घरफिचर्ससारांशआईचं दूध होतंय विषारी!

आईचं दूध होतंय विषारी!

Subscribe

खरंतर आईचं दूध हे बाळासाठी जीवन संजीवनी असतं. तिच्या दुधातूनच ते जडत आणि घडत असतं. रोगप्रतिकारशक्ती याच दुधातून त्याला मिळते. त्यामुळे आईचे दूध हे बाळासाठी आवश्यक नाही तर अत्यावश्यक असल्याचे डॉक्टर सांगतात. यामुळे ज्या बाळांना आईचं दूध मिळत नाही अशा बाळांसाठी मिल्क बँकाही उभ्या राहिल्या आहेत, पण याच दुधात विषारी रसायने सापडत असल्याने अनेक स्तनदा मातांनाही धक्का बसला आहे. आईच्या दुधात सापडलेली रसायने ही प्रामुख्याने भाज्या आणि पिकांवर मारण्यात आलेल्या कीटकनाशकांचेच सूक्ष्म कण आहेत, असे दिसून आले आहे. त्यामुळे आरोग्य क्षेत्रासमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.

–कविता जोशी-लाखे

महिनाभरापूर्वी पब्लिक लायब्ररी ऑफ सायन्सच्या जर्नल प्लॉस वनमध्ये एक अहवाल छापण्यात आला होता. या अहवालाने संपूर्ण जगात खळबळ उडवली. कारण या अहवालात एका रुग्णाच्या बायपास सर्जरीदरम्यान करण्यात आलेल्या  तपासण्यांमध्ये त्याच्या रक्तकोषिकांमध्ये चक्क मायक्रोप्लास्टीक आढळले होते. त्यावर संशोधन सुरू असतानाच अजून एक अशीच धक्कादायक बाब समोर आली. उत्तर प्रदेशमधील महाराजगंज येथे १० महिन्यांत १११ बालकांचा गूढ आजाराने मृत्यू झाल्याचे समोर आले. यावरून देशभरात खळबळ उडाली. त्यावर लखनऊ येथील क्विन मेरी हॉस्पिटलने मृत बालकांच्या आईच्या दुधात कीटकनाशक सापडल्याचा दावा केला.

- Advertisement -

तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार आईच्या दुधात सापडलेले कीटकनाशक हे प्रामुख्याने भाज्या आणि इतर पिकांवर मारण्यात आलेल्या कीटकनाशकांचेच सूक्ष्म कण आहेत. जनावरांना दूध जास्त यावे यासाठी देण्यात येत असलेले सप्लिमेंट आणि वजन वाढण्यासाठी कोंबड्यांना देण्यात येणार्‍या रासायनिक इंजेक्शनच्या माध्यमातून हे कीटकनाशक महिलांच्या दुधात जात आहेत. हेच दूध नवजात बालके पित असल्याने बाळाला जन्मताच आपण दूध नाही तर स्लो पॉयझन पाजत आहोत, असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे. लखनऊमधील या घटनेने खरंतर वैद्यकीय क्षेत्रासमोर मोठे आव्हान उभे केले आहे. ज्या डॉक्टरांनी दुधात कीटकनाशक असल्याचे समोर आणले त्यांचे नाव डॉ. अब्बास अली मेहंदी आणि डॉ. नैना द्विवेदी, डॉ. सुजाता देव आहे. या संशोधनासाठी त्यांनी १३० महिलांवर सर्वेक्षण केले. यावेळी प्रसूतीसाठी आलेल्या महिलांच्या कॉर्ड ब्लडमध्ये कीटकनाशकांचे प्रमाण अधिक वाढल्याचे समोर आले. त्यानंतर हे कीटकनाशक महिलांच्या दुधापर्यंत पोहचले आहे का हे पाहण्यासाठी या चमूने दुधाचे परीक्षण केले. त्यानंतर आईच्या रक्तातच नाही तर दुधामध्येही कीटकनाशक असल्याचे निदर्शनास आल्याने संशोधकही चक्रावले.

विशेष म्हणजे नवजात बाळाच्या आरोग्यावर या कीटकनाशक असलेल्या दुधाचा लगेचच परिणाम होत नाही, तर जेव्हा बाळ पाच ते सहा वर्षांचे होते त्यावेळी या कीटकनाशकांचा त्याच्या शरीरावर, अवयवांवर दुष्परिणाम दिसू लागतो. कारण या कालावधीमध्ये कीटकनाशकांमध्ये वापरण्यात आलेली घातक रसायने हळूहळू स्लो पॉयझनप्रमाणे मुलांच्या शरीरात पसरत असतात. त्यामुळे त्यांचे गंभीर परिणाम हे तात्काळ दिसत नाहीत. तसेच शाकाहारी महिलांच्या तुलनेत मांसाहारी महिलांच्या दुधात मोठ्या प्रमाणावर कीटकनाशक आढळल्याचा खुलासा तज्ज्ञांनी केला आहे. २०२१ मध्येही एका वैद्यकीय मासिकात आईच्या दुधात विषारी द्रव्य सापडल्याचा दावा करण्यात आला होता. जी विषारी द्रव्ये आईच्या दुधात सापडली होती त्याचा वापर हा प्रामुख्याने फूड पॅकेजिंग, कपड्यांवर पडलेले डाग घालवण्यासाठी करण्यात येत असल्याचे समोर आले होते. या कीटकनाशकांमुळे मुलांची वाढ तर खुंटतेच, शिवाय आईच्या गर्भात वाढणार्‍या भ्रूणात अनेक दोष निर्माण होतात.

- Advertisement -

खरंतर आईचं दूध हे बाळासाठी जीवन संजीवनी असते. तिच्या दुधातूनच ते जडत आणि घडत असते. रोगप्रतिकारशक्ती याच दुधातून त्याला मिळते. यामुळे आईचे दूध हे बाळासाठी आवश्यक नाही तर अत्यावश्यक असल्याचे डॉक्टर सांगतात. यामुळे ज्या बाळांना आईचं दूध मिळत नाही अशा बाळांसाठी मिल्क बँकाही उभ्या राहिल्या आहेत, पण याच दुधात विषारी रसायने सापडत असल्याने अनेक स्तनदा मातांनाही धक्का बसला आहे. ब्रेस्ट मिल्क बँकांमध्येही आता कोणी येईनासे झाले आहे. काही केसेसमध्ये तर बाळाला थेट औषधे न देता आईच्या माध्यमातून दिली जातात. जेणेकरून तिच्या दुधातून ती बाळाच्या शरीरात जातात. त्यामुळे आईचे दूध बाळासाठी नवसंजीवनी असले तरी ते आता जीवघेणे ठरण्याचीच शक्यता वाढली आहे.

निसर्ग नियमानुसार गर्भावस्थेचे नऊ महिने ते प्रसूतीनंतरचे नऊ महिने बाळ आईशी जोडले गेलेले असते, पण दुधात सापडणार्‍या कीटकनाशकांमुळे आता मुलांना अंगावर पाजा, हा सल्ला देणंही डॉक्टरांसाठी कठीण झालं आहे. २००५ सालीही अशाच काही गोष्टी समोर आल्या. त्यावेळी चार मातांनी एकत्र येत मेक अवर (मॉम्स) मिल्क सेफ नावाची संघटना सुरू केली. ही संघटना महिलेच्या गर्भावस्थेपासून प्रसूतीपर्यंत त्यांना सुरक्षित खानपान द्यायची, पण काळानुसार सगळं बदलत गेलं आणि मॉम्सचं कामही मागे पडलं. आज अशा संघटना कुठे आढळत नाहीत. खरंतर मॉम्ससारख्या संघटनांची गरज आज प्रामुख्याने आहे.

डॉक्टर द्विवेदी यांनी केलेल्या संशोधनानंतर आपण जे काही खातोय पितोय त्यात घातक रसायनांचा मारा होत आहे हे स्पष्ट झालं आहे, पण ही घातक रसायने वापरणार्‍यांवर कुठलीच कारवाई झालेली नाही. कीटकनाशक न वापरलेल्या ऑरगॅनिक फळभाज्या खाणं सामान्यांना परवडणारे नाही. मग यातून मध्यम मार्ग कसा काढायचा यावर ना सरकार दरबारी चर्चा झडत आहे, ना जनतेमध्ये. यामुळे आई होणार्‍या मातांनाच जागरूक राहून स्वत:चा आहार जपायचा आहे. तज्ज्ञ आणि डायटिशियनच्या मदतीनेच आता खावं-प्यावं लागणार आहे. बाजारात मिळणार्‍या भाज्या, फळे विकत न घेता स्वत:च्या घरातच भाज्या उगवायचे दिवस आता आले आहेत.

–(लेखिका आपलं महानगरच्या सहाय्यक संपादक आहेत)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -