घरफिचर्ससारांशनव्या काळाची नवी सप्तपदी!

नव्या काळाची नवी सप्तपदी!

Subscribe

दोन जीवांचा संगम म्हणजे लग्न. हा संगम टिकवण्यासाठी आपल्याला दोघांमधला समतोलही राखावा लागतो. हा समतोल कसा राखावा यासाठी वर्षानुवर्षे आपल्या लग्न पद्धतीमध्ये सप्तपदी किंवा सात वचनांना खूप महत्त्व आहे. तरी प्रश्न पडतो सप्तपदी आणि सात वचने घेऊनसुद्धा खरंच ही वचने आपल्याकडून पूर्ण होतात का? किंवा आपण त्या वचनांप्रमाणे वागतो का? या सात वचनांमधून नवरा आणि बायको या दोघांनीही संसार करताना काय करावं, कसं वागावं या सूचनांबरोबरच वचनबद्ध होऊन त्याचं कसं पालन करावं याविषयी सांगितलं आहे, पण आताचा हा जमाना वेगळा आहे किंवा आपण असं म्हणून शकतो की ती सात वचनं ही आताच्या काळाशी मिळती-जुळती असावीत म्हणजे मग संसाराची घडी व्यवस्थित बसते. तर चला जाणून घेऊया नव्या काळाची नवी सप्तपदी काय असावी.

–संकेत शिंदे

पहिला फेरा, वचन पहिलं
मी दिलेलं पाहिलं वचन : आयुष्यात जेव्हा चढउतार, सुख-दु:ख अशी परिस्थिती येईल तेव्हा तू माझा हात घट्ट धरून ठेव. जर तू या सगळ्या प्रसंगामध्ये माझ्या सोबत असशील, तर आयुष्यातली सगळी संकटं मी दूर करू शकेन. जर तू मला सोडून गेलीस तर मात्र मी स्वत:चा तोल सांभाळू शकणार नाही. म्हणून नेहमीच माझी ताकद बनून माझ्यासोबत राहा. मीही तुझ्या प्रत्येक सुख-दुःखात तुझ्या पाठीशी नाही तर सोबत उभा असेन.

- Advertisement -

तिने दिलेलं पहिलं वचन : तू माझ्या भावनांना जर समजू शकलास, तर मला येणार्‍या अडथळ्यांवर मात करता येईल आणि मी स्वत:ही एक मोठी उंची गाठू शकेन. एकमेकांचा हात हातात धरून आपण जीवनाची एकमेकांच्या भावनांचा सन्मान आणि स्वीकार खुल्या मनाने करूया.

दुसरा फेरा, वचन दुसरं
मी दिलेलं दुसरं वचन : आयुष्यात जर कधी अशी वेळ आली की त्यावेळी तुला असं वाटेल की माझं आपल्या नात्याकडे लक्ष नाही किंवा पहिल्यासारखं मी तुझ्याशी वागत नाही, प्रेम व्यक्त करीत नाही असं जेव्हा तुला वाटेल तेव्हा माझ्यावर संशय घेण्यापेक्षा तू मला विश्वासात घेऊन याबद्दल सांगशील आणि त्यावर चर्चा करून आपण आपल्या नात्यातल्या वाईट गोष्टींना लांब करू. मी कायम तुझ्याशी एकनिष्ठ राहीन.

- Advertisement -

तिने दिलेलं दुसरं वचन : मीही इतर पुरुषांशी बोलले किंवा त्यांच्याशी मैत्री केली तर तुही माझ्याकडे संशयाच्या नजरेने न पाहता माझ्याकडे एक माणूस म्हणूनच पाहशील. जर काही चुकल्यास माझ्या चारित्र्यावर बोट दाखवून मला सतत स्वत:च्या धाकात ठेवणार नाहीस. मीदेखील कायम तुझ्याशी एकनिष्ठ राहीन.

तिसरा फेरा, वचन तिसरं
मी दिलेलं तिसरं वचन : कधी माझ्याकडची संपत्ती कमी झाली आणि मी तुझी हौसमौज पुरवू शकलो नाही तरीही तू धीराने माझ्यावर विश्वास ठेवून त्या काळात माझ्यासोबत राहशील. माझा तिरस्कार करून, कमीपणा देऊन किंवा बिनकामी समजून माझी मानहानी करणार नाहीस.

तिने दिलेलं तिसरं वचन : संसार करताना मला काही येत नसेल, चुका होत असतील तर त्यावर तू मला चारचौघात न सुनावता एकांतात समजवशील. माझ्या चुका दाखवून मला मारणं किंवा शिवीगाळ न करता मला आदर आणि सन्मानपूर्वक घरात नांदवशील.

चौथा फेरा, वचन चौथं
मी दिलेलं चौथं वचन : मला माहीत आहे तू तुझ्या करियर, भविष्याबाबत खूप स्वप्न रंगवली आहेस. माझ्यासारखा तू आणि तुझ्याही आईवडिलांचा तुझ्या करियर, स्वप्नांमध्ये महत्त्वाचा वाटा आहे. म्हणून तुझ्या करियरमध्ये मी कधी अडथळा आणणार नाही. घरातल्या कामामध्ये मी तुझी मदत करेन. तुला तुझी स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी नेहमीच हजर राहीन.

तिने दिलेलं चौथं वचन : मला माहीत आहे तुझ्यावर आर्थिक भार मोठा आहे. म्हणून तू नोकरीत व्यस्त असताना मी घरात सर्वांची काळजी घेईन. तू वेळ देत नाहीस म्हणून तुझ्याकडे तक्रार न करता तुला समजून घेईन. हे घर आता आपलं आहे म्हणून त्याची जबाबदारी केवळ तुझी नाही तर माझीदेखील आहे.

पाचवा फेरा, वचन पाचवं
मी दिलेलं पाचवं वचन : मला माहीत आहे तुला तुझ्या घरी कशाचीच कमी झाली नाही म्हणून माझंही कुटुंब तुला कशाची कमी पडू देणार नाही. तुला आम्ही खूश ठेवू, पण जर कधी नकळत कोणाकडून तुझ्या मनाला ठेच लागली तर तू त्या गोष्टीला मनाला लावून घेऊ नकोस. ती गोष्ट विश्वासाने सांग आणि तुझ्या काय अपेक्षा आहेत हेदेखील मांडण्याचं स्वातंत्र्य तुला असेल. कारण नात्यात मोकळीकता असेल तर आपण उत्तम पद्धतीने संसार फुलवू. तू माहेरी जशी आनंदात, मोकळेपणाने वावरत होतीस तशीच इथेही राहशील.

तिने दिलेलं पाचवं वचन : सासर आणि माहेर ही दोन वेगवेगळी घरं न समजता मी तुझ्या माणसांना माझं करून घेईन. माझ्या आईवडिलांप्रमाणे त्यांनाही माझं चुकल्यास मला ओरडण्याचा आणि योग्य मार्ग दाखवण्याचा अधिकार असेल. माझी कुठली गोष्ट तुला आवडली नाही तर नक्कीच मोकळीकतेने मला तू सांगू शकतोस.

सहावा फेरा, वचन सहावं
मी दिलेलं सहावं वचन : प्रत्येक व्यक्ती ही वेगळी असते. माझ्या कुटुंबातले सदस्य तुझ्या कुटुंबापेक्षा वेगळे असतील, पण या दोघांमध्ये तुलना न करता तू नक्कीच त्यांना आपलंस करशील. आपल्या मैत्रिणीच्या नवर्‍याशी माझी तुलना करणं तू टाळावं. माझ्या आईची आणि तुझी तू तुलना करणार नाहीस. तुम्ही दोघीही माझ्या अत्यंत जवळच्या आहात.
तिने दिलेलं सहावं वचन : आपल्या दोघांच्याही कुटुंबांचे स्वभाव, राहणीमान वेगळे असेल. म्हणून तू माझ्या सवयी, राहणीमान यात तुलना करणार नाहीस. आपल्या आईशी प्रत्येक गोष्टीत माझी तुलना करणार नाहीस.

सातवा फेरा, वचन सातवं
मी दिलेलं सातवं वचन : आपल्या घरी जर काही चुकीचं झालं तर तू त्या गोष्टीविषयी बाहेर न सांगता घरात चर्चा करशील. आपले घरातले प्रश्न समजून तू घरातल्या व्यक्तीशी विश्वासाने बोलशील. मीही तुझं म्हणणं ऐकून घेईन. तुझी वेळोवेळी सोबत करेन.

तिने दिलेलं सातवं वचन : माझी काही चूक झाली तर तू त्या चुकांचा पाढा माझ्या माहेरी न वाचता माझ्याशी बोलून त्या चुकांवर प्रकाश टाकशील. आपल्या घरातल्या चांगल्या-वाईट गोष्टी मी माझ्याकडे सुरक्षित ठेवेन. शेवटी आता आपलं घर आहे म्हणून ज्याने आपल्या घराचा मान कमी होईल असं मी कोणाला काही सांगणार नाही. घरातल्या गोष्टी घरात ठेवेन.

माझ्या मते आजच्या मॉडर्न सप्तपदी या असाव्यात. कारण या आपल्या काळाशी अगदी मिळत्याजुळत्या तर आहेतच, पण या वचनांची आज प्रत्येक जोडप्याला आपल्या वैवाहिक जीवनात गरजही आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -