शेती विकासात महिलांचे योगदान

शेती उत्पादन वाढीसाठी शेतकरी आज मोठ्या प्रमाणावर काबाडकष्ट करतात आणि शेती विकासासाठी प्रयत्न करतात. शेतीमधील विविध कामांमध्ये पुरुष शेतकर्‍यांच्या तुलनेने महिला शेतकर्‍यांचे प्रमाण कमी दिसते. महिला शेतकर्‍यांना सर्वसाधारणपणे शारीरिक श्रमाची कामे मोठ्या प्रमाणावर दिली जातात, पण महिलांच्या ठायी असणारी निर्णयक्षमता तसेच विविध गुणांचा वापर करून घेऊन शेती विकास केला म्हणजेच शेती क्षेत्रातील महत्त्वाच्या समजल्या जाणार्‍या निर्णय प्रक्रियेत महिलांना महत्त्वाचे स्थान दिले तर कृषी उत्पादनात त्याने वाढ होण्यास मदतच होईल.

–प्रा. कृष्णा शहाणे

जिच्या हाती पाळण्याची दोरी ती राष्ट्राला उद्धरी, या उक्तीप्रमाणे स्त्रीशक्तीमध्ये राष्ट्राचा उद्धार करण्याचे प्रचंड सामर्थ्य आहे. अशा महिला शक्तीने आपल्या कौशल्याचा वापर कोणत्याही क्षेत्रात केला तर त्यातून त्या क्षेत्राच्या विकासास मदतच होते. आज कोणत्याही क्षेत्रात महिला मागे नाहीत. विविध क्षेत्रातील अनेक प्रगतीची शिखरे महिलांनी पादाक्रांत केली आहेत. या महिला शक्तीने आपल्या अंगभूत गुणांचा वापर कोणत्याही क्षेत्रात केल्यास त्या क्षेत्राच्या विकासाला एक नवीन दिशा प्राप्त होते. भारतीय अर्थव्यवस्थेचा विचार करता शेती, उद्योग आणि सेवा या तीन क्षेत्रांचा विकास हा देशाच्या आर्थिक विकासासाठी महत्त्वाचा आहे. यातील सर्वच क्षेत्रात महिलांचा सहभाग हा आर्थिक विकासाला वेग प्राप्त करून देणारा ठरतो. आज अनेक क्षेत्रात महिला वर्ग कार्यरत आहे, पण त्यांची संख्या वाढणे महत्त्वाचे आहे. म्हणजेच महिलांच्या अंगी असणार्‍या विविध गुणांचा उपयोग वस्तू आणि सेवांच्या उत्पादनात होऊन त्यातून राष्ट्रीय विकासाला हातभार लागण्यास अथवा आर्थिक विकासाची चाके अधिकाधिक गतिमान होण्यास मदत होईल.

निर्णयक्षमता – शेती उत्पादन वाढीसाठी शेतकरी आज मोठ्या प्रमाणावर काबाडकष्ट करतात आणि शेती विकासासाठी प्रयत्न करतात. शेतीमधील विविध कामांमध्ये पुरुष शेतकर्‍यांच्या तुलनेने महिला शेतकर्‍यांचे प्रमाण कमी दिसते. महिला शेतकर्‍यांना सर्वसाधारणपणे शारीरिक श्रमाची कामे मोठ्या प्रमाणावर दिली जातात, पण महिलांच्या ठायी असणारी निर्णयक्षमता तसेच विविध गुणांचा वापर करून घेऊन शेती विकास केला म्हणजेच शेती क्षेत्रातील महत्त्वाच्या समजल्या जाणार्‍या निर्णय प्रक्रियेत महिलांना महत्त्वाचे स्थान दिले तर कृषी उत्पादनात त्याने वाढ होण्यास मदतच होईल.

प्रभावी नियोजन – कुठल्याही कामामध्ये यशप्राप्तीसाठी आवश्यक असते ते प्रभावी नियोजन किंवा नियोजन क्षमता. घरगुती वातावरणात किंवा घरातील कामकाजात महिला या कौशल्याने सर्व कामाचे नियोजन करून सर्व कामे यशस्वी करतात. तेच नियोजन कौशल्य जर महिलांनी शेती क्षेत्रात वापरले तर त्यातून शेती विकासासाठी मदत होईल. शेती क्षेत्रातील नियोजनाचा विचार केला तर उपलब्ध जमीन, लागवडीलायक जमीन, पाण्याची व विजेची उपलब्धता, पैसा, भांडवल यांची उपलब्धता, श्रमशक्तीची उपलब्धता, कोणत्या पिकाचे उत्पादन घ्यावे याविषयीचे नियोजन महिला चांगल्या प्रकारे करू शकतात. त्याने शेतीच्या विकासासाठी मदतच होईल.

चिकाटी – महिलांच्या अंगी चिकाटी हा महत्त्वाचा गुण मोठ्या प्रमाणावर असतो. शेतीतील अनेक कामामध्ये उत्पादन प्रक्रिया, वस्तू बाजारपेठेत नेणे, विक्री या सर्वच प्रक्रियेमध्ये चिकाटी ठेवणे महत्त्वाचे आहे. काही शेती आदानाची उदा. पाणी, वीज व इतर यांची उपलब्धता वेळेवर न झाल्यास त्यावर चिकाटीने मात करता येते. त्यावर पर्याय शोधण्यासाठी काही वेळ निघून जातो आणि याच वेळेमध्ये चिकाटी फायदेशीर ठरते.

वेळेचा सदुपयोग – अनेक महिलांनी मोठ्या प्रमाणावर चांगुलपणाचा ध्यास घेतलेला असतो. हा चांगुलपणाचा ध्यास त्यांनी शेती क्षेत्रात घेतला तर शेती उत्पादकतेत मोठ्या प्रमाणावर वाढ होण्यास मदतच होते. वेळेचा सदुपयोग करण्याचे कौशल्य अनेक महिलांमध्ये चांगल्या प्रकारे असते. ते घरातील अनेक कामकाजांमध्ये आपणास दिसून येतेच. याच कौशल्याचा वापर त्यांनी शेती क्षेत्रामध्ये केल्यास वेळ, पैसा, पाणी, वीज इतर शेती आदाने यांचा चांगला किंवा पुरेपूर वापर करता येतो. त्यालाच पर्याप्त वापर असेही म्हणतात. त्यामुळे विविध शेती आदानांचा पर्याप्त वापर करून शेती उत्पादनाची महत्तम पातळी गाठणे सहज शक्य होते. ज्याच्या आधारे कोणत्याही कृषी आदानाचा अपव्यय न होता त्यातील अधिकाधिक क्षमतेचा वापर हा प्रत्यक्ष कृषी विकासासाठी होण्यास मदत होते.

अभ्यासू प्रवृत्ती – अनेक महिलांमध्ये अभ्यासू प्रवृत्ती मोठ्या प्रमाणावर दिसून येते. अगदी शालेय जीवनापासून किंवा अभ्यासापासून ही अभ्यासू प्रवृत्ती दिसून येते. मेरीटमध्ये येणार्‍या विद्यार्थ्यांमध्ये मुलींची संख्या मुलांच्या संख्येपेक्षा किंचित तरी जास्त दिसून येते. याच अभ्यासूपणाचा वापर महिलांनी शेती विकासासाठी केल्यास त्याने उत्पादकतेत भर पडण्यास मदतच होईल. उदा. कोणते बियाणे वापरावे, कोणते खत वापरावे, मशागत कशी करावी, निंदणी कोणत्या वेळी करावी, कोणत्या रोगावर किती प्रमाणावर कोणते औषध फवारावे, कापणी केव्हा करावी, पिकाची साठवणूक, पॅकिंग, प्रतवारी कशा प्रकारे करावी, तसेच कोणत्या बाजारपेठेत वस्तू कोणत्या वेळेस पाठवल्यास महत्तम किंमत प्राप्त होईल या आणि यांसारख्या इतर अनेक निर्णयांसाठी अभ्यास किंवा संशोधन किंवा सातत्याने येणारा अनुभव फायदेशीर ठरत असतो. अशा वेळी या अभ्यास प्रवृत्तीच्या जोरावर महिला या सर्व गोष्टींचा योग्य तो निर्णय घेऊ शकतात. त्याने शेती उत्पादकतेत वाढ तर होईलच, पण उत्पादित शेतमालाला महत्तम किंमत मिळण्यासदेखील मदत होईल.

ममता/मातृत्व – ममता अथवा मातृत्व ही महिलांना प्राप्त अद्वितीय देणगी आहे. अनेक मोठमोठी कामे या ममतेमुळे चांगल्या पद्धतीने पार पडतात. ममतेमुळे अथवा मातृत्वामुळे महिला आपल्या बालकाला चांगल्या प्रकारे संस्कार देतात. आपल्या अपत्याला जगात उपयोगी पडेल असे विचार, विविध जीवनोपयोगी अनेक गोष्टी ममतेने शिकवल्यामुळे आयुष्यभर उपयोगी पडणार्‍या गोष्टी चांगल्या प्रकारे शिकता येतात.

खिलाडू प्रवृत्ती – खिलाडू प्रवृत्तीच्या जोरावर महिला वर्ग आपल्या आयुष्यात प्रगतीची अनेक शिखरे पादाक्रांत करतात. खिलाडू प्रवृत्तीचे संस्कार आपल्या अपत्त्यांवर लहानपणापासून करतात. त्यामुळे आयुष्यात लहान-मोठे अपयश आल्यास त्यावर मात करून कसे पुढे जायचे याची शिकवण मिळते. त्यामुळेच आपल्या व्यावसायिक जीवनात निराशा न येता प्रगती करता येते. व्यक्ती कोणत्याही क्षेत्रात कार्यरत असली तरीदेखील त्याला खिलाडू प्रवृत्तीचा आपल्या प्रगतीसाठी उपयोग होतोच.

वक्तशीरपणा – महिला वर्गात वक्तशीरपणा हा गुण अत्यंत मोठ्या प्रमाणावर दिसून येतो. या वक्तशीरपणाचा केवळ महिलांनाच नव्हे तर संपूर्ण कुटुंबाला प्रगतीसाठी उपयोग होतो. तसेच एखाद्या आस्थापनाच्या प्रमुखपदी महिला असेल तर त्या संपूर्ण आस्थापनाच्या प्रगतीसाठीदेखील उपयोग होतो. शेती, उद्योग आणि सेवा या आपल्या अर्थव्यवस्थेच्या प्रगतीसाठी या वक्तशीरपणाचा उपयोग होतो.

शिस्तप्रियता – महिलांच्या अंगी असणार्‍या शिस्तप्रियतेमुळे कोणत्याही क्षेत्रातील उद्योग व्यवसाय प्रगती साध्य करतो. शिस्तप्रियतेमुळे कोणतेही काम वेळेच्या आत अथवा योग्य त्या वेळी करण्याची प्रवृत्ती वाढीस लागते. काय योग्य, काय अयोग्य याची शहानिशा करता येते. वेळेचे आणि त्या कामाचे महत्त्व समजते. कामाचे नियोजन केले जाते. त्या कामाला असणारे महत्त्व आणि आपण त्या कामाला देत असणारे महत्त्व याची तुलना करता येते. त्यामुळे खरोखर महत्त्वाच्या कामाला महत्त्व दिले जाते आणि महत्त्व नसणार्‍या कामावर वेळ खर्च केला जात नाही. आयुष्यात आपण कोणत्याही क्षेत्रात काम करा, पण आपण आपले काम शिस्तबद्ध रितीने केले तर ते काम कमीत कमी वेळेत आणि कमीत कमी खर्चात चांगल्या प्रकारे होते. या महत्त्वाच्या गुणामुळे अंगीकृत क्षेत्रात यश प्राप्त होते आणि आर्थिक विकासासाठी हातभार लागतो.
संसाधनांचा पर्याप्त वापर – कोणत्याही घटकाचा अथवा संसाधनांचा पर्याप्त अथवा पुरेपूर वापर कसा करायचा यावर त्या कामाचे यश अवलंबून असते. संसाधनांचा पर्याप्त अथवा पुरेपूर वापर कसा करायचा याचे ज्ञान महिला वर्गाला मोठ्या प्रमाणावर असते. आपल्याकडे उपलब्ध असणारी साधनसंपत्ती चांगल्या प्रकारे वापरली तर त्या साधनांचा अपव्यय न होता वस्तू व सेवांचे उत्पादन मोठ्या आणि चांगल्या प्रकारे होऊ शकते. त्यातून त्या प्रकल्पाच्या यशासह राष्ट्राचा आर्थिक विकास होत असतो.

काटकसरीपणा – आवश्यकतेपेक्षा कमी खर्च करणे म्हणजे कंजूसपणा होय आणि आवश्यकतेइतका खर्च करणे म्हणजे काटकसर होय. आपण करीत असणारा खर्च हा जेवढा आवश्यक आहे तेवढाच करणे होय. या गुणामुळे आपल्या पैशांचा उत्पादनक्षम कार्यास चांगल्या प्रकारे उपयोग होतो. काटकसरीपणा हा गुणदेखील महिला वर्गात चांगल्या प्रकारे दिसून येतो. काटकसरीपणा हा केवळ पैशांचाच असावा असे नाही तर पैशांबरोबरच वेळ, उत्पादनाची साधने, आपल्याकडील इतर संसाधने यांच्या बाबतीत ही काटकसरी प्रवृत्ती असल्यास आपण केलेल्या कोणत्याही गोष्टीच्या खर्चाचा अधिकाधिक उत्पादक पद्धतीने वापर होतो. त्यातून आपल्याबरोबरच देशाचा विकास होण्यास मदत होते.

बचतीची प्रवृत्ती – आपल्या आस्थापनाच्या यशासाठी बचतीची प्रवृत्ती हा गुण मोठ्या प्रमाणावर कार्य करतो. बचतीची प्रवृत्ती हा महत्त्वाचा गुण महिला वर्गाकडे मोठ्या प्रमाणावर असतो. बचत म्हणजे आपल्याकडील असणारा अतिरिक्त पैसा बँकेत ठेवणे की जेणेकरून त्यावर आपल्याला व्याज मिळेल. अशा प्रकारे बचतीची प्रवृत्ती मोठ्या प्रमाणावर असल्यास त्यातून चार पैशांचे उत्पन्न प्राप्त होते तसेच भविष्यात आस्थापनाच्या आर्थिक प्रगतीसाठी पैसा अथवा भांडवलाची तातडीने आवश्यकता निर्माण झाली तर हा पैसा वापरता येतो. तांत्रिक प्रगतीचा स्वीकार करण्यासाठीदेखील या बचतीच्या रकमेचा वापर करता येतो.

गुणवत्तेची कास धरणे – महिला वर्ग हा गुणवत्तेच्या बाबतीत अत्यंत जागरूक असतो. आपल्या हातातील काम अत्यंत चांगल्या प्रकारे पूर्ण करण्याकडे त्यांचा कल असतो. त्यात कोणत्याही प्रकारे गुणवत्तेशी तडजोड त्या करीत नाहीत. अधिकाधिक चांगली अथवा गुणवत्तापूर्ण वस्तू व सेवांचे उत्पादन कशा रीतीने करता येईल याकडे त्यांचा नेहमीच कल असतो. सर्वच प्रकारच्या कार्यात गुणवत्तेची कास धरल्यामुळे उत्तमोत्तम वस्तू आणि सेवांचे उत्पादन होण्यास मदत होते. त्यातून देशाच्या आर्थिक विकासास हातभार लागण्यास मदत होते.

नम्रता – सामाजिक वातावरण असो अथवा कौटुंबिक वातावरण असो, नम्रता अंगी बाणल्यास अथवा नम्रतेने व्यवहार केल्यास अनेक अडचणी कमी होतात. आपल्या कार्यातील अडचणी कमी झाल्यास आपण करीत असणार्‍या कार्यात मोठ्या प्रमाणावर यश मिळते. नम्रतेमुळे आपल्या आसपास असणार्‍यांचे आपल्याला सहकार्य मिळत जाते. नम्रता हा गुण महिला वर्गाकडे मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे आपल्या अंगीकृत कार्यात यश प्राप्त होण्यास मदत होते.

नेतृत्व क्षमता – आपल्या घरातील जबाबदारी नीट सांभाळून सामाजिक आणि व्यावसायिक जबाबदार्‍या महिला चांगल्या प्रकारे पार पाडतात. त्या केवळ आपल्याच फायद्याचा विचार करीत नाहीत तर आपल्याबरोबर आपल्या सहकार्‍यांच्या फायद्याचादेखील विचार करतात. किंबहुना स्वत:चा फायदा एकवेळ झाला नाही तरी चालेल पण आपल्यावर ज्यांनी विश्वास ठेवला आहे त्याला तडा जाऊ नये यासाठी आपला नाही तर आपल्या सहप्रवाशांचा फायदा होणे महत्त्वाचे आहे ही प्रवृत्ती महिलांमध्ये असते. त्यामुळे त्यांच्या ठायी चांगल्या प्रकारे नेतृत्वगुणांचा विकास होतो.

त्यागवादी प्रवृत्ती – आपल्याला जास्तीत जास्त नफा मिळवण्यासाठी अथवा अवास्तव नफा मिळवण्याकडे महिलांचा कल दिसून येत नाही. योग्य तो नफा मिळवणे जेणेकरून वस्तू खरेदी करणार्‍या घटकाला त्याचा त्रास होणार नाही अशी मानसिकता महिला वर्गाची असल्याचे दिसून येते. कुणाचे नुकसान होऊ नये किंवा आपल्या वस्तूच्या विक्रीच्या मोबदल्यात प्रमाणापेक्षा जास्त नफा घेऊन समोरच्याचे आर्थिक शोषण करण्याची प्रवृत्ती महिलांमध्ये नसते. यालाच त्यागवादी प्रवृत्ती असे म्हणतात. यातून देशाच्या विकासाला हातभार लागतो.

संस्कृतीचे संवर्धन – आपल्या अंगीकृत क्षेत्रात प्रगती करताना आपल्या संस्कृतीला सोडून प्रगती करणे याविषयी महिला वर्गाला चीड असते. म्हणजेच ज्या ज्या गोष्टी न्याय्य आहेत, योग्य आहेत, चांगल्या आहेत, त्या गोष्टींच्या आधारे आपल्या अंगीकृत क्षेत्रात महिला प्रगती करताना दिसतात. म्हणजेच अन्यायकारक, अयोग्य, वर्ज्य अशा मार्गाने प्रगती साध्य करण्याच्या विरुद्ध महिला वर्ग दिसून येतो. आपल्या कार्यातून संस्कृतीचे संवर्धन करताना महिला वर्ग दिसून येतो. यातून मानवी संसाधनांचा विकास होतो आणि त्यातून राष्ट्रीय विकासाची चाके गतिमान होण्यास मदत होते.

महिला वर्गात वरीलप्रमाणे तसेच इतर अनेक गुण मोठ्या प्रमाणावर असतात. यांसारख्या गुणांच्या जोरावर आपल्या अंगीकृत क्षेत्रात महिला विजयश्री संपादन करतात. त्यामुळे त्यांच्या परिवाराबरोबरच सामाजिक आणि देशाचा आर्थिक विकास होण्यास मदत होते. आजच्या सामाजिक रचनेत महिला वर्गावर होणारे अन्याय कमी होऊन त्यांच्या अंगी असणार्‍या विविध गुणांचा उपयोग आपल्या कौटुंबिक आणि राष्ट्राच्या विकासासाठी कशा रीतीने करता येईल याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. यासाठी महिलांचे शिक्षण, आरोग्य, सुपोषण, सामाजिक सुरक्षा, उत्पन्न, वडिलोपार्जित मालमत्तेतील हिस्सा अशा सर्वच बाबतीत सकारात्मक दृष्टिकोनातून पाहणे गरजेचे आहे. यासाठी आवश्यकता आहे ती समाजाची मानसिकता बदलण्याची.

–(लेखक अर्थतज्ज्ञ आहेत)