घरफिचर्ससारांशतयारी फॅशन शोची...

तयारी फॅशन शोची…

Subscribe

फॅशन शोसाठी तयारी करताना आपण आधी ड्रेस कुठल्या प्रकारचे असावेत? किंवा चालणं कसं असावं? याविषयीदेखील बघितलं. तसं आजच्या लेखामध्ये मी फॅशन शोचा विषय काय असावा यावर माहिती देणार आहे. थोडक्यात सांगायचं म्हणजे उदाहरणार्थ जर आपण फॅशन शोचा विषय घेतला की आपल्याला काही गोष्टी हातात घेऊन चालायचे आहेत किंवा त्याला प्रॉप्स म्हणतात. प्रॉप्स घेऊन चालायचं असेल, तर ते कशा प्रकारचे पाहिजे? किंवा एखाद्या सणानुसार फॅशन शो करायचा असेल तर तो कसा असावा? त्याप्रमाणे भारतीय परंपरेचा फॅशन शो असावा म्हणजे नेमकं काय असावं? असे एक काय अनेक विषय यासाठी निवडले जातात आणि त्यापैकी एखादा विषय नक्की करून त्या विषयानुसार पुढील गोष्टी ठरवल्या जातात.

-अर्चना दीक्षित

तर मग आपण इव्हेंटविषयी किंवा एखाद्या कार्यक्रमाविषयी बोलताना फॅशन शो हा विषय घेतला आहे. आधीच्या काही लेखांमध्येही मी याविषयी नमूद केले आहे, तर त्याच विषयाला अनुसरून मी पुढे माझं लिखाण चालू ठेवते. आजचा विषय आहे की फॅशन शोचा विषय काय असावा? फॅशन शो हा एक खूप मोठा विषय आहे. त्याला कुठल्याही प्रकारची मर्यादा नाही, पण फॅशन शोसाठीदेखील एखादा विषय जेव्हा आपण निवडतो, त्यामुळे त्या विषयानुसार तयारी करून घेणं खूप सोपं जातं. जसं आपण आधी ड्रेस कुठल्या प्रकारचे असावेत? किंवा चालणं कसं असावं? याविषयीदेखील बघितलं. तसं आजच्या लेखामध्ये मी फॅशन शोचा विषय काय असावा यावर माहिती देणार आहे.

- Advertisement -

थोडक्यात सांगायचं म्हणजे उदाहरणार्थ जर आपण फॅशन शोचा विषय घेतला की आपल्याला काही गोष्टी हातात घेऊन चालायचे आहेत किंवा त्याला प्रॉप्स म्हणतात. प्रॉप्स घेऊन चालायचं असेल, तर ते कशा प्रकारचे पाहिजे? किंवा एखाद्या सणानुसार फॅशन शो करायचा असेल तर तो कसा असावा? त्याप्रमाणे भारतीय परंपरेचा फॅशन शो असावा म्हणजे नेमकं काय असावं? असे एक काय अनेक विषय यासाठी निवडले जातात आणि त्यापैकी एखादा विषय नक्की करून त्या विषयानुसार पुढील गोष्टी ठरवल्या जातात.

कारण आपण आधीच्या लेखात बघितल्याप्रमाणे जी मेंटर असते तिला हा विषय माहिती असण्याची खूप गरज असते. कारण त्यानुसार तिच्या मॉडेल्सकडून किंवा त्या सौंदर्य स्पर्धेतील सहभागींकडून काम करून घेणार असते, त्यांना तसे शिकवणार असते. त्यामुळे तिला एकदा तो विषय माहिती असला तसेच बर्‍याचदा तिच्या सहमतानेच हे विषय ठरवले जातात, जेणेकरून तिला पुढील कार्य सोपे करता येते.

- Advertisement -

तर एकदा का हा विषय ठरला, तर यातला आता आपण एखादं उदाहरण घेऊन हा विषय पुढे करूयात. तर उदाहरण द्यायचं झालं तर प्रॉप्स किंवा हातात एखादी गोष्ट घेऊन जाणे तर हे प्रॉप्स काय असावेत किंवा प्रॉप्स म्हणजे नेमकं काय, तर प्रॉप्स म्हणजे रंगमंचाची सामुग्री. तर काय सामुग्री आपण हातात घेऊन चालू शकतो? किंवा काय दाखवू शकतो? इतरांना आपल्याला काय दाखवायचे? यावर आधी विचार करावा लागतो. म्हणजे जर आपण भारतीय परंपरा ठेवली तर त्या परंपरेमध्येदेखील अनेक गोष्टी आहेत, ज्या आपण रंगमंचावर घेऊन जाऊ शकतो आणि त्यांचे सादरीकरण योग्य प्रकारे करू शकतो.

म्हणजे आता एवढेच बघा ना जर आपण भारतीय परंपरेतील एखादी नवीन नवरी दाखवणार असू तर ती एका डोलीमध्ये बसून जाते. तर आता बसून जाते असेही करू शकतो की तिला उचलून नेण्यात येऊ शकतं, पण ते थोडे फॅशन शोच्या दृष्टीने अवघड जातं. म्हणून मग एखादी मोठी डोली तयार करून ती स्त्री कशी चालू शकते आणि कशी स्टेजवर वावरू शकते यावर लक्ष द्यावे लागते. ती डोली जड तर होणार नाही ना? ती स्टेजवर कुठून कुठे तिला चालायचं आहे? आणि तेवढं ती चालू शकते की नाही? या सगळ्याचा विचार त्या मेंटर किंवा त्या शिक्षिकेला करावा लागतो. हे झालं डोलीचं उदाहरण.

इतर सामुग्रीचा जर विचार केला तर एखादा मोठा आरसा म्हणून आपण तो जर घेऊन जायचं झाला तर तो कसा घेऊन जाऊ शकतो? किंवा त्याला कसं सजवू शकतो? की जो आकर्षकही दिसला पाहिजे आणि त्या मॉडेलला घेऊन जायला सोपाही झाला पाहिजे. अशा एक काय अनेक सामुग्रींचा आपण विचार करू शकतो. एवढेच काय तर पशूपक्षी यांच्यादेखील आकृत्या बनवून आपण सादर करू शकतो, पण त्या नुसत्याच आकृत्या घेऊन जाण्यापेक्षा त्यांना कशा प्रकारे सजवून आणि कशा प्रकारे तुम्ही लोकांपुढे सादर करता यावर खूप भर द्यायला लागतो. ते घेऊन चालताना कुठल्या प्रकारच्या अडीअडचणींना सामोरे जावे लागेल याचादेखील विचार करावा लागतो.

मागे एकदा असंच एका फॅशन शोमध्ये एका सौंदर्यवतीला डोली घेऊन जायचा प्रकार झाला होता, पण तो खूपच चांगल्या प्रकारे त्याचं सादरीकरण झालं. हो हो, सांगते ना कसं काय ते आणि त्यात काय विशेष असेही तुम्हाला वाटेल, पण खरं सांगायचं म्हणजे तिला नुसतं डोली घेऊन जायचं नव्हतं, तर गोव्याला एका जहाजावर, जहाजावरच्या डेकवर तिला ही डोली घेऊन चालायचं होतं. संध्याकाळची वेळ होती, वाराही सुटला होता.

तर अशा परिस्थितीत मेंटरचे कर्तव्य होतं की तिला किंवा तिची जी मॉडेल आहे तिला ती कसं योग्य प्रकारे मार्गदर्शन करते आणि शिवाय तिची मॉडेल आहे, तिची सौंदर्यवती आहे, ती त्याचं सादरीकरण कसं करते? हा खूपच सगळ्यांना मोठा प्रश्न होता, पण त्यातदेखील न डगमगता चेहर्‍यावर पूर्णपणे आत्मविश्वास ठेवून ती जी सौंदर्यवती होती, तिने त्याच पद्धतीने जसं फॅशन शोमध्ये आपण कॅटवॉक हे म्हणतो तसंच चालून त्याचं सादरीकरण केलं. तर हे त्या मेंटरबरोबर त्या सौंदर्यवतीचादेखील त्यात खूप मोठा हातभार आहे. तर मी म्हटलं त्याप्रमाणे रंगमंचावरील सामुग्री घेऊन कसा चालू शकतो यावर खूप लक्ष द्यायला लागतं. हे झालं सामुग्री घेऊन चालायचं कसं हे शिकणं.

दुसरं म्हणजे हे सगळं करतानाच किंवा हे सगळं केल्यानंतर एक प्रश्न उत्तर याचा राऊंड असतो आणि त्यासाठी कसं तयार करायचं किंवा कसं उभं राहायचं याचीदेखील एक पद्धत असते. स्टेजवर उदाहरणार्थ जर पाच महिला किंवा सौंदर्यवती उभ्या असतील, तर त्यांनी कसं उभं राहायला पाहिजे? एक जण बोलत असेल तर बाकीच्यांनी काय पोजमध्ये उभे राहावं याचा अगदी बारकाव्याने विचार करावा लागतो. तेदेखील त्यांना शिकावं लागतं. बोलताना एखादी काव्यात्मक सुरुवात करून मग तुम्हाला तुमचं नाव आणि तुमच्या आवडीनिवडी याविषयी बोलायचं असतं आणि त्यानंतर समोर बसलेल्या पाहुण्यांसमोर याचे सादरीकरण करायचे असते.

बर्‍याचदा काय होतं बोलताना आपले शब्द किंवा काही अक्षरं हे तोंडातल्या तोंडात उच्चारले जातात. तर ती अक्षरंदेखील प्रत्येक अक्षर किंवा प्रत्येक शब्द हा कसा स्पष्ट असावा हेदेखील शिकावे लागते बरं का. तुम्हाला वाटेल ह्या काय छोट्या छोट्या गोष्टी आहेत, पण याच छोट्या छोट्या गोष्टींपासून मोठ्या गोष्टी आपल्याला आयुष्यात मिळत असतात, तर प्रत्येक शब्द आणि प्रत्येक अक्षर कसं स्पष्ट येईल, त्यासाठी काय करावे लागते, कुठली पद्धत सोपी आहे हे शिकवलं जातं.

अगदी थोडक्यात उदाहरण सांगायचं झालं तर आपल्या तोंडात एक पेन धरून मग बोलायची प्रॅक्टिस करायची. गंमत वाटते ना हे वाचताना पण खरं आहे हे. जेव्हा तुम्ही करून बघता तेव्हा सुरुवातीला थोडंस ओशाळल्यासारखंदेखील होत, पण जेव्हा याचा जास्तीत जास्त आपण उपयोग केला किंवा प्रयोग केला तर त्याचा नक्कीच आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात उपयोग होतो. कारण जेव्हा आपले अक्षर किंवा शब्द स्पष्ट होतात त्यावेळेस ते समोरच्यापर्यंत पोहचायला खूप उपयोग होतो आणि त्याचा प्रभावही वेगळाच असतो. म्हणून वाटताना छोटी गोष्ट असली तरी त्याचा प्रभाव हा खूप मोठा असतो हे लक्षात घेऊन आपल्यामधील हे बदल घडवणे तितकेच महत्त्वाचे असते.

आधीच प्रश्नांची यादी तुम्हाला दिली जाते. जेव्हा तुम्हाला स्टेजवर उभे राहायचे असते त्यातील एक किंवा फार फार तर दोन प्रश्न विचारले जातात, पण तरीदेखील त्याआधी मिळालेल्या यादीनुसार सगळ्या प्रश्नांची तयारी तुम्हाला करावी लागते. कारण त्यातला कुठला प्रश्न विचारला जाईल हे तुम्हाला माहिती नसतं. बर्‍याचदा तुम्ही हजरजबाबी असणं खूप महत्त्वाचं असतं. तुम्ही वेळेवर कसे बोलता? कसं स्वत:ला सादर करता हे बारकाव्याने बघितले जाते. शिवाय तुमचं समाजातील स्थान काय? तुम्ही समाजासाठी काय करू शकता? या गोष्टींकडेदेखील बारकाव्याने लक्ष असतं बरं का.

तुम्ही मनापासून बोलत आहात का? खरोखर तुमच्या प्रश्नाचं उत्तर व्यवस्थित देताय हेदेखील ते ओळखून असतात. म्हणूनच कुठले उत्तर देताना योग्य विचार करून उत्तर देणं जास्त बरोबर आहे. ही प्रश्न उत्तरं झाल्यानंतर तुम्ही परत मागे वळून कसे उभे राहता हेही महत्त्वाचं असतं. तुम्ही इतर प्रतिस्पर्ध्यांशी कसे वागतात? कसे बोलतात? त्यांचा मान ठेवता की नाही? या बारीक बारीक गोष्टी या पूर्ण काळात बघितल्या जातात. म्हणूनच तर म्हणते ना या सगळ्याचा खूप बारकाव्याने अभ्यास करावा लागतो. खूप बारकाव्याने ह्या सगळ्या गोष्टी शिकाव्या लागतात.

मागच्या लेखामध्ये मी चालण्यासाठी काही छोट्या छोट्या टिप्स दिल्या होत्या, तर या लेखामध्ये मी बोलणे कसे सुधारावे याविषयीदेखील थोडक्यात सांगितले आहे. त्या दृष्टीने योग्य ती तयारी करूनच या स्पर्धेत उतरा, असं मी नक्कीच तुम्हा सगळ्यांना सांगेन.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -