वाटा आनंद देणार्‍या आहेत. वर्तमानात या वाटेचा प्रवास विद्यार्थ्यांसाठी जीवघेणा ठरू लागला आहे. मुलांना आनंदाने बहरू देण्याची गरज असताना शिक्षणाच्या तणावातून होणार्‍या आत्महत्या चिंताजनक आहेत. काल परवापर्यंत उच्च शिक्षणातील विद्यार्थी आत्महत्या करीत होते. आता मात्र शालेय शिक्षणातील विद्यार्थीदेखील आत्महत्या करीत आहेत. शिक्षणाचा मार्ग आनंददायी असतो. असे असताना शिक्षणामुळे आत्महत्या का होतात याचा विचार करण्याची गरज आहे, अन्यथा भविष्य अंधारमय होण्याचा धोका आहे.

- Advertisement -

अंगी असलेल्या क्षमतेपेक्षा विद्यार्थ्यांकडून अधिक अपेक्षा केल्या गेल्या की मनात निराशा घर करते. त्यातून आत्महत्येचा मार्ग अनुसरला जातो. खरंतर विद्यार्थी जीवनात कोणत्याही प्रकारची निराशा असण्याचे कारण नाही. इतक्या लहान वयात विद्यार्थ्यांच्या वाट्याला भविष्याची चिंता असत नाही. असं असताना विद्यार्थी मृत्यूला कवटाळत आहेत. आपल्या राज्यातही गेल्या काही वर्षांत शालेय विद्यार्थ्यांच्या आत्महत्या वाढत आहेत. विद्यार्थ्यांच्या मनावर असलेले अभ्यासाचे ओझे कमी व्हावे म्हणून सरकारने आपल्या स्तरावर प्रयत्न केले आहेत. त्यानुसार गेली काही वर्षे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाच्या वतीने दरवर्षी जाहीर होणारी गुणवत्ता यादी गेल्या अनेक वर्षांपासून जाहीर करणे थांबवले आहे. गुणवत्ता यादीत येण्यासाठी असलेली एका एका मार्कासाठीची स्पर्धा या निर्णयामुळे थांबण्यास मदत झाली आहे.

ज्या वयात विद्यार्थ्यांनी पायाभूत स्वरूपाचे शिक्षण घेण्याची गरज असते, तेथील शालेय जीवनातील स्पर्धा चिंताजनक आहे. शालेय जीवनात तशी कोणतीच स्पर्धा असता कामा नये. कारण तेथील वयात विद्यार्थ्यांनी फक्त शिकणे महत्त्वाचे आहे. त्या वयात ज्ञानप्राप्तीचा विचार महत्त्वाचा असतो. तेथे विद्यार्थ्यांच्या मनात शिकण्यासाठीची प्रेरणा निर्माण करण्याची गरज असते, मात्र तेथेही मार्कांची स्पर्धा वाढल्याने विद्यार्थ्यांच्या जीवनातील आनंद हिरावला गेला आहे. मार्कांसाठीची स्पर्धा चिंताजनक असल्याने शिक्षण हक्क कायद्यातील कलम २९ अन्वये सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापनाची प्रक्रिया सुरू करण्यात आली. त्या प्रक्रियेद्वारे विद्यार्थ्यांच्या गुणपत्रकावरील मार्कांची संख्या गेली आणि त्यावर श्रेणी आली.

- Advertisement -

गुणपत्रक गेले आणि हाती प्रगती पत्रक आले, मात्र त्यामागील मनोभूमिका समजावून न घेता आपल्या शिक्षणाची स्पर्धा घराघरात कायम राहिली. गुणांची स्पर्धा संपली आणि श्रेणींची स्पर्धा सुरू झाली. जेथे स्पर्धा असते तेथे शिकणे महत्त्वाचे न राहता मार्क महत्त्वाचे ठरतात. मुळात शिक्षणात स्पर्धा निर्माण झाल्याने शिक्षणातील आनंद संपला आहे. अर्थात जेथे स्पर्धा येते तेथे मत्सर, द्वेष आपोआपच येतो. यातूनच असलेली स्पर्धा आपोआप जीवघेणी बनते. विद्यार्थ्यांच्या मस्तकी निराशेची छाया आपोआप दाटून येते. त्यातून विद्यार्थ्यांच्या भविष्याच्या वाटा अधिक अंधारमय बनत जातात. मनात अंधार दाटून आला की विद्यार्थ्यांच्या वाटा चुकतातच. त्याचा दुष्परिणाम समाज व राष्ट्राला भोगावा लागतो. विद्यार्थ्यांच्या मस्तकी अभ्यासाचे ओझे जितके नाही त्यापेक्षा पालकांच्या अपेक्षांचे ओझे अधिक आहे. त्यातून विद्यार्थ्यांच्या विकासाला पोषक ठरणारे खेळ शालेय जीवनातून हद्दपार झाले आहेत. विद्यार्थी मैत्रीतील अनुभवाला पोरके झाले आहेत. जीवनाला आनंदाची वाट दाखविणार्‍या वाटाही कमी होत चालल्या आहेत. त्याचा दुष्परिणाम व्यक्तिमत्त्वावर होत आहे.

पालकांच्या अपेक्षा फार नाहीत, पण ज्या आहेत त्यात प्रतिष्ठा सामावलेली आहे. जेथे मोठे पॅकेज आहे ते अभ्यासक्रम हवे आहेत. त्यातून पाल्याला अभियंता बनवायचे आहे. डॉक्टर बनवायचे आहे किंवा शासकीय सेवेत आयएएस, आयपीएससारख्या सेवेत विद्यार्थी निवडले जातील त्या दृष्टीने पावले पडत आहेत. मुलांना शिक्षणासाठी अत्यंत उच्चत्तम संस्थेमध्ये शिक्षण हवे आहे. आपणाला आपल्या आयुष्यात जे मिळविता आले नाही ते आपल्या पाल्यांद्वारे प्राप्त करण्याचा प्रयत्न पालक करीत असतात. अखिल भारतीय सेवेत निवड व्हावी म्हणून लाखो विद्यार्थी देशभरात प्रयत्न करतात. त्यासाठी लाखो रुपये वेगवेगळ्या शिकवणीला मोजतात, मात्र यश मिळण्याची शक्यता फारच कमी असते. एक लाख विद्यार्थ्यांमध्ये एखादा विद्यार्थी यशस्वी होतो असे साधारण आकडेवारीवरून दिसते. मग एक लाख विद्यार्थी करतात काय? तर केवळ पालकांची इच्छा म्हणून प्रयत्न करतात. पुन्हा पुन्हा प्रयत्न केले जातात आणि अपयश येते तेव्हा विद्यार्थ्याचे वय झालेले असते. हाती एखादी पदवी असते आणि मिळेल ती नोकरी करण्याची वेळ येते. अगदी वैद्यकीय शिक्षणाची अवस्थादेखील तशीच आहे. संपूर्ण देशात लाखभर जागा आहेत. त्याकरिता सुमारे १८ ते २० लाख विद्यार्थी प्रयत्न करतात.

आयआयटीसारख्या नामवंत संस्थेच्या विविध अभ्यासक्रमांच्या सुमारे सतरा हजार जागा आहेत. तेथे प्रवेश मिळावा म्हणूनदेखील १० ते १२ लाख विद्यार्थी परीक्षेला बसतात. यासाठी देशात काही ठिकाणी विद्यार्थी शिकवणीला प्रवेश घेतात. आपल्या राज्यातही यासाठी विशेष शिकवणीसाठी शहरे आणि महाविद्यालये प्रसिद्ध आहेत. कोटा हे तर देशातील शिकवणीचे शहर म्हणून ओळखले जाते. ही शहरे आता कोटीच्या कोटी उड्डाणे घेत आहेत. यातून निर्माण झालेल्या स्पर्धेमुळे कनिष्ठ महाविद्यालये ओस पडू लागली आहेत. पालक केवळ बारावीच्या परीक्षेपुरते प्रवेश ठेवतात आणि शिकवणीच्या गावी विद्यार्थी रात्रंदिवस शिकवणीत शिकतात. अनेकदा पहिल्याच वेळी यश मिळत नाही म्हणून दोन-दोन वर्षे विद्यार्थी त्यासाठी स्वत:ला झोकून देत स्वतःला बंदिस्त करीत अभ्यास करतात. अभ्यास म्हणजे घोकंपट्टीच असते. यात आयुष्यातील महत्त्वाची वर्षे निघून जातात, मात्र पालकांचे स्वप्न पूर्ण करायचे आहे.

काही झाले तरी प्रवेश मिळायला हवा. अगदी येथे नाही मिळाला तर परदेशातून पदवी प्राप्त करू, मात्र त्यातील अनेक विद्यार्थी परदेशी पदवी घेऊन आल्यावर येथे येऊन भारत सरकारची असलेली परीक्षा उत्तीर्ण होत नाहीत. चार वर्षांच्या अभ्यासक्रमासाठी १० ते १५ वर्षे स्वतःला सिद्ध करीत असतात. आयुष्यातील महत्त्वाची वर्षे वाया जातात याचे दुःख त्या विद्यार्थ्याला असतेच, मात्र केवळ पालकांची इच्छा म्हणून प्रवास सुरू राहतो. अनेकदा पालकांच्या अपेक्षा पूर्ण करता येत नसल्याने विद्यार्थी स्वतःचा प्रवास कायमस्वरूपी थांबविण्यासाठी मृत्यूला कवटाळतात. या शिकवणीच्या शहरातील आत्महत्येचा आलेख समजावून घेण्याची गरज आहे. पालकांच्या अपेक्षांचे ओझे असेच वाढत जाते ते केवळ विद्यार्थ्यांच्या भविष्याच्या चिंतेपोटी. आपल्या विद्यार्थ्यांच्या आयुष्यात अधिक चांगले दिवस यावेत ही अपेक्षा. ही अपेक्षा पूर्ण करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे पैसा आहे ही धारणा असल्याने जेथे मोठे पॅकेज तिकडच्या अभ्यासक्रमासाठी स्पर्धा निर्माण केली जाते. त्या अभ्यासक्रमाला प्रवेशासाठी पालकांचा आग्रह असतो.

पालकांचा आनंद ज्यात असतो त्यात पाल्यांचा असेलच असे नाही. मुलांचे आयुष्य आणखी काही वेगळे असते. त्यांना वेगवेगळ्या आनंदाच्या वाटा हव्या असतात. कोणाला तरी उत्तम चित्र काढायची असतात, कोणाला गायचे असते, कोणाला वाद्य वाजवायचे असते, कोणाला कवी तर कोणाला लेखक व्हायचे असते, कोणाला क्रीडा क्षेत्रात करिअर करायचे असते. खरंतर प्रत्येक आवडीच्या क्षेत्रात विद्यार्थ्याला यश मिळवता येते. पैसा हा त्याच्या आयुष्याला हवा तितका मिळवता येणे महत्त्वाचे नाही तर त्यापलीकडे आनंद मिळणे महत्त्वाचे असते. पैसा कितीही मिळवला तरी आनंद मात्र कितीही पैसा ओतला तरी मिळवता येत नाही. त्यामुळे जीवनाचे यश पैशांत न मोजता आनंदात मोजायला शिकल्याशिवाय आपण विद्यार्थ्यांच्या आत्महत्या रोखू शकणार नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणाबरोबर पालकांचे प्रबोधन महत्त्वाचे आहे. जीवनात शिक्षणामधून आनंदाच्या वाटा निर्माण करता येण्याची गरज आहे. त्याशिवाय आपल्याला मानवी विकासाचा निर्देशांकदेखील उंचावता येणार नाही आणि आत्महत्या थांबणार नाहीत.

–(लेखक शिक्षण क्षेत्राचे अभ्यासक आहेत)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -